आपल्याकडे महाराष्ट्रात, विशेषतः मराठी घरांमध्ये वरण किंवा आमटी पातळ करण्याची पद्धत आहे. कालवण आपल्याला पातळच लागतं. त्यामुळे खरंतर आपण आमट्यांमधून फारसं प्रोटीन खात नाही. पण जसंजसं आपण वर उत्तरेकडे जायला लागतो तसंतसंआमटी घट्ट व्हायला लागते. विशेषतः पंजाबात तर आमट्यांना आमटी न म्हणता डाळी म्हणतात ते अगदी बरोबर आहे कारण तिथे डाळी अगदी दाट असतात. तिथल्या थंडीला, शारीरिक कष्टांना जास्त कॅलरीजची गरज असते. त्यामुळेच या डाळी दाट असतात. शिवाय त्यात लोणी, तूप, साय यांचा मुबलक वापर असतो. त्यामुळे या डाळी पौष्टिक तर असतातच पण त्याचबरोबर चवदारही लागतात. पंजाबात डाळी भाताबरोबर कमी आणि रोट्यांबरोबर, पराठ्यांबरोबर अधिक खाल्ल्या जातात. माह की दाल किंवा दाल माखनी, अख्ख्या उडदाची डाळ, चणा दाळ, रस्सेवाला राजमा या सगळ्या डाळी रोट्यांबरोबर अप्रतिम लागतात. आज मी अशाच एका डाळीची रेसिपी शेअर करणार आहे. ही आहे धाबेवाली डाळ. पंजाबात जागोजागी धाबे आहेत. या धाब्यांवर मिळणारी डाळ म्हणून धाबेवाली डाळ. ही रेसिपी तरला दलाल यांची आहे. ही मी वर्षानुवर्षं आमच्या घरात करत आले आहे. ती सगळ्यांना खूप प्रिय आहे. अतिशय कमी घटक पदार्थ असलेली ही डाळ करायलाही अतिशय सोपी आहे.
धाबेवाली डाळ
साहित्य – प्रत्येकी अर्धी वाटी बारीक लाल राजमा, अख्खे काळे उडीद आणि चणा डाळ, दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, दोन टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेले, २ टेबलस्पून लसूण अगदी बारीक चिरलेला, २ हिरव्या मिरच्या मधून लांब कापलेल्या, १ टेबलस्पून कसुरी मेथी, २ टीस्पून तिखट, २ टीस्पून जिरे पूड, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, वरून घालायला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
१) तिन्ही डाळी स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवा.
२) सकाळी थोडंसं मीठ घालून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या. मध्यम आकाराच्या कुकरमध्ये साधारणपणे १ शिटी करून अर्धा तास अगदी बारीक गॅसवर ठेवा.
३) डाळी शिजल्या की नरम असतानाच अगदी मऊ घोटून घ्या.
४) एका कढईत तेल गरम करा. त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला.
५) चांगलं लाल झालं की त्यात टोमॅटो घालून चांगला मऊ शिजू द्या.
६) टोमॅटो शिजल्यावर त्यात जिरे पूड, तिखट, मीठ आणि कसुरी मेथी घाला.
७) २ मिनिटं परतून त्यात शिजलेली डाळ घाला. चांगलं हलवून घ्या. आपल्याला हवी तितपत पातळ करा. पण ही डाळ घट्टच असते.
८) मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं एकजीव होऊ द्या.
९) गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
धाबेवाली डाळ तयार आहे. कांदा परतताना अगदी मऊ शिजवायचा असेल तर मंद गॅसवर झाकण घालून अतिशय शांतपणे शिजवावा लागतोय घाई केलीत तर तो कच्चाच राहतो आणि तो चांगला लागत नाही. इतकी डाळ नेहमीच्या जेवणातल्या इतर पदार्थांबरोबर ४ माणसांना पुरेशी होते. या डाळीबरोबर साध्या कणकेचे जाडसर पराठे, पोळ्या किंवा फुलके असं काहीही चांगलं लागतं. बरोबर लांब चिरलेल्या कांद्यात, तिखट-मीठ-लिंबू-कोथिंबीर घालून केलेलं कचुंबर द्या.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष