तर आजची ही पहिली पोस्ट आहे धुंदुरमासाच्या जेवणाची. म्हणजेच भोगीला केल्या जाणा-या स्वयंपाकाची. ही पोस्ट गेल्या वर्षीचीच आहे. नवीन लोकांसाठी परत पोस्ट करते आहे. गेल्या वर्षी भोगीच्या भाजीचे फोटो काढलेले नव्हते ते आज मुद्दाम काढून शेअर करते आहे.
आज धुंदुरमासाचा शेवटचा दिवस, भोगी. महाराष्ट्रात भोगीला खास जेवण केलं जातं. याला धुंदुरमासाचं जेवण असंही म्हणतात. हे जेवण खरंतर सकाळच्या पहिल्या प्रहरात, अगदी उजाडताना करायचं असतं. माझी काकू आता नाही. पण मला आठवतं. माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेला गरोदर असताना माझ्या काकूनं मला धुंदुरमासाचं डोहाळे-जेवण केलं होत. सकाळी-सकाळी केळीच्या पानावर, बाजरीची तीळ लावलेली भाकरी, लोण्याचा गोळा, तिळाची चटणी, मिसळीची भाजी, टोमॅटोचं सार आणि गरमागरम मूगडाळीची खिचडी. त्या जेवणाची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. माझ्या या काकूनंच मी लहान असताना मला खिडकीत बसवून भरवलं होतं.
संक्रात हा सुगीच्या काळात येणारा सण. शिवाय थंडीच्या मोसमातला सण. म्हणूनच भोगीच्या जेवणात मुक्त हस्ताने तीळ वापरले जातात. बाजरीच्या भाकरीला तीळ लावतात, मिसळीच्या भाजीत तीळ किंवा तिळाचं कूट घातलं जातं, तिळाची चटणी तर असतेच, टोमॅटोच्या सारातही तिळाचं कूट घालतात आणि तिळगुळाचे लाडू तर आहेतच. आयुर्वेदात तीळ उष्ण मानले जातात म्हणून ते या दिवसात खायचे असं म्हणतात. मला तर तीळ वर्षभर खायला आवडतात. आज मी धुंदुरमासाच्या जेवणातल्या पदार्थांच्या रेसिपीज शेअर करणार आहे.
मिसळीची भाजी किंवा भोगीची भाजी
साहित्य – १ वाटी मोडलेला श्रावण घेवडा किंवा वालाच्या शेंगा, १ वाटी वांग्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, १ वाटी गाजराचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, प्रत्येकी पाव वाटी तुरीचे, हरभ-याचे आणि मटारचे कोवळे दाणे, २ वाट्या बारीक चिरलेली मेथी, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, प्रत्येकी १ टीस्पून धणे-जिरे पूड, १ टीस्पून का-हळाची पूड (ऐच्छिक), २ टीस्पून तीळ, बोराएवढा गूळ, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी – १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद
कृती –
१) एका कढईत तेल कडकडीत गरम करून खमंग फोडणी करा. त्यात तीळ घालून तडतडू द्या.
२) नंतर त्यात गाजराचे आणि वांग्याचे तुकडे घाला. झाकण ठेवून पाच मिनिटं एक वाफ येऊ द्या.
३) नंतर त्यात श्रावण घेवड्याच्या शेंगा घाला. परत पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
४) मग त्यात सगळे दाणे घाला, चिरलेली मेथी घाला.
५) नीट मिसळून घेऊन त्यात तिखट, मीठ, काळा मसाला, धणे-जिरे पूड, का-हळाची पूड, गूळ घाला. नीट हलवून घ्या.
६) कढईवर झाकण घाला. झाकणावर थोडं पाणी ठेवा म्हणजे भाजी खाली लागणार नाही.
७) भाजी चांगली शिजेपर्यंत मधूनमधून हलवत रहा.
८) भाजी मऊ शिजली की गॅस बंद करा.
मिसळीची भाजी तयार आहे.
टोमॅटोचं सार
साहित्य – ४-५ टोमॅटोंचा रस, २ टोमॅटो मध्यम आकारात चिरलेले, २ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून तिळाचा कूट, १-२ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, फोडणीला १ टेबलस्पून तेल किंवा तूप, थोडं जिरं, पाव चमचा हिंग
कृती –
१) पातेल्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरं घालून तडतडू द्या.
२) नंतर त्यात हिंग घाला, लगेचच मिरची आणि कढीपत्ता घाला.
३) मिरची परतली गेली की टोमॅटोचे तुकडे घालून परता. मंद गॅसवर झाकण घालून पाच मिनिटं ठेवा.
४) आता त्यात टोमॅटोचा रस घाला. परत झाकण ठेवून ५-७ मिनिटं किंवा टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवा.
५) नंतर त्यात जितपत जाड-पातळ हवं असेल त्याप्रमाणात पाणी घाला. तिखट, मीठ, साखर, तिळाचा कूट घाला.
६) गॅस मोठा करून चांगली उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून दोन मिनिटं उकळा.
टोमॅटोचं सार तयार आहे.
भोगीची खिचडी
साहित्य – १ वाटी बारीक तांदूळ (शक्यतो आंबेमोहोर, नसल्यास इतर कुठलाही), १ वाटी मूग डाळ, प्रत्येकी दीड टीस्पून धणे-जिरे पूड, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून खोवलेलं खोबरं, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून तेल, थोडी मोहरी, हिंग, पाव टीस्पून हळद, ६ वाट्या पाणी
कृती –
१) खिचडी करण्याआधी तासभर डाळ-तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी काढून निथळायला ठेवा.
२) खिचडी करताना एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.
३) दुस-या पातेल्यात तेल घालून गरम करा. मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला.
४) जरासं परतून धुतलेले डाळ-तांदूळ घाला. चांगलं परता. आता त्यात दही घालून परता.
५) चांगलं परतलं गेलं की त्यात आधणाचं पाणी ओता. तिखट, मीठ, काळा मसाला, धणे-जिरे पूड घाला.
६) चांगली उकळी येऊ द्या. नंतर त्यात खोबरं-कोथिंबीर घाला. नीट मिसळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
७) खिचडीतलं पाणी आटत आलं की पातेलं तव्यावर ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर खिचडी अगदी मऊ शिजेपर्यंत शिजवा.
इतकं जेवण साधारणपणे चार माणसांसाठी पुरेसं होईल.
या जेवणाबरोबर अर्थातच बाजरीची तीळ लावलेली भाकरी, लोण्याचा गोळा, तिळाची खमंग चटणी घ्यायलाच हवी. आणि हो खिचडीवर, मस्त कढवलेलं ताजं तूपही. तेव्हा धुंदुरमास संपला असला तरी तुम्ही हे जेवण करून बघा आणि नक्की कळवा कसं झालं होतं ते.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
हा धनुर्मास . सूर्य धनुराशीत .
LikeLike
Thanks Tai
LikeLike
🙂
LikeLike
टोमॅटो सार मधला टोमॅटो रस म्हणजे काय ? कसा करायचा ?
LikeLike
पातेल्यात पाणी उकळायचं. गॅस बंद करून त्यात टोमॅटो घालायचे. झाकण ठेवायचं. पंधरा मिनिटांनी सालं काढायची. नंतर ते मिक्सरमध्ये वाटून गाळून घ्यायचे.
LikeLike