पारसी आणि इराणी या दोन्ही जमाती इराणमधून भारतात येऊन स्थायिक झाल्या. पारसी आणि इराणी या दोन्ही जमाती मूळच्या इराणच्याच. दोन्ही जमाती झरातृष्ट किंवा झोरास्टरलाच पुजतात. दोन्ही जमातींचा धर्म झोराष्ट्रीयनच. पण तरीही दोन्ही जमाती वेगवेगळ्या. खाण्यापिण्याच्या सवयीही काहीशा वेगळ्या. पारसी हे इराण्यांच्या फार आधी भारतात आले. इस्लामी राज्यकर्त्यांनी इराणवर आक्रमण केल्यानंतर आपली कत्तल होईल या भीतीनं आठव्या शतकापासून पारसी भारतात यायला सुरूवात झाली आणि सगळ्यात आधी ते गुजरातेत स्थायिक झाले. म्हणून त्यांनी गुजरातीलाच (कच्छी गुजराती) आपली मातृभाषा मानली. सुरूवातीच्या काळात पारसी शेती करत असत. नंतर नंतर त्यांनी व्यापारउदीमाला सुरूवात केली आणि त्यात लक्षणीय प्रगती केली. मी मागेही लिहिलं होतं की, दुस-या देशातून येऊन पारशांनी या देशाला आपलंसं केलं, आपलं मानलं. पारसी बायका साड्या नेसायला लागल्या. ते या देशाची भाषा बोलायला लागले. संख्येनं अगदी कमी असूनही त्यांनी देशाचं ऋण फेडायला मागेपुढे बघितलेलं नाही. आज आपण आजूबाजूला बघितलं तर समाजकार्यात पारसी सगळ्यात अग्रभागी आहेत. त्यातही टाटा. ते कुठल्याही राजकीय झेंड्याखाली येत नाहीत. आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून ऊरबडवेपणा करत नाहीत. आमच्यावर अन्याय होतो असा ओरडा करत नाहीत. आज ही जमात नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे, कारण त्यांचा शुद्धतेचा अट्टहास. धानसाक, ब्राऊन राईस, पातरानी मच्छी, लगननू कस्टर्ड हे पारशांचे काही खास पदार्थ.
म्हटलं तर इराणी हे पारशांचेच भाऊबंद. पण तरीही या दोन जमाती एकमेकांना वेगळं मानतात. इराणी फार नंतर भारतात आले. त्यांनीही भारतातल्या चालीरितींना आपलंसं केलं. इराणीही हैदराबाद, मुंबई आणि गुजरातचा काही भाग या ठिकाणीच वसले. एक काळ असा होता की मुंबईत इराणी रेस्टॉरंट्सची चलती होती. त्यांची संगमरवरी टेबलं, दुधाळ चहा, कडक ब्रूनमस्का, त्यांचं खास ऑम्लेट, खिमा पाव, बेरी पुलाव अशी खास वैशिष्ट्यं होती. मुंबईतली ब्रिटानिया, कयानी अँड कंपनी, येझदानी बेकरी, कूलर, कॅफे माँडेगर, लिओपोल्ड कॅफे ही प्रसिद्ध इराणी रेस्टॉरंट्स. त्यातली हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सोडली तर हळूहळू बंद पडत गेली. पण गंमतीचा भाग असा की आता इराणी रेस्टॉरंट्सचं पुनरूज्जीवन होऊ घातलंय. मी काही दिवसांपूर्वीच माहिमच्या इराणी चाय या रेस्टॉरंटबद्दल लिहिलं होतं. आज मी लिहिणार आहे ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडलेल्या सोडाबॉटलओपनरवाला या लांबलचक नावाच्या पारसी-कम-इराणी रेस्टॉरंटबद्दल.
प्रसिद्ध रेस्तॉरेत्युअर ए. डी. सिंग यांचं हे रेस्टॉरंट आहे. खास इराणी रेस्टॉरंटमधल्यासारखी लहान टेबलं, त्यावर घातलेले चौकड्यांचे टेबलक्लॉथ, त्याच्या वरून घातलेली काच, जेवण सर्व्ह करताना जुनाट दिसणा-या पितळेच्या टिफिनचा केलेला वापर, कोल्डड्रिंक सर्व्ह करण्यासाठी उभट साध्या काचेच्या ग्लासांचा वापर, जुन्या पद्धतीच्या लँपशेड्स, ज्यूक बॉक्स, रेस्टॉरंटमध्ये जागोजागी जुन्या इराणी आणि पारसी दुकानांच्या लावलेल्या जाहिराती, पारशांच्या विक्षिप्तपणाबद्दल लिहिलेले मजेदार बोर्ड्स, गल्ल्यावर खास इराणी बिस्किटांच्या बरण्या या सगळ्यामुळे या रेस्टॉरंटचं वातावरण एकदम जिवंत होतं. मेन्यूमध्ये एग्ज केजरीवाल, आलू आंटी के कटलेट्स, चिकन फरचा, बैदा चिकन रोटी, भरूची पनीरी आकुरी, बेरी पुलाव, मटन धानसाक, चिकन धानसाक, व्हेज धानसाक, ब्राऊन राईस, कचुंबर, पातरानी मच्छी, पारसी मटन मसाला रोस्ट अशा इराणी आणि पारसी पदार्थांची रेलचेल आहे. शिवाय काही गोवन आणि काही बंबईय्या पदार्थही मेन्यूत आहेत. शिवाय त्यांचं खास रासबेरी सोडाही आहे.
मी स्वतः शाकाहारी असल्यानं आधी व्हेज कटलेट्स आणि फ्रेंच फ्राईड विथ ठेचा मसाला असं घेतलं. बरोबर रासबेरी सोडा. मुख्य जेवणात मी व्हेज धानसाक आणि ब्राऊन राईस खाल्ला. माझ्या नव-यानं आणि त्याच्या मित्रानं मटन सलीबोटी आणि पाव खाल्लं. आम्ही इराणी आणि पारसी जेवण यापूर्वीही अनेकदा जेवलो आहोत. शिवाय धानसाक आणि राईस तर मी घरीही करते. पण या रेस्टॉरंटमधलं जेवण आम्हाला विशेष आवडलं नाही. धानसाक घट्ट असतं, ते आमटीसारखं पातळ केलेलं होतं. सलीबोटीतही टोमॅटोचा फार जास्त वापर केला होता असं निरंजन म्हणाला.
पण ते सगळं वातावरण अनुभवणं हा एक अनुभव होता इतकं मात्र खरं. तेव्हा जर जुन्या इराणी-पारसी रेस्टॉरंटचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा सोडाबॉटलओपनरवालाला भेट द्यायला हरकत नाही.
सोडाबॉटलओपनरवाला
कॅपिटॉल बिल्डिंग, जी ब्लॉक, तळमजला, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.
फोन नंबर – 9892841456 (फक्त पत्ता विचारायला फोन करू शकता. ते प्री-बुकिंग घेत नाहीत.)
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष