गेली काही वर्षं प्रत्येक गोष्टीचा एखादा खास दिवस ठरवण्याची पद्धत रूळते आहे. आणि ही पद्धत मला आवडते. निदान त्यामुळे त्या विषयावर किती तरी चर्चा होते. म्हणजे २१ डिसेंबर हा वर्ल्ड साडी डे आहे किंवा १ डिसेंबर हा इंटरनॅशनल एड्स डे आहे तर २९ सप्टेंबर हा इंटरनॅशनल हार्ट डे आहे. १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर आजचा दिवस म्हणजे ४ मार्च हा इंडिया पिकल डे अर्थात भारतीय लोणचं दिन म्हणून पाळला जाणार आहे अशी माहिती निरंजननं, माझ्या नव-यानं मला सांगितली. त्यानं बहुधा ट्विटरवर ती वाचली.
लोणचं हा भारतीय जेवणाचा एक खरोखर अविभाज्य भाग आहे. खरोखर यासाठी म्हणतेय की अमुकअमुक अविभाज्य भाग आहे असं बरेचदा सवयीनं लिहिलं जातं पण लोणच्याच्या बाबतीत मात्र ते मनापासून खरं आहे. भारतात जवळपास सर्व राज्यांमधल्या जेवणांमध्ये लोणच्यांचे किती तरी प्रकार असतात. लोणचं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं, पाचक रस स्त्रवायला लागतात. कितीही बेचव जेवण असलं तरी लोणच्यामुळे ते सुसह्य होतं.
महाराष्ट्रातच बघायचं झालं तर कैरीचं किंवा आंब्याचं लोणचं, आवळ्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबाचं तिखट लोणचं, लिंबाचं उपासाचं गोड लोणचं, रस लिंबू, भोकराचं लोणचं, फणसाचं लोणचं, कैरीचा तक्कू, आंबोशीचं लोणचं असे लोणच्याचे किती तरी प्रकार केले जातात. उन्हाळ्याच्या अखेरीला साधारण वळवाचा पाऊस झाल्यानंतर वर्षभर साठवणीचं लोणचं करून ठेवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लोणच्यासाठी कै-या आणणं, मग त्या स्वच्छ धुवून पंचावर पसरणं, नंतर त्या कैरीच्या अडकित्त्यानं फोडून घेणं, त्यातल्या बाठीचे तुकडे काढून त्या फोडी साफ करणं, नंतर लोणच्याचा मसाला करणं, मेथ्यांची खमंग फोडणी करून ती थंड करायला ठेवणं, बरण्या धुवून, चांगल्या कोरड्या करून त्यांना हिंगाची धुरी देणं, लोणचं मिसळणं, मिसळलेल्या लोणच्याच्या करकरीत फोडी मनसोक्त खाणं, नंतर बरणीत खाली मिठाचा थर देऊन त्यावर लोणचं भरणं, परत वर मिठाचा थर देणं, वरून थंड झालेली फोडणी ओतणं, बरणीचं झाकण घट्ट लावणं, वर त्याला पांढ-या शुभ्र कापडाचा दादरा बांधणं आणि मग त्या निगुतीनं उचलून ठेवणं ही सगळी प्रक्रिया किती सुंदर असते!
माझ्या पिढीच्या प्रत्येकाच्या लहानपणाशी लोणच्याच्या आठवणी जोडलेल्या असतातच. कारण तेव्हा लोणची घरी केली जायची. बेडेकर लोणचं तेव्हाही मिळायचं पण घरचं संपल्याशिवाय विकत आणलं जायचं नाही. तेव्हा शाळेत दोन मधल्या सुट्या नसायच्या. सॅलड नेण्याची सक्ती शाळा करायच्या नाहीत. रादर तेव्हा शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष देत असाव्यात! त्यामुळे डब्यात कोण काय आणतंय याकडे शिक्षक लक्ष देत नसत. डब्यात लोणचं पोळी नेणं मला सगळ्यात जास्त आवडायचं. त्यातही ज्या मैत्रिणीनं लोणचं आणलं असेल तिच्याकडून फोड मिळवण्यासाठी घासाघीस करणं फार महत्वाचं होतं. मला चिवडा नेला तरी बरोबर लोणचं लागायचंच. अजूनही मला उपमा, पोहे, फोडणीचा दही भात, धिरडी या सगळ्याबरोबर लोणचं लागतंच. घरात खायला काही नसलं तर अजूनही कधीही लोणचं-पोळी आवडीनं खाऊ शकते.
माझ्या आईची एक मैत्रीण आंध्र प्रदेशची होती. तिच्यामुळे आमच्या घरात प्रथमच आलं-लसूण घातलेलं झणझणीत कैरीचं लोणचं पहिल्यांदा केलं गेलं आणि ते नंतर होतच राहीलं. शिवाय माझी आई का-हळाचं, लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घातलेलं लोणचं करते, तेही मस्त लागतं. आईच्या याच मैत्रिणीकडून आई आंध्र प्रदेशाची खासियत असलेलं टोमॅटोचं लोणचंही शिकली होती. तेही छानच लागतं.
उत्तरेत भरलेल्या लाल मिरच्यांचं लोणचं केलं जातं. त्यात बडिशेपेचा वापर केला जातो आणि मोहरीचं तेल वापरलं जातं. आपल्याकडे लोणच्यात शेंगदाण्याचं किंवा तिळाचं तेल वापरलं जातं. घरगुती लिंबाच्या लोणच्यात फोडणीचा वापर केला जात नाही. लिंबू आणि मीठ असल्यामुळे त्यात टिकवण्यासाठी वेगळ्या घटकाचा वापर करावा लागत नाही. माझ्या आजीकडे बीडला सुटीत गेलं की जेवताना मला अगदी जुनं झालेलं, काळं पडलेलं लिंबाचं लोणचं खायला फार आवडायचं. विशेषतः मऊ गुरगुट्या भात, तूप आणि हे लोणचं. अजूनही इंद्रायणी तांदळाचा मऊ, आसट भात असेल तर लोणच्याचा खार, विशेषतः लोणच्याचं तेल घेऊन खायला फार म्हणजे फारच आवडतं.
उत्तरेसारखंच आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपणही भाज्यांचं लोणचं करतो. त्यात गाजरं, फ्लॉवर, मटार, कार्लं, मिरच्या, आंबेहळद, मुळा, गवार अशा भाज्या छान लागतात. माईनमुळ्याचं लोणचंही ब-याच ठिकाणी केलं जातं. लोणच्यात मुख्यत्वे मोहरीची डाळ, तिखट, हळद, मेथ्यांची तळून केलेली पूड आणि मिठाचा वापर होतो. त्यात घरातल्या पद्धतींनुसार बदल होत जातात. म्हणजे कुणी आलं-लसूण घालतं तर कुणी लवंगा-मिरी दाणे घालतं. कुणी गूळ किंवा साखरेचा वापर करतं. आपल्याकडे चिकन, मटन, माशांचं लोणचंही केलं जातं. गोवन पोर्क पिकल प्रसिद्धच आहे.
दक्षिण भारतात ओल्या मसाल्यांचं लोणचं मिळतं. म्हणजे ओली मिरी, लसूण आलं यांचं स्वतंत्र किंवा मिश्र लोणचं तिथे प्रसिद्ध आहे. खारवून पदार्थ साठवण्याची किंवा पिकलिंगची पद्धत जगातल्या ब-याच भागांमध्ये आहे. पदार्थ बराच काळ टिकावेत, ते खराब होऊ नयेत म्हणून मीठ किंवा तेल किंवा व्हिनेगरचा वापर पिकलिंगसाठी केला जातो. त्यात जी मोहरी किंवा खडा मसाला वापरला जातो त्यानंही बॅक्टेरियांचा नाश व्हायला आणि पर्यायानं पदार्थ टिकायला मदत होते. जर्मनीतलं सॉरक्रॉत (उच्चार कदाचित चूक असू शकतो), कोरियन किमची, फिलिपिनो आचारा, इंडोनेशियन, मलेशियन अकार, श्रीलंकन अच्छारू ही सगळी लोणच्याचीच रूपं. मेडेटेरेनियन जेवणात पिकल्ड भाज्यांचा वापर केलेला असतो. त्यासाठी व्हिनेगर वापरतात.
पिकल हा मूळ डच शब्द आहे. पण लोणचं करण्याची किंवा पिकलिंगची सुरूवात जगात सगळ्यात आधी भारतात सुरू झाली असं मानतात. त्यामुळे आजच्या या भारतीय लोणचं दिनाचं महत्व आपल्याला सगळ्यात जास्त आहे!
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
Nice
LikeLike