आपण घर रोज कितीही नीटनेटकं, स्वच्छ ठेवत असू तरी घरात नको असलेल्या गोष्टींची संख्या वाढत जातेच. आणि कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला त्यांचं ओझं व्हायला लागतं आणि त्या गोष्टी काढून टाकून घराला मोकळा श्वास घ्यायला देणं आवश्यक आहे असं वाटायला लागतं. निदान मला तरी असं होतं. याचं कारण असं आहे की मला कुठलाच कचरा, पसारा सहन होत नाही. म्हणजे अगदी मोबाइलवरचे बिनकामाचे मेसेज असोत, व्हॉट्सएपवरचे भरमसाठ कचरा मेसेज असोत, ज्यांचा नंतर काही उपयोग होणार नाहीये अशा इमेल असोत की घरातल्या नकोशा वस्तू असोत, मला तो कचरा कधी एकदा काढून टाकते असं होतं.
आणि मला जेव्हा असं होतं तेव्हा मला कधी एकदा सगळं आवरतेय असं होतं (मला माहितीये, हा थोडा मानसिक प्रॉब्लेम आहे!) गेले काही दिवस मला असंच होत होतं. म्हणजे रोज घर झाडून-पुसून स्वच्छ होत होतंच. पण गेले २-३ महिने माझ्या कामाच्या मुलींच्या या ना त्या कारणानं खूप सुट्या झाल्या. त्यामुळे घर रोज कसंबसंच आवरलं जात होतं. अनेक गोष्टी तशाच ठेवल्या जात होत्या. शिवाय गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पेंटिंग झालं तेव्हा घर लावताना ब-याच गोष्टी नंतर नीट विचार करून लावू असंही ठरवलं होतं. पण त्यानंतर ते जमलं नव्हतं. तर अशा रितीनं परवा ब-याच काळानंतर घरावर हात फिरवला गेला.
घर आवरताना नेहमी एक एक खोली आवरावी असं मला वाटतं. म्हणजे एक खोली घेतली की तिचा कानाकोपरा आवरल्याशिवाय दुस-या खोलीतला पसारा काढायचा नाही. असं केलं की नीट तर आवरता येतंच पण काहीही बाकी राहात नाही. परवा मी आधी स्वयंपाकघर आवरायला घेतलं. माझ्या स्वयंपाकघराला एक माळा आहे. या माळ्यावर मी फारसा कचरा ठेवतच नाही. ज्या गोष्टी ३ महिन्यांहून अधिक काळ वापरल्या जात नाहीत (छत्र्या, हिवाळी कपडे अशा गोष्टी वगळता) त्या कधीच वापरल्या जात नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे अशा गोष्टींना माझ्या घरात स्थान नाही. पण माझ्याकडे काम करणा-या राणी आणि रंजना यांना ते मान्य नाहीये. त्यामुळे कितीही सांगितलं तरी हळूच माझा डोळा चुकवून त्या कधीतरी लागतील म्हणून प्लॅस्टिकचे डबे, कंटेनर्स यासारख्या गोष्टी माळ्यावर सरकवत असतात. शिवाय समजा मी नवीन नॉनस्टिक पॅन किंवा तवे आणले आणि जुने फेकून द्या म्हटलं तर तेही माळ्यावर चढतात. नाहीतर एरवी या माळ्यावर पावसाळ्यात लागतो तो कपड्यांचा स्टँड, कुणी आलं तर लागणारं एक फोल्डिंग टेबल, जास्त लोकांच्या स्वयंपाकासाठी लागणारी मोठी पातेली, दिवाळीत लागणारे हँगिंग दिवे, एक मातीची उरळी (फुलं ठेवतो ते पात्र) आणि डिस्पोजेबल प्लेट्स, पेले, वाट्या असं ठेवलेलं असतं.
परवा जेव्हा माळा काढला तेव्हा अर्थातच आमच्या दोन्ही तायांनी खूप पसारा केलेला होता. तो सगळा आवरलाच. शिवाय नको असलेल्या ज्या अनेक गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या त्या काढून टाकल्या. माझं फ्रीज बदलून ६ महिने झाले. जुन्या फ्रीजची दोन स्टॅबलायझर्स यांनी अजूनही माळ्यावर ठेवलेली होती. आमच्याकडे ४-५ वर्षांपूर्वी पाण्याचा प्रॉब्लेम होत होता. तेव्हा एक प्लॅस्टिकचा एक लहान ड्रम घेतलेला होता. तो चांगला होता पण त्याची गेल्या ३ वर्षांत गरज लागली नव्हती. तो काढून टाकला. कारण पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर तो फारसा महाग नसल्यामुळे नवीन विकत घेता येऊ शकतो. माळ्यावर पांढ-या टाइल्स लावलेल्या असल्यामुळे माळा स्वच्छच असतो. एकदा झाडून, स्वच्छ पुसला की मस्त दिसतो.
त्यानंतर कपाटं लावायला घेतली. किचनमधली कपाटं वर्षातून निदान चारदा व्यवस्थित आवरायलाच हवीत. याचं कारण अनेक खाद्यपदार्थ असे असतात की जे लवकर खराब होतात. विशेषतः मुंबईसारख्या हवेत तर होतातच. शिवाय रेडीमेड मसाले, सॉस यांनाही एक्सापरी डेट्स असतात. त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवायला लागतं. मी वर म्हटलं तसं गेल्या वर्षी पेंटिंग झाल्यावर मी जशी जमतील तशी कपाटं लावली होती. ती नीट लावण्याची आत्यंतिक गरज होती.
माझ्याकडे नेहमी लोक जेवायला असतात. त्यामुळे मला भरपूर क्रॉकरी आणि कटलरी लागते. फार जरी बघितलं नाही तरी अगदी देशी जेवण करायचं ठरवलं तर स्टीलचीच ताटं बरी वाटतात. म्हणून जास्तीची स्टीलची ताटं-वाट्या तर माझ्याकडे आहेतच. शिवाय एकावेळेला ४०-५० माणसं जेवू शकतील इतके सर्व्हिंग बोल्स, प्लेट्स, क्वार्टर प्लेट्स, चमचे, काटे आहेत. व्हिस्की, रेड वाईन, व्हाइट वाइन यासारख्या पेयांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास लागतात. तर तेही निदान ६ च्या सेटमध्ये माझ्याकडे आहेत. ते तितके पुरतात. कारण येणारे सगळेच एकाच प्रकारचं ड्रिंक घेणारे नसतात. आणि जास्त लागलेच तर कॉलनीतल्या मैत्रिणी आहेतच.
जास्तीचे जे काटे-चमचे लागतात ते मी प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवते. शिवाय जास्तीच्या सु-या, सालकाढणी, बॉटल ओपनर्स, करंजी कातणं, करंजीचा मोल्ड अशासारख्या गोष्टी दुस-या डब्यात ठेवते. प्लॅस्टिकच्या एका ट्रेमध्ये पार्टीसाठी जे सर्व्हिंग स्पून्स लागतात ते ठेवते. माझ्या मुलीला बेकिंग करायला आवडतं आणि मला अजिबात आवडत नाही. तर तिचं जे सामान आहे म्हणजे कपकेकचे वेगवेगळे साचे किंवा सिलिकॉन मोल्ड हे सगळं आणखी एका डब्यात एकत्र करून ठेवते. आणखी एका प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये फिंगर फूड (आपण जे स्टार्टर्स करतो ते) खाण्यासाठी लागणा-या टूथपिकसारख्या स्टीक्स, डिस्पोजेबल चॉपस्टिक्स, कुणी लहान मुलं आली तर लागणारे स्ट्रॉ, त्यांच्या ड्रिंकला मजा म्हणून लावायला लहानशा कागदी छत्र्या असं सगळं ठेवलेलं असतं. अशा गोष्टी मोठ्या डब्यात किंवा ट्रेमध्ये ठेवल्यानं पसारा तर कमी होतोच. पण आपल्याला हव्या त्या गोष्टी एका जागेवर मिळतात.
ज्या गोष्टी क्वचित लागतात पण लागतातच अशा म्हणजे मैद्याची चाळणी, पुरणयंत्र, चकली पात्र या सगळ्या एकत्र ठेवलेल्या असतात. दिवाळीचा फराळ करतानाच त्यांचा वापर होतो. त्याच्या बाजूलाच मी वर उल्लेख केलेले प्लॅस्टिकचे डबे ठेवते. त्याच्याबाजूला मायक्रोवेव्ह ओव्हनला लागणा-या जाळ्या असतात. मी मागेही लिहिलं होतं की आपल्या स्वयंपाकघरातून प्लॅस्टिकच्या वस्तू हद्दपार झाल्या पाहिजेत. विशेषतः खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर केला पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे बहुतांश बरण्या काचेच्या आहेत. विकत आणलेल्या ब-याच आहेत. बरोबर ऑलिव्हच्या बरण्या (या आकारानं उभट असतात, त्यामुळे फ्रीजरला चिंचेची चटणी स्टोअर करायला उत्तम असतात), कॉफीच्या रिकाम्या बरण्या (चिंचेचा कोळ ठेवायला वापरता येतात. कारण आकार उभट असतो.) हेही मी वापरते. शिवाय रेडीमेड लोणची, जॅम यांच्या बरण्या कुणाला काही द्यायचं असेल तर चांगल्या म्हणून त्या ठेवते. कारण कुणाला खाद्यपदार्थ देताना प्लॅस्टिक का द्यायचं? या बरण्यांच्या बाजूला स्टीलची जास्तीची ताटं आणि वाट्या ठेवते. शिवाय दोन इडली स्टँड्स आहेत तेही ठेवते.
त्याच्या कालच्या कप्प्यात जास्तीच्या मसाल्यांची पाकिटं, झिपलॉकच्या पिशव्या (मी त्यात काहीही स्टोअर करत नाही. फक्त कुणाला काही द्यायचं असेल तरच त्यांचा वापर होतो. किंवा क्वचित प्रसंगी मटार सोलून फ्रीजरला टाकायचे असतील तरच) असतात. त्याच्या खाली रोजचे लागणारे मसाले म्हणजे हळद, तिखट, जिरं, मोहरी, ओवा, मेथी दाणे, मासे तळायला लागणारं रवा-तांदळाच्या पिठाचं मिश्रण, आमसूलं असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात सर्व कडधान्यं, पोहे, रवा, सुक्या मिरच्या, साबुदाणा, शेंगदाणे, तूर डाळ वगळता इतर डाळी, बेसन, तांदळाचं पीठ यासारख्या गोष्टी ठेवलेल्या असतात. बाजूच्या मोठ्या कप्प्यात स्टीलच्या मोठ्या डब्यांत वाळवणाचे पदार्थ म्हणजे शेवया, पापड, पापड्या, खारवड्या असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात स्वयंपाक करताना अगदी हाताशी लागणारी उपकरणं जसं की खूप जास्त कांदा चिरायचा असेल तर लागणारं चॉपर, मिरच्या किंवा लसूण बारीक करायला लागणारं चिली चॉपर, सुक्यामेव्याचे तुकडे करायला लागणारं नट चॉपर, एक मध्यम आकाराचा खलबत्ता असं ठेवलेलं असतं.
दुस-या ओट्यावरच्या कपाटात नॉनस्टिकची रोज न लागणारी मोठी भांडी, तवे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रे, मोठे सर्व्हिंग बोल्स असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात रोजचं जेवण काढायला लागणारी काचेची भांडी, इडली-सांबार किंवा वडा-सांबार किंवा बिसीबेळे भातासारखे प्रकार खायला वापरले जाणारे बोल्स ठेवलेले असतात. सगळ्यात खालच्या कप्प्यात इटालियन हर्ब्ज, पास्ता सिझनिंग, ओरिगामो, रोझमेरी, थाइम यासारखे मसाले, सोया सॉस-चिली सॉस, व्हिनेगर असे सॉस ठेवलेले असतात. शिवाय हँड मिक्सर ठेवलेलं असतं. सिंकच्या वरती जे शेल्फ आहे तिथे रोज लागणारे कप, ग्लासेस, मग्ज आदी ठेवलेलं असतं.
मी डायनिंग टेबलाजवळ एका कपाटात जेवताना लागणारं लोणचं-चटण्या, मस्टर्ड-टोमॅटो केचप, जॅम-जेली असं ठेवते. शिवाय भडंग, चिवडा, टोस्ट, बिस्किटं असे कोरडे पदार्थ ठेवते. या सगळ्यासाठी काचेच्याच बरण्या वापरते. या कपाटात जास्तीचे कोस्टर, गरम जेवण ठेवण्यासाठी लागणा-या जाळ्या, ऑलिव्ह ऑईल, मध, कॉर्नफ्लेक्स असंही ठेवलेलं असतं. या कपाटाच्या बाजूलाच एक लहानंसं उभं कपाट आहे. जे आधी मुलींच्या खोलीत होतं. ते त्यांना नकोसं झाल्यामुळे ते बाहेर आलं. त्याच्या खालच्या कप्प्याची काच काढून मी त्यात टीव्हीचा व्हूपर ठेवला आहे. तर वरच्या कप्प्यात जास्तीचे बोल्स, मग्ज, कोरडे पदार्थ देण्यासाठी लागणारे बोल्स अशा गोष्टी ठेवल्या आहेत. माझ्या नव-याला वेगवेगळे चहा आवडतात. त्यासाठी कालच मी एक खास कप्पा केला आहे. त्यात वेगवेगळे चहा, माझ्या मैत्रिणीनं शर्मिलानं दिलेलं देखणं चायनीज चहापात्र, आमची मैत्रीण शिरीननं दिलेली खास ब्रिटिश डिझाइनची केटल असं ठेवलं आहे.
आणि हो हे सगळं आवरताना अनेक खराब झालेले मसाले, ज्यांच्या एक्स्पायरी डेट गेल्या होत्या असे मसाले आणि सॉस, कीड लागलेली कडधान्यं (मुंबईत महिनाभरात लागते), फुटके कप, बोल्स, भांडी हे सगळंही काढलं गेलंच. तर अशा रितीनं माझं स्वयंपाकघर मला हवं तसं लागलं. बाकीच्या खोल्या जशा जमतील तशा आवरणार आहेच. तेव्हा त्याचा वृत्तांत पुन्हा कधीतरी.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा. पोस्ट वाचलीत तर लाइकवर क्लिक जरूर करा. मला ब्लॉग स्टॅट्ससाठी ते गरजेचं आहे. आणि पोस्ट आवडली तर कमेंटही जरूर करा!
सायली राजाध्यक्ष
ag sayali, pan evdya kachechya baranya vapartes…kamvalya mavashi fodat nahit ka ??? amchyakade kachech kahihi amhalach dhuvav lagat…futnyachi bhiti jast…. tuz almost nimm kitchen breakable ahe
LikeLike
Atishay sundar lihta tumhi. Mala tumcha blog khup avadla. Every thing in the blog is very useful. Thank you very much
LikeLike
How do you take care of cockroach . I am very tried of killing it with hit .. can’t go for pest control as I have kid 2 yrs old. please suggest
LikeLike
बोरिक पाऊडर + कणीक समप्रमाणात घ्यायची दुधा कालवायची आणि (चपातील भिजवतो तशी ) बारिक गोळे करून स्वयंपाकघरात जागोजागी ठेवायचे याने झुरळ आपोआप नाहीशी होतात वाटेल तिथे मारून पडत नाहीत छोट्या छोट्या काळजी घ्याव्या जस की गॅस चुली वर पिठाचे सूक्ष्म कण पडलेले तसेच ठेवणे कचरा उघडा ठेवणे अन्न पदार्थ उघडे ठेवण वगैरे गोष्टी टाळण्याची सवय लावून घ्यावी
LikeLike
Hello,
Sayali madam
LikeLike
Hello
Sayali madam
LikeLike
सायलीताई…आज सहज तुझा हा ब्लॉग वाचला..खूप मस्त..मी गेल्या वर्षी स्वयंपाकघरातली जुनी कपाटं काढून मला हवी तशी नवीन करून घेतली…त्या अगोदर हा ब्लॉग वाचायला मिळाला असता तर किती छान झालं असतं असं वाटलं..अर्थात तरीही स्वयंपाकघर आवरण्यासाठी ही माहिती खूपच उपयोगी पडेल अशी आहे…थँक यू…
LikeLike