तेलवांगं हा प्रकार मी पहिल्यांदा खाल्ला तो माझ्या मित्राच्या घरी. तोपर्यंत मी या पदार्थाबद्दल फक्त ऐकलं होतं. माझ्या मित्राची गिरीशची बायको दीपा ही कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिचा स्वयंपाक चमचमीत आणि झणझणीत असतो. खास कोल्हापुरी मसाला घालून केलेलं पिठलं तर ती इतकं अप्रतिम बनवते की फक्त बोटं चाटत राहावं. मी एकदा त्यांच्या घरी राहायला गेले होते तेव्हा तिनं हे तेलवांगं केलं. पहिल्यांदाच खाल्लं आणि या अतिशय चविष्ट अशा पदार्थाच्या मी प्रेमातच पडले. भरली वांगी, वांगं-बटाटा भाजी, वांग्याची रस्सा भाजी, मटन मसाल्यातली वांगी हे सगळे प्रकार आवडतातच. पण सध्याचा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे तो म्हणजे तेलवांगं. आज याच अत्यंत सोप्या पण अतिशय चवदार पदार्थाची रेसिपी मी शेअर करणार आहे.
तेलवांगं
साहित्य – अर्धा किलो बारीक काटेरी वांगी (भरल्या वांग्यासाठी चिरतो तशी चिरा, थोडे देठ ठेवा), पाऊण वाटी लसूण पाकळ्या, १२-१३ कमी तिखट हिरव्या मिरच्या (तिखटाचं प्रमाण हवं तसं कमी जास्त करा), ३ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मोहरी, ७-८ मेथी दाणे, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार
कृती –
१) मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या वाटून घ्या. नंतर त्यात लसूण आणि मीठ घालून जाडसर वाटा.
२) हे वाटण सुरीच्या साह्यानं वांग्यांमध्ये भरा. नुसत्या हातानं भरलंत तर हाताची आग होईल.
३) एका नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईत तेल गरम करा. या भाजीला तेल सढळ हातानंच घालावं लागतं. त्यामुळे मी सांगितलंय त्याहून जास्त चालणार असेल तर घाला.
४) तेल गरम झालं की त्यात मोहरी, मेथी दाणे आणि हळद घाला.
५) त्यावर वाटण भरलेली वांगी घाला. झाकण ठेवून मऊ शिजू द्या.
६) शिजली की गॅस मोठा करून वांग्यातला मसाला मस्त लाल कुरकुरीत होऊ द्या.
तेल वांगी तयार आहेत. ही भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर उत्तम लागते. बरोबर दहीदुधाचं पिठलं करा. कच्चा कांदा घ्या. उत्तम झणझणीत जेवण होईल.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष