बरण्या आणि बाटल्या

13507099_553666191506771_9172758413297425811_n

आज खरं तर मी कुठलीतरी रेसिपी शेअर करणार होते. पण आपली एक मैत्रीण लीना सौमित्र हिनं दुपारी मला मेसेज केला. तिला तिच्या स्वयंपाकघरातल्या बरण्या-डबे बदलायचे आहेत. तर ते कुठले घ्यावेत असं तिनं मला विचारलं आहे. ती गोंधळली आहे कारण तिला स्टीलचे डबे नको आहेत. शिवाय ती भाड्याच्या घरात राहाते. तिला टपरवेअर वापरायचं नाहीये. प्लॅस्टिकही तिला फारसं आवडत नाही. शिवाय एकूण बरण्या-बाटल्या किती ठेवाव्यात असा तिचा प्रश्न आहे. तर काय करावं या विचारात ती पडली आहे.
आपल्या स्वयंपाकघरातल्या डबे-बरण्यांची संख्या आणि आकार ही आपल्या घरात किती माणसं आहेत आणि रोज कोणत्या प्रकारचा स्वयंपाक होतो त्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर घरात १२ माणसं असतील तर अगदी उपमा केला तरीही एकावेळी निदान पाऊण किलोचा करावा लागेल म्हणजे महिन्याचं सामान भरायचं झालं तर महिन्यात निदान चारदा उपमा कराल असं गृहित धरलं तर ३ किलो रवा एका वेळेला घरात आणावा लागेल. त्याउलट जर ४ माणसं घरात असतील तर एका वेळेला दीड वाटीचा उपमा पुरे होईल. म्हणजे ६ वाट्यांचा उपमा महिन्याला म्हणजे साधारण किलोभर रवा महिनाभर पुरेल. त्यामुळे घरात सामान भरताना घरात किती माणसं आहेत हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे.
घरात जर रोज उसळी आणि आमट्या होत असतील तर मग घरात कडधान्यं साठवण्यासाठी जास्त बरण्या लागतील. त्याऐवजी मांसाहारी स्वयंपाकाचं प्रमाण जास्त असेल किंवा उसळी-डाळींऐवजी भाज्यांवर अधिक भर असेल तर मग कडधान्यं साठवण्यासाठी फार बरण्या लागत नाहीत.


लीनाच्या घरी साधारण ब्राह्मणी घरांमध्ये होतो तसा स्वयंपाक होतो (इथे जातीचा काहीही संबंध नसून हा उल्लेख खाण्यापिण्याच्या सवयींचा आहे). मग या प्रकारच्या जेवणात साधारणपणे कुठले घटक पदार्थ वापरले जातात? तर डाळी, कडधान्यं, बेसिक मसाले, बेसन-तांदळाचं पीठ-भाजणी अशी पीठं, साबुदाणा-पोहे-रवा-इडली रवा हे नाश्त्यासाठी लागणारे पदार्थ, सुक्या मिरच्या-चिंच-धणे आदी मसाल्यांसाठी लागणारे घटक पदार्थ असं साधारण या प्रकारच्या स्वयंपाकात वापरलं जातं. तूरडाळ-तांदूळ-गूळ-वाळवणाचे पदार्थ (कुरडया-पापड्या-सांडगे इत्यादी) हे साधारणपणे स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवलं जातं.
आता महिन्याचंच सामान मागवायचं आहे असं जर गृहित धरलं तर कुठलं सामान साधारण किती लागेल असं ठरवता येईल. माझं स्वयंपाकघर लहान आहे म्हणून मी महिन्यात एकदा सामान भरते आणि मग त्यात लागेल तशी भर घालत राहाते. महिन्याच्या सामानात आपण कुठले घटक पदार्थ मागवतो? (हा सगळा अंदाज लहान स्वयंपाकघर, ३ ते ४ माणसं असं गृहित धरून दिला आहे.)
महिन्याचं वाणसामान – साधे तांदूळ-बासमती तांदूळ, तूर डाळ-मूग डाळ-उडीद डाळ-चणा डाळ-मसूर डाळ-सालीची मूग डाळ, चवळी-मसूर-मूग-मटकी-चणा-छोले-राजमा-पांढरे वाटाणे-हिरवे वाटाणे ही कडधान्यं, तांदूळ-जाडं बेसन-बारीक बेसन-भाजणी ही पीठं, धणे-जिरे-मोहरी-चिंच-सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे-तीळ, मीठ-तिखट-हळद-काळा मसाला-धणेजिरे पूड हे मसाले, पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा हे नाश्त्यासाठी लागणारे घटक पदार्थ इतके किमान पदार्थ वाणसामानात मागवावे लागतात. यात मी महिन्याची कणीक-ज्वारीचं पीठ-आपण तात्पुरते करून ठेवतो ते सांबार-रसम मसाल्यांसारखे मसाले हे धरलेलं नाहीये.
चार माणसांच्या कुटुंबाला साधारण किती सामान लागेल हा अंदाजच आहे. कारण घराघरातल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कुणाकडे तांदूळ जास्त लागत असतील तर कुणाकडे कणीक जास्त लागत असेल. पण मी प्रमाण ढोबळमानानं सांगते आहे. माझ्या घरात चार माणसं आणि माझ्या दोन सहकारी मुली शिवाय येणारे पाहुणे असं गृहित धरून मी सामान मागवते. जर वर उल्लेख केलेली सगळी कडधान्यं तुम्ही वापरत असाल तर ८ कडधान्यं महिन्यातून प्रत्येकी दोनदा केली गेली तर एका वेळेला वाटीभर कडधान्य पुरतं. पाव किलोमध्ये साधारण नेहमीच्या मापाची २ वाटी कडधान्यं येतात. म्हणजे ही कडधान्यं पाव किलो पुरतात. बहुतेक घरांमध्ये रोज तूर डाळीचं वरण केलं जातं त्यामुळे डाळींमध्ये तूर डाळ सर्वात जास्त लागते. पण अधूनमधून मूग-मसूर-छिलका-उडीद डाळ वापरली जात असेल तर ती प्रत्येकी अर्धा किलो पुरे होते. शिवाय खिचडीसाठी मूगडाळीचा वापर होतो. जर खिचडी जास्त वेळा करत असाल तर मग आपल्या आवडीनुसार मूगडाळ (सालीची अथवा बिनसालीची) १ किलो मागवा. भरडा भाज्या (पीठ पेरून केल्या जाणा-या भाज्या) करत असाल तर मग जाडं बेसन मागवा. अन्यथा साधं बेसन आणि तांदळाचं पीठ, थालीपिठ भाजणी प्रत्येकी किलोभर पुरेल. धणे-जिरं-मोहरी हे महिन्याला साधारण (घरी पूड करता हे गृहित धरून) पाव किलो पुरतं. चिंचेचा वापर वरणात, सांबारात, कालवणांमध्ये होत असेल शिवाय गोड चटणी करून ठेवत असाल तर महिन्याला अर्धा ते पाऊण किलो चिंच पुरते. सुक्या मिरच्या फोडणीला, सांबार-रसम मसाल्याला वापरत असाल तर मग पाव किलो मिरच्या पुरतात. पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा हे पदार्थ महिन्याला प्रत्येकी १ किलो पुरतात.
मी वर दिलेला सगळा अंदाज आहे. कारण म्हटलं तसं खाण्यापिण्याच्या सवयींवर हे अवलंबून आहे. माझ्या घरी कडधान्यांच्या उसळी तर होतातच शिवाय धिरड्यांना कडधान्यं आणि डाळी असं दोन्ही बरंच वापरलं जातं. त्यामुळे मला साहजिकच ती जास्त लागतात. शिवाय प्रत्येक वस्तूच वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळं असतं. म्हणजे एक किलोची बरणी घ्याल तर त्यात रवा बसेल पण १ किलो कुरमुरे बसणार नाहीत. कारण कुरमु-याचं वस्तुमान कमी असतं. म्हणून प्रत्येक १ किलो पदार्थाला सारख्याच आकाराची बरणी घेऊन उपयोग नाही.
तर आता पुन्हा लीनाचा मूळ प्रश्न – स्वयंपाकघरात किती आणि कुठल्या आकाराच्या बरण्या घ्याव्यात. लीनाच्या घरी तीन माणसं आहेत. ती, तिचा नवरा आणि तिचा सोळा महिन्यांचा मुलगा. मुलगा सोळा महिन्यांचा आहे म्हणजे लवकरच तो घरातलं सगळं जेवायला लागेल. त्यामुळे तीन माणसं पूर्ण असंच आपण धरू.

रोजच्या वापरातले तूरडाळ-तांदूळ-बासमती तांदूळ-गूळ या पदार्थांना स्टीलचेच डबे वापरावेत.
इतर डाळी महिन्याला प्रत्येकी अर्धा किलो असं धरलं तर ५ अर्धा किलोच्या बरण्या डाळींसाठी
पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा-बेसन-जाडं बेसन-तांदळाचं पीठ-भाजणी प्रत्येकी १ किलो धरलं तर १ किलोच्या ८ बरण्या
चिंच-सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे यांसाठी १ किलोच्या ४ बरण्या (मिरच्या वजनाला कमी असल्या तरी आकारमान जास्त असतं.)
धणे-जिरे-मोहरी-तिखट-हळद-मसाला-तीळ – पाव किलोच्या ६ बरण्या
शिवाय ओवा-मेथी दाणे-खसखस यांसारख्या पदार्थांसाठी १०० ग्रॅमच्या ६ बरण्या
तर या बेसिक बरण्या झाल्या. तेव्हा मी लीनाला असं सुचवेन –
१ किलोच्या १२ बरण्या
अर्धा किलोच्या ९ बरण्या
पाव किलोच्या ६ बरण्या
१०० ग्रॅमच्या १२ बरण्या
मी बरण्यांची संख्या जास्त लिहिली आहे. याचं कारण असं आहे बरेचदा आपण एखादं सामान जास्त मागवतो किंवा एखादा मसाला करून ठेवतो किंवा चिवड्यासारखे पदार्थ करतो त्यासाठी जास्तीच्या बरण्या असाव्यात. वस्तुमान आणि आकारमानानुसार एकाच आकाराच्या बरणीत दोन पदार्थ कमीजास्त बसतील. तेव्हा जितके बसतील तितके भरावेत, उरलेल्या पाकिटाला क्लॅम्प लावून ठेवावं आणि बरणीतला संपला की परत भरावा.
बरण्या कुठल्या मटेरियलच्या वापराव्यात? मी वर म्हटलं तसं लीनाला स्टील आणि टपरवेअर वापरायचं नाहीये. प्लॅस्टिक शक्यतो वापरू नये या मताची मी आहे. मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे काचेच्या बरण्यांचा. काचेच्या बरण्या हाताळायला काही जणांना अवघड वाटतं. पण मी गेली ५ वर्षं त्या वापरते आहे आणि फारशा फुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या वापरायला काहीच हरकत नाही. शिवाय त्यात पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया होत नाही. पटकन पदार्थ दिसतो. आरोग्यावरही काचेचा काहीही विपरीत परिणाम होत नाही. हे सगळे गुण लक्षात घेता काचेचा वापर करणं योग्य आहे असं मला वाटतं.
लीनाच्या शंकेचं निरसन करायचा मी माझ्या परीनं प्रयत्न केलेला आहे. तिला या पोस्टची थोडीफार मदत होईल अशी आशा करते.

सायली राजाध्यक्ष

7 thoughts on “बरण्या आणि बाटल्या

 1. नमस्कार सायलीताई,
  अतिशय उपयुक्त आणि मुद्देसूद माहिती दिली आहेत तुम्ही! सात वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आणि आमचा राजा-राणीचा संसार सुरु झाला. चौकोनी कुटुंबाबातून दुसऱ्या शहरात माझं मलाच सगळं करायचा होता. आईला फोन करून विचारायचा म्हणाला तरी काही लिमिटेशन्स येतातच. वर्षभर ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीने स्वयंपाकघरातल्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सामान भरायचा अंदाज तर बऱ्याच वेळेला चुकला. माझी नोकरी होती. किराणा माल भरण्यासाठी सारख्या चकरा होऊ नयेत म्हणून कडधान्ये,डाळी भरपूर भरायचे. ठाण्याच्या हवेला त्या खराब व्हायच्या महिनाभरात. हळू हळू अशा बारीक सारीक गोष्टी कळायला लागल्या.

  आज ‘बरण्या आणि बाटल्या’ वाचल्यावर त्या वेळेला मला हा लेख वाचायला मिळाला असता तर किती बरं झाला असतं असं वाटलं. तुमच्या प्रचंड टापटिपीत आणि पध्द्धतशीरपणे लावलेल्या स्वयंपाकघराचे फोटो पण फार आवडले. मला थोडा कॉम्प्लेक्सच आला बघून. मुलगी लहान असल्याने आणि सध्या आम्ही परदेशात असल्याने घरकामाचा बराचसा भर माझ्यावरच पडतो. त्यामुळे हल्ली मी थोडी कामात आळशीपणा करते. पण आता स्वयंपाकघर नीट लावणे हा अजेन्डा आहे माझा.

  तुमचे अन्न हेच पूर्णब्रह्म आणि साडी आणि बरंच काही हे दोन्ही ब्लॉग मी अतिशय आवडीने वाचते. रोजच्या जीवनातली साध्या सध्या गोष्टींवर, बायकांच्या जिव्हाळ्याच्या (स्वयंपाकघर आणि साड्या) लिहिण्यात खरंच तुमची हातोटी आहे.
  असंच छान छान लिहीत राहण्यासाठी शुभेच्छा!

  Like

 2. Tuncha blog masta asato
  me gele 1 yrs pasana wachatey.
  madhe tumhi Mejawani chya show la alelya baghun khup ananda zala olakhiche kuni show madhe alay ase watale
  plastic nako asa tumhi mhanta me bhadyachya gharat rahate ani dusara kuthalahi plastic me waparat nahi sagala tupperware ahe mazhya kade

  Like

 3. Hi.Mam this post is very infermative and usefull. Can you also give information about what kind of crockery to use. I would like to know about type,size and nos of crockery.i have dinner set but really confused how and when to use it.
  -Priyanka

  Like

 4. Wow!! Such a brilliant wrigh up!! I got this at the right time. Maza lagna houn 6 mahine zale ahet ani ata amhi UK madhe rahto. Saman kiti ani Kay Kay Lagta he suddha honestly Kalat nahiye ! But tumcha ha blog vachun khup madat hote thanx a lot

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: