गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा (माझे आजोबा तौर म्हणायचे) वापर जेवणात करतात. कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची पद्धत आहे.
अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र गिरीश देशमुख यांनी ही फुलं घालून केलेल्या पंचामृताची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. मी पंचामृताची रेसिपी खाली शेअर करते आहे. त्यातच ही थोडी फुलं घातली की झालं.
पंचामृत – डाव्या बाजूला कोशिंबीर, रायत्यांबरोबर, दह्यात कालवलेलं मेतकूट आणि पंचामृत असतंच. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.
साहित्य –
७-८ हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे,
अर्धी वाटी दाण्याचं कूट,
अर्धी वाटी तिळाचं कूट,
अर्धी वाटी चिंचेचा पातळ कोळ,
अर्धी वाटी किसलेला गूळ,
पाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या,
७-८ कढीपत्त्याची पानं,
मोहरी-हिंग-हळद, १ टेबलस्पून तेल,
मीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.
कृती –
१) एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा.
२) त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला.
३) जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.
४) गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला.
५) चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या.
६) जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा.
पंचामृत तयार आहे.
सायली राजाध्यक्ष
मला तुमचे लिखाण नेहेमीच आवडते. हल्ली स्वयंपाक या विषयात गती, रुची असणं म्हणजे ते माणूस ‘अकलेच्या प्रांतात जरा कमीच आहे’ असा भाव दाखविण्यात येतो. तुम्ही स्वयंपाक या गोष्टीला प्रतिष्ठा आणि ग्लॅमर मिळवून दिले आहे. इतर विषयांवर सुद्धा तुमचे लिखाण समंजस दृष्टीने लिहिलेले असते. तुमचा व्यवस्थितपणा तुम्ही लिहिता, करता त्या हर एक गोष्टीत दिसून येतो.
LikeLiked by 1 person