मित्रमैत्रिणींनो, गेले काही दिवस काहीशी कामात होते त्यामुळे या पेजवर काही पोस्ट करू शकले नाही. लोकसत्ता पूर्णब्रह्मचा अंक तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत विकत घेतला असेलच. अनेकांचा तो वाचूनही झाला असेल तर काही जणांनी त्यातल्या काही रेसिपीज करूनही बघितल्या असतील. अंक उत्तम झाला आहे. मराठवाडा वगळता मलाही इतर प्रांतांमधल्या अनेक नवीन रेसिपीज कळल्या आणि आपली खाद्यसंस्कृती किती अफाट आहे तेही जाणवलं. प्रत्येक प्रांतात काही पाककृतींमध्ये साम्य आहे. पण तरीही त्या-त्या प्रांताचा खास असा एक टच त्या पाककृतीला आहे. म्हणूनच ती वेगळी ठरते.
मीही हा अंक हातात आल्याच्या दुस-याच दिवशी वाचून काढला. वाचल्याबरोबर त्यातले पदार्थ कधी करून खाते असं झालं. हात शिवशिवायला लागले. पण लोकसत्ताचे लागोपाठ तीन कार्यक्रम होते. त्यामुळे ठरवलं की ते संपले की मगच करू. त्यानुसार आजपासून यातले पदार्थ करायला घेतले आहेत. अगदी रोजच जमेल असं नाही. पण जसे जमतील तसे सगळे तिखट पदार्थ लागोपाठ करून पाहणार आहे. आणि फोटोंसकट त्या रेसिपी इथे शेअर करणार आहे. ज्यांच्याकडे अंक आहे त्यांनी त्या वाचल्या असतीलच. पण ज्यांच्याकडे अंक नाही त्यांच्यासाठी, विशेषतः परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी मी त्या शेअर करते आहे.
आजची पहिली रेसिपी आहे ती म्हणजे खानदेशी शेवेची भाजी. ही भाजी अनेकांना माहिती असेलही. पण ही रेसिपी आहे ती खानदेशी खाद्यसंस्कृतीबद्दल लिहिणा-या आशाताई पाटील यांची. त्यामुळे ती अस्सल खानदेशी आहे यात शंकाच नाही! शेवभाजी ही जाड तिखट शेव वापरून करतात आणि मटनासाठी ज्या प्रकारचा मसाला वापरला जातो तशा मसाल्यात करतात. मी त्यात फक्त दोन बदल केले. एक म्हणजे मी आलं-लसूण थोडं कमी घेतलं कारण मला फार आलं-लसूण आवडत नाही. आणि तेलाचं प्रमाण मी जरासं कमी केलं. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण जास्त घेऊ शकता.
खानदेशी शेवभाजी
साहित्य – जाड तिखट शेव पाव किलो किंवा २ वाट्या, ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, २ कांदे मध्यम आकारात किंवा पातळ लांब चिरून, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, १ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून खानदेशी मसाला, १ टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून तेल, कांदा भाजण्यासाठी १ टीस्पून तेल, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
कृती –
१) एका कढईत सुकं खोबरं भाजून घ्या. ते काढून ठेवा आणि धणे-जिरे भाजून घ्या. तेही काढून ठेवा.
२) नंतर कढईत १ टीस्पून तेल घालून त्यात चिरलेला कांदा घाला आणि मध्यम आचेवर मधूनमधून परतत तो चांगला लाल होऊ द्या. तो लाल झाला की काढून ठेवा आणि थंड होऊ द्या.
३) भाजलेला मसाला थंड झाला की भाजलेला सुका मसाला, कांदा, खानदेशी मसाला, तिखट, आलं-लसूण हे सगळं मिक्सरवर अगदी एकजीव वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.
४) १ टेबलस्पून शेवही कोरडीच मिक्सरला वाटून तिची पूड करा.
५) एका कढईत तेल गरम करा. तेल चांगलं गरम झालं की त्यात वाटलेला मसाला घालून त्याला तेल सुटेपर्यंत खमंग परता.
६) दुस-या शेगडीवर ४-५ वाट्या पाणी गरम करायला ठेवा. मसाला परतला की त्यात अर्धी वाटी गरम पाणी घाला. २ मिनिटं झाकण ठेवा. मसाल्यातलं तेल वर आलं की त्यात उरलेलं गरम पाणी ओता.
७) शेवेची पूड घाला. चवीनुसार मीठ घाला. सगळं नीट हलवून घ्या आणि रस्सा चांगला उकळू द्या.
८) रस्सा उकळला की त्यात कोथिंबीर घाला. एक उकळी काढून गॅस बंद करा.
९) जेव्हा जेवायचं असेल तेव्हा रस्सा गरम करताना त्यात शेव घाला. चांगला गरम झाला की गॅस बंद करा.
या शेवेच्या भाजीबरोबर मी आज ज्वारीची भाकरी, ठेचा आणि कच्चा कांदा खाणार आहे. शिवाय बरोबर गरम भातही लावलेला आहेच. वासावरून तरी ही भाजी मस्त झाली आहे असं वाटतंय. पावसाळ्यात असं चमचमीत खायला असल्यावर बघायलाच नको!
आणखी एक विशेष म्हणजे या भाजीत मी जो खानदेशी मसाला वापरला तो मला आशाताईंनीच दिला होता. हा मसाला त्या तयार करतात. तो तुम्हाला ऑनलाइन मागवता येईल. त्याची लिंकही शेअर करते आहे.
http://wanderingfoodie.in/shop/
हा मसाला मागवेपर्यंत तुम्ही तुमच्याकडचा मालवणी मसाला किंवा मटन मसाला वापरला तरी चालेल.
मग पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही झणझणीत भाजी करून बघा. कशी झाली होती तेही कळवा.
सायली राजाध्यक्ष
vachoon karavese vatate…tumchi bhasha aavadate.mokali aani aapleypanachi.
LikeLike