वांगी-शेवगा रस्सा भाजी

13256244_542733602600030_7839358886434837380_nमी काही दिवसांपूर्वी शुभा गोखले या माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते तेव्हा तिनं शेवग्याच्या शेंगांचं अप्रतिम सूप केलं होतं. तसं सूप करून पाहू म्हणून मी परवाभाजीला गेले होते तेव्हा शेवग्याच्या शेंगा आणल्या. आणि मी बाहेर गेले होते तेव्हा त्यातल्या दोन शेंगा माझ्या कामवाल्या सहकारी मुलीनं आमटीत वापरून टाकल्या. तिच्या सवयीप्रमाणं तिनं एक शेंग बाकी ठेवली होती (मी परवाच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की त्या दोघींनाही असे तुकडे उरवायची विचित्र सवय आहे.) एका शेंगेत सूप करणं शक्य नव्हतं. ती आमटी किंवा कढीत घालणं शक्य नव्हतं. येत्या दोन दिवसांत सांबार करणार नव्हते. मग ती शेंग मी वांग्याच्या रस्सा भाजीत वापरून टाकली.

ब-याच ठिकाणी शेवग्याच्या शेंगा रस्सा भाजीत वापरतात. मी मधे औरंगाबादला गेले होते तेव्हा हल्ली औरंगाबादच्या बाहेर शेवगा फ्राय आणि शेवग्याच्या रस्सा भाजीचे किती तरी स्टॉल्स बघितले. मी ते दोन्हीही चाखून बघितलं पण मला काही ते प्रकरण फारसं भावलं नाही. कुठल्याही भाजीला स्वतःची अशी खास चव असते. त्यामुळे तिच्यावर आलं-लसूण, खूप मसाले, तेल असा मारा करून तिची चव घालवून टाकणं मला आवडत नाही. त्याऐवजी मोजकेच घटक पदार्थ वापरून भाजीची चव खुलवली तर भाजी अधिक चांगली लागते असं माझं मत आहे. शेवग्याला तर फारच सुरेख चव असते. आणि शिवाय छानसा वासही असतो. बघा ना, आमटीत किंवा कढी-पिठल्यात शेवग्याच्या शेंगा घातल्या तर काय सुरेख स्वाद येतो.
तर वांग्याची भाजी करताना ती शेंगही मी वापरली. मी मागेही लिहिलं होतं की मी ब-याच भाज्या डायरेक्ट कुकरला करते. या पद्धतीमुळे एकतर पदार्थ लवकर होतोच शिवाय त्यातली पोषणमूल्यंही ब-यापैकी टिकून राहतात. तशीच ही भाजीही मी कुकरला केली. तेव्हा आजची रेसिपी आहे वांगी-शेवगा रस्सा भाजी.

वांगी-शेवगा रस्सा भाजी

साहित्य – पाव किलो काटेरी वांगी (भरून करतो तशी चिरून मग त्याचे दोन भाग करून), १-२ शेवग्याच्या शेंगा (३ इंचाचे तुकडे करून), १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १ टेबलस्पून तिळाचं कूट, २-३ टीस्पून काळा मसाला, अर्धा टीस्पून तिखट (ऐच्छिक), लहान बोराएवढा गूळ (ऐच्छिक), १ कांदा मोठे तुकडे करून (वाटण्यासाठी), १ कांदा मध्यम आकारात चिरलेला, ५-६ लसूण पाकळ्या, पाव टीस्पून हळद, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी आणि चिमूटभर हिंग

कृती –
१) वाटणासाठी चिरलेला कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. बारीक झालं की त्यात दाण्याचं आणि तिळाचं कूट, काळा मसाला, तिखट, मीठ, हळद, गूळ असं सगळं घाला. परत एकदाच फिरवा. फार बारीक वाटण करू नका.
२) लहान स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घालून फोडणी करा. त्यावर चिरलेली वांगी आणि शेंगेचे तुकडे घाला. ते चांगले परता.
३) आता त्यावर चिरलेला कांदा आणि वाटलेला मसाला, कोथिंबीर घाला. नीट हलवा. थोडावेळ झाकण ठेवून मंद आचेवर जरासं परता.
४) नंतर त्यात आपल्याला जितपत रस्सा हवा असेल तितपत पाणी घाला (साधारण दीड वाटी पुरेसं होतं). शिटीसकट कुकरचं झाकण लावा. मंद आचेवर अगदी ५ मिनिटं ठेवा. गॅस बंद करा.

या रस्सा भाजीबरोबर भाकरी, पोळी किंवा भातही उत्तम लागतो. तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे वाढवा. गूळ घातला नाही तरी चालेल. माझी आई काळ्या मसाल्यात जास्त मिरची घालत नाही म्हणून मी तिखट घालते. पण जर काळ्या मसाल्यात तिखट असेल तर वरून वेगळं घालू नका. इतकी भाजी ३-४ माणसांना पुरेशी होते.

सायली राजाध्यक्ष

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: