हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच. हल्ली आपल्याकडे सिमला मटार म्हणून मिळणारा प्रकार तर फारच गोड असतो.
मटाराच्या शेंगा या बोटॅनिकली फळ या प्रकारात मोडतात. मटार हा खाद्यसंस्कृतीच्या इतिहासात फार पूर्वीपासून आढळणारा घटक आहे. अतिशय प्राचीन काळापासून म्हणजे शतकगणनेच्यापूर्वी ४८०० ते ४४०० वर्षांपासून मटारचा किंवा वाटाण्याचा उल्लेख आढळतो. सर्वात प्रथम इजिप्त, जॉर्डन, ग्रीस, सीरिया, तुर्कस्तान या भागात मटार पिकवला जायला लागला. भारतात शतकगणनेपूर्वी २२५० ते १७५० या काळात मटार पिकवला जायला लागला असावा असा अंदाज आहे. मटार पिकवण्यासाठी थंड हवामानाची गरज असते. साधारणपणे एक वर्षाच्या कालावधीत मटारचं पीक येतं. (मटारची माहिती संदर्भ – विकीपीडिया)
आधुनिक काळात मटारचा खाण्यात मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जायला लागला. मटारच्या शेंगा नुसत्या उकडून खाल्ल्या जातात. किंवा दाणे उकडून साधं मीठ-मिरपूड लावून खाल्लं जातं. अनेक बेक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मटाराचा वापर होतो. मटारचं सूपही केलं जातं. जगात जवळपास सगळ्या देशांमध्ये मटार मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. भारतात उत्तरेतल्या ब-याचशा पदार्थांमध्ये मटाराचा वापर होतो. आलू मटर, मटर पनीर, पुलाव, मटर की कचौडी, मटर के पराठे हे उत्तरेतले पदार्थ लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत.
मी कॉलेजमध्ये असताना आम्ही आग्र्यापर्यंतची रोड ट्रीप केली होती. तेव्हा इंदौरला बघितलेले मटारचे ढीग आणि रस्ताभर खाल्लेल्या मटाराची चव अजून लक्षात आहे. तेव्हा महाराष्ट्रात मटारचं इतकं प्रस्थ नव्हतं. आज मी मटार पॅटिसची रेसिपी शेअर करणार आहे.
मटार पॅटिस
सारणाचं साहित्य – ४ वाट्या अगदी ताजे, कोवळे मटारचे दाणे, ४ मध्यम कांदे अगदी बारीक चिरलेले, ४ हिरव्या मिरच्या – दीड इंच आलं एकत्र वाटलेलं, अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एका लिंबाचा रस, १ टीस्पून साखर (ऐच्छिक), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल
वरच्या पारीचं साहित्य – १० मध्यम आकाराचे बटाटे, ६ ब्रेड स्लाइस, १ टेबलस्पून कॉर्न फ्लार, २ हिरव्या मिरच्या-अर्धा इंच आलं-१ वाटी कोथिंबीर एकत्र वाटलेलं, मीठ चवीनुसार
शॅलो फ्राय करण्यासाठी तेल, ४-५ ब्रेड स्लाइस मिक्सरमध्ये फिरवून केलेला चुरा
सारणाची कृती –
१) एका कढईत तेल गरम करा.
२) तेल तापल्यावर त्यात कांदा घाला. परतून झाकण घाला.
३) मधूनमधून हलवत तो चांगला मऊ होऊ द्या. मात्र लाल करू नका. तो गुलाबीच राहायला हवा.
४) कांदा शिजला की त्यात आलं मिरचीचं वाटण, साखर, मीठ घाला.
५) २ मिनिटं परतून त्यात मटार घाला. परत झाकण घाला. मधूनमधून हलवत मटार चांगले शिजू द्या.
६) मटार शिजले की त्यात खोबरं-कोथिंबीर घाला आणि लगेच गॅस बंद करा.
७) सारण चांगलं थंड होऊ द्या.
वरच्या पारीची कृती –
१) उकडलेले बटाटे मॅश करा.
२) ब्रेड स्लाइस मिक्सरमधून काढून त्यात घाला.
३) कॉर्न फ्लोर घाला, वाटण आणि मीठ घाला.
४) हे मिश्रण चांगलं मळून घ्या.
पॅटिसची कृती –
१) पारीसाठी मळलेल्या मिश्रणाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा.
२) जरासा तेलाचा हात लावून हातानंच त्या गोळ्याची वाटी करा.
३) वाटीत १ टीस्पून सारण घाला. हलक्या हातानं वाटीचं तोंड बंद करा.
४) हलकेच दाब देऊन पॅटिस चपटा करा. असे सगळे पॅटिस करून घ्या.
५) ब्रेडच्या चु-यात घोळवून तव्यावर तेल घालून मध्यम आचेवर चुरचुरीत लाल होऊ द्या.
मटार पॅटिस तयार आहेत.
बरोबर टोमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी द्या. मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. मी कमी तिखट हिरव्या मिरच्या वापरते.
इतक्या साहित्यात मध्यम आकाराचे २२-२४ पॅटिस होतात. मधल्या वेळेला खायला करा किंवा रात्रीच्या जेवणात करा. बरोबर सूप आणि भाताचा एखादा प्रकार करा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
Dear Sayali,
You are simply amazing.
I love your blog.
And your initiative makes us feel proud of you.
Keep up the good work and keep inspiring people around you.
Cheers,
Pallavi Gujar – Warunjikar
LikeLike