भरलेले कांदे

12688044_497923627081028_9091284638115683875_nकांद्याशिवाय भारतीय स्वयंपाकाचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याकडे जवळपास ७०-८० टक्के भाज्यांमध्ये फोडणीला कांदा घातला जातो. शिवाय कालवणं, मांसाहारी पदार्थ यांनाही कांदा हवाच. कांद्याची पीठ पेरून भाजी, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचं रायतं असे किती तरी पदार्थ रोजच्या जेवणात आपण करत असतो. कांदा-मिरची घातलेलं चमचमीत ऑम्लेट काय मस्त लागतं! कच्चा कांदा नसेल तर भेळ, पाव-भाजी, रगडा पॅटिसची मजाच जाईल. कबाबबरोबर कांद्याच्या स्लाइस हव्यातच.
कांद्याच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातल्या लासलगावला कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो. तिथून रेल्वेनं जाताना कांद्याचा उग्र वास येतोच शिवाय तिथले रस्ते कांद्याच्या गुलाबी पाचोळ्यानं भरून गेलेले असतात. मला आठवतंय, माझ्या लहानपणी म्हणजे साधारण ३०-४० वर्षांपूर्वी लाल कांद्याचं इतकं प्रस्थ नव्हतं. तेव्हा पांढरेच कांदे मिळायचे. पांढरे कांदे हे चवीला लाल कांद्यापेक्षा काहीसे सौम्य असतात त्यामुळे कच्चा खायला पांढरा कांदाच अधिक चांगला लागतो. तर लाल कांदा पदार्थांमध्ये वापरायला अधिक चांगला असतो. काय गंमत आहे बघा. कच्चा कांदा खाल्ला की किती तरी वेळ तोंडाचा वास जात नाही इतका तो उग्र असतो. पण जरा पाच मिनिटं शिजवला की तो किती गोडसर लागतो, शिवाय वासही येत नाही.
अलिबागचे पांढरे कांदे प्रसिद्ध आहेत. पण ते वर्षभर मिळत नाहीत. मद्रासी लोक बाळकांद्याचं सांबार करतात. माटुंगा मार्केटला हे अगदी लहान कांदे मिळतात. कांद्याची पीठ पेरून भाजी तर तुम्ही सगळे करत असालच. माझी आई लहान कांदे भरून त्याची भाजी करत असे. हल्ली ब-याच वर्षांत तिनं ती केली नाही. परवा मला भाजी बाजारात अगदी लहान लहान पांढरे कांदे मिळाले. म्हणून मी माझीच कल्पनाशक्ती वापरून भरल्या कांद्यांची भाजी केली. भाजी अप्रतिम झाली होती. म्हणूनच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. जर वाईट झाली असती तर कदाचित केली नसती!

भरले कांदे

साहित्य – अर्धा किलो अगदी लहान पांढरे कांदे (नाही मिळाले तर लाल वापरा), २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, २ चिमटी हळद, अर्धा कप गरम पाणी

भरायचा मसाला – अर्धी वाटी सुकं खोबरं, १ टेबलस्पून धणे, ४ सुक्या लाल बेडगी मिरच्या, २ टेबलस्पून तीळ, अर्ध्या लिंबाएवढी चिंच, त्याच्या अर्धा गूळ, २ टीस्पून काळा मसाला, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती –
१) एका कढईत सुकं खोबरं कोरडंच लाल रंगावर भाजून घ्या.
२) ते काढून ठेवा आणि त्यात थोडं तेल घालून धणे, मिरच्या, तीळ, चिंच असं सगळं भाजा.
३) सगळं चांगलं भाजलं की त्यात खोबरं घाला. एकदाच हलवून गॅस बंद करा.
४) भाजलेला मसाला थंड होऊ द्या. मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.
५) नंतर त्यात गूळ आणि काळा मसाला घालून परत वाटा.
६) एका भांड्यात काढून त्यात मीठ आणि कोथिंबीर घाला आणि नीट एकत्र करून घ्या.
७) कांद्यांची सालं काढून आपण भरलेली वांगी करताना वांग्यांना जशा चिरा देतो तशा द्या. त्यात हा मसाला भरा.
८) एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, हळद घालून नेहमीसारखी फोडणी करा.
९) त्यात भरलेले कांदे घाला. नीट हलवून त्यावर झाकण ठेवा. मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या.
१०) नंतर त्यात अर्धा कप गरम पाणी घाला. मंद आचेवर पाणी आटेपर्यंत शिजवा.
११) पाणी आटलं आणि मसाला अंगासरशी झाला की गॅस बंद करा.

भरलेले कांदे तयार आहेत.
या भाजीबरोबर गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मस्त लागते. मी परवा ज्वारीची भाकरी, कच्च्या मेथीची दही घातलेली कोशिंबीर, ठेचा आणि भरल्या कांद्यांची भाजी असा बेत केला होता. बरोबर ताजं लोणीही होतं. मस्त जेवण झालं.

तुम्हीही करून बघा आणि कशी झाली होती ते नक्की कळवा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

Advertisements

One comment

  1. पाककृती छान आहे. फक्त यातला काळा मसाला म्हणजे नेमका कोणता याबद्दल अधिक माहिती द्यावी.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s