काळं मटन

Screenshot_20180313-101941_01आमच्या घरी चिकन अनेकदा होतं. मासे तर अगदी नियमितपणे होतात पण मटन फारसं होत नाही. निरंजन आणि सावनीचं म्हणणं की चिकनला फारशी चव नसते, त्याउलट मटन चवदार असतं. पण रेड मीट जास्त खाऊ नये असं डॉक्टर सांगतात म्हणून म्हणा किंवा अजून काही पण मटन फारच कमीदा होतं.

सावनीचा काल वाढदिवस होता आणि तिला मटन खायचं होतं. ती गेले दोन आठवडे मिड टर्म ब्रेक होता म्हणून इथे मुंबईतच होती आणि आज परतणार होती. तिला माझ्या मैत्रिणीच्या, चिन्मयीच्या हातचं मटन फार आवडतं. मला ती म्हणाली की, आई तसं मटन कर ना. चिन्मयीला फोन करून रेसिपी विचारून घेतली आणि मटन केलं. ते उत्तम झालं होतं असं खाणारे लोक म्हणाले. 😊

गेल्या मंगळवारी माझी हिस्टरेक्टोमी झाली. मी गुरूवारी घरी आले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अंमलात आणूनच, आरामात मी मटन केलं. राणीला काहीही सांगितलं की त्याची उत्तम अंमलबजावणी करते. तसं मी तिला मसाला काढून दिला. त्यातलं काय भाजायचं, कसं भाजायचं ते सांगितलं. समोर बसून ते करून घेतलं. आणि मग शांतपणे मटन फोडणीला घातलं. त्यामुळे मलाही काही त्रास झाला नाही. आजची रेसिपी आहे काळ्या मटनाची.

काळं मटन

साहित्य – १ किलो कोवळ्या मटनाचे तुकडे (स्वच्छ धुवून घ्या), २ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, १०-१२ लसूण पाकळ्या- दीड इंच आलं यांचं वाटण, २-३ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

वाटण मसाला – अर्धी सुक्या खोब-याची वाटी आणि ३ मोठे कांदे गॅसवर डायरेक्ट काळे होईपर्यंत भाजा आणि त्याचं छान एकजीव वाटण करून घ्या.

पूड करण्याचा मसाला – २ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून शहाजिरं, १ इंचाचे २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्रं, जायफळाचा लहानसा तुकडा (१/६ तुकडा), अर्धा टीस्पून बडीशेप, १ टीस्पून खसखस, ६-७ लवंगा, १०-१२ मिरी दाणे, १ बडी वेलची, २ साध्या वेलच्या (हे सगळे साहित्य अगदी थोड्याशा तेलावर खमंग तपकिरी रंगावर भाजा. थंड झाल्यावर कोरडी पूड करा.)

फोडणीचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, २ वेलच्या, लहानसा दालचिनीचा तुकडा, १ तमालपत्र

कृती –

१) कुकरला तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात खडा मसाला घाला.

२) तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा चांगला खमंग लाल परतल्यावर त्यात आलं-लसणाचं वाटण घाला. तेही चांगला खरपूस वास येईपर्यंत परता.

३) त्यानंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ घाला. चांगलं परतून त्यावर मटन घाला.

४) नीट हलवून घ्या आणि १ वाटी पाणी घाला. कुकरचं झाकण लावून ५-६ शिट्या करा.

५) कुकरचं प्रेशर सुटल्यावर त्यात कोरडी पूड घाला. चांगला घमघमाट येईपर्यंत उकळा.

६) नंतर त्यात कांदा-खोब-याचं वाटण घाला.

७) मंद आचेवर दहा मिनिटं छान शिजवा.

८) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. काळं मटन तयार आहे.

या मटनाबरोबर ताजा पाव, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळ्या किंवा गरम भात असं काहीही छान लागतं असं आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे. मी खात नसल्यामुळे मला त्याची कल्पना नाही. 😊 बरोबर अर्थातच कच्चा कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू घ्या.

चिन्मयी, इतकी सोपी रेसिपी सांगितलीस की मला करायला अजिबात अवघड गेलं नाही. आता आमच्या घरात हा पदार्थ वारंवार होणार हे नक्की. Thank you!

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#काळंमटन #मांसाहारीपदार्थ #मटनरेसिपी #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #मुंबईमसाला #kalamutton #nonvegrecipe #muttonrecipe #simplerecipe #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

IMG_20180312_182221

9 thoughts on “काळं मटन

 1. Receipe solid वाटतेय .
  करून बघणारे .. मी तश्या सगळयाच करून बघते ….

  काही doubts आहेत . सांगाल का plz …
  कांदा खोबरं आधी gas वर खरपूस भाजुन घ्यायच म्हणजे भरतासाठी वांग भाजतो तस का ?? मग कांदा आत पर्यंत भाजला जातो का??

  आणि मिरची (पावडर किंवा हिरवी ) कोणतीच वापरत नाहीत का यात …??? फक्त मिरी चाच तिखटपणा ??

  Like

  1. कांदा छान आतपर्यंत भाजला जातो. हो, भरताच्या वांग्यासारखाच भाजायचा. तिखट आहे ना साहित्यात.

   Like

 2. मॅडम नमस्कार ,

  मला तुमची हि रेसिपी फार आवडली .
  मी नक्की एकदा करेल.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: