मेथीफळं

10366272_514391318767592_7297320868161576773_nशहरी राहणीमानामुळे म्हणा किंवा मुलांच्या बदललेल्या आवडीनिवडींमुळे म्हणा पण आजकाल बरेचसे पारंपरिक पदार्थ घराघरांमधून हद्दपार झालेले आहेत. आमच्याकडे निरंजन सारस्वत तर मी देशस्थ. सारस्वतांचे फणसाचा तळ, धोंडस, तिरफळं घालून केलेली माशांची वा डाळीची आमटी हे पदार्थ निरंजनला आवडत नाहीत त्यामुळे ते आमच्या घरात केले जात नाहीत. माझ्या सासुबाई मात्र अजूनही क्वचित का होईना पण हे पदार्थ करतात. सुदैवानं मला बहुतेक सर्व मराठवाडी पदार्थ मनापासून आवडतात. पण माझ्या मुलींना त्यातले काही पदार्थ आवडत नाहीत. त्यामुळे असे पदार्थ कमी केले जातात. पण आता अन्न हेच पूर्णब्रह्मच्या निमित्तानं का होईना पण मी हे पदार्थ पुन्हा करायला लागले आहे. कारण हे पदार्थ जर केले गेले नाहीत तर हळूहळू कारण नसताना ते लोप पावतील. आज मी अशाच एका पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे. हा पदार्थ आहे मेथीफळं. हा पदार्थ एक वन डिश मील म्हणून करता येतो. यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स आणि मेथीमुळे भरपूर व्हिटॅमिन्स आणि फायबर आहे. त्यामुळे हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे. माझी मैत्रीण ऋग्वेदिता परख ही सिएटलमध्ये आँकोपॅथॉलॉजिस्ट आहे. शिवाय ती हेल्थ कॉन्शसही आहे. तिनं मला या पेजवर काही पौष्टिक रेसिपीज सुचवायला सांगितलं आहे. कारण भारतात मधुमेहाचं प्रमाण फार मोठं आहे, त्या अनुषंगानं तरूण वयातच हृदयविकार होण्याचीही शक्यता बळावते. मी आहार तज्ज्ञ नाही. पण साधारण काय खावं हे हल्ली सगळ्यांनाच थोडंफार माहीत असतं. त्या अनुषंगानं मला ही रेसिपी पौष्टिक वाटते.

मेथीफळं

साहित्य – ७-८ मेथीच्या लहान जुड्या (मोठ्या असतील तर २-३ पुरतील. समुद्र मेथी नव्हे, नेहमीची मेथी), २ वाट्या कणीक, पाऊण वाटी डाळीचं पीठ, २-३ टीस्पून तिखट, २ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, २-३ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग

कृती –
१) कणीक, डाळीचं पीठ, तिखट-मीठ-हळद-हिंग-जिरेपूड एकत्र करून घ्या. त्यात पाणी घालून नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेसारखी भिजवा.
२) मेथी स्वच्छ धुवून पंचावर पसरून पूर्णपणे कोरडी होऊ द्या. नंतर ती बारीक चिरा. त्यातही चवीनुसार तिखट, मीठ घाला.
३) कणकेची मोठी पोळी लाटून लहान वाटीनं त्याची पु-यासारखी फळं कापा. अशी सगळी फळं करून घ्या.
४) नॉनस्टिक कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करा. नेहमीसारखी फोडणी करा.
५) त्यावर मेथीचा एक थर द्या. त्या थरावर फळं लावा. परत मेथीचा थर द्या. परत फळं लावा. असे सगळे थर लावा.
६) पॅनवर झाकण घाला. मध्यम आचेवर ३-४ मिनिटं शिजू द्या. झाकण काढून नीट हलवा. परत झाकण घाला.
७) फळं शिजत आली की झाकण काढा. नंतर मधूनमधून हलवत फळं चांगली खरपूस लालसर होऊ द्या.
८) सगळ्या बाजूंनी लाल झाली की गॅस बंद करा.

 

मेथीफळं तयार आहेत. खायला देताना वरून साजूक तूप घालून द्या.

इतकी फळं २-३ माणसांना जेवण म्हणून पुरे होतात. बरोबर थंड ताक किंवा मठ्ठा घ्या. ज्यांना मेथी खूप आवडते त्यांना हा प्रकार आवडेल. पण ज्यांना मेथीचा कडवटपणा आवडत नाही त्यांना कदाचित आवडणार नाही कारण मेथीच्या भरपूर प्रमाणामुळे हा पदार्थ थोडासा कडसर लागतो. आवडीनुसार तिखट-मिठाचं प्रमाण वाढवा. तेलही अजून जास्त घातलंत तर उत्तमच लागतं. पण नॉनस्टिकमध्ये केल्यानं तेल फारसं लागत नाही.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

2 thoughts on “मेथीफळं

  1. When i had seen this recipe on your facebook page back in 2016, I had kept this in my list of recipes to try out. I was able to execute it today and it came out really well. To counter the bitterness of methi, I added a little bit of sugar and cheese as well. Thank you for sharing this unique recipe with us.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: