मिनिमिलिस्टीक लाइफस्टाइल

img20160916194812

मिनिमिलिस्टिक लाइफस्टाइल या विषयावर सध्या जगभर बरीच चर्चा होते आहे. आपण सोसासोसानं बरेचदा नको असलेल्या कित्येक गोष्टी खरेदी करत असतो. वापर न होणा-या कितीतरी गोष्टींचा साठा करत असतो. आमच्या आजुबाजूलाच मी बघते, काही मैत्रिणींच्या सासवा, आया या एखादी गोष्ट केवळ त्यांनी खरेदी केली आहे म्हणून वर्षानुवर्षं काढून टाकू देत नाहीत. घरांचे माळे काठोकाठ भरलेले असतात. एक ओळखीचं कुटुंब अनेक वर्षं परदेशात वास्तव्याला आहे पण त्यांच्या भारतातल्या घरात चाळीस वर्षांपूर्वी घेतलेली क्रॉकरी तुटक्याफुटक्या अवस्थेत पडून आहे.
मुंबईत रस्त्यावरून प्रवास करत असताना बाल्कन्यांमध्ये प्रचंड अडगळ दिसत असते. फिरायला बाहेर पडल्यावर कित्येकांच्या ग्रीलमध्ये नको असलेलं सामान, काही वस्तू विकत घेतल्या असतील तर त्याची रिकामी खोकी पडलेली बघायला मिळतात. थोडक्यात नको असलेल्या गोष्टी फेकवत नाहीत. कुणाला कपडे फेकवत नाहीत, तर कुणाला भांडीकुंडी. मुळात आपली वस्तू दुसरी व्यक्ती वापरणार हे नकोस होतं. किंवा आपण ही वस्तू घेण्यासाठी केलेला खर्च लक्षात असतो म्हणून ती टाकवत नाही. पण ती वापर न होता तशीच पडून असते हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.
माझी मैत्रीण शर्मिला फडके सध्या याच विषयावर एक फार मस्त कॉलम लोकमतमध्ये लिहिते आहे. मिनिमिलिस्टिक लाइफस्टाइल म्हणजे सर्वसंगपरित्याग नव्हे हे ती आवर्जून सांगते. उत्तम आयुष्य जगा पण भरमसाठ पसारा गोळा करून जगू नका, नकोशा गोष्टी जमवू नका, इतकं सोपं हे आहे. मी जेव्हा शर्मिलाचे हे लेख वाचले तेव्हा मी माझ्या घराबद्दल विचार करत होते. माझ्या घरात मी यातलं कायकाय पाळते याचा विचार करत होते.
मला कपडे, ज्युलरी, साड्या खूप आवडतात. त्यामुळे मी ते खरेदी करत असते. पण त्यातही मी सलवार कमीज फारसे घालत नाही त्यामुळे गेली दोन वर्षं मी सलवार कमीज विकत घेणं बंद करून टाकलं आहे. साड्या मात्र मी भरपूर घेते. कुडते जुने झाले म्हणून हल्लीच मी बहुतेक जुने कुडते काढून टाकले आणि नवीन विकत घेतले. मुलींनाही मी तेच सांगत असते. नवीन विकत घेताना जुनं काढून टाकायला हवं असं मला वाटतं. निरंजन स्वतःहून पुस्तकं सोडली तर काहीच खरेदी करत नाही. आमच्या घरात दोन माळे आहेत. एका माळ्यावर प्रवासाला जाताना लागणा-या बॅगा आहेत आणि पावसाळ्यात लागणा-या छत्र्या. तर स्वयंपाकघरातल्या माळ्यावर पावसाळ्यात कपडे वाळत घालण्याचा स्टँड आहे आणि जास्त लोक जेवायला असतील तर स्वयंपाक करताना लागणारी मोठी पातेली आहेत. याव्यतिरिक्त एक फोल्डिंग टेबल आहे, जे पाहुणे आल्यावर आम्ही काढतो. याशिवाय माझ्या माळ्यांवर काहीही सामान नाही. कारण जे सामान आपल्याला दोन महिन्यांहून अधिक काळ लागत नाही ते आपल्याला कधीच लागत नाही असं मला वाटतं (स्वेटर, छत्र्या अशा गोष्टी वगळता).
आम्ही चौघेही खूप पुस्तकं विकत घेत असतो. पण मी आणि निरंजन हल्ली वाचून झालेली, आणि पुन्हा वाचली जाण्याची शक्यता नसलेली पुस्तकं दर सहा महिन्यांनी जड अंतःकरणानं काढून टाकतो. घर लहान असल्यामुळे त्याला पर्यायच नाही. आणि कित्येक पुस्तकं आपण काही आठवणींशी निगडीत असतात म्हणून ठेवून देतो, कधी ती काढून बघतही नाही. घरात ज्या ब-याचशा सीडीज आणि डिव्हिडी आहेत त्या लवकरच हार्ड डिस्कवर घेऊन काढून टाकण्याची आमची योजना आहे. ती प्रत्यक्षात कधी येते ते बघू.
स्वयंपाकघरात नॉनस्टिक भांडी आणि काचेचे रोज लागणारे ग्लास सोडले तर मी फार भांडी विकत घेत नाही. मी स्वतंत्र राहायला लागले तेव्हा जी स्टीलची भांडी विकत घेतली होती त्यात फारच थोडी भर पडलेली आहे. अगदीच आवश्यक असतील तीच स्टीलची भांडी मी घेते. माझ्याकडे ५० माणसं जेवू शकतील इतकी क्रॉकरी आणि कटलरी आहे. पण ती मी हळुहळू जमवलेली आहे. मूळ क्रॉकरी घेतली त्याला १५-१६ वर्षं झाली आहेत. त्यातच मी भर टाकत गेले आहे. आणि आता ती पुरेशी आहे असं मला वाटतं (माणसं घरी आलेली खूप आवडतं त्यामुळे याबाबतीत मी तडजोड करू शकत नाही).
मला स्वतःला आवरण्याचा आजारच आहे. मला घरात कुठेही खूप वस्तू भरलेल्या दिसलेलं आवडत नाही. पुस्तकं सोडली तर आमच्या घरात फार वस्तू ओसंडून वाहात नाहीत. मला कुणाच्या घरी गेल्यावर प्रचंड वस्तूंचा संग्रह दिसला की कसंसंच होतं. कुणाकडे गेल्यावर पसारा दिसला की आवरावासा वाटतो. मला कळतं की हे चूक आहे पण स्वभावाला औषध नाही. माझ्या मेलबॉक्समध्ये जंक मेल्स मी सतत उडवत असते. शिवाय ज्या मेल्स ठेवायची गरज नाही त्याही काढून टाकते. मोबाइलमध्ये नको असलेले मेसेज डिलीट करत राहाते. व्हॉट्सएपवर जे ग्रुप असतात त्यातलं संभाषण कित्येकदा न वाचताच काढून टाकते. व्हॉट्सएपवर रोज शेकड्यांनी येणारे फोटो डिलीट करत असते.
आणि सगळ्यात महत्वाचं पण कुणाला मजेशीर वाटू शकेल असं म्हणजे मला भरमसाठ विरामचिन्हांचा वापर करून लिहिलेलं काहीही वाचायला फार त्रास होतो. इतका की मला ते डाऊनलोड करून आधी स्वच्छ करावंसं वाटतं आणि मग वाचावं असं वाटतं! लोक नको तिथे इतकी विरामचिन्हं, विशेषतः उद्गारवाचक चिन्हं का वापरतात हे मला अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
तर एकूण शर्मिलाच्या लेखांनी विचार करायला भाग पाडलेलं आहे हे नक्की. वाचले नसतील तर तुम्हीही वाचा.

सायली राजाध्यक्ष

One thought on “मिनिमिलिस्टीक लाइफस्टाइल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: