आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्याची अमावस्या. आता विजेचे दिवे असतात. पण ज्या काळी वीज नव्हती तेव्हा तेलवात करून वापरण्यात येणा-या दिव्यांमुळेच उजेड होत असे.
आजच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून लख्ख करायचे आणि मल तेलवात करून उजळायचे, त्यांची पूजा करायची अशी जुनी प्रथा आहे. माझी आजी कणकेचे गूळ घालून दिवे करायची, ते उकडून, त्यात तूप घालून, वात पेटवून आम्हाला ओवाळायची आणि नंतर ते दिवे खायला द्यायची. आता ही प्रथा कालबाह्य झाली आहे. कारण वर म्हटलं तसं विजेचे दिवे असताना या दिव्यांना आता तितकंसं महत्त्व उरलेलं नाही. पण जुनी परंपरा म्हणून त्या-त्या सणाला ते-ते ठराविक पदार्थ मी करतेच. तसे आजही मी कणकेचे गूळ घालून दिवे केले होते. त्याचबरोबर माझी मैत्रीण तनुजा बांदिवडेकर हिनं सांगितलेली दिव्यांची खीरही केली होती. फक्त मी त्याला दिव्यांची रसमलई असं नाव दिलं, कारण मी त्यात थोडा बदल केला होता.
कणकेचे दिवे
साहित्य – १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी पाणी, त्यात मावेल तेवढी कणीक, १ टीस्पून तूप, चिमूटभर मीठ, वरून घालायला साजूक तूप
कृती –
१) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ घालून ठेवा.
२) तो विरघळला की त्यात तूप आणि मीठ घालून हलवून घ्या.
३) त्यात मावेल तेवठी कणीक घाला. साधारण आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा. १५ मिनिटं तशीच ठेवा.
४) नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन हातावर त्याचा गोल, जाडसर पेढा करा. पेढ्याच्या मधोमध बोटांनी दाब देऊन हळूवार हातानं कडा काढत त्याला दिव्याचा आकार द्या. असे सगळे दिवे करून घ्या.
५) एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा. त्यावर तयार दिवे ठेवा. झाकण ठेवून २०-२५ मिनिटं वाफवा.
दिवे तयार आहेत. गरम असतानाच वरून साजूक तूप घालून खा.
दिव्यांची रसमलई
साहित्य –
दिव्यांसाठीचं साहित्य – १ वाटी पाणी, १ वाटी सुवासिक तांदळाची पिठी, १ टीस्पून तूप, १०-१२ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ
रसमलईचं साहित्य- १ लिटर दूध, ५ टीस्पून साखर, प्रत्येकी १ टेबलस्पून काजू-बदामाचे तुकडे, थोडीशी चारोळी आणि बेदाणे, अर्धा टीस्पून जायफळ पूड
कृती –
दिव्यांची कृती –
१) एका कढईत पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात तूप आणि मीठ घाला. केशराच्या काड्याही घाला.
२) त्यात तांदळाची पिठी घाला. गॅस बंद करा. उलथन्यानं हलवून घ्या. १० मिनिटं झाकण घालून ठेवा.
३) नंतर एका ताटात काढून थोड्या तुपाचा हात लावून चांगली मळून घ्या.
४) बोराएवढे गोळे करून त्याला पणतीचा आकार द्या. अशा सगळ्या पणत्या करून घ्या.
रसमलईची कृती –
१) दूध गॅसवर आटवायला ठेवा.
२) चांगलं आटलं की त्यात साखर, सुकामेवा, जायफळ पूड घाला.
३) हलवून घ्या आणि नंतर तयार दिवे त्यात घाला.
४) मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटं उकळी काढा.
गरमागरम रसमलई तयार आहे. हवी असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.
सायली राजाध्यक्ष
Innovative. Superb love to make it. Thanks. Pratibha
LikeLike