सूपचे काही प्रकार

14993370_612464228960300_4991316405437148323_n

सध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं सांगायचं तर सूपला अशी काही खास रेसिपी नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांची काँबिनेशन्स करून चवीला चांगली सूप्स बनवता येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज घातले की चवही बदलते. मीठ-मिरपूड तर आपण नेहमीच घालतो. कधी त्यात चिली फ्लेक्स आणि लिंबाचा रस घाला. कधी थाइम-रोझमेरी असे हर्ब्ज मिळतात ते घाला. कधी वरून थोडंसं चीज नाहीतर पनीर किसून घाला. कधी थोडी जिरेपूड घालून बघा. कधी वरून थोडे उकडलेले नूडल्स घाला. कधी थोडा पास्ता घालून सूप करून बघा. कधी थोडा बारीक चिरलेला लसूण आणि मिरची घालून बघा. कधी वरून अर्धा लहान चमचा साय किंवा बटर घाला किंवा घरचं लोणी घाला. मी बहुतेक सगळ्या सूप्समध्ये थोडंसं दूध घालतेच. त्यानं सूपला छान क्रिमी अशी चव येते. कुठल्याही सूपला उकळी आल्यावर गॅस बारीक करून दूध घालायचं आणि मग बारीक गॅसवर एक उकळी काढायची, दूध नासत नाही. शेवटी काय तर आपल्या चवीनुसार प्रयोग करत गेलात की काहीतरी मस्त चवीचं सापडतंच सापडतं.

सूप प्यायला देताना कधी त्याबरोबर ब्रेडस्टिक तर कधी चीजचा लहानसा तुकडा तर कधी ब्रेडचे क्रुताँ, कधी होल व्हीट ब्रेडचा गरमागरम तुकडा असं काही दिलंत तर सूपची अजून मजा येते.

काही सूप्स

साधं टोमॅटो सूप – ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर
कृती – टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र करून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरला वाटून, गाळून घ्या. उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि दूध, साखर घालून मंद गॅसवर उकळा.

क्रीम ऑफ टोमॅटो – ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून त्यात मीठ-मिरपूड घाला आणि मंद आचेवर उकळा.
टोमॅटो-गाजर सूप – २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.

टोमॅटो-कॉर्न सूप – १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
कृती – लोण्यावर कांदा परता, नंतर टोमॅटो घाला. परत परता. आता त्यात कॉर्न दाणे घाला. नीट एकत्र करून घ्या. कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. गाळून घ्या. त्यात दूध आणि मीठ घालून उकळा. वरून कांद्याची पात घाला.

फ्लॉवर-सेलरी सूप – २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती – एका लहान कुकरमध्ये लोणी गरम करा. त्यावर कांदा घालून पारदर्शक होऊ द्या. नंतर त्यात फ्लॉवरचे तुरे घालून जरासं परता. त्यात दूध आणि अर्धा कप पाणी घाला. कुकरचं झाकण लावून शिटी काढा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. गाळायची गरज नाही. त्यात मीठ आणि मिरपूड घालून उकळा. सेलरी घाला आणि मंद गॅसवर ५ मिनिटं उकळा.
याच पद्धतीनं ब्रॉकोलीचंही सूप करता येतं.

पालक सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती – पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवून घ्या. पाण्यासकट थंड करा आणि मिक्सरला वाटून घ्या. गाळू नका. त्यात दूध घालून मंद आचेवर उकळा. मीठ-मिरपूड घाला.

पालकाचं मिक्स सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. मीठ-मिरपूड-दूध घालून उकळी काढा.

लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप – अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध
कृती – लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली उकळी काढा.

मश्रूम सूप – १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. जरासं परतून त्यात कपभर पाणी घालून शिजवा. थंड करून मिक्सरला वाटून घ्या. १ टीस्पून बटरवर कणीक भाजा. खमंग वास आला की त्यात हळूहळू दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हा सॉस मश्रूमच्या मिश्रणात ओता. मीठ-मिरपूड घाला. उकळा.

चिकन सूप – १ मोठा कप सूपसाठी मिळतात ते चिकनचे तुकडे , १ कांदा उभा पातळ चिरून, प्रत्येकी २ लवंगा-मिरी दाणे, १ तमालपत्र, १ अगदी लहान दालचिनीचा तुकडा, १ टीस्पून तेल, मीठ
कृती – लहान कुकरला तेलावर खडा मसाला घाला. त्यावर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात चिकनचे तुकडे घाला. २ कप पाणी घाला. मीठ घाला. कुकरचं झाकण लावून एक शिटी करा. गरमागरम प्यायला द्या.
याच सूपमध्ये आपल्या आवडीच्या भाज्याही घालता येतील

मुगाचं सूप – पाव वाटी मूग, १ कांदा, १ लसणाची पाकळी, १ कप पाणी, मीठ, वरून घालायला थोडंसं लोणी
कृती – कुकरला मूग, कांदा, लसूण एकत्र करून शिजवा. मिक्सरला वाटून घ्या. मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला द्या. पाण्याचं प्रमाण आवडीनुसार वाढवा.
याच पद्धतीनं मसूर डाळीचंही सूप करता येईल.

उकडशेंगोळ्याचं सूप – १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं
कृती – लहान कुकरमध्ये तेलावर जिरं घाला. तडतडलं की लसूण पाकळ्या ठेचून घाला. त्या चांगल्या लाल होऊ द्या. त्यावर हिंग-हळद-तिखट घाला. लगेचच पाणी ओता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. एका वाटीत तिन्ही पिठं घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून चांगलं कालवा. हे कालवलेलं पीठ उकळत्या पाण्यात घाला. त्यात मीठ घाला. झाकण लावून ५ मिनिटं मंद आचेवर ठेवा.
आजारी माणूस नसेल तर तिखटाचं प्रमाण वाढवा.
काही सारांचे प्रकार

टोमॅटोचं सार – २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास वरून घालायला थोडी कोथिंबीर
कृती – तुपाची जिरं घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग घाला. टोमॅटोचा रस घाला. मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत उकळा. टोमॅटो अर्धवट शिजला की अर्धा कप पाणी घाला. पूर्ण शिजू द्या. नंतर त्यात मीठ, साखर, नारळाचं दूध घाला. मंद आचेवर उकळा. वरून कोथिंबीर घाला.

15036418_612463435627046_5442444215290894429_n

 

टोमॅटोचं सार २ – २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी
कृती – तूप गरम करा. जिरं घालून तडतडलं की त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. मिनिटभर परतून टोमॅटोचा रस घाला. उकळी आली की पाणी घालून मंद आचेवर शिजवा. शिजत आलं की त्यात तिखट, मीठ, साखर आणि तिळाचा कूट घाला. चांगलं उकळा.

कोकम सार – ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
कृती – आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून रस काढा. गाळून घ्या. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की कढीपत्ता आणि हिंग घाला. हवी असल्यास मिरची घाला. त्यावर हे आमसूलाचं पाणी घाला. त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला. उकळा. मीठ-साखर घाला. परत उकळा. पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानं वाढवा.

मठ्ठा – अगदी गोड ताक ३ वाट्या, १ टीस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून आलं-मिरची वाटण, साखर-मीठ चवीनुसार, १ टीस्पून साजूक तूप, २ चिमूट हिंग
कृती – ताकाला आलं-मिरचीचं वाटण लावा. त्यात साखर-मीठ घाला. साजूक तुपाची फोडणी करा. जिरं, हिंग, कढीपत्ता घाला. ही फोडणी ताकावर ओता. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

खिमट – खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की.
साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ चवीनुसार, १ कप पाणी
कृती – लहान कुकरला सगळं साहित्य एकत्र करा. मंद गॅसवर ५-७ मिनिटं ठेवा. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवा.

हल्ली फिलिप्सचा सूपमेकर मिळतो. त्यात पंधरावीस मिनिटांत उत्तम सूप्स होतात असं म्हणतात. मी तो लवकरच घेणार आहे. घेतल्यावर त्याबद्दल लिहीनच.

या पेजवरची ही तसंच इतर सर्व पोस्ट्स www.shecooksathome.com या माझ्या ब्लॉगवरही बघता येतील. सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#soups #Healthiswealth #dietplan #Mumbaimasala #अन्नहेचपूर्णब्रह्म#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #सूप्स #सूप

सायली राजाध्यक्ष

6 thoughts on “सूपचे काही प्रकार

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: