अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण सुपर्णा राखे-भोसले हिनं मला मध्यंतरी एक मेसेज पाठवला होता. तिला हे पेज खूप आवडतं आणि या पेजमुळे तिला खूप मदत होते असं तिनं या मेसेजमध्ये कळवलं होतं. सुपर्णा ही मूळची सोलापूरची. लग्न होऊन ती मुंबईत आली. ती एका खाजगी बँकेत टेक्नॉलॉजी विभागात काम करते. लग्नापूर्वी तिला स्वयंपाक करायला आवडायचं पण नंतर संसार, नोकरी यात व्यग्र झाल्यामुळे तिनं स्वयंपाकाला बाई ठेवली. अन्न हेच पूर्णब्रह्म वाचल्यानंतर तिला परत स्वयंपाक करण्याची उर्मी आली असं तिनं लिहिलंय. हे पेज वाचून ती परत स्वयंपाक करायला लागली. सुरूवातीला स्वयंपाक करताना कुठली गोष्ट मिळाली नाही की चिडचिड व्हायची. पण आता स्वयंपाकघराचं आणि स्वयंपाकाचं नियोजन ती करते. म्हणून आता स्वयंपाक करणं तिला स्ट्रेस बस्टर वाटतो. तिचा नवराही तिला स्वयंपाकात मदत करायला लागला आहे.
माझ्या या पेजमुळे तिला हे करावंसं वाटलं म्हणून माझे आभार मानण्यासाठी तिनं मला हा मेसेज केला होता. खरं सांगू सुपर्णा, तुझ्या मनातही हे सगळं करावं असं असणारच. कधीकधी कुणाचं तरी प्रोत्साहन आपल्याला हवं असतं किंवा कधीतरी कुणाचं तरी बघून आपल्याला असं करावंसं वाटतं. त्यामुळे मी जर तुला असं करायला प्रवृत्त केलंय असं तुला वाटत असेल तर मला खरोखर मनापासून आनंद आहे. आपल्याला जे काही थोडंफार बरं करता येतं ते प्रत्येकानं इतरांबरोबर शेअर करावं असं मला वाटतं. त्यातूनच माझे दोन्ही ब्लॉग्ज मी लिहायला लागले. आणि जेव्हा त्याची अशी पावती मिळते ती सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.
कृतज्ञता म्हणून मला काही तरी भेट द्यावी असं वाटतं असं सुपर्णानं मला कळवलं. तिची आई सोलापूरचा काळा मसाला सुरेख बनवते असंही लिहिलं. आई आधी फक्त घरच्यांसाठी हा मसाला तयार करायची. पण आर्थिक परिस्थितीमुळे ती आता मसाला करून विकते. सुपर्णानं मला हा मसाला भेट म्हणून कुरियर केला. हे पेज सुरू झाल्यावर मला मिळालेली ही सगळ्यात सुंदर भेट आहे. हा मसाला वापरून जेव्हा मी काही करेन तेव्हा नक्की कळवेन असं मी सुपर्णाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज मी तिच्या आईचा मसाला वापरून चवळीची उसळ केली आहे. मस्त झणझणीत झाली आहे. तर हा आनंद तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा असं मला वाटलं.
Thank you Suparna!
सुपर्णाचा काळा मसाला (हा ब्राह्मणी काळ्या मसाल्यापेक्षा कोल्हापुरी मसाल्याचा जवळ जाणारा आहे.) कुणाला मागवायचा असेल तर तिचा नंबर खाली शेअर करते आहे.
सुपर्णा राखे-भोसले – 9004086354
असाच प्रतिसाद देत रहा.
चवळीच्या उसळीची रेसिपी अगदीच सोपी आहे. १ वाटी चवळी रात्रभर भिजवा. सकाळी ती स्वच्छ धुवून घ्या. छोट्या कुकरमध्ये नेहमीसारखी तेल-हिंग-मोहरी-हळद अशी फोडणी करा. त्यात बारीक चिरलेला १ कांदा घाला. कांदा गुलाबी झाला की त्यात बारीक चिरलेला १ टोमॅटो घाला. चांगलं परता. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून परता. त्यात चवळी घाला. थोडंसं मीठ आणि हा मसाला घाला (मसाल्यात मीठ आहे). हवं तितकं पाणी घाला. कुकरचं झाकण लावा. प्रेशर आलं की बारीक गॅसवर ५-७ मिनिटं ठेवा. चवळीची झणझणीत उसळ तयार आहे. गरम पोळी, भाकरी किंवा भात कशाबरोबरही मस्त लागते.
ही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष
सायली
धन्यवाद,मी नेहमी उत्तम मसाल्यांचा शोधात असते,आणि सोलापुरी मसाला ,येसर,हेतर हवेच असतात,त्यामुळं सुपर्णाचा क्रमांक त्वरित स्टोर केला,
खूप खूप आभार
LikeLike
धन्यवाद शुभा. मी तुमचे लेख नेहमी वाचते. छान असतात.
LikeLike