हिवाळ्यातले पदार्थ – २

हिवाळातल्या पदार्थांबद्दल एक पोस्ट मी काही दिवसांपूर्वी लिहिली होती. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग.

हिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्या मिळतातच. पण या हवेत त्यांची चव काही औरच असते. शिवाय दिसायलाही त्या रसरशीत दिसतात. त्यामुळे तुम्ही बघितलंत तर प्रत्येक प्रांतात या काळात मिश्र भाज्या केल्या जातात असं तुमच्या लक्षात येईल. जसं की गुजरातेत उंधियो, महाराष्ट्रात भोगीची भाजी किंवा लेकुरवाळी भाजी, दक्षिणेत अवियल, विदर्भात पोपटी. या सगळ्या भाज्यांमध्ये ब-याच भाज्या एकत्रितपणे वापरल्या जातात. उंधियोत मेथी, सुरती पापडी, मटार-तूर-हरभ-याचे कोवळे दाणे, वांगी-बटाटे, कोनफळ, रताळी, केळी, ओली हळद असं सगळं वापरलं जातं. मसाला म्हणाल तर ओलं नारळ-ओला लसूण-भरपूर कोथिंबीर यांचा सढळ हातानं वापर केला जातो. उंधियो नुसता खायलाही मस्त लागतो.

उंधियोची रेसिपी –  https://goo.gl/ktYZt6

भोगीची भाजी आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतो. या भाजीतही साधारणपणे सारख्याच भाज्या घातल्या जातात. पण करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. जसं की या भाजीत ओली हळद घालत नाहीत. सुरती पापडीऐवजी वालाच्या शेंगा वापरल्या जातात. शिवाय गाजराचा वापर होतो. या भाजीत तिळाचं कूट वापरलं जातं, कारण थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थांची जजास्त गरज असते. शिवाय या भाजीत का-हळाचं किंवा खुरासणीचं कूट वापरलं जातं.

भोगीच्या भाजीची रेसिपी – https://goo.gl/6jPLzm

या मोसमात गाजरं उत्तम मिळतात. माझी आई गाजराचा भुरका फार मस्त करते. गाजराचा कीस करून तो उन्हात कडकडीत वाळवायचा. नंतर जास्त तेलाची फोडणी करून तो कुरकुरीत करायचा. त्यातच तीळ, तिखट, मीठ घालायचं. हे एक मस्त तोंडीलावणं होतं.

हिंदी सिनेमानं गाजर हलवा अमर केलेला आहे. आईचं प्रेम म्हणजे गाजर हलवा असंच जणू समीकरण हिंदी सिनेमानं केलेलं आहे.

गाजर हलवा – १ किलो गुलाबी गाजरं सालं काढून किसून घ्या. एका कढईत तूप गरम करा. त्यावर गाजराचा कीस घाला. झाकण ठेवून मंद आचेवर चांगली वाफ येऊ द्या. नंतर त्यात साधारणपणे १ मोठा कप दूध घाला. परत झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गाजर शिजत आलं की त्यात वेलची पावडर, काजूची जाडीभरडी पूड, बेदाणे, बदामाचे काप आणि साखर घाला. मला १ किलोला अर्धी वाटी साखर पुरली. कारण गाजरं छान गोड होती. शिवाय फार मिट्ट गाजर हलवा मला आवडत नाही. लवकर घट्ट करायचा असेल तर २ टेबलस्पून मिल्क पावडर घाला.

माझ्या आजोबांना गाजराची भाजी फार आवडायची. खरं तर ही अगदी साधी भाजी आहे. गाजराच्या सालं काढून मध्यम आकाराच्या लहान फोडी करा. तेलाची मोहरी-हिंग घालून फोडणी करा. नंतर त्यात हळद घाला. त्यात गाजराच्या फोडी घाला. एक वाफ आली की त्यात तिखट, मीठ, का-हळाचा कूट घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असल्यास ओलं खोबरं घाला.

मुळा अनेकांना आवडत नाही. पण मला स्वतःला मुळा फार आवडतो. विशेषतः कच्चा मुळा मला फार आवडतो. खानदेशात मिरचीची भाजी केली जाते. या भाजीबरोबर कच्चा कांदा, काकडी आणि कच्चा मुळा खातात. या भाजीबरोबर तोंडीलावणं म्हणून मुळा हवाच.

खानदेशी मिरच्यांची भाजी – https://goo.gl/N6FknW

मुळ्याची दह्यातली कोशिंबीर – मुळा किसून घ्यायचा. त्यात गोड दही, दाण्याचं कूट, चिमूटभर तिखट, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असं सगळं घालायचं. छान एकत्र करायचं. या कोशिंबीरीला फोडणीची गरज नाही.

मुळ्याचा पराठा – https://goo.gl/v4R1Ej

राजमा खरं तर पंजाबी. किंवा उडीद डाळीचा वापर खानदेशात सोडला तर महाराष्ट्रात तसा फारसा होत नाही. पण या दोन्ही डाळी खूप पौष्टिक आणि हिवाळ्यात आवश्यक असणारी जास्त ऊर्जा देणा-या.

दाल माखनी – https://goo.gl/qCYjRo

अशीच एक डाळीची सोपी पण मस्त रेसिपी तरला दलालांच्या पुस्तकात आहे. धाबेवाली डाळ नावाच्या या पदार्थात जास्त मसाले वापरले जात नाहीत. पण उडीद डाळ, हरभरा डाळ आणि राजमा या तिन्ही डाळींच्या वापरानं ही डाळ फार चवदार होते.

धाबेवाली डाळ – https://goo.gl/JaPVYz

गेल्या पोस्टमध्ये सोलाण्यांच्या आमटीची एक रेसिपी शेअर केली होतीच. आज जी रेसिपी शेअर करणार आहे ती एकदम वेगळी आहे. माझ्या बहिणीची, मेघनची मैत्रीण ती करते.

सोलाण्यांच्या करंज्यांची आमटी – https://goo.gl/X62hbG

या सगळ्या रेसिपीज तुम्ही करून बघा. कशा झाल्या होत्या तेही नक्की कळवा.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #रोजचेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #एकत्रितपदार्थांच्यापोस्ट #हिवाळीपदार्थ #हिवाळा #आरोग्यदायीपदार्थ #मुंबईमसाला #अन्नहेचपूर्णब्रह्म #simplerecipe #healthyrecipe #healthiswealth #healthyliving #healthyeating #winterrecipes #indianwinter #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

Advertisements

हिवाळ्यातले पदार्थ – १

मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात बहुतेक भाज्या मिळतात आणि त्याही ताज्या. नुकताच पाऊस होऊन गेलेला असतो त्यामुळे त्या पाण्याचा अंश जमिनीत असतो आणि पावसाळ्यात अति पाण्यानं भाज्या सडतात तसंही होत नाही.

हिवाळ्यात मिळणा-या भाज्यांचं काय काय करता येईल आणि जास्त भाज्या एकाच वेळी आणल्या तर त्या कशा संपवता येतील याबद्दल एक पोस्ट लिही असं माझी मैत्रीण शर्मिला हिनं सुचवलं आहे. त्यामुळे आजची ही पोस्ट शर्मिलाच्या फर्माइशीनुसार.

हिवाळ्यात गाजरं, फ्लॉवर, मटार या भाज्या तर सुरेख मिळतातच. त्यामुळे माझी सगळ्यात पहिली हिवाळी रेसिपी असते ती भाज्यांच्या लोणच्याची. हे लोणचं मी भरपूर करते आणि फ्रीजमध्ये ठेवते. शिवाय मी या लोणच्याला अजिबात तेल घालत नाही. या लोणच्याची रेसिपी अगदीच सोपी आहे. गाजरं, फ्लॉवर, मटार दाणे, ओली हळद-आंबे हळद, कमी तिखट हिरव्या मिरच्या, आवडत असेल तर अगदी कोवळी गवार आणि अगदी कोवळी कारली (आमच्या घरी गवार आणि कारली मी सोडले तर इतरांना आवडत नाही, त्यामुळे मी ते वापरत नाही) हे सगळं समप्रमाणात घेऊन बारीक चिरायचं, त्यात चवीनुसार केप्र किंवा बेडेकरचा कैरी लोणचं मसाला आणि मीठ घालायचं. जितकी भाजी असेल त्या प्रमाणात पुरेसं आंबट होईल इतपत लिंबाचा रस घालायचा. नीट कालवायचं आणि काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये टाकायचं.

photo 3
लोणच्यासाठी एकत्र केलेल्या भाज्या

मटारचं तर काय-काय करता येतं. मटारची साधी उसळ फार सोपी आहे. मात्र यासाठीचा मटार अगदी कोवळा, गोडसर हवा. तेलाची फोडणी करा. त्यात मोहरी-हिंग घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. तो गुलाबी झाला की थोडंसं आलं-ओल्या मिरचीचं वाटण घाला. त्यावर किंचीत हळद घाला. छान वास आला की त्यात मटार दाणे घालून दोन मिनिटं परता. त्यानंतर त्यात थोडं गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ, काळा मसाला घाला. चिमूटभर साखर घाला. मटार शिजत आले आणि पाणी आटत आलं की कोथिंबीर-ओलं खोबरं घाला. गॅस बंद करा. मटार पचपचीत शिजवू नका. किंवा फारही गाळ करू नका.

मटारची वाटणाची उसळ – भरपूर कोथिंबीर, ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि आलं (आवडत असल्यास थोडा लसूण) हे सगळं एकजीव वाटून घ्या. त्यात पाणी घालून सरबरीत वाटा. रंग हिरवागार यायला हवा. तेलाची फोडणी करा. हिंग-मोहरी-चिमूटभर हळद घाला. मटार घालून परता. किंचित पाणी घालून चांगली वाफ येऊ द्या. नंतर वाटण आणि मीठ घालून, हवा तितका रस्सा करून एक उकळी काढा.

मटार करंजी – यासाठी छान कोवळे मटार वापरा. करंजीच्या पारीसाठी मैदा, रवा समप्रमाणात घ्या. दोन्ही मिक्सरमधून फिरवून घ्या. फिरवताना त्यात थोडं तूप घाला. नंतर मीठ, ओवा, तीळ, थोडं मोहन घालून घट्ट भिजवा. सारणासाठी थोड्या तेलावर जिरं घालून मटार वाफवा. नंतर त्यात मिरची-लसणाचं वाटण घाला. तिखट-मीठ आणि भरपूर कोथिंबीर घाला. हे सारण घालून नेहमीसारख्या करंज्या करा.

मटार भात – एक वाटी तांदूळ असतील तर दीड वाटी कोवळे मटार, १ कांदा मध्यम आकारात चिरलेला आणि एक टोमॅटो मध्यम आकारात चिरलेला असं प्रमाण घ्या. तांदूळ तासभर आधी धुवून ठेवा. पाणी पूर्ण काढून ठेवा. करताना तांदळाला आपल्या आवडीप्रमाणे काळा मसाला चोळून घ्या. तेलाची नेहमीसारखी फोडणी करून त्यात अगदी कमी खडा मसाला (२ लवंगा, २ दालचिनीचे लहान तुकडे, ७-८ मिरीदाणे, १ तमालपत्र) घाला. नंतर कांदा घालून मऊ शिजवा. त्यात टोमॅटो घालून जरासं शिजवा. त्यानंतर मटार घालून एक वाफ काढा. त्यानंतर त्यात तांदूळ घालून चांगली वाफ येऊ द्या. दुप्पट उकळतं पाणी घाला, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला. मऊ शिजवा. वरून साजूक तूप, खोबरं-कोथिंबीर घालून खा. आवडत असल्यास गाजराचे लांब तुकडे घाला.

मटार पराठा – मटार मिक्सरला वाटा. वाटतानाच त्यात आलं-मिरची घाला. नंतर या प्युरेत ओवा, तीळ, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. यात मावेल तसं पीठ घाला. घडीचे जाडसर पराठे करा. तेल लावून खरपूस भाजा.

मटार-गाजर कोशिंबीर – अगदी कोवळे मटार वाटीभर असतील तर कोवळ्या रसरशीत गाजराचा कीस वाटीभर घ्या. त्यात लिंबाचा रस, चिमूटभर साखर, मीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं घाला. वरून हिंग-मोहरीची खमंग फोडणी द्या.

मटार पॅटिस रेसिपी –  https://goo.gl/UvB7zU

या मोसमात तुरीचे दाणेही फार सुंदर मिळतात. तुरीच्या दाण्याचे पदार्थ फार खमंग लागतात.

तुरीच्या दाण्यांची आमटी – कढईत तेल गरम करून त्यात एखादा कांदा उभा चिरून तो गुलाबी होऊ द्या. त्यातच एखादी लसणाची पाकळी आणि एखादी हिरवी मिरची घाला. ते जरासं परतून त्यात तुरीचे दाणे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. नंतर त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थोडंसं परता. गार झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड वाटा. फार बारीक पेस्ट करू नका. आपल्याला हवं असेल तितपत पातळ करून पातेल्यात घालून उकळायला ठेवा. त्यात आवडत असल्यास थोडा दाण्याचा कूट घाला. काळा मसाला आणि मीठ घाला. एका लहान कढईत हिंग मोहरी हळदीची खमंग फोडणी करा. थोडा कढीपत्ता घालून ही फोडणी आमटीवर घाला. मस्त उकळा. गरम बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खा. अशीच सोलाण्याची म्हणजे ओल्या हरभ-याचीही आमटी करतात.

तुरीच्या दाण्यांचा भात – एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी तुरीचे दाणे घ्या.  तांदूळ तासभर आधी धुवून, पाणी काढून ठेवा. करताना ८-१० लसूण पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीरीचं वाटण करा. आवडत असल्यास एखादी हिरवी मिरची त्यात घाला. हे वाटण तांदळाला चोळा. पातेल्यात साजूक तूप गरम करा. त्यात फक्त ३-४ लवंगा घाला. नतर तांदूळ घालून लसणाचा खमंग वास येईपर्यंत परता. त्यात दुप्पट पाणी, किंचित लिंबाचा रस आणि मीठ घालून मऊ शिजवा. या भाताला कसलाही मसाला घालायचा नाही.

तुरीच्या दाण्यांची उसळ – तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यावर चिरलेला कांदा परता. कांदा चांगला परतला की त्यात तुरीचे दाणे, तिखट, मीठ, काळा मसाला, आवडत असल्यास किंचित गूळ घाला. एक वाफ आली की त्यात थोडं गरम पाणी घाला. चांगली शिजू द्या. नंतर त्यात खोबरं-कोथिंबीर घाला. काळ्या मसाल्याऐवजी गरम मसाला किंवा मालवणी मसालाही वापरू शकता. अशीच सोलाण्याची म्हणजे ओल्या हरभ-याची उसळ करता येते. तुरीचे सुके दाणे भिजवूनही ही उसळ करता येते. पण ताज्या दाण्यांची जास्त चांगली लागते.

photo (22)

हिवाळ्यात पालेभाज्या फार छान मिळतात. मराठवाड्यात कच्च्या पालेभाज्या खातात. पालेभाज्यांचा घोळाणा केला जातो.

कांद्याच्या पातीचा घोळाणा – कांद्याची पात बारीक चिरायची. त्यात दाण्याचं कूट, तिखट-मीठ घालायचं. वरून कच्चं तेल घालून एकत्र करायचं. हा झाला कांद्याच्या पातीचा घोळाणा. असाच मेथीचा, करडईचा करता येतो.

मेथीची पचडी – कोवळी मेथी धुवून बारीक चिरा. मेथी दोन वाट्या असेल तर प्रत्येकी १ लहान कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरा. १ गाजर आणि अर्धा मुळा किसून घ्या. सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, थोडं तिखट, लिंबाचा रस असं घाला. वरून जरा जास्त हिंग घालून खमंग फोडणी द्या.

IMG_8370

मेथीचे पराठे – मेथी बारीक चिरून घ्या. त्यात हळद-तिखट-मीठ-ओवा-तीळ घाला. लसूण वाटून घाला. सगळं नीट एकत्र करा आणि चांगलं पाणी सुटू द्या. आवडत असल्यास एखादं चांगलं पिकलेलं केळं कुस्करून घाला. नीट एकत्र करून ठेवा. चांगलं पाणी सुटलं की त्यात एक लहान चमचा बेसन आणि मावेल तेवढी कणीक घाला. नीट मळून थोडा वेळ ठेवून द्या. नंतर आपल्याला हवे तसे घडीचे पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.

मेथीचं वरण – मेथी धुवून बारीक चिरून घ्या. तूरडाळीचं वरण शिजवून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यात मोहरी आणि हिंग घाला. ठेचलेला लसूण घाला. तो चांगला लाल झाला की थोडी हळद घाला. त्यावर मेथी घालून एक चांगली वाफ येऊ द्या. मेथी शिजत आली की त्यात शिजलेलं वरण घाला. आपल्याला हवं तितपत पातळ करा. त्यात तिखट, मीठ आणि काळा मसाला घाला, चांगलं उकळा. गरम भात किंवा भाकरीबरोबर खा.

मेथीफळं – https://goo.gl/U4VCqC

मेथी-वांगं-बटाटा भाजी – https://goo.gl/vxUcBc

हे पदार्थ आपल्या सोयीनं करून बघा. कसे झाले ते जरूर कळवा. या पोस्टचा दुसरा भाग लवकरच. त्यात एकत्रित भाज्यांचा वापर करून केलेल्या पदार्थांचा समावेश असणार आहे.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #रोजचेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #एकत्रितपदार्थांच्यापोस्ट #हिवाळीपदार्थ #हिवाळा #आरोग्यदायीपदार्थ #मुंबईमसाला #अन्नहेचपूर्णब्रह्म #simplerecipe #healthyrecipe #healthiswealth #healthyliving #healthyeating #winterrecipes #indianwinter #mumbaimasala

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

जागतिक मधुमेह दिन

या आठवड्यात खाद्यप्रेमींनी लक्षात घ्यावेत असे दोन दिवस आहेत. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. तर आज म्हणजे १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय फास्ट फूड दिवस म्हणून पाळला जातो. हे दोन्ही दिवस परस्परविरोधी गोष्टींसाठी पाळले जातात. मधुमेह टाळायचा असेल तर फास्ट फूड टाळणं हिताचं असतं. पण त्याचबरोबर जिभेची आवड पुरवायची असेल तर फास्ट फूड खाल्लं जातंच.

मधुमेह हा एक दबक्या पावलांनी येणारा आजार आहे. मधुमेहाचा एक प्रकार हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आहे. मधुमेहाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह. या प्रकारात शरीरात चयापचयासाठी आवश्यक अशा इन्सुलिनची निर्मितीच होत नाही. स्वादुपिंड किंवा पॅनक्रिआ ही ग्रंथी शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असते. पण काही कारणांनी जेव्हा ही निर्मिती होत नाही तेव्हा मधुमेह उद्भवतो. या प्रकारात इन्सुलिन टोचून घेणं गरजेचं ठरतं. या आजारात शरीरातल्या साखरेकडे सतत लक्ष ठेवून इन्सुलिनचा डोस कमीजास्त करावा लागतो.

टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे. तो टाळता येऊ शकतो. हा मधुमेह कशामुळे होतो? तर हा मधुमेह बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडचं सेवन, वाढलेलं वजन यामुळे होतो. टाइप १ मधुमेह टाळता येत नाही. त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू. पण हा प्रकार टाळणं सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल मी आज या पोस्टमध्ये सांगणार आहे.

वर म्हटलं तसं बैठी आणि आळशी जीवनशैली ही याला कारणीभूत असते. तेव्हा सगळ्यात आधी जितकं शक्य आहे तितकं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. जी-जी कामं चालत जाऊन करता येऊ शकतात ती वाहन न घेता चालत जाऊन करा. शक्य तितके जिने चढा आणि उतरा. व्यायामाचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार म्हणजे चालणं आहे. आणि चालणं हे कुठल्याही वयात सहज करता येईल असा व्यायाम प्रकार आहे. गती आणि अंतर आपापल्या क्षमतेपेक्षा कमीजास्त करता येऊ शकतं. पन्नाशीपर्यंतच्या आणि कुठलेही मोठे आजार नसलेल्या माणसांना रोज ५ किलोमीटर चालणं सहज शक्य आहे. यातही तुम्ही सकाळी अर्धं आणि संध्याकाळी अर्धं असं करू शकता. किंवा दिवसभरात १०-१० मिनिटं तीन-चारदा चालू शकता. थोडक्यात हे करणं अगदीच सोपं आहे. जे लोक दिवसभर कामासाठी बाहेर असतात ते ऑफिसमध्ये वेळ काढून चालू शकतात किंवा ऑफिसहून येताना वाहन अर्ध्यावर सोडून चालत येऊ शकतात.

चालण्याशिवाय धावणं, पोहणं, नाचणं, सायकल चालवणं यासारखे हृदयाला व्यायाम देणारे म्हणजे एरोबिक व्यायामप्रकार मधुमेह टाळण्यासाठी आणि झाला असेल तर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोज आपण किती व्यायाम करतो याची नोंद टेवण्यासाठी मोबाईलवर अनेक apps उपलब्ध आहेत. त्यांच्यावर आपण रोजची नोंद सहज ठेवू शकतो. शिवाय चालताना निसर्गाचा फार मोठा आनंद मिळतो.

मी स्वतः गेली अनेक वर्षं म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून नियमितपणे चालते. औरंगाबादच्या आमच्या घरापासून विद्यापीठ साधारण ६ किलोमीटर दूर होतं. मी अनेकदा एकटी मजेत चालत यायचे. लग्नानंतर साधारण २००० च्या सुमाराला निरंजनला कोलेस्टरॉल डिटेक्ट झालं. त्यानंतर रोज चालायला जायला लागलो. तरी २००३ मध्ये निरंजनची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र आम्ही जीवनशैली फारच बदलली. आता भरपूर चालणं हा आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे.

माझ्या आईच्या माहेरी डायबेटिसची स्ट्राँग हिस्टरी आहे. माझ्यातही ते जीन्स असणारच. होणं न होणं आपल्या हातात नसतं. पण मी तो होणं लांबवू शकते किंवा झालाच तर नियंत्रणात ठेवू शकते. सध्या मी दिवसाला ६-७ किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करते. सकाळी वॉकला निघाल्यावर ५ किलोमीटर आणि जमल्यास परत संध्याकाळी थोडं चालतेच.

टाइप २ मधुमेह होण्यात जंक फूडचा मोठा हात आहे. जंक फूड किंवा फास्ट फूड ही पहिल्या महायुदधानंतर जगाला मिळालेली देणगी आहे. रस्ता प्रवासात पटकन हातात घेऊन खाता येईल अशा पदार्थांचा विचार या काळात केला गेला. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार होता हॅम्बर्गर किंवा बर्गर. नंतर नंतर या प्रकारानं इतका जोर धरला की गेल्या काही वर्षांत जंक फूडचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था सरसावल्या आहेत. मुलांना शाळेच्या डब्यात घरी केलेले पदार्थच द्यावेत. छोट्या सुटीच्या टिफिनमध्ये फळं किंवा काकडी गाजरासारख्या कच्च्या भाज्या द्याव्यात अशी सक्ती अनेक शाळा करताना दिसतात.

फास्ट फूड डे हा खरंतर आपल्या आवडीचं फास्ट फूड खाऊन साजरा केला जातो. पण आपण असं करायला काय हरकत आहे की या दिवसाचं स्मरण म्हणून महिन्यातल्या फक्त दर १६ तारखेला आपल्या आवडीचं फास्ट फूड खायचं पण इतर दिवशी मात्र सकस, आरोग्यदायी अन्न खायचं. फास्ट फूडमध्ये काय काय येतं? तर फास्ट फूडमध्ये बर्गर, चिप्स, वेफर्स, नूडल्स असे पदार्थ येतात.

घरी स्वयंपाक केला तर आपल्या सोयीनं आपण या पदार्थांमध्ये काही बदल करून ते जास्तीत जास्त आरोग्यदायी बनवू शकतो. जसं की पावभाजी करताना खूप जास्त बटाटा घालण्याऐवजी त्यात फ्लॉवर, वाटाणा, टोमॅटोबरोबर थोडं गाजर-फरसबी अशा भाज्या वापरू शकतो. मॅश केल्यानं आणि पावभाजी मसाल्याच्या स्वादामुळे या भाज्या वापरल्याचं लक्षातही येत नाही. किंवा नूडल्स करताना नूडल्सच्या बरोबरीनं भाज्या घातल्या तर ते मस्तच लागतात. मॅगीसारखे रेडीमेड मसाले असलेले नूडल्स वापरण्याऐवजी जर तुम्ही साधे नूडल्स विकत आणले आणि त्यात भाज्या घातल्यात तर उत्तम नूडल्स होतात. तसंच पास्ता करतानाही त्यात ब्रोकोली,फ्लॉवर,गाजर,कॉर्न,मश्रूम्स अशा भरपूर भाज्या घातल्यात आणि वर चीज घातलंत, व्हाईट सॉससाठी मैद्याऐवजी कणीक वापरलीत तर पास्ता छानच बनतो. रेडीमेड सॉसऐवजी घरी टोमॅटो सॉस करून पिझ्झा बनवलात, त्यावर सिमला मिरची, बेबीकॉर्न, टोमॅटो, ऑलिव्ह घातलेत, वरून चीज घालून तो साध्या तव्यावर खरपूस भाजलात तर उत्तम पिझ्झा होतो.

नेहमी जर असं केलंत तर सिनेमाला गेल्यावर एखादा समोसा खाल्लात किंवा एखादं लहान फ्राइजचं पॅकेट खाल्लंत तर काहीच हरकत नाही.

रोजचा आहार आरोग्यदायी करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं?

रोज साधा पण ताजा स्वयंपाक करा. जेवणात भरपूर भाज्यांचा, कडधान्यांचा, डाळींचा, वेगवेगळ्या धान्यांचा वापर करा. जसं की जेवणाआधी एखादी काकडी-गाजर खाण्याची सवय लावून घ्या. (मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांना विचारून गाजर, बीट, कॉर्न खावं). रोजच्या दोन जेवणांपैकी एका जेवणात तरी उसळ ठेवाच. प्रत्येक जेवणात ताजी कोशिंबीर किंवा सॅलड ठेवाच. कोशिंबीर नेहमी ताजीच खा. उरली तर सरळ फेकून द्या. कच्च्या अन्नात जीवाणूंची वाढ लवकर होते त्यामुळे कधीही कच्चे पदार्थ जास्त वेळ ठेवू नका. आहारात आंबवलेले पदार्थ वापरा. इडली, डोसे करताना जास्त डाळी वापरा. गव्हाबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा धान्यांचा वापर करा. रोज किमान २-३ फळं चोथ्यासकट खा. फळांचे रस पिऊ नका. मधुमेह असलेल्यांनी आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्षं अशी फळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा. जेवणात दूध-दही-ताक यांचा समावेश करा. मांसाहारी पदार्थ करताना तेलाचा कमीत कमी वापर करा. शक्यतो बेकिंग, स्टीमिंग अशा पद्धती वापरा. पारंपरिक माशांची आमटी, पारंपरिक चिकन रस्सा करायला हरकत नाही. मटन, बीफ, पोर्क हे प्रमाणात, कधीतरीच खा.  गोड पदार्थ रोज खाऊ नका. विकतचे तर खाऊच नका. गोड पदार्थांचं तसंच जंक पदार्थांचं व्यसन लागू शकतं.  गोड फारच खावंसं वाटलं तर घरी केलेले खीर, गाजर हलवा, दुधी हलवा, श्रीखंड असे पदार्थ खा, पण तेही प्रमाणात खा. आईस्क्रीम, केक्स, पुडिंग असे पदार्थ क्वचितच खा. फार गोड खावंसं वाटलं तर खजूर, जर्दाळू, बेदाणे, मनुका असं काहीतरी खा.

पण जर एकदा मधुमेह झाला आणि तुम्ही तो नियंत्रणात ठेवला नाही तर मात्र तुमचं आयुष्य कठीण होतं. मधुमेह किडनी, डोळे, मज्जासंस्था यावर मोठा परिणाम करतो. त्यामुळे चाळीशीनंतर दर सहा महिन्यांनी मधुमेह तपासणी करायलाच हवी. ज्यांच्या घरात मधुमेहाची स्ट्राँग हिस्टरी आहे त्यांनी तर पंचविशीपासून तपासणी करावी. ही तपासणी अगदी स्वस्तात होते.

मधुमेह टाळायचा असेल किंवा नियंत्रित ठेवायचा असेल तर सक्रिय जीवनशैली, सकस आहार आणि पूरक व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. तो करणं अजिबात अवघड नाही हे स्वानुभवानं सांगते फक्त मनाचा निग्रह मात्र हवा.

मी आहारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञ नाही. हे मी सगळं कॉमन सेन्समधून लिहिलेलं आहे. ज्यांना कुठल्याही शारिरीक समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका. या लेखातल्या मधुमेहाबद्दलच्या माहितीचा संदर्भ – विकीपीडिया

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #हेल्दीजीवनशैली #अन्नहेचपूर्णब्रह्म #साधीजीवनशैली #simpleliving #healthyliving #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

 

आंबट बटाटा

बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला. स्पॅनिश लोकांनी त्याचा जगभरात प्रसार केला. त्यानंतर बटाटा जगभरात इतका लोकप्रिय झाला की आज बहुसंख्य देशांच्या स्वयंपाकात बटाट्याला फार मानाचं स्थान आहे.
तुम्ही बघितलंत तर युरोपात तसंच जगात जिथे जिथे अति थंडी असते आणि त्यामुळे जिथे भाज्या अगदीच नगण्य उगवतात अशा देशांच्या जेवणात बटाटा असतोच असतो. याचं कारण अशा थंडीत भाज्या कमी उगवतात हे तर आहेच. पण थंडीत लागणारी ऊर्जा पुरवण्याचं काम बटाटा करतो.
बटाट्याचे तब्बल ५००० प्रकार आहेत. ७-८ प्रजातींपासून हे वेगवेगळे प्रकार तयार झालेले आहेत. बटाटा जमिनीखाली उगवतो. बटाट्याच्या झाडाला पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी अशी वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात. पांढ-या फुलांच्या झाडांच्या बटाट्याची साल पांढरट असते तर इतर रंगांच्या फुलांची साल गुलाबीसर रंगाची असते. आज जागतिक धान्य उत्पादनात मका, गहू आणि तांदळाच्या खालोखाल बटाट्याचा क्रमांक लागतो. भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे.
आपल्याकडे उपासाला बटाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तळलेला बटाटा तर फार म्हणजे फारच फर्मास लागतो. बटाटा वेफर्स हे एक वेडं खाणं आहे. एकदा खायला लागलो की थांबवताच येत नाही स्वतःला. बटाट्याच्या वेगवेगळ्या जातींचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर केला जातो. मॅकडोनल्ड्समधल्या फ्रेंच फ्राईजना तोड नाही याचं कारण यासाठी एका विशिष्ट प्रकारचा बटाटा वापरला जातो. कमीजास्त स्टार्चच्या प्रमाणानुसार त्या-त्या जातीपासून विशिष्ट पदार्थ बनवले जातात. आपणही भाजी चिकट झाली की म्हणतोच की नाही की बटाटा नवा आहे वाटतं.
तर आज मी या लाडक्या बटाट्याचीच एक रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी सारस्वतांची खासियत आहे. या भाजीचं नाव आहे आंबट बटाटा. खोब-याचं वाटण घातलेली तिखट-आंबट-गोड अशी रस्सा भाजी. ही रेसिपी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. त्या ही भाजी फार सुंदर करतात.

आंबट बटाटा

साहित्य – ४ मोठे बटाटे (साल काढून फ्रेंच फ्राइजच्या आकारात चिरलेले), दीड वाटी ओलं खोबरं-२ टीस्पून तिखट-१ टीस्पून मालवणी मसाला-अर्धा टीस्पून हळद (हे सगळं मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ (किंवा थोडी चिंच वाटण मसाल्यातच वाटा), लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मेथी दाणे, मीठ चवीनुसार

कृती –
१) एका कढईत तेल गरम करा. त्यात मेथी दाणे आणि हळद घाला.
२) मेथी दाणे लाल झाले की बटाटा घाला. झाकण ठेवून किंचित वाफ द्या.
३) नंतर त्यात कपभर गरम पाणी घाला, मीठ घाला आणि झाकण ठेवून गॅस बारीक करा.
४) बटाटा शिजत आला की त्यात वाटण, चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. ते सगळं नीट एकत्र करून चव बघा.
५) आपल्याला हव्या त्या चवीचं प्रमाण वाढवा. कारण ही भाजी तिखट-आंबट-गोड अशी हवी.

photo 4 (2)

गरमागरम पोळ्या किंवा गरमागरम भाताबरोबर ही भाजी खा. बरोबर एखादी सुकी भाजी, मठ्ठा किंवा सोलकढी आणि आवडत असतील तर तळलेले मासे असा बेत करा.
इतक्या साहित्यात ४ जणांसाठी भाजी होते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#साधीरेसिपी #सोपीरेसिपी #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #मराठीपदार्थ#सारस्वतीपदार्थ #सारस्वतीखासियत #रोजचास्वयंपाक #रोजचेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म#simplerecipe #marathirecipe #saraswatdelicacy #saraswatrecipe#healthiswealth #healthycooking #everydaycooking #everydayrecipe#traditionalmaharashtrianrecipe #traditionalcooking #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

photo 1 (2)

दोन कोशिंबिरी

उन्हाळ्यातलं माझं आवडतं जेवण म्हणजे भरपूर आंब्याचा रस, त्यात साजूक तूप आणि गरम पोळ्या. हे जेवण मी संपूर्ण उन्हाळा सकाळ-संध्याकाळ न कंटाळता खाऊ शकते. आमच्या घरी नव-याला आणि मुलींना आंब्याचा रस आवडतो पण त्यांना तो पोळीबरोबर खायला आवडत नाही, त्यामुळे इतर स्वयंपाक करणं क्रमप्राप्त असतं.
उन्हाळ्यात खूप मसालेदार भाज्या खाव्याशा वाटत नाहीत. त्यापेक्षा गार दहीभात, साधं वरण-भात, कुठल्याही साध्या काच-या आणि पोळी असं काहीतरी खावंसं वाटतं. कोशिंबिरी किंवा सॅलड्स एरवीही खावंच. पण उन्हाळ्यात थंड दह्यातली कोशिंबीर किंवा फ्रीजमध्ये ठेवून गार केलेल्या भाज्यांचं सॅलड खाणं बरं वाटतं. त्यामुळे लाल भोपळ्याचं दह्यातलं रायतं, दुधी भोपळ्याचं दह्यातलं रायतं, काकडीची दह्यातली कोशिंबीर, टोमॅटो-कांद्याची दह्यातली कोशिंबीर, पांढ-या कांद्याची दह्यातली कोशिंबीर असं काहीतरी जेवणात असावं. शिवाय वांग्याचं दह्यातलं भरीतही अप्रतिम लागतं. आपण सगळेच थोड्याफार फरकानं तशाच पद्धतीनं कोशिंबिरी करत असतो. पण त्यात जरासा बदल करून बघितला तर वेगळ्या चवीचा साक्षात्कार होतो. कुणी फोडणीत हिंग-हळद घालतं तर कुणी नुसतंच मोहरी-जिरं, कुणी हिरव्या मिरच्यांचे तुकडे तर कुणी त्याबरोबर कढीपत्ता. कुणी सुक्या लाल मिरच्या तर कुणी तळणीची मिरची. या लहानसहान बदलांनी पदार्थाची चव खूप बदलते. आज मी अशाच दोन मस्त कोशिंबिरींच्या रेसिपी शेअर करणार आहे.

IMG_20170513_195334_327
वांग्याचं दह्यातलं भरीत
साहित्य – २ भरताची जांभळी, कमी बिया असलेली वांगी (स्वच्छ धुवून, पुसून, तेलाचा हात लावून डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या, थंड झाल्यावर ओल्या हातांनी हलकेच सालं काढा. नंतर मॅशरनं चांगलं एकजीव मॅश करा.), २ पांढरे कांदे बारीक चिरलेले (नसल्यास लाल कांदे वापरा), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ वाट्या गोड दही, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
फोडणी – १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, ताकातल्या किंवा तळणीच्या मिरच्यांचे १०-१२ तुकडे, १ टीस्पून तिखट
कृती –
१) मॅश केलेलं वांगं एका टोपल्यात घ्या. त्यात दही, साखर, मीठ, कोथिंबीर घाला.
२) सगळं नीट एकत्र करा.
३) एका कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडली की त्यात हिंग आणि मिरच्यांचे तुकडे घाला.
४) तुकडे फुलले की तिखट घाला आणि लगेचच गॅस बंद करा. तिखट जळता कामा नये.
५) ही फोडणी भरतावर ओता. हलवून घ्या.
या भरताबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी उत्तम लागते. बरोबर घरचं लोणी, मिरचीचा ठेचा, पिठलं असेल तर अजूनच बहार येते.

IMG_20170514_195904
काकडी, गाजर, टोमॅटोची साधी कोशिंबीर
साहित्य – २ गाजरं किसलेली, २ कोवळ्या काकड्या बारीक चिरलेल्या, १ मोठा टोमॅटो बिया काढून बारीक चिरलेला, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे ऐच्छिक, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, पाव टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
फोडणी – २ टीस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग
कृती –
१) सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, तिखट, मीठ, साखर घाला. कोथिंबीर घाला. नीट एकजीव करा.
२) एका लहान कढलीत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला.
३) ती तडतडली की त्यात हिंग घाला, लगेचच गॅस बंद करा. ही फोडणी कोशिंबिरीवर ओता.
या कोशिंबिरीबरोबर मी आज काळ्या वाटाण्याची आमटी, वांग्याचे काप, मेथीची भरडा भाजी, दोडक्याची भाजी केलं होतं. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हवं ते करा.

सायली राजाध्यक्ष

बीजिंगमध्ये हिरवा भात!

World is too small!
या उक्तीचा अनुभव पुन्हापुन्हा येत राहातो. कधी तुम्हाला अचानक कुठल्यातरी आडगावात तुमच्या ओळखीतल्या कुणाचा तरी नातेवाईक भेटतो, तर कधी नेहमीच्या परिचित व्यक्तीची वेगळीच ओळख निघते.
ब्लॉगमुळे मला हा अनुभव वारंवार येत असतो. परवा बंगलोरहून एका ब्लॉग वाचक मैत्रिणीचा इनबॉक्समध्ये मेसेज आला. बंगलोरला राहणा-या सुचित्रा गोडबोलेनं चीनमध्ये राहणा-या प्रीती राहुल महाजन या भारतीय मैत्रिणीला माझ्या ब्लॉगवरची ग्रीन पुलावची रेसिपी दिली होती. त्या मैत्रिणीनं एका स्पर्धेत ती रेसिपी केली. भारतातल्या एका मराठी ब्लॉगरची रेसिपी बीजिंगमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय शाळांच्या कुकरी स्पर्धेत केली गेली. मला तर हा फार विलक्षण अनुभव वाटतो.
कुक फॉर होप नावाच्या या स्पर्धेत बीजिंगमधल्या पाच शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भाग घेतला होता. या पाच टीम्सनी वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला होता. हाँगकाँगच्या टीमनं हाँगकाँगमधलं स्ट्रीट फूड बनवलं होतं. युरोपियन टीममध्ये इस्त्रायली, भारतीय, चीनी, फ्रेंच आणि ग्रीक सदस्य होते. त्यांनी आपापल्या देशांतले पदार्थ बनवले होते. भारतीय टीमनं अर्थातच भारतीय पदार्थ केले होते. त्याआधीच्या आठवड्यातल्या वसुंधरा दिनाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी संपूर्ण शाकाहारी स्वयंपाक केला होता. त्यातच हा ग्रीन पुलाव केला गेला.
या स्पर्धेतून जो निधी जमा झाला तो बेबी हान या अनाथ मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.

https://www.beijing-kids.com/…/cook-for-hope-2017-serves-u…/

सायली राजाध्यक्ष

डाएटसाठी चालतील असे पदार्थ

15036719_615172132022843_1362274204576290416_n

मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई केली आहे. त्यातले निदान २-३ किलो कमी करावेत असा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी नियमितपणे, व्यवस्थित खाते आहे.

डाएटिंग करताना पाळण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीच क्रॅश डाएट करू नये. वजन खूप जास्त असेल आणि ते मनापासून कमी करण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही उत्तम. याचं कारण मनानं केलेल्या, इंटरनेटवर वाचून केलेल्या डाएटमुळे शरीराची हानी होण्याची शक्यता असते. शास्त्रशुद्ध माहिती नसताना आहारातून काही पदार्थ वगळले तर डेफिशिअन्सी होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचाच सल्ला घ्या. मी जे डाएट करते आहे ते मी फार विचारपूर्वक करते आहे. शिवाय मला फारसं वजन कमी करायचं नाहीये तर हेल्दी खायचं आहे. त्यामुळे मी इथे जे डाएट शेअर करते ते संदर्भासाठी वापरा. त्यात आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या शारीरिक समस्यांनुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करा.
प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगळी असते, प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात त्यामुळे सरसकट कुठलेच नियम सगळ्यांना लागू होत नाहीत.
आजची जी पोस्ट आहे त्यात मी काही हेल्दी रेसिपीज शेअर करणार आहे. गेल्या आठवड्याभरात मी जे पदार्थ खाते आहे त्यातल्या काही पदार्थांच्या अगदी सोप्या रेसिपीज शेअर करणार आहे.

चटपटे हरभरे किंवा चणे
साहित्य – १ वाटी भिजवून मऊ शिजवलेले हरभरे (हरभरे शिजवून त्यातलं पाणी गाळून घ्या. ते सूप किंवा आमटीत वापरा), १ लहान कांदा बारीक चिरलेला, १ लहान टोमॅटो बारीक चिरलेला, १-२ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार
कृती – हरभरे फ्रीजमध्ये मस्त थंड करा. त्यात सगळं साहित्य घाला. लगेचच खा.

15027563_615171985356191_1767573786615262550_n

कोबी आणि पपनस कोशिंबीर
साहित्य – २ वाट्या लांब पातळ चिरलेला कोबी, १ वाटी सोललेलं पपनस, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून जाड भरडलेले मिरी दाणे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15027976_612960678910655_3948258700166116713_n

मूग-काकडी-डाळिंब सॅलड
साहित्य – प्रत्येकी १ वाटी मूग आणि मध्यम आकारात चिरलेली काकडी, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडासा लिंबाचा रस
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15107370_615172068689516_8505055392683547100_n

कुरमु-यांचा साधा चिवडा
साहित्य – पाव किलो कुरमुरे, अर्धी वाटी डाळं, हवे असल्यास अर्धी वाटी शेंगदाणे, भरपूर बारीक चिरलेला कढीपत्ता, २ टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या (ऐच्छिक), मोहरी-हिंग-हळद
कृती – कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घाला. त्यातच दाणे घाला. सतत हलवत परता. लाल होत आले की त्यात डाळं घाला. डाळं लाल झालं की त्यात लसूण घालून लाल करा. नंतर त्यात कढीपत्ता घाला, हळद-तिखट-मीठ घाला. चांगलं हलवा आणि कुरमुरे घाला. व्यवस्थित एकत्र करा. गॅस बंद करा.

15094450_615172215356168_6926909106747496070_n

पुदिना पराठा आणि पुदिना चटणी
पराठा साहित्य – १ ते दीड वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, १ मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला, २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, २-३ वाट्या कणीक, भाजण्यासाठी साजूक तूप, नसेल तर तेलही चालेल.
कृती – पुदिन्याची पानं, कांदा, मिरची आणि मीठ एकत्र करा. चांगलं मिसळलं की त्याला थोडं पाणी सुटेल. त्यात कणीक घाला. घट्ट मळून घ्या. नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडी घट्ट भिजवा. नेहमीसारखा पराठा लाटा. तव्यावर थोडंसं तूप लावून खमंग भाजा.
चटणी साहित्य – १ मध्यम आकाराची पुदिन्याची जुडी, त्याच्या अर्धी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार
कृती – पुदिना आणि कोथिंबीर निवडून, धुवून, नीट निथळून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरवर बारीक चटणी वाटा.
पराठा आणि चटणी खा.

15085531_615172092022847_8443951495275013912_n

पालक-बाजरी-नाचणी भाकरी
साहित्य – अर्धी जुडी पालक (निवडून, धुवून पाण्यात अर्धवट शिजवून घ्या. नंतर निथळा.), २ हिरव्या मिरच्या, ३-४ पाकळ्या लसूण, अंदाजे १ वाटी बाजरी आणि १ वाटी नाचणीचं पीठ (अंदाजे यासाठी की पालकाच्या मिश्रणात मावेल तसं पीठ घाला. बाजरी आणि नाचणी समप्रमाणात किंवा आवडीनुसार कमीजास्त करा.), किंचित मीठ
कृती – शिजवलेला पालक, मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात मावेल तसं पीठ घाला, चवीला किंचित मीठ घाला. पीठ चांगलं मळून नेहमीसारखी भाकरी करा. इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या ३-४ भाक-या होतात.

कांद्याच्या पातीचा घोळाणा
साहित्य – १ लहान जुडी कांद्याची पात (धुवून, कोरडी करून मध्यम आकारात चिरलेली, हवा असल्यास पातीचा कांदाही बारीक चिरा.) २ टीस्पून दाण्याचं कूट, अर्धा टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून तेल
कृती – चिरलेली कांद्याची पात आणि इतर साहित्य एकत्र करा. आवडत असल्यास लिंबाचा रस आणि साखरही घालू शकता.

15078638_615172168689506_7722971918702105799_n

हे पदार्थ करायला अतिशय सोपे आहेत. चवदार लागतात, करायला अतिशय कमी वेळ लागतो.

काही सोप्या टीप्स लक्षात ठेवा. हा कॉमन सेन्स आहे. जर नाश्त्याला पराठे, पोळी, भाकरी किंवा मिश्र पिठांची धिरडी असं खाल्लंत तर जेवताना उसळ किंवा घट्ट वरण खाच. मांसाहार करत असाल तर मासे आणि चिकन, अंडी खाऊ शकता. रोजच्या स्वयंपाकात एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य, एक डाळ वापराच. मांसाहारी असाल तर अर्थातच चिकन किंवा मासे. रेड मीट आणि शेलफिश (कोलंबी, कालवं, तिस-या) नेहमी खाऊ नये असं डॉक्टर सांगतात म्हणून मटन आणि शेलफिश क्वचित खा.

मला कुणीतरी प्रश्न विचारला होता की दुपारच्या जेवणात पोळी खाल्ली नाही तर अशक्तपणा येणार नाही का? तर त्या दिवशी मी नाश्त्याला २ पोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे जेवताना सॅलड, उसळ आणि ताक इतकं मला पुरे होतं. मी भातही पूर्ण बंद केलेला नाही. कारण मला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. पण तो मी अगदी कमी म्हणजे फक्त एक वाटी खाते. काल रात्री मी एक वाटीभर चण्याचं सॅलड आणि एक मोठा बोल पालकाचं सूप घेतलं तर तेवढं मला पुरेसं होतं. रात्री मी एक संत्रं आणि ३ मोठे खजूर खाल्ले.

हेल्दी राहाण्यासाठी भुकेलं राहू नका. पण भरमसाठ खाऊही नका. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका. फळं, भाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स, पनीर, प्रमाणात सुकामेवा, तेलबिया (शेंगदाणे, तीळ, सूर्यफूल), कडधान्यं, डाळी हे जास्त खा. ब्रेड, भाकरी, पोळी, भात हे कमी प्रमाणात खा पण पूर्ण बंदही करू नका. साखर आणि तेल (तूप, बटर, लोणी हेही) खूप कमी करा.
कायम मन मारून खाणं अशक्य आहे. अगदी कुठल्याही वयात अवघड आहे. त्यामुळे मध्यम मार्ग स्विकारणं हे सगळ्यात उत्तम. सगळं खा पण प्रमाणात खा. प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाला पर्याय नाही. आठवड्यातून ५-६ दिवस व्यायाम कराच. मी आठवड्यातून ६ दिवस ४५ मिनिटं चालते आणि आठवड्यातून ३ दिवस १ तास योगासनं करते. व्यायाम हवाच हवा हे लक्षात घ्या.

So Happy Reading, happy Eating, Happy exercising!

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#happyhealth #Healthiswealth #Healthyeating #dietplan #Mumbaimasala#हेल्दीखादेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #Exerciseisamust

सायली राजाध्यक्ष