भातांचे प्रकार म्हणजे अहाहा! खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातला पालक आणि भात असं काहीही असलं तरी मला ते आवडतं, अगदी साधं वरण-भात-तूपही खूप आवडतं. भातातून विशेष पौष्टिक असं काहीही मिळत नाही, भात म्हणजे एम्प्टी कॅलरीज हे सगळं माहीत असूनही आवडीला काही करता येत नाही ना! मग त्याबरोबर भाज्या, डाळी, मासे, चिकन असं काही तरी वापरायचं आणि त्याला पौष्टिक बनवायचं. म्हणूनच खिचडी करताना मी तांदळाच्या बरोबरीनं डाळ घेते. मटार भात किंवा भाज्या घालून भात करताना भरपूर भाज्यांचा वापर करते. मी मांसाहारी नसले तरी माशांची आमटी किंवा चिकन रस्सा पौष्टिकच हे मला माहीत आहे. म्हणून घरातल्यांसाठी असं काही केलं तर मला पिठलं करते. सांबार भातात किंवा भिशी बेळे भातात डाळ तर असतेच शिवाय भरपूर भाज्या घातल्या की हे प्रकार पूर्णान्न होतात. बरोबर एखादी कोशिंबीर केली की भागतं. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे भिशी बेळे भाताची. भाताचा हा कर्नाटकी प्रकार आहे. अप्रतिम लागतो. सांबार-भाताच्या जवळ जाणारा हा प्रकार माझी आई फार सुरेख करते. सांबार मसाला आणि भिशी बेळे भाताचा मसाला यातला फरक म्हणजे सांबार मसाल्यात दालचिनी वापरत नाहीत तर या प्रकारात दालचिनी वापरतात.
भिशी बेळे भात
साहित्य – १ वाटी तांदूळ (धुवून पाणी काढून ठेवा), १ वाटी तूर डाळ (करण्याआधी १ तास धुवून १ वाटी पाणी घालून ठेवा), १ वाटी फरसबीचे १ इंचाचे तुकडे, १ वाटी फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे, १ वाटी गाजराचे १ इंचाचे तुकडे, अर्धी वाटी सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, १ मोठा कांदा लांब उभा चिरलेला, १ टोमॅटो लांब उभा चिरलेला, १ बटाटा सालं काढून मोठे तुकडे केलेला (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, बोराएवढा गूळ (ऐच्छिक), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी-पाव टीस्पून हिंग-अर्धा टीस्पून हळद, ७-८ कढीपत्त्याची पानं, ४-५ वाट्या पाणी
मसाल्याचं साहित्य – २ टेबलस्पून चणा डाळ, २ टेबलस्पून उडीद डाळ, अर्धी वाटी सुकं खोबरं, १ टेबलस्पून धणे, अर्धा टीस्पून मेथ्या, १ इंच दालचिनीचा तुकडा, 7-8 सुक्या लाल मिरच्या (खोबरं लाल रंगावर कोरडं भाजून घ्या. नंतर कढईत थोडं तेल घालून इतर साहित्य चांगलं लाल रंगावर भाजा. गार झाल्यावर एकत्र पूड करा.)
कृती –
१) एका मोठ्या पातेल्यात तेल तापवा आणि नेहमीसारखी फोडणी करा. त्यात हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला.
२) नंतर त्यात कांदा घाला. एखादा मिनिट परतून टोमॅटो घाला. परत एखादा मिनिट परता आणि इतर सगळ्या भाज्या घाला.
३) भाज्या चांगल्या परतून घ्या. त्यात धुतलेली डाळ पाण्यासकट घाला. मंद आचेवर झाकण घालून शिजू द्या.
४) डाळ अर्धवट शिजली की त्यात धुतलेले तांदूळ घाला. नीट हलवून घ्या.
५) त्यात वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घाला.
६) नीट मिसळा आणि त्यात ४ वाट्या गरम आधणाचं पाणी घाला.
७) मधूनमधून हलवत, झाकण ठेवून मंद आचेवर भात अगदी मऊ शिजू द्या. अंदाजानं पाण्याचं प्रमाण वाढवा.
भिशी बेळे भात तयार आहे. भात खायला देताना बरोबर तळलेले पापड, सांडगी मिरची द्या. भातावर साजूक तूप घालून खा. इतका भात वन डिश मील म्हणून ३-४ लोकांना पुरे होतो.
हा भात कुकरलाही करता येतो. पण त्याचा अंदाज येणं गरजेचं आहे कारण अंदाज चुकला तर तो खाली लागतो.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
Mam should we put all masala which we had prepared for bise belle bhat?
LikeLike
अतिशय सोपी व रूचकर रेसिपी.दिलेले प्रमाण अगदी योग्य.
LikeLike
धन्यवाद!
LikeLike