परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ

12993413_529352400604817_3797025368817271107_nभारतात आपल्याला सर्रास ज्या भाज्या मिळतात त्याच भाज्या परदेशात गेलं की दुरापास्त होतात. विशेषतः अति थंडी असलेले जे देश आहेत तिथे भाज्या मिळणं अवघड होतं. प्रवास करायला गेला असाल तर काहीच दिवसांचा प्रश्न असतो तेव्हा निभावून नेता येतं. पण जर कामानिमित्त तिथे राहण्याचा प्रसंग आला तर मग पर्याय शोधणं भागच असतं. उपलब्ध असतील त्या भाज्यांमधूनच रांधावं लागतं. मला आठवतंय माझा चुलतभाऊ बेल्जियमला होता तेव्हा २००९ मध्ये आम्ही बेल्जियमला गेलो होतो. तिथे जवळ असलेल्या स्टोअरमध्ये फक्त कांदे, बटाटे, टोमॅटो, गाजरं हेच मिळायचं. मग जरा दूर असलेल्या इंडियन स्टोअरमध्ये जाऊन भाज्या आणायचो. आपल्या डोळ्यांना भारतातले फुललेले, रंगीबेरंगी भाजी बाजार बघायची सवय. परदेशातही सुंदर बाजार असतात. अतिशय देखणे. पण आपण रोज ज्या भाज्या खातो त्या मिळत नाहीत. पालेभाज्या तर दुर्मीळच. या इंडियन स्टोअरमध्ये ज्या भाज्या यायच्या त्या इंग्लंडमधून यायच्या. सुकलेल्या गवारीच्या शेंगा, सुकलेली भेंडी बघून कसंसच व्हायचं. भारतात आपण अशा भाज्यांकडे ढुंकूनही बघितलं नसतं असं वाटायचं. पण पर्याय काय होता! झक्कत घ्यायचे.
अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण पल्लवी औसेकर-कुलकर्णी ही काही दिवसांपूर्वीच जर्मनीतल्या हॅम्बर्गला स्थलांतरीत झाली आहे. जर्मनी हाही अति थंडीचा देश. त्यामुळे तिथेही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच भाज्या मिळतात, ज्या आपल्याकडे केल्या जातात. तर तिनं मला त्या भाज्यांची यादी पाठवली होती आणि त्यातून काय काय करता येईल असं विचारलं होतं. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या परदेशातल्या इतरही काही मित्रमैत्रिणींना हा प्रश्न पडत असेलच. म्हणून आजची ही पोस्ट आहे पल्लवीनं जी भाज्यांनी यादी पाठवली आहे त्यातून काय काय करता येईन याबद्दलची.
पल्लवीनं जी यादी पाठवली आहे त्यात आहे – निळी मोठी वांगी, गाजरं, ब्रॉकोली, दुधी भोपळा, टोमॅटो, बटाटे, कांदे, कांदा-पात, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची (शिवाय मटार आणि कॉर्न तिथे मिळत असणार असं मी गृहित धरून चालले आहे.) यात काय काय करता येऊ शकेल असा विचार केल्यावर पटापट मला जे काही सुचलं ते मी खाली लिहिते आहे.

13001095_529348530605204_4246336360106886085_n
दुधीचं रायतं

कोशिंबिरी
गाजर-कांदा-टोमॅटो कोशिंबीर – गाजरं किसा, त्यात बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो घाला. साखर-मीठ-दाण्याचं कूट घाला. दही हवं असल्यास दही घाला. नको असल्यास लिंबाचा रस घाला. उपलब्ध असल्यास कोथिंबीर घाला. यात टोमॅटो न घालताही अशीच केलेली कोशिंबीर मस्त लागते.
गाजर-कांदा कोशिंबीर – कांदा लांब, पातळ चिरा. गाजर किसून घ्या. दही, तिखट, मीठ, दाण्याचं कूट आणि साखर घाला. वरून तळलेल्या मिरचीची फोडणी द्या. उपलब्ध असल्यास कोथिंबीर घाला.
कांदा-टोमॅटो कोशिंबीर – कांदा-टोमॅटो बारीक चिरा. वरीलप्रमाणेच साहित्य घाला. दही घालून कालवा. आवडत असल्यास फोडणी घाला.
कांदा कोशिंबीर – कांदा बारीक चिरा. त्यात दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट घाला. हवी असल्यास चिमूटभर साखर घाला. दही घालून कालवा. वरून हिंग-मोहरीची फोडणी द्या.
कांद्याचं रायतं – कांदा लांब पातळ चिरा. भरपूर दही घालून कालवा. उपलब्ध असल्यास हिरवी मिरची बारीक चिरून घाला. नसल्यास लाल तिखट घाला. मीठ घाला. थोडी जिरे पूड घाला. हे रायतं पुलाव-बिर्याणी-मसालेभाताबरोबर चांगलं लागतं.
दुधीचं रायतं – दुधीचे लहान चौकोनी तुकडे करा. वाफवून घ्या. थंड झाले की त्यात दाण्याचं कूट, जिरे पूड, मोहरीची पूड, मीठ आणि चिमूटभर साखर घाला. दही घालून कालवा. वरून हिंग-मोहरी-हिरवी मिरची-कढीपत्ता अशी फोडणी द्या. उपलब्ध नसेल तर मिरची कढीपत्ता नाही घातलं तरी चालेल.
फ्लॉवरचं रायतं – फ्लॉवरचे लहान तुरे काढा. वाफवून घ्या. दही-मिरपूड-जिरेपूड घाला. असल्यास कोथिंबीर घाला.
बटाट्याचं रायतं – बटाटा उकडा. त्याच्या बारीक फोडी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. मीठ-जिरेपूड घाला. दही घालून कालवा.
सिमला मिरचीची कोशिंबीर – सिमला मिरची बारीक चिरा. त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घाला. त्यात दाण्याचं कूट-साखर-मीठ घाला. दही घालून कालवा. वरून फोडणी द्या.
सिमला मिरची-कोबी-मूग सॅलड – सिमला मिरची लांब, पातळ चिरा. त्यात मोड आलेले मूग घाला. लांब पातळ चिरलेला कोबी घाला. मीठ-मिरपूड-लिंबाचा रस-चाट मसाला घाला. कालवा.
कांदा पातीची कोशिंबीर – कांदा पात बारीक चिरा. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं गाजर घाला. दाण्याचं कूट-साखर-मीठ-लिंबाचा रस घाला. वरून जरा जास्त हिंग घालून फोडणी द्या.
कांदा पातीचा घोळाणा – कांदा पात बारीक चिरा. त्याचा कांदाही बारीक चिरून घाला. वरून तिखट-मीठ घाला. आवडत असल्यास दाण्याचं कूट घाला. वरून कच्चं तेल घाला. कालवा.
कोबीची कोशिंबीर – कोबी लांब, पातळ चिरा. त्यात साखर-मीठ-तिखट-दाण्याचं कूट घाला. दही घालून कालवा.
ब्रॉकोली सॉल्ट-पेपर – ब्रॉकोलीचे लहान तुरे काढा. स्वच्छ धुवून कोरडे करा. पॅनमध्ये थोडंसं बटर गरम करा. त्यावर तुरे घाला. झाकण ठेवून जराशी वाफ द्या. फार मऊ करू नका. थोडंसं मीठ आणि मिरपूड घाला.

आता काही भातांचे प्रकार

गाजर-मटार भात – गाजर लांब-लांब चिरा. मटारचे भरपूर दाणे घ्या. १ वाटी तांदूळ असतील तर निदान १ वाटी गाजराचे तुकडे आणि १ वाटी मटार दाणे घ्या. तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. थोडा अख्खा गरम मसाला (लवंग-दालचिनी-मिरीदाणे-तमालपत्र) घाला. त्यावर गाजराचे तुकडे आणि मटार घाला. ते चांगलं परता. तांदळाला काळा मसाला लावून घ्या. ते यावर घाला. चांगलं परता. दुप्पट पाणी घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. भात शिजू द्या.
वांगी भात – एरवी आपण भाताला लहान वांगी वापरतो. पण परदेशात बरेचदा बिनबियांची वांगी असतात. त्यामुळे तीही वापरायला हरकत नाही. वांग्याचे लहान चौकोनी तुकडे करा. १ वाटी तांदूळ असतील तर १ मध्यम चिरलेला कांदा आणि १ मध्यम चिरलेला टोमॅटो, १ ते दीड वाटी वांग्याच्या फोडी घ्या. तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. थोडा अख्खा गरम मसाला (लवंग-दालचिनी-मिरीदाणे-तमालपत्र) घाला. त्यावर कांदा परता. तो गुलाबी झाला की टोमॅटो घाला. तो चांगला परता मग त्यात वांग्याचे तुकडे घाला. ते चांगलं परता. तांदळाला काळा मसाला लावून घ्या. ते यावर घाला. चांगलं परता. दुप्पट पाणी घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. भात शिजू द्या.
फ्लॉवर भात – फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे काढा. १ वाटी तांदूळ असेल तर २ वाट्या तुकडे घ्या. थोड्याशा बटरवर थोडे मिरे दाणे आणि २ लवंगा, दालचिनीचा तुकडा घाला. त्यावर फ्लॉवरचे तुरे घाला. तांदळाला अगदी थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला लावा. तुरे परतले की त्यावर तांदूळ घाला. दुप्पट पाणी आणि मीठ-थोडी मिरपूड घाला. शिजत आला की थोडं किसलेलं चीज घाला. अशाच पद्धतीनं कोबीचा भातही करता येईल.
टोमॅटो भात – टोमॅटोचा रस काढा. तेल किंवा तूप गरम करा. त्यावर थोडा अख्खा गरम मसाला घाला. त्यावर धुतलेले तांदूळ घाला. चांगलं परतलं की त्यावर टोमॅटोचा रस घालून परता. कच्चट वास गेला की दुप्पट पाणी घाला. साखर-मीठ आणि थोडंसं लाल तिखट घाला. हवं असल्यास यातही चीज घालता येऊ शकेल.
बटाटे भात – आलं-लसूण-मिरची वाटून घ्या. बटाट्यांची सालं काढून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. १ वाटी तांदूळ असेल तर २ वाट्या तुकडे घ्या. थोडंसं जिरं आणि मिरी दाणे जाडसर भरडून घ्या. जरा जास्त तेलाची फोडणी करा. फक्त तमालपत्र घाला. त्यावर बटाट्याचे तुकडे आणि आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. चांगलं परता. नंतर त्यात जिरं-मि-याची पूड घाला. १ मोठा चमचा दही घालून परता. तांदूळ घाला. चांगलं लाल रंगावर परता. दुप्पट पाणी आणि मीठ घाला. भात शिजत आला की थोडंसं साजूक तूप घाला.
पुलाव – गाजर-फ्लॉवर-सिमला मिरची-मटार-बटाटा अशा हव्या त्या भाज्या घ्या. तांदूळ धुवून त्याला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा बिर्याणी पुलाव मसाला लावा. तेलावर किंवा तुपावर अख्खा गरम मसाला घाला. त्यावर भाज्या घाला. चांगलं परता. त्यावर तांदूळ घालून चांगलं परता. मग दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजू द्या.
मसालेभात – फ्लॉवर-वांग्याचे तुकडे-बटाटा-मटार अशा भाज्या घ्या. तांदळाला काळा मसाला चोळून ठेवा. तेलाची फोडणी करा. त्यावर अगदी थोडा अख्खा गरम मसाला घाला. त्यावर भाज्या घाला. चांगलं परता. थोडंसं सुकं खोबरं-धणे-सुकी लाल मिरची-जिरं असं वाटून घाला. परतलं की त्यावर तांदूळ घाला. मीठ घाला. दुप्पट पाणी घाला. काजूचे तुकडे घाला. चांगलं मऊ शिजू द्या. वरून साजूक तूप घाला.

उपलब्ध भाज्यांमध्ये काय करता येईल याचे काही पर्याय या पोस्टमध्ये मी सांगितले आहेत. आणखी काही प्रकार पुढच्या पोस्टमध्ये लिहीन. आपली कल्पनाशक्ती वापरून असे अजूनही किती तरी प्रकार करता येऊ शकतील.

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा. तुम्ही आता मला Instagram वर sayaliniranjan या आयडीवर फॉलो करू शकाल.

सायली राजाध्यक्ष

2 thoughts on “परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ

  1. HI Sayali! my name is also sayali. hope you are doing fine
    i want to thank you for this wonderful blog. its a saviour for me!! i shifted to UK 3 weeks back and got married 6 moths back so u can understand my situation 🙂 i am reading your blog daily and try to cook whatever is available here. thank you so much for this. i have one request can you give me some tips about phulka pr polya?? Very bad at it

    Best wishes

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: