तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

IMG_8473

आजची दुसरी पोस्ट आहे तिळगुळाचे मऊ लाडू आणि गूळपोळीची.

हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात. सामान्यपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आमच्याकडे मराठवाड्यात आणि विदर्भातही तिळकुटाचे लाडू केले जातात. हा मऊ पण खुसखुशीत लाडू अप्रतिम लागतो. आज मी याच लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात. तीन किलो तीळ आणि जवळपास अडीच ते पावणेतीन किलो गुळाचे मिळून! तुम्हीही एकदा या पध्दतीनं लाडू करून बघा, खा आणि नक्की कळवा कसे झाले होते ते.

तिळगुळाचे मऊ लाडू

साहित्य – १ किलो पॉलिश न केलेले तीळ, पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ किसून, १-२ टीस्पून जायफळ

कृती –
१) तीळ कढईत घालून मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ चांगले तडतडायला लागले आणि खमंग वास यायला लागला की तीळ भाजले गेले असं समजा. तीळ लाल झाले पाहिजेत पण काळे होता कामा नयेत.
२) तीळ थंड करायला ताटात काढून ठेवून द्या.
३) तीळ कोमट झाले की मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घ्या.
४) नंतर हे जाडसर कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ पूड हातानं मस्त एकजीव करा.
५) हे मिश्रण परत थोडंथोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी लगदा करू नका, थोडंसं जाडसरच (माझी आई ओबडधोबड म्हणते!) ठेवा.
६) नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात लाडू वळा.

इतक्या मिश्रणात मध्यम आकाराचे ६०-६५ लाडू होतात. किलोभर करायचे नसतील तर वाटीनं मोजून करा. साधारणपणे १ वाटी तीळ असतील तर पाऊण वाटी गूळ असं प्रमाण घ्या.
जायफळ ऐच्छिक आहे. नाही घातलंत तरी चालेल, मला आवडतं म्हणून मी घालते. तीळ कोमट असताना कूट केलंत तर तिळाला जास्त तेल सुटतं म्हणून कोमट असतानाच कूट करा. या लाडवांना वरून अजिबात तेल किंवा तूप लागत नाही कारण तिळामध्ये भरपूर तेल असतं. हे लाडू अप्रतिम लागतात कारण एकतर यात पॉलिस न केलेले तीळ वापरले आहेत शिवाय केमिकल विरहीत गूळ. करून बघा आणि कसे झाले होते तेही कळवा.

आजची दुसरी रेसिपी आहे गूळपोळीची.

गुळाची पोळी आज मी केवळ तुमच्या आग्रहामुळे बनवली आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की ती मस्तच झाली आहे. यापूर्वी मी कधीही गुळाची पोळी करायच्या भानगडीत पडले नव्हते. So thanks to you all!

गुळाची पोळी

IMG_8519

साहित्य –
वरच्या पारीचं साहित्य – ३ वाट्या कणीक, अर्धी वाटी मैदा, १ टेबलस्पून डाळीचं पीठ, २ टेबलस्पून तेल
सारणाचं साहित्य – २ वाट्या गूळ (मऊ किसून घेतलेला), १ वाटी तिळाची भाजून केलेली पूड, अर्धी वाटी बेसन (तेलावर खमंग भाजून घ्या), २ टीस्पून जायफळ पूड
पोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी

कृती –
पारीची कृती –
१) कणीक, मैदा, डाळीचं पीठ एकत्र करून ते मैद्याच्या चाळणीनं बारीक चाळून घ्या.
२) तेल कडकडीत गरम करून त्याचं मोहन या पिठात घाला.
३) आधी कोरडंच नीट एकत्र करा. नंतर पाणी वापरून घट्ट भिजवा.
४) एक तास बाजूला ठेवून द्या.

सारणाची कृती –
१) सारणासाठीचं सगळं साहित्य एकत्र करून चांगलं मळून त्याचा गोळा करा.
२) तेही एक तास बाजूला ठेवून द्या.

पोळीची कृती –
१) पु-यांना घेतो तसे दोन गोळे घ्या.
२) त्याच गोळ्यांच्या आकाराचा जरा मोठासा सारणाचा गोळा घ्या.
३) दोन पु-यांच्या मध्ये सारण दाबून भरा.
४) त्यांच्या कडा चांगल्या दाबून घ्या. आणि तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घ्या.
५) जर सारण शेवटपर्यंत पोचलं नसेल तर सरळ कडा कापून घ्या (माझी आपली सोपी युक्ती!)
६) नॉनस्टिक तव्यावर हलक्या हातानं दोनदाच उलटत पोळी भाजा.
७) पोळी भाजताना प्रत्येक वेळेला तवा पुसून घ्या.

इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या दहा पोळ्या होतात.

तेव्हा करून बघा आणि दोन्ही पदार्थ कसे झाले होते ते आवर्जून कळवा.  सोशल नेटवर्किंगवर पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

7 thoughts on “तिळगुळाचे लाडू आणि गूळपोळी

  1. मी नक्की करून पाहिल ताई तुमच्या पध्दति ने मी नागली डोसा केला मस्त झाला आता या पुढ़े नेहमी करणार

    Like

  2. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मऊ तीळाचे लाडू वळले..
    छान जमले…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: