परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी उपलब्ध साहित्यामधून करता येतील असे काही प्रकार आपण गेल्या दोन पोस्टमध्ये बघितले. त्याच पोस्टचा हा तिसरा भाग.
काही भाज्यांचे प्रकार
कांद्याची भरडा भाजी – कांदा मध्यम आकारात चिरा. तेलाची फोडणी करा. हिंग-मोहरी घाला. त्यावर कांदा घाला. नीट हलवून झाकण ठेवा. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे पण काळा किंवा कोरडा होता कामा नये. म्हणून मंद आचेवर मधूनमधून हलवत राहा. कांदा शिजत आला की त्यावर डाळीचं जाडसर पीठ, लाल तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घाला. चांगलं हलवून घ्या. भाजी खूप कोरडी होणार नाही याचा अंदाज घेऊन तितपतच पीठ घाला. झाकण घालून चांगली वाफ येऊ द्या. पीठ शिजलं की भाजी झाली असं समजा. कोरडं वाटलं तर पाण्याचा हबका देऊन शिजवा. हवी असल्यास वरून कोथिंबीर घाला. अशीच कांदा पातीची भाजी करा.
कांद्याची भाजी २ – तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यावर मध्यम आकारात चिरलेला कांदा घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर हळद-तिखट-मीठ-दाण्याचं कूट घालून हलवा. परत एक वाफ काढा. अशीच कांदा पातीची भाजी करा.
कांद्याची रस्सा भाजी – कांद्याचे मोठे-मोठे तुकडे करा किंवा शॅलट्स घ्या. थोडे धणे, सुकी लाल मिरची, सुकं खोबरं आणि तीळ भाजून घ्या. थंड झालं की त्यात थोडी चिंच आणि गूळ घाला. काळा किंवा गोडा मसाला घाला. मिक्सरला वाटून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यावर कांदा घाला. एक वाफ येऊ द्या. वाफ आली की त्यावर हा मसाला घाला. मीठ घाला. थोडं गरम पाणी घाला. चांगली मस्त उकळी येऊ द्या. आपल्याला हवा तितपत रस्सा ठेवा.
फ्लॉवरची भाजी – फ्लॉवरचे बारीक तुरे काढा. तेलाची फोडणी करा. मोहरी-हिंग-हळद घाला. त्यावर तुरे घाला. झाकण ठेवून जरासं शिजवा. तिखट-मीठ घाला. वरून कोथिंबीर घाला. ही भाजी लगदा शिजवू नका. ही साधी भाजी दालफ्राय-जिरा राईस, साधी आमटी आणि भात किंवा एखादी रस्सा उसळ आणि पोळी यांच्याबरोबर छान लागते.
फ्लॉवर रस्सा – फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे काढा. थोडं ओलं खोबरं-जिरं-मिरं-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या. तेलाची फोडणी करा. हिंग आणि हळद घाला. फ्लॉवरचे तुरे घाला. चांगली वाफ येऊ द्या. वाटण घाला. आपल्याला हवं तितपत गरम पाणी घाला. मीठ घाला. चिमूटभर साखर घाला. आवडत असल्यास शिजत आल्यावर टोमॅटोचे तुकडे घाला.
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी – कांद्याच्या भरडा भाजीप्रमाणेच करावी.
सिमला मिरचीची भाजी २ – सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. तेलाची फोडणी करा. हिंग-हळद घाला. सिमला मिरचीचे तुकडे घाला. एक वाफ येऊ द्या. फार शिजवू नका. त्यात दाण्याचं कूट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, तिखट आणि मीठ घाला. अंगासरशी रस ठेवा.
सिमला मिरचीची भाजी ३ – छोट्या आकाराच्या सिमला मिरच्या घ्या. त्याचा देठ काढून आतून संपूर्ण पोखरून घ्या. बटाटा उकडून मॅश करा. त्यात आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, बारीक चिरलेला कच्चा कांदा, मीठ आणि लिंबू किंवा आमचूर घाला. हे सारण सिमला मिरच्यांमध्ये भरा. पॅनमध्ये तेल गरम करा. त्यावर मिरच्या लावा. झाकण ठेवून एक वाफ द्या. नंतर झाकण काढून मध्यम आचेवर सगळ्या बाजूंनी लाल होऊ द्या. या मिरच्यांमध्ये पनीर-जिरेपूड-बारीक चिरलेली हिरवी मिरची-थोडं चीज असं घालूनही ही भाजी करता येईल.
काही पराठ्यांचे प्रकार
ब्रॉकोली पराठा – ब्रॉकोली किसून घ्या. त्यात मीठ-मिरपूड-किसलेलं चीज घाला. पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवा. त्याचा गोळा घेऊन वाटी करून हे सारण भरा. हलक्या हातानं पराठा लाटा. बटर सोडून भाजा.
गाजर पराठा – गाजरं वाफवून घ्या. ती मॅश करा. त्यात जिरे पूड, तिखट, मीठ घाला. त्यात मावेल तेवढी कणीक घाला. पराठे करा. तूप लावून भाजा. बीट मिळत असेल तर गाजर आणि बीट एकत्र करून पराठा करा.
दुधी पराठा – दुधी किसून घ्या. त्यात लसूण-मिरच वाटण-जिरेपूड-मीठ-तिखट-हळद घाला. भरपूर कोथिंबीर चिरून घाला. मिश्रण एकत्र करा. त्याला चांगलं पाणी सुटू द्या. मग त्यात थोडं बेसन किंवा डाळीचं पीठ आणि कणीक घालून भिजवा. पराठे करा. तेल किंवा तूप लावून भाजा.
आलू पराठा – बटाटे उकडून घ्या. मॅश करा. त्यात आलं-लसूण-मिरची वाटण, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे-जिरेपूड, आमचूर घाला. आवडत असल्यास थोडा पुदिना घाला. नेहमीसारखी कमीक भिजवा. त्याचा गोळा घ्या. त्यात सारण भरा. पराठे करा. तेल-तूप किंवा बटर लावून भाजा.
कांद्याच्या पातीचा पराठा – कांद्याची पात बारीक चिरा. त्यात चीज किसून घाला. मीठ-मिरपूड घाला. कणकेची वाटी करून सारण भरा. हलक्या हातानं पराठा लाटा. बटर लावून खमंग भाजा.
फ्लॉवरचा पराठा – फ्लॉवर किसून घ्या. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा-बारीक चिरलेली हिरवी मिरची, धणे पूड, थोडा गरम मसाला, आमचूर आणि मीठ घाला. कणकेचे दोन लहान गोळे घ्या. त्यांच्या पोळ्या लाटा. एका पोळीवर हे सारण पसरा. दुसरी पोळी त्यावर ठेवून कडा नीट बंद करा. परत हलक्या हातानं लाटा. तूप लावून भाजा.
कोबी पराठा – कोबी किसून घ्या. त्यात लसूण-मिरची वाटून घाला. हळद-तिखट-मीठ घाला. भरपूर कोथिंबीर घाला. या सारणाला चांगलं पाणी सुटू द्या. त्यात बसेल तशी कणीक घाला. पीठ भिजवून पराठे करा. तेल लावून भाजा.
वांग्याचे काप – वांग्याच्या गोल चकत्या करा. त्याला तिखट-हळद-मीठ लावा. थोडा रवा आणि तांदळाचं पीठ मिसळा. त्यातही तिखट-हळद-मीठ घाला. त्यात हे काप घोळवा. तव्यावर किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. रवा आणि तांदळाच्या पिठाऐवजी बेसनही वापरू शकाल.
वांग्याची भजी – वांग्याच्या चकत्या करून त्या अर्धगोलाकार कापा. भज्यांच्या पीठासारखं पीठ भिजवा. त्यात या चकत्या बुडवून तळा.
कांदा आणि गाजराची चटणी – कच्चा कांदा आणि कच्चं गाजर मिक्सरला फिरवा. त्यात जरा जास्त तिखट-मीठ आणि दाण्याचं कूट, हवा असल्यास थोडा गूळ किंवा साखर गालून परत फिरवा. याच पद्धतीनं फक्त कांद्याची, कैरी आणि कांद्याची चटणीही करता येते.
आता जगातल्या बहुतांश देशांमध्ये भारतीय कामानिमित्त येजा करत असतात. त्यातल्या अमेरिका-इंग्लंडसारख्या देशांमध्ये भारतीय स्वयंपाकासाठी लागणारे बहुतेक सगळे घटक पदार्थ सहज उपलब्ध होतात. पण काही देशांमध्ये मर्यादित घटक पदार्थ उपलब्ध असतात. अशा देशांमध्ये राहणा-या मित्रमैत्रिणींसाठी, विशेषतः तरूण, नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यांसाठी या गेल्या तीन पोस्ट्स लिहिल्या आहेत. जे बरेच वर्षं परदेशात राहाताहेत, बरीच वर्षं स्वयंपाक करताहेत ते अनुभवी असतात. त्यांनी अपु-या साधनसामुग्रीतून पूर्णब्रह्म साकारण्याचं कौशल्य मिळवलेलं असतं. शिवाय तिथे मिळणा-या भाज्यांमधून आपल्या पद्धतीच्या पाककृतीही करण्यात प्राविण्य मिळवलेलं असतं. त्यामुळे या पोस्ट्समध्ये मी तशा कुठल्याही रेसिपीज लिहिलेल्या नाहीत.
सायली राजाध्यक्ष
फारच सुंदर लेख.
LikeLike