बर्मा बर्मा – रेस्टॉरंट रिव्ह्यू

ब्रह्मदेश किंवा म्यानमार हा आपल्यासाठी कायम एक गूढ राहिलेलं आहे. मेरे पिया गये रंगून, वहा से किया है टैलिफून या गाण्यामधूनच ब्रह्मदेशचा आणि आपला काय तो संबंध. आणि हो टिळकांना झालेला मंडालेचा तुरूंगवासही आहेच. खुदिराम बोसच्या बाँबहल्ल्याचं केसरीतून समर्थन केल्याबद्दल टिळकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरण्यात आला. या खटल्यात त्यांना सहा वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला. त्यासाठी त्यांना मंडालेला पाठवण्यात आलं. या तुरूंगवासातच त्यांनी गीतारहस्य लिहिलं हे आपल्याला शाळेत वाचलेल्या इतिहासातून माहीत झालेलं असतं. पण ब्रह्मदेशाची इतकीच काय ती तुटपुंजी माहिती. कारण या देशात गेली कित्येक वर्षं लष्करी राजवट आहे. त्यामुळे अर्थातच खुलं वातावरण नाही, म्हणून देशाबाहेर फारशी माहितीही येतजात नाही. तरी आता आँग सान सू कींच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेलं आहे. लोकशाहीसाठी दारं हळूहळू किलकिली व्हायला लागली आहेत. आँग सान सू की ही स्वातंत्र्य सैनिक आँग सान यांची मुलगी. ती दोन वर्षांची असतानाच त्यांची हत्या झाली. नंतर आईबरोबर त्या भारतातही राहिल्या. इथेच पदवीधर झाल्या. पुढे इंग्लंडला शिकत असताना ब्रिटिश माणसाशी त्यांनी लग्न केलं. १९८८ मध्ये आजारी आईला भेटायला ब्रह्मदेशला परतल्यावर त्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्या आपल्या पतीला फक्त पाचदा भेटू शकल्या. १९९९ मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हाही त्यांना देशाबाहेर जाता आलं नाही कारण परत येता येणार नाही अशी भीती त्यांना होती. मुलांनाही आईला भेटायला येऊ दिलं गेलं नाही. अशा या धाडसी स्त्रीला नोबेलनं सन्मानित करण्यात आलं आहे हे तर आपल्याला माहीत आहेच.
ही सगळी प्रस्तावना आहे ती बर्मीज खाद्यसंस्कृतीबद्दलच्या पोस्टची. बर्मीज जेवण म्हणजे खाव सुई इतकंच आपल्याला माहीत असतं. म्हणजे एका बोलमध्ये सूप, त्यातच नूडल्स, चिकन किंवा मासे घालून केलेलं वन बोल मील. पण याशिवायही बर्मीज जेवणात खूप काही असतं हे मुंबईतल्या बर्मा बर्मा या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर कळलं.

बर्मा बर्मा हे रेस्टॉरंट फक्त शाकाहारी आहे. शिवाय इथे दारूही मिळत नाही. या दोन्ही गोष्टींचा माझ्याशी संबंध नसल्यामुळे मला तर हे रेस्टॉरंट फारच आवडलं. या रेस्टॉरंटमध्ये परवा मी आणि माझा नवरा निरंजन गेलो होतो. फारसं मोठं नसलेल्या या रेस्टॉरंटचं डेकोर अतिशय सुबक आहे. आणि ब्रह्मदेशाची आठवण करून देणारं आहे. लाकूड आणि बांबूचा वापर करून बनवलेल्या शोभेच्या वस्तू आणि भांडी, चहाच्या केटल्स, वेगवेगळ्या आकाराचे चहाचे कप, लाकडी बाहुल्या अशा गोष्टींचा वापर करून इथे ब्रह्मदेशाचा आभास निर्माण करण्यात आला आहे. अगदी बाथरूममध्येही ब्रह्मदेशाबद्दल माहिती देणारी चित्रं-छायाचित्रं लावण्यात आलेली आहेत. जेवणाच्या मेन्यूत नावं वाचून आपल्याला काहीच कळत नाही. पण तिथले कर्मचारी आपल्याला त्याबद्दल माहिती देतात. शिवाय बर्मीज नावांच्या खाली इंग्रजीत त्या-त्या पदार्थाबद्दल माहिती दिलेली आहे. बर्मीज जेवणात चिंचेचा वापर मुबलक प्रमाणात असतो. अगदी गोड पदार्थांमध्येही चिंचेचा वापर करतात. सगळ्याच पौर्वात्य देशांप्रमाणे भात आणि नूडल्स हे बर्मीज जेवणाचा मुख्य भाग आहेत. आणि पौर्वात्य खाद्यसंस्कृतीसारखंच या जेवणात नारळाचा, लसणाचा मुबलक वापर केला जातो.
मी सुरूवातीला एक डाळींबाचा रस आणि संत्र्याचा रस असलेलं बर्मीज मॉकटेल घेतलं. त्याबरोबर आम्ही जे स्टार्टर मागवलं होतं ते दुधी भोपळ्याच्या लांब स्टीक्स कापून त्या मैद्यात घोळवून तळलेला पदार्थ होता. बरोबर तीन-चार प्रकारचे तिखट सॉसेस होते. मेन कोर्समध्ये आम्ही वन बोल मील मागवलं कारण इथे पोर्शन्स ब-यापैकी मोठे आहेत. या वन बोल मीलमध्ये सूपमधले नूडल्स, त्यात ब्रॉकोली, वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या, फरसबी, गाजर अशा भाज्या, वरून घातलेले तिखट सॉसेस असं होतं. शिवाय त्याला चिंचेच्या आंबटपणाची मस्त चव होती. फारसं तेल नव्हतं. हा पदार्थ अतिशय चविष्ट होता. नाव अर्थातच लक्षात नाही.


इतरही अनेक पदार्थ मेन्यूमध्ये आहेत. त्यांची चव घ्यायला परत परत या रेस्टॉरंटमध्ये जायला लागणार हे नक्की. मुख्य म्हणजे अतिशय वाजवी दर आहेत. मॉकटेल्स घेतले नसते तर आम्हा दोघांचं बिल ७०० रूपये झालं असतं. मुंबईत इतक्या कमी दरात उत्तम प्रतीचं जेवण मिळणं हल्ली अशक्य आहे. तेव्हा मुंबईतल्या मित्र-मैत्रिणींनो इथे नक्की जेवा. आणि कसं वाटलं तेही कळवा.

रेस्टॉरंटचा पत्ता – बर्मा बर्मा, कोठारी हाऊस, अल्लाना लेन, एमजी रोड फोर्ट
फोन नंबर – ०२२ – ४००३६६०१, ०२२ – ४००३६६००

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: