उन्हाळ्यातलं माझं आवडतं जेवण म्हणजे भरपूर आंब्याचा रस, त्यात साजूक तूप आणि गरम पोळ्या. हे जेवण मी संपूर्ण उन्हाळा सकाळ-संध्याकाळ न कंटाळता खाऊ शकते. आमच्या घरी नव-याला आणि मुलींना आंब्याचा रस आवडतो पण त्यांना तो पोळीबरोबर खायला आवडत नाही, त्यामुळे इतर स्वयंपाक करणं क्रमप्राप्त असतं.
उन्हाळ्यात खूप मसालेदार भाज्या खाव्याशा वाटत नाहीत. त्यापेक्षा गार दहीभात, साधं वरण-भात, कुठल्याही साध्या काच-या आणि पोळी असं काहीतरी खावंसं वाटतं. कोशिंबिरी किंवा सॅलड्स एरवीही खावंच. पण उन्हाळ्यात थंड दह्यातली कोशिंबीर किंवा फ्रीजमध्ये ठेवून गार केलेल्या भाज्यांचं सॅलड खाणं बरं वाटतं. त्यामुळे लाल भोपळ्याचं दह्यातलं रायतं, दुधी भोपळ्याचं दह्यातलं रायतं, काकडीची दह्यातली कोशिंबीर, टोमॅटो-कांद्याची दह्यातली कोशिंबीर, पांढ-या कांद्याची दह्यातली कोशिंबीर असं काहीतरी जेवणात असावं. शिवाय वांग्याचं दह्यातलं भरीतही अप्रतिम लागतं. आपण सगळेच थोड्याफार फरकानं तशाच पद्धतीनं कोशिंबिरी करत असतो. पण त्यात जरासा बदल करून बघितला तर वेगळ्या चवीचा साक्षात्कार होतो. कुणी फोडणीत हिंग-हळद घालतं तर कुणी नुसतंच मोहरी-जिरं, कुणी हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर कुणी त्याबरोबर कढीपत्ता. कुणी सुक्या लाल मिरच्या तर कुणी तळणीची मिरची. या लहानसहान बदलांनी पदार्थाची चव खूप बदलते. आज मी अशाच दोन मस्त कोशिंबिरींच्या रेसिपी शेअर करणार आहे.
वांग्याचं दह्यातलं भरीत
साहित्य – २ भरताची जांभळी, कमी बिया असलेली वांगी (स्वच्छ धुवून, पुसून, तेलाचा हात लावून डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या, थंड झाल्यावर ओल्या हातांनी हलकेच सालं काढा. नंतर मॅशरनं चांगलं एकजीव मॅश करा.), २ पांढरे कांदे बारीक चिरलेले (नसल्यास लाल कांदे वापरा), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ वाट्या गोड दही, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
फोडणी – १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, ताकातल्या किंवा तळणीच्या मिरच्यांचे १०-१२ तुकडे, १ टीस्पून तिखट
कृती –
१) मॅश केलेलं वांगं एका टोपल्यात घ्या. त्यात दही, साखर, मीठ, कोथिंबीर घाला.
२) सगळं नीट एकत्र करा.
३) एका कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडली की त्यात हिंग आणि मिरच्यांचे तुकडे घाला.
४) तुकडे फुलले की तिखट घाला आणि लगेचच गॅस बंद करा. तिखट जळता कामा नये.
५) ही फोडणी भरतावर ओता. हलवून घ्या.
या भरताबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी उत्तम लागते. बरोबर घरचं लोणी, मिरचीचा ठेचा, पिठलं असेल तर अजूनच बहार येते.
काकडी, गाजर, टोमॅटोची साधी कोशिंबीर
साहित्य – २ गाजरं किसलेली, २ कोवळ्या काकड्या बारीक चिरलेल्या, १ मोठा टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेला, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे ऐच्छिक, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, पाव टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
फोडणी – २ टीस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती –
१) सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, तिखट, मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. नीट एकजीव करा.
२) एका लहान कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला.
३) ती तडतडली की त्यात हिंग घाला, लगेचच गॅस बंद करा. ही फोडणी कोशिंबिरीवर ओता.
या कोशिंबिरीबरोबर मी आज काळ्या वाटाण्याची आमटी, वांग्याचे काप, मेथीची भरडा भाजी, दोडक्याची भाजी केलं होतं. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हवं ते करा.
सायली राजाध्यक्ष
वांग्याच्या भरीतात पांढरा कांदा कधी घालायचा ?
LikeLike