तांदूळ हे धान्य असं आहे की किती तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या रोजच्या खाण्यात आपण त्याचा वापर करत असतो. पोहे तांदळाचेच असतात, इडली, दोसे तांदळासहच बनतात. तांदळाच्या शेवयांचा उपमा केला जातो. भाताचे तर कितीतरी प्रकार करता येतात. तांदूळ हे जगातलं सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं कर्बोदक (कार्बोहायड्रेट) आहे. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये या ना त्या स्वरूपात तांदूळ खाल्ला जातो. आशियातल्या सगळ्या देशांमध्ये रोजच्या जेवणात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा भात असतोच असतो. मध्यपूर्वेतल्या देशांमध्येही तांदळाचा मुबलक वापर केला जातो. आपल्याकडे मिळणारा तांदळाचाच आणखी एक प्रकार म्हणजे मुरमुरे किंवा कुरमुरे किंवा चुरमुरे. अगदी सहज उपलब्ध असलेलं, स्वस्तातलं हे खाणं हे पौष्टिक आहे. त्यात चणे-फुटाणे-शेंगदाणे घालून खाल्लं की पूर्णान्न होतं. भारतात रस्तोरस्ती कुरमुरे विकणारे भडभुंजे असतात. मग कधी त्याची भेळ होते तर कधी झालमुरी.
आमच्याकडे मराठवाड्यात मुरमुरे मुबलक खाल्ले जातात. लहानपणी आजीबरोबर भडभुंज्याकडून गरम मुरमुरे, गरम भट्टीचे शेंगदाणे आणि फुटाणे आणायला जायचे. ताजे कुरमुरे नुसतेही छान लागतात. त्याला थोडा काळा मसाला, कच्चं तेल, तिखट आणि मेतकूट लावूनही मस्त लागतं. बरोबर चिरलेला कच्चा कांदा घेतला तर अजूनच चव वाढते. कुरमु-यांचा चिवडाही पटकन होतो. शिवाय सांगली-कोल्हापूरकडचं भडंगही अफलातून लागतं. आज मी कुरमु-यांची एक खास मराठवाडी रेसिपी शेअर करणार आहे. जी करायला अतिशय सोपी आहे, पौष्टिक आहे, खमंग आहे. या रेसिपीला मोजून १० मिनिटं लागतात. ही रेसिपी आहे सुशीला. माझी एक मामी आहे. तिचं नाव सुशीला आहे. त्यामुळे मला लहानपणी तिचं या पदार्थाशी काहीतरी नातं आहे असं सारखं वाटायचं!
सुशीला
साहित्य – ८ वाट्या कुरमुरे (शक्यतो भेळेचे घ्या. ते चांगले भिजतात), २ टेबलस्पून दाण्याचं भरड कूट, २ टीस्पून तिखट, पाव टीस्पून साखर, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १-२ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
१) प्रथम एका मोठ्या टोपल्यात किंवा पातेल्यात भरपूर पाणी घ्या. त्यात कुरमुरे घाला. ते लगेचच भिजतात. भिजलेले कुरमुरे हाताच्या मुठीत घेऊन चांगले घट्ट पिळून घ्या.
२) पिळलेले कुरमुरे एका ताटात घ्या. त्यावर दाण्याचं कूट, साखर, मीठ, तिखट आणि हळद घाला. हलक्या हातानं नीट मिसळा.
३) एका कढईत तेलाची फोडणी करा. कमी तेल हवं असेल तर १ टेबलस्पूनच वापरा. जास्त चालत असेल तर मग २ वापरा. फोडणीत हिंग फुलला की त्यावर कुरमुरे घाला. चांगलं हलवून घ्या.
४) मंद आचेवर झाकण घालून चांगली दणदणीत वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला.
काही लोक यात डाळ्याचं भरड कूटही घालतात. आवडत असेल तर तेही घाला. इतकं सुशीला ३-४ लोकांना पुरेसं होईल. भडंगाचे कुरमुरे वापरलेत तर जरा जास्त वेळ भिजू द्या.
सायली राजाध्यक्ष