जागतिक मधुमेह दिन

या आठवड्यात खाद्यप्रेमींनी लक्षात घ्यावेत असे दोन दिवस आहेत. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. तर आज म्हणजे १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय फास्ट फूड दिवस म्हणून पाळला जातो. हे दोन्ही दिवस परस्परविरोधी गोष्टींसाठी पाळले जातात. मधुमेह टाळायचा असेल तर फास्ट फूड टाळणं हिताचं असतं. पण त्याचबरोबर जिभेची आवड पुरवायची असेल तर फास्ट फूड खाल्लं जातंच.

मधुमेह हा एक दबक्या पावलांनी येणारा आजार आहे. मधुमेहाचा एक प्रकार हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आहे. मधुमेहाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह. या प्रकारात शरीरात चयापचयासाठी आवश्यक अशा इन्सुलिनची निर्मितीच होत नाही. स्वादुपिंड किंवा पॅनक्रिआ ही ग्रंथी शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असते. पण काही कारणांनी जेव्हा ही निर्मिती होत नाही तेव्हा मधुमेह उद्भवतो. या प्रकारात इन्सुलिन टोचून घेणं गरजेचं ठरतं. या आजारात शरीरातल्या साखरेकडे सतत लक्ष ठेवून इन्सुलिनचा डोस कमीजास्त करावा लागतो.

टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे. तो टाळता येऊ शकतो. हा मधुमेह कशामुळे होतो? तर हा मधुमेह बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडचं सेवन, वाढलेलं वजन यामुळे होतो. टाइप १ मधुमेह टाळता येत नाही. त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू. पण हा प्रकार टाळणं सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल मी आज या पोस्टमध्ये सांगणार आहे.

वर म्हटलं तसं बैठी आणि आळशी जीवनशैली ही याला कारणीभूत असते. तेव्हा सगळ्यात आधी जितकं शक्य आहे तितकं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. जी-जी कामं चालत जाऊन करता येऊ शकतात ती वाहन न घेता चालत जाऊन करा. शक्य तितके जिने चढा आणि उतरा. व्यायामाचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार म्हणजे चालणं आहे. आणि चालणं हे कुठल्याही वयात सहज करता येईल असा व्यायाम प्रकार आहे. गती आणि अंतर आपापल्या क्षमतेपेक्षा कमीजास्त करता येऊ शकतं. पन्नाशीपर्यंतच्या आणि कुठलेही मोठे आजार नसलेल्या माणसांना रोज ५ किलोमीटर चालणं सहज शक्य आहे. यातही तुम्ही सकाळी अर्धं आणि संध्याकाळी अर्धं असं करू शकता. किंवा दिवसभरात १०-१० मिनिटं तीन-चारदा चालू शकता. थोडक्यात हे करणं अगदीच सोपं आहे. जे लोक दिवसभर कामासाठी बाहेर असतात ते ऑफिसमध्ये वेळ काढून चालू शकतात किंवा ऑफिसहून येताना वाहन अर्ध्यावर सोडून चालत येऊ शकतात.

चालण्याशिवाय धावणं, पोहणं, नाचणं, सायकल चालवणं यासारखे हृदयाला व्यायाम देणारे म्हणजे एरोबिक व्यायामप्रकार मधुमेह टाळण्यासाठी आणि झाला असेल तर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोज आपण किती व्यायाम करतो याची नोंद टेवण्यासाठी मोबाईलवर अनेक apps उपलब्ध आहेत. त्यांच्यावर आपण रोजची नोंद सहज ठेवू शकतो. शिवाय चालताना निसर्गाचा फार मोठा आनंद मिळतो.

मी स्वतः गेली अनेक वर्षं म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून नियमितपणे चालते. औरंगाबादच्या आमच्या घरापासून विद्यापीठ साधारण ६ किलोमीटर दूर होतं. मी अनेकदा एकटी मजेत चालत यायचे. लग्नानंतर साधारण २००० च्या सुमाराला निरंजनला कोलेस्टरॉल डिटेक्ट झालं. त्यानंतर रोज चालायला जायला लागलो. तरी २००३ मध्ये निरंजनची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र आम्ही जीवनशैली फारच बदलली. आता भरपूर चालणं हा आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे.

माझ्या आईच्या माहेरी डायबेटिसची स्ट्राँग हिस्टरी आहे. माझ्यातही ते जीन्स असणारच. होणं न होणं आपल्या हातात नसतं. पण मी तो होणं लांबवू शकते किंवा झालाच तर नियंत्रणात ठेवू शकते. सध्या मी दिवसाला ६-७ किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करते. सकाळी वॉकला निघाल्यावर ५ किलोमीटर आणि जमल्यास परत संध्याकाळी थोडं चालतेच.

टाइप २ मधुमेह होण्यात जंक फूडचा मोठा हात आहे. जंक फूड किंवा फास्ट फूड ही पहिल्या महायुदधानंतर जगाला मिळालेली देणगी आहे. रस्ता प्रवासात पटकन हातात घेऊन खाता येईल अशा पदार्थांचा विचार या काळात केला गेला. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार होता हॅम्बर्गर किंवा बर्गर. नंतर नंतर या प्रकारानं इतका जोर धरला की गेल्या काही वर्षांत जंक फूडचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था सरसावल्या आहेत. मुलांना शाळेच्या डब्यात घरी केलेले पदार्थच द्यावेत. छोट्या सुटीच्या टिफिनमध्ये फळं किंवा काकडी गाजरासारख्या कच्च्या भाज्या द्याव्यात अशी सक्ती अनेक शाळा करताना दिसतात.

फास्ट फूड डे हा खरंतर आपल्या आवडीचं फास्ट फूड खाऊन साजरा केला जातो. पण आपण असं करायला काय हरकत आहे की या दिवसाचं स्मरण म्हणून महिन्यातल्या फक्त दर १६ तारखेला आपल्या आवडीचं फास्ट फूड खायचं पण इतर दिवशी मात्र सकस, आरोग्यदायी अन्न खायचं. फास्ट फूडमध्ये काय काय येतं? तर फास्ट फूडमध्ये बर्गर, चिप्स, वेफर्स, नूडल्स असे पदार्थ येतात.

घरी स्वयंपाक केला तर आपल्या सोयीनं आपण या पदार्थांमध्ये काही बदल करून ते जास्तीत जास्त आरोग्यदायी बनवू शकतो. जसं की पावभाजी करताना खूप जास्त बटाटा घालण्याऐवजी त्यात फ्लॉवर, वाटाणा, टोमॅटोबरोबर थोडं गाजर-फरसबी अशा भाज्या वापरू शकतो. मॅश केल्यानं आणि पावभाजी मसाल्याच्या स्वादामुळे या भाज्या वापरल्याचं लक्षातही येत नाही. किंवा नूडल्स करताना नूडल्सच्या बरोबरीनं भाज्या घातल्या तर ते मस्तच लागतात. मॅगीसारखे रेडीमेड मसाले असलेले नूडल्स वापरण्याऐवजी जर तुम्ही साधे नूडल्स विकत आणले आणि त्यात भाज्या घातल्यात तर उत्तम नूडल्स होतात. तसंच पास्ता करतानाही त्यात ब्रोकोली,फ्लॉवर,गाजर,कॉर्न,मश्रूम्स अशा भरपूर भाज्या घातल्यात आणि वर चीज घातलंत, व्हाईट सॉससाठी मैद्याऐवजी कणीक वापरलीत तर पास्ता छानच बनतो. रेडीमेड सॉसऐवजी घरी टोमॅटो सॉस करून पिझ्झा बनवलात, त्यावर सिमला मिरची, बेबीकॉर्न, टोमॅटो, ऑलिव्ह घातलेत, वरून चीज घालून तो साध्या तव्यावर खरपूस भाजलात तर उत्तम पिझ्झा होतो.

नेहमी जर असं केलंत तर सिनेमाला गेल्यावर एखादा समोसा खाल्लात किंवा एखादं लहान फ्राइजचं पॅकेट खाल्लंत तर काहीच हरकत नाही.

रोजचा आहार आरोग्यदायी करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं?

रोज साधा पण ताजा स्वयंपाक करा. जेवणात भरपूर भाज्यांचा, कडधान्यांचा, डाळींचा, वेगवेगळ्या धान्यांचा वापर करा. जसं की जेवणाआधी एखादी काकडी-गाजर खाण्याची सवय लावून घ्या. (मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांना विचारून गाजर, बीट, कॉर्न खावं). रोजच्या दोन जेवणांपैकी एका जेवणात तरी उसळ ठेवाच. प्रत्येक जेवणात ताजी कोशिंबीर किंवा सॅलड ठेवाच. कोशिंबीर नेहमी ताजीच खा. उरली तर सरळ फेकून द्या. कच्च्या अन्नात जीवाणूंची वाढ लवकर होते त्यामुळे कधीही कच्चे पदार्थ जास्त वेळ ठेवू नका. आहारात आंबवलेले पदार्थ वापरा. इडली, डोसे करताना जास्त डाळी वापरा. गव्हाबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा धान्यांचा वापर करा. रोज किमान २-३ फळं चोथ्यासकट खा. फळांचे रस पिऊ नका. मधुमेह असलेल्यांनी आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्षं अशी फळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा. जेवणात दूध-दही-ताक यांचा समावेश करा. मांसाहारी पदार्थ करताना तेलाचा कमीत कमी वापर करा. शक्यतो बेकिंग, स्टीमिंग अशा पद्धती वापरा. पारंपरिक माशांची आमटी, पारंपरिक चिकन रस्सा करायला हरकत नाही. मटन, बीफ, पोर्क हे प्रमाणात, कधीतरीच खा.  गोड पदार्थ रोज खाऊ नका. विकतचे तर खाऊच नका. गोड पदार्थांचं तसंच जंक पदार्थांचं व्यसन लागू शकतं.  गोड फारच खावंसं वाटलं तर घरी केलेले खीर, गाजर हलवा, दुधी हलवा, श्रीखंड असे पदार्थ खा, पण तेही प्रमाणात खा. आईस्क्रीम, केक्स, पुडिंग असे पदार्थ क्वचितच खा. फार गोड खावंसं वाटलं तर खजूर, जर्दाळू, बेदाणे, मनुका असं काहीतरी खा.

पण जर एकदा मधुमेह झाला आणि तुम्ही तो नियंत्रणात ठेवला नाही तर मात्र तुमचं आयुष्य कठीण होतं. मधुमेह किडनी, डोळे, मज्जासंस्था यावर मोठा परिणाम करतो. त्यामुळे चाळीशीनंतर दर सहा महिन्यांनी मधुमेह तपासणी करायलाच हवी. ज्यांच्या घरात मधुमेहाची स्ट्राँग हिस्टरी आहे त्यांनी तर पंचविशीपासून तपासणी करावी. ही तपासणी अगदी स्वस्तात होते.

मधुमेह टाळायचा असेल किंवा नियंत्रित ठेवायचा असेल तर सक्रिय जीवनशैली, सकस आहार आणि पूरक व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. तो करणं अजिबात अवघड नाही हे स्वानुभवानं सांगते फक्त मनाचा निग्रह मात्र हवा.

मी आहारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञ नाही. हे मी सगळं कॉमन सेन्समधून लिहिलेलं आहे. ज्यांना कुठल्याही शारिरीक समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका. या लेखातल्या मधुमेहाबद्दलच्या माहितीचा संदर्भ – विकीपीडिया

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #हेल्दीजीवनशैली #अन्नहेचपूर्णब्रह्म #साधीजीवनशैली #simpleliving #healthyliving #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

 

डाएटसाठी चालतील असे पदार्थ

15036719_615172132022843_1362274204576290416_n

मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई केली आहे. त्यातले निदान २-३ किलो कमी करावेत असा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी नियमितपणे, व्यवस्थित खाते आहे.

डाएटिंग करताना पाळण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीच क्रॅश डाएट करू नये. वजन खूप जास्त असेल आणि ते मनापासून कमी करण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही उत्तम. याचं कारण मनानं केलेल्या, इंटरनेटवर वाचून केलेल्या डाएटमुळे शरीराची हानी होण्याची शक्यता असते. शास्त्रशुद्ध माहिती नसताना आहारातून काही पदार्थ वगळले तर डेफिशिअन्सी होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचाच सल्ला घ्या. मी जे डाएट करते आहे ते मी फार विचारपूर्वक करते आहे. शिवाय मला फारसं वजन कमी करायचं नाहीये तर हेल्दी खायचं आहे. त्यामुळे मी इथे जे डाएट शेअर करते ते संदर्भासाठी वापरा. त्यात आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या शारीरिक समस्यांनुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करा.
प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगळी असते, प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात त्यामुळे सरसकट कुठलेच नियम सगळ्यांना लागू होत नाहीत.
आजची जी पोस्ट आहे त्यात मी काही हेल्दी रेसिपीज शेअर करणार आहे. गेल्या आठवड्याभरात मी जे पदार्थ खाते आहे त्यातल्या काही पदार्थांच्या अगदी सोप्या रेसिपीज शेअर करणार आहे.

चटपटे हरभरे किंवा चणे
साहित्य – १ वाटी भिजवून मऊ शिजवलेले हरभरे (हरभरे शिजवून त्यातलं पाणी गाळून घ्या. ते सूप किंवा आमटीत वापरा), १ लहान कांदा बारीक चिरलेला, १ लहान टोमॅटो बारीक चिरलेला, १-२ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार
कृती – हरभरे फ्रीजमध्ये मस्त थंड करा. त्यात सगळं साहित्य घाला. लगेचच खा.

15027563_615171985356191_1767573786615262550_n

कोबी आणि पपनस कोशिंबीर
साहित्य – २ वाट्या लांब पातळ चिरलेला कोबी, १ वाटी सोललेलं पपनस, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून जाड भरडलेले मिरी दाणे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15027976_612960678910655_3948258700166116713_n

मूग-काकडी-डाळिंब सॅलड
साहित्य – प्रत्येकी १ वाटी मूग आणि मध्यम आकारात चिरलेली काकडी, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडासा लिंबाचा रस
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15107370_615172068689516_8505055392683547100_n

कुरमु-यांचा साधा चिवडा
साहित्य – पाव किलो कुरमुरे, अर्धी वाटी डाळं, हवे असल्यास अर्धी वाटी शेंगदाणे, भरपूर बारीक चिरलेला कढीपत्ता, २ टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या (ऐच्छिक), मोहरी-हिंग-हळद
कृती – कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घाला. त्यातच दाणे घाला. सतत हलवत परता. लाल होत आले की त्यात डाळं घाला. डाळं लाल झालं की त्यात लसूण घालून लाल करा. नंतर त्यात कढीपत्ता घाला, हळद-तिखट-मीठ घाला. चांगलं हलवा आणि कुरमुरे घाला. व्यवस्थित एकत्र करा. गॅस बंद करा.

15094450_615172215356168_6926909106747496070_n

पुदिना पराठा आणि पुदिना चटणी
पराठा साहित्य – १ ते दीड वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, १ मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला, २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, २-३ वाट्या कणीक, भाजण्यासाठी साजूक तूप, नसेल तर तेलही चालेल.
कृती – पुदिन्याची पानं, कांदा, मिरची आणि मीठ एकत्र करा. चांगलं मिसळलं की त्याला थोडं पाणी सुटेल. त्यात कणीक घाला. घट्ट मळून घ्या. नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडी घट्ट भिजवा. नेहमीसारखा पराठा लाटा. तव्यावर थोडंसं तूप लावून खमंग भाजा.
चटणी साहित्य – १ मध्यम आकाराची पुदिन्याची जुडी, त्याच्या अर्धी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार
कृती – पुदिना आणि कोथिंबीर निवडून, धुवून, नीट निथळून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरवर बारीक चटणी वाटा.
पराठा आणि चटणी खा.

15085531_615172092022847_8443951495275013912_n

पालक-बाजरी-नाचणी भाकरी
साहित्य – अर्धी जुडी पालक (निवडून, धुवून पाण्यात अर्धवट शिजवून घ्या. नंतर निथळा.), २ हिरव्या मिरच्या, ३-४ पाकळ्या लसूण, अंदाजे १ वाटी बाजरी आणि १ वाटी नाचणीचं पीठ (अंदाजे यासाठी की पालकाच्या मिश्रणात मावेल तसं पीठ घाला. बाजरी आणि नाचणी समप्रमाणात किंवा आवडीनुसार कमीजास्त करा.), किंचित मीठ
कृती – शिजवलेला पालक, मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात मावेल तसं पीठ घाला, चवीला किंचित मीठ घाला. पीठ चांगलं मळून नेहमीसारखी भाकरी करा. इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या ३-४ भाक-या होतात.

कांद्याच्या पातीचा घोळाणा
साहित्य – १ लहान जुडी कांद्याची पात (धुवून, कोरडी करून मध्यम आकारात चिरलेली, हवा असल्यास पातीचा कांदाही बारीक चिरा.) २ टीस्पून दाण्याचं कूट, अर्धा टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून तेल
कृती – चिरलेली कांद्याची पात आणि इतर साहित्य एकत्र करा. आवडत असल्यास लिंबाचा रस आणि साखरही घालू शकता.

15078638_615172168689506_7722971918702105799_n

हे पदार्थ करायला अतिशय सोपे आहेत. चवदार लागतात, करायला अतिशय कमी वेळ लागतो.

काही सोप्या टीप्स लक्षात ठेवा. हा कॉमन सेन्स आहे. जर नाश्त्याला पराठे, पोळी, भाकरी किंवा मिश्र पिठांची धिरडी असं खाल्लंत तर जेवताना उसळ किंवा घट्ट वरण खाच. मांसाहार करत असाल तर मासे आणि चिकन, अंडी खाऊ शकता. रोजच्या स्वयंपाकात एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य, एक डाळ वापराच. मांसाहारी असाल तर अर्थातच चिकन किंवा मासे. रेड मीट आणि शेलफिश (कोलंबी, कालवं, तिस-या) नेहमी खाऊ नये असं डॉक्टर सांगतात म्हणून मटन आणि शेलफिश क्वचित खा.

मला कुणीतरी प्रश्न विचारला होता की दुपारच्या जेवणात पोळी खाल्ली नाही तर अशक्तपणा येणार नाही का? तर त्या दिवशी मी नाश्त्याला २ पोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे जेवताना सॅलड, उसळ आणि ताक इतकं मला पुरे होतं. मी भातही पूर्ण बंद केलेला नाही. कारण मला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. पण तो मी अगदी कमी म्हणजे फक्त एक वाटी खाते. काल रात्री मी एक वाटीभर चण्याचं सॅलड आणि एक मोठा बोल पालकाचं सूप घेतलं तर तेवढं मला पुरेसं होतं. रात्री मी एक संत्रं आणि ३ मोठे खजूर खाल्ले.

हेल्दी राहाण्यासाठी भुकेलं राहू नका. पण भरमसाठ खाऊही नका. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका. फळं, भाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स, पनीर, प्रमाणात सुकामेवा, तेलबिया (शेंगदाणे, तीळ, सूर्यफूल), कडधान्यं, डाळी हे जास्त खा. ब्रेड, भाकरी, पोळी, भात हे कमी प्रमाणात खा पण पूर्ण बंदही करू नका. साखर आणि तेल (तूप, बटर, लोणी हेही) खूप कमी करा.
कायम मन मारून खाणं अशक्य आहे. अगदी कुठल्याही वयात अवघड आहे. त्यामुळे मध्यम मार्ग स्विकारणं हे सगळ्यात उत्तम. सगळं खा पण प्रमाणात खा. प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाला पर्याय नाही. आठवड्यातून ५-६ दिवस व्यायाम कराच. मी आठवड्यातून ६ दिवस ४५ मिनिटं चालते आणि आठवड्यातून ३ दिवस १ तास योगासनं करते. व्यायाम हवाच हवा हे लक्षात घ्या.

So Happy Reading, happy Eating, Happy exercising!

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#happyhealth #Healthiswealth #Healthyeating #dietplan #Mumbaimasala#हेल्दीखादेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #Exerciseisamust

सायली राजाध्यक्ष

सूपचे काही प्रकार

14993370_612464228960300_4991316405437148323_n

सध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं सांगायचं तर सूपला अशी काही खास रेसिपी नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांची काँबिनेशन्स करून चवीला चांगली सूप्स बनवता येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज घातले की चवही बदलते. मीठ-मिरपूड तर आपण नेहमीच घालतो. कधी त्यात चिली फ्लेक्स आणि लिंबाचा रस घाला. कधी थाइम-रोझमेरी असे हर्ब्ज मिळतात ते घाला. कधी वरून थोडंसं चीज नाहीतर पनीर किसून घाला. कधी थोडी जिरेपूड घालून बघा. कधी वरून थोडे उकडलेले नूडल्स घाला. कधी थोडा पास्ता घालून सूप करून बघा. कधी थोडा बारीक चिरलेला लसूण आणि मिरची घालून बघा. कधी वरून अर्धा लहान चमचा साय किंवा बटर घाला किंवा घरचं लोणी घाला. मी बहुतेक सगळ्या सूप्समध्ये थोडंसं दूध घालतेच. त्यानं सूपला छान क्रिमी अशी चव येते. कुठल्याही सूपला उकळी आल्यावर गॅस बारीक करून दूध घालायचं आणि मग बारीक गॅसवर एक उकळी काढायची, दूध नासत नाही. शेवटी काय तर आपल्या चवीनुसार प्रयोग करत गेलात की काहीतरी मस्त चवीचं सापडतंच सापडतं.

सूप प्यायला देताना कधी त्याबरोबर ब्रेडस्टिक तर कधी चीजचा लहानसा तुकडा तर कधी ब्रेडचे क्रुताँ, कधी होल व्हीट ब्रेडचा गरमागरम तुकडा असं काही दिलंत तर सूपची अजून मजा येते.

काही सूप्स

साधं टोमॅटो सूप – ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर
कृती – टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र करून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरला वाटून, गाळून घ्या. उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि दूध, साखर घालून मंद गॅसवर उकळा.

क्रीम ऑफ टोमॅटो – ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून त्यात मीठ-मिरपूड घाला आणि मंद आचेवर उकळा.
टोमॅटो-गाजर सूप – २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.

टोमॅटो-कॉर्न सूप – १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
कृती – लोण्यावर कांदा परता, नंतर टोमॅटो घाला. परत परता. आता त्यात कॉर्न दाणे घाला. नीट एकत्र करून घ्या. कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. गाळून घ्या. त्यात दूध आणि मीठ घालून उकळा. वरून कांद्याची पात घाला.

फ्लॉवर-सेलरी सूप – २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती – एका लहान कुकरमध्ये लोणी गरम करा. त्यावर कांदा घालून पारदर्शक होऊ द्या. नंतर त्यात फ्लॉवरचे तुरे घालून जरासं परता. त्यात दूध आणि अर्धा कप पाणी घाला. कुकरचं झाकण लावून शिटी काढा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. गाळायची गरज नाही. त्यात मीठ आणि मिरपूड घालून उकळा. सेलरी घाला आणि मंद गॅसवर ५ मिनिटं उकळा.
याच पद्धतीनं ब्रॉकोलीचंही सूप करता येतं.

पालक सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार
कृती – पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवून घ्या. पाण्यासकट थंड करा आणि मिक्सरला वाटून घ्या. गाळू नका. त्यात दूध घालून मंद आचेवर उकळा. मीठ-मिरपूड घाला.

पालकाचं मिक्स सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. मीठ-मिरपूड-दूध घालून उकळी काढा.

लाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप – अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध
कृती – लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली उकळी काढा.

मश्रूम सूप – १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार
कृती – १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. जरासं परतून त्यात कपभर पाणी घालून शिजवा. थंड करून मिक्सरला वाटून घ्या. १ टीस्पून बटरवर कणीक भाजा. खमंग वास आला की त्यात हळूहळू दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हा सॉस मश्रूमच्या मिश्रणात ओता. मीठ-मिरपूड घाला. उकळा.

चिकन सूप – १ मोठा कप सूपसाठी मिळतात ते चिकनचे तुकडे , १ कांदा उभा पातळ चिरून, प्रत्येकी २ लवंगा-मिरी दाणे, १ तमालपत्र, १ अगदी लहान दालचिनीचा तुकडा, १ टीस्पून तेल, मीठ
कृती – लहान कुकरला तेलावर खडा मसाला घाला. त्यावर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात चिकनचे तुकडे घाला. २ कप पाणी घाला. मीठ घाला. कुकरचं झाकण लावून एक शिटी करा. गरमागरम प्यायला द्या.
याच सूपमध्ये आपल्या आवडीच्या भाज्याही घालता येतील

मुगाचं सूप – पाव वाटी मूग, १ कांदा, १ लसणाची पाकळी, १ कप पाणी, मीठ, वरून घालायला थोडंसं लोणी
कृती – कुकरला मूग, कांदा, लसूण एकत्र करून शिजवा. मिक्सरला वाटून घ्या. मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला द्या. पाण्याचं प्रमाण आवडीनुसार वाढवा.
याच पद्धतीनं मसूर डाळीचंही सूप करता येईल.

उकडशेंगोळ्याचं सूप – १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं
कृती – लहान कुकरमध्ये तेलावर जिरं घाला. तडतडलं की लसूण पाकळ्या ठेचून घाला. त्या चांगल्या लाल होऊ द्या. त्यावर हिंग-हळद-तिखट घाला. लगेचच पाणी ओता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. एका वाटीत तिन्ही पिठं घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून चांगलं कालवा. हे कालवलेलं पीठ उकळत्या पाण्यात घाला. त्यात मीठ घाला. झाकण लावून ५ मिनिटं मंद आचेवर ठेवा.
आजारी माणूस नसेल तर तिखटाचं प्रमाण वाढवा.
काही सारांचे प्रकार

टोमॅटोचं सार – २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास वरून घालायला थोडी कोथिंबीर
कृती – तुपाची जिरं घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग घाला. टोमॅटोचा रस घाला. मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत उकळा. टोमॅटो अर्धवट शिजला की अर्धा कप पाणी घाला. पूर्ण शिजू द्या. नंतर त्यात मीठ, साखर, नारळाचं दूध घाला. मंद आचेवर उकळा. वरून कोथिंबीर घाला.

15036418_612463435627046_5442444215290894429_n

 

टोमॅटोचं सार २ – २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी
कृती – तूप गरम करा. जिरं घालून तडतडलं की त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. मिनिटभर परतून टोमॅटोचा रस घाला. उकळी आली की पाणी घालून मंद आचेवर शिजवा. शिजत आलं की त्यात तिखट, मीठ, साखर आणि तिळाचा कूट घाला. चांगलं उकळा.

कोकम सार – ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
कृती – आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून रस काढा. गाळून घ्या. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की कढीपत्ता आणि हिंग घाला. हवी असल्यास मिरची घाला. त्यावर हे आमसूलाचं पाणी घाला. त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला. उकळा. मीठ-साखर घाला. परत उकळा. पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानं वाढवा.

मठ्ठा – अगदी गोड ताक ३ वाट्या, १ टीस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून आलं-मिरची वाटण, साखर-मीठ चवीनुसार, १ टीस्पून साजूक तूप, २ चिमूट हिंग
कृती – ताकाला आलं-मिरचीचं वाटण लावा. त्यात साखर-मीठ घाला. साजूक तुपाची फोडणी करा. जिरं, हिंग, कढीपत्ता घाला. ही फोडणी ताकावर ओता. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

खिमट – खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की.
साहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ चवीनुसार, १ कप पाणी
कृती – लहान कुकरला सगळं साहित्य एकत्र करा. मंद गॅसवर ५-७ मिनिटं ठेवा. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवा.

हल्ली फिलिप्सचा सूपमेकर मिळतो. त्यात पंधरावीस मिनिटांत उत्तम सूप्स होतात असं म्हणतात. मी तो लवकरच घेणार आहे. घेतल्यावर त्याबद्दल लिहीनच.

या पेजवरची ही तसंच इतर सर्व पोस्ट्स www.shecooksathome.com या माझ्या ब्लॉगवरही बघता येतील. सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#soups #Healthiswealth #dietplan #Mumbaimasala #अन्नहेचपूर्णब्रह्म#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #सूप्स #सूप

सायली राजाध्यक्ष

हेल्थ इज वेल्थ

15027976_612960678910655_3948258700166116713_n

कशी झाली सगळ्यांची दिवाळी? मस्तच झाली असेल ना? माझीही दिवाळी मस्त झाली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचा सहवास, खुसखुशीत फराळ, खूपसे दिवाळी अंक, शांतपणे तेवत असलेले भरपूर दिवे, दारात छानशी रांगोळी, उत्तम खाणं-पिणं आणि मुख्य म्हणजे सगळे ताणतणाव दूर सारून निवांत होणं हे सगळं म्हणजेच माझ्यासाठी दिवाळी. आणि हे सगळं मी छानपैकी अनुभवलं.
त्याआधी महिनाभर अंकाची खूप गडबड होती. रात्रंदिवस काम होतं. त्यामुळे कायम कॉम्प्युटरला चिकटलेले होते. यावर्षी दिवाळीचा फराळही माझ्या कामवाल्या मुलींनीच केला. पण नंतर दिवाळीच्या आदल्या दिवशी मी खूपशी फुलं आणली, ती छान लावून ठेवली, घरभर पणत्या ठेवल्या, खिडक्यांमध्ये आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा लावल्या आणि वातावरणच बदलून गेलं. एकदम प्रसन्न वाटायला लागलं.
दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड खाणं झालंय. चकल्या, बेसनाचे लाडू आणि येताजाता चिवडा सुरूच होतं. शिवाय वर्षभरात जे तळलेलं फारसं केलं जातं नाही तेही खाल्लं. म्हणजे एक दिवस वडा सांबार झालं, अळूवड्या झाल्या, दहीवडे झाले. एकूण काय तर जीवाची मौज केली. महिनाभर एकाजागी बसून केलेलं काम, वाढतं वय आणि अरबट चरबट खाणं या सगळ्यामुळे वजन वाढलं आहे. आणि आता ते कमी करायचं आहे. दोन महिन्यात निदान ५ किलो वजन कमी करायचं आहे.

अन्न हेच पूर्णब्रह्मच्या एका मैत्रिणीनं डाएटला चालतील अशा रेसिपीज सुचवायला सांगितलं आहे. मी आहारतज्ज्ञ नाही किंवा या विषयातला माझा अभ्यासही नाही. पण मी जे काही वाचून आणि अनुभवातनं शिकले आहे त्यानुसार मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यायाम आणि तोंडावर ताबा अशा दोन गोष्टी अमलात आणल्या, अर्थात नॉर्मल परिस्थितीत ( म्हणजे थायरॉइड किंवा औषधाचे दुष्परिणाम असतील किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर काहीच करता येत नाही) तर वजन कमी करता येतंच. त्यामुळे मी आजपासून थोडंसं डाएट करणार आहे. ४५ मिनिटं वॉक तर रोज घेतेच, पण जमल्यास संध्याकाळीही ३० मिनिटं चालण्याचा प्रयत्न करणार आहे.

मी माझ्या डाएटमध्ये काय करणार आहे? –
१) तळलेले आणि गोड पदार्थ बंद करणार आहे. रोज किमान ७-८ मोठे ग्लास पाणी पिणार आहे.
२) रोज निदान ३ फळं खाणार आहे. रोज निदान २ काकड्या आणि २ गाजरं कच्ची खाणार आहे.
३) रात्रीच्या जेवणात एक मोठा बोलभर सूप रोज घेणार आहे.
४) रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण संपवणार आहे.
५) सकाळच्या जेवणात १ मोठी पोळी आणि भरपूर भाज्या, कोशिंबीर आणि डाळ किंवा उसळ खाणार आहे. हे सगळं बनवण्यासाठी कमीतकमी तेलाचा वापर करणार आहे.
६) भरपूर नाश्ता, मध्यम जेवण आणि पुरेसं रात्रीचं जेवण असं घेणार आहे.
७) रोज निदान १ तास चालण्याचा प्रयत्न करणार आहे. आठवड्यातून तीनदा योगासनांना जाणार आहे (योगासनांनी वजन कमी होत नाही. फक्त स्ट्रेचिंग,बेंडिंग आणि टोनिंग होतं.)
८) आठवड्यातून फार तर फार एकदाच बाहेर खाणार आहे, शक्यतो न खाण्याचा प्रयत्न करणार आहे.
९) मी रोज निदान ७ तास झोपतेच. ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करणार आहे.
१०) आणि तुम्हाला वेळोवेळी याचा फीडबॅक देणार आहे, म्हणजे माझ्यावरही तुमचा वचक राहील.

तुमच्यापैकी कुणाला हे फॉलो करायचं असेल तर यात त्रास होईल असं काहीही नाहीये. फक्त तुम्हाला डायबेटिस किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.

चला तर मग आजपासून पुढचे दोन महिने हेल्दी होण्याचा प्रयत्न करूया. याचा अर्थ आपलं मन मारून सगळं करा असा अजिबात नाही. कधीतरी आपल्या मनासारखं खायला काहीच हरकत नाही. फक्त ते खाताना किती प्रमाणात आणि किती वेळा खातोय याचा विचार मात्र करा. माझ्या एकूण हेल्थ प्लॅनबद्दल मी आठवड्यातून एकदा लिहिणार आहे आणि एकदा नेहमीची पोस्ट करणार आहे. हेल्थ प्लॅनच्या पोस्टमध्ये मी एखादी हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. आवडेल का तुम्हाला असं? जरूर कळवा.

#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्दीडाएट #अन्नहेचपूर्णब्रह्मडाएट #मुंबईमसाला #Healthiswealth#Mumbaimasala #हेल्थरेसिपीज #हेल्दीरेसिपीज

सायली राजाध्यक्ष

स्वयंपाकघर आवरणं

14322206_587364771470246_4133751162132985495_n

आपण घर रोज कितीही नीटनेटकं, स्वच्छ ठेवत असू तरी घरात नको असलेल्या गोष्टींची संख्या वाढत जातेच. आणि कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला त्यांचं ओझं व्हायला लागतं आणि त्या गोष्टी काढून टाकून घराला मोकळा श्वास घ्यायला देणं आवश्यक आहे असं वाटायला लागतं. निदान मला तरी असं होतं. याचं कारण असं आहे की मला कुठलाच कचरा, पसारा सहन होत नाही. म्हणजे अगदी मोबाइलवरचे बिनकामाचे मेसेज असोत, व्हॉट्सएपवरचे भरमसाठ कचरा मेसेज असोत, ज्यांचा नंतर काही उपयोग होणार नाहीये अशा इमेल असोत की घरातल्या नकोशा वस्तू असोत, मला तो कचरा कधी एकदा काढून टाकते असं होतं.
आणि मला जेव्हा असं होतं तेव्हा मला कधी एकदा सगळं आवरतेय असं होतं (मला माहितीये, हा थोडा मानसिक प्रॉब्लेम आहे!) गेले काही दिवस मला असंच होत होतं. म्हणजे रोज घर झाडून-पुसून स्वच्छ होत होतंच. पण गेले २-३ महिने माझ्या कामाच्या मुलींच्या या ना त्या कारणानं खूप सुट्या झाल्या. त्यामुळे घर रोज कसंबसंच आवरलं जात होतं. अनेक गोष्टी तशाच ठेवल्या जात होत्या. शिवाय गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पेंटिंग झालं तेव्हा घर लावताना ब-याच गोष्टी नंतर नीट विचार करून लावू असंही ठरवलं होतं. पण त्यानंतर ते जमलं नव्हतं. तर अशा रितीनं परवा ब-याच काळानंतर घरावर हात फिरवला गेला.
घर आवरताना नेहमी एक एक खोली आवरावी असं मला वाटतं. म्हणजे एक खोली घेतली की तिचा कानाकोपरा आवरल्याशिवाय दुस-या खोलीतला पसारा काढायचा नाही. असं केलं की नीट तर आवरता येतंच पण काहीही बाकी राहात नाही. परवा मी आधी स्वयंपाकघर आवरायला घेतलं. माझ्या स्वयंपाकघराला एक माळा आहे. या माळ्यावर मी फारसा कचरा ठेवतच नाही. ज्या गोष्टी ३ महिन्यांहून अधिक काळ वापरल्या जात नाहीत (छत्र्या, हिवाळी कपडे अशा गोष्टी वगळता) त्या कधीच वापरल्या जात नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे अशा गोष्टींना माझ्या घरात स्थान नाही. पण माझ्याकडे काम करणा-या राणी आणि रंजना यांना ते मान्य नाहीये. त्यामुळे कितीही सांगितलं तरी हळूच माझा डोळा चुकवून त्या कधीतरी लागतील म्हणून प्लॅस्टिकचे डबे, कंटेनर्स यासारख्या गोष्टी माळ्यावर सरकवत असतात. शिवाय समजा मी नवीन नॉनस्टिक पॅन किंवा तवे आणले आणि जुने फेकून द्या म्हटलं तर तेही माळ्यावर चढतात. नाहीतर एरवी या माळ्यावर पावसाळ्यात लागतो तो कपड्यांचा स्टँड, कुणी आलं तर लागणारं एक फोल्डिंग टेबल, जास्त लोकांच्या स्वयंपाकासाठी लागणारी मोठी पातेली, दिवाळीत लागणारे हँगिंग दिवे, एक मातीची उरळी (फुलं ठेवतो ते पात्र) आणि डिस्पोजेबल प्लेट्स, पेले, वाट्या असं ठेवलेलं असतं.
परवा जेव्हा माळा काढला तेव्हा अर्थातच आमच्या दोन्ही तायांनी खूप पसारा केलेला होता. तो सगळा आवरलाच. शिवाय नको असलेल्या ज्या अनेक गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या त्या काढून टाकल्या. माझं फ्रीज बदलून ६ महिने झाले. जुन्या फ्रीजची दोन स्टॅबलायझर्स यांनी अजूनही माळ्यावर ठेवलेली होती. आमच्याकडे ४-५ वर्षांपूर्वी पाण्याचा प्रॉब्लेम होत होता. तेव्हा एक प्लॅस्टिकचा एक लहान ड्रम घेतलेला होता. तो चांगला होता पण त्याची गेल्या ३ वर्षांत गरज लागली नव्हती. तो काढून टाकला. कारण पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर तो फारसा महाग नसल्यामुळे नवीन विकत घेता येऊ शकतो. माळ्यावर पांढ-या टाइल्स लावलेल्या असल्यामुळे माळा स्वच्छच असतो. एकदा झाडून, स्वच्छ पुसला की मस्त दिसतो.
त्यानंतर कपाटं लावायला घेतली. किचनमधली कपाटं वर्षातून निदान चारदा व्यवस्थित आवरायलाच हवीत. याचं कारण अनेक खाद्यपदार्थ असे असतात की जे लवकर खराब होतात. विशेषतः मुंबईसारख्या हवेत तर होतातच. शिवाय रेडीमेड मसाले, सॉस यांनाही एक्सापरी डेट्स असतात. त्यामुळे त्यावरही लक्ष ठेवायला लागतं. मी वर म्हटलं तसं गेल्या वर्षी पेंटिंग झाल्यावर मी जशी जमतील तशी कपाटं लावली होती. ती नीट लावण्याची आत्यंतिक गरज होती.
माझ्याकडे नेहमी लोक जेवायला असतात. त्यामुळे मला भरपूर क्रॉकरी आणि कटलरी लागते. फार जरी बघितलं नाही तरी अगदी देशी जेवण करायचं ठरवलं तर स्टीलचीच ताटं बरी वाटतात. म्हणून जास्तीची स्टीलची ताटं-वाट्या तर माझ्याकडे आहेतच. शिवाय एकावेळेला ४०-५० माणसं जेवू शकतील इतके सर्व्हिंग बोल्स, प्लेट्स, क्वार्टर प्लेट्स, चमचे, काटे आहेत. व्हिस्की, रेड वाईन, व्हाइट वाइन यासारख्या पेयांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास लागतात. तर तेही निदान ६ च्या सेटमध्ये माझ्याकडे आहेत. ते तितके पुरतात. कारण येणारे सगळेच एकाच प्रकारचं ड्रिंक घेणारे नसतात. आणि जास्त लागलेच तर कॉलनीतल्या मैत्रिणी आहेतच.
जास्तीचे जे काटे-चमचे लागतात ते मी प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये ठेवते. शिवाय जास्तीच्या सु-या, सालकाढणी, बॉटल ओपनर्स, करंजी कातणं, करंजीचा मोल्ड अशासारख्या गोष्टी दुस-या डब्यात ठेवते. प्लॅस्टिकच्या एका ट्रेमध्ये पार्टीसाठी जे सर्व्हिंग स्पून्स लागतात ते ठेवते. माझ्या मुलीला बेकिंग करायला आवडतं आणि मला अजिबात आवडत नाही. तर तिचं जे सामान आहे म्हणजे कपकेकचे वेगवेगळे साचे किंवा सिलिकॉन मोल्ड हे सगळं आणखी एका डब्यात एकत्र करून ठेवते. आणखी एका प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये फिंगर फूड (आपण जे स्टार्टर्स करतो ते) खाण्यासाठी लागणा-या टूथपिकसारख्या स्टीक्स, डिस्पोजेबल चॉपस्टिक्स, कुणी लहान मुलं आली तर लागणारे स्ट्रॉ, त्यांच्या ड्रिंकला मजा म्हणून लावायला लहानशा कागदी छत्र्या असं सगळं ठेवलेलं असतं. अशा गोष्टी मोठ्या डब्यात किंवा ट्रेमध्ये ठेवल्यानं पसारा तर कमी होतोच. पण आपल्याला हव्या त्या गोष्टी एका जागेवर मिळतात.


ज्या गोष्टी क्वचित लागतात पण लागतातच अशा म्हणजे मैद्याची चाळणी, पुरणयंत्र, चकली पात्र या सगळ्या एकत्र ठेवलेल्या असतात. दिवाळीचा फराळ करतानाच त्यांचा वापर होतो. त्याच्या बाजूलाच मी वर उल्लेख केलेले प्लॅस्टिकचे डबे ठेवते. त्याच्याबाजूला मायक्रोवेव्ह ओव्हनला लागणा-या जाळ्या असतात. मी मागेही लिहिलं होतं की आपल्या स्वयंपाकघरातून प्लॅस्टिकच्या वस्तू हद्दपार झाल्या पाहिजेत. विशेषतः खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर केला पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे बहुतांश बरण्या काचेच्या आहेत. विकत आणलेल्या ब-याच आहेत. बरोबर ऑलिव्हच्या बरण्या (या आकारानं उभट असतात, त्यामुळे फ्रीजरला चिंचेची चटणी स्टोअर करायला उत्तम असतात), कॉफीच्या रिकाम्या बरण्या (चिंचेचा कोळ ठेवायला वापरता येतात. कारण आकार उभट असतो.) हेही मी वापरते. शिवाय रेडीमेड लोणची, जॅम यांच्या बरण्या कुणाला काही द्यायचं असेल तर चांगल्या म्हणून त्या ठेवते. कारण कुणाला खाद्यपदार्थ देताना प्लॅस्टिक का द्यायचं? या बरण्यांच्या बाजूला स्टीलची जास्तीची ताटं आणि वाट्या ठेवते. शिवाय दोन इडली स्टँड्स आहेत तेही ठेवते.
त्याच्या कालच्या कप्प्यात जास्तीच्या मसाल्यांची पाकिटं, झिपलॉकच्या पिशव्या (मी त्यात काहीही स्टोअर करत नाही. फक्त कुणाला काही द्यायचं असेल तरच त्यांचा वापर होतो. किंवा क्वचित प्रसंगी मटार सोलून फ्रीजरला टाकायचे असतील तरच) असतात. त्याच्या खाली रोजचे लागणारे मसाले म्हणजे हळद, तिखट, जिरं, मोहरी, ओवा, मेथी दाणे, मासे तळायला लागणारं रवा-तांदळाच्या पिठाचं मिश्रण, आमसूलं असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात सर्व कडधान्यं, पोहे, रवा, सुक्या मिरच्या, साबुदाणा, शेंगदाणे, तूर डाळ वगळता इतर डाळी, बेसन, तांदळाचं पीठ यासारख्या गोष्टी ठेवलेल्या असतात. बाजूच्या मोठ्या कप्प्यात स्टीलच्या मोठ्या डब्यांत वाळवणाचे पदार्थ म्हणजे शेवया, पापड, पापड्या, खारवड्या असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात स्वयंपाक करताना अगदी हाताशी लागणारी उपकरणं जसं की खूप जास्त कांदा चिरायचा असेल तर लागणारं चॉपर, मिरच्या किंवा लसूण बारीक करायला लागणारं चिली चॉपर, सुक्यामेव्याचे तुकडे करायला लागणारं नट चॉपर, एक मध्यम आकाराचा खलबत्ता असं ठेवलेलं असतं.


दुस-या ओट्यावरच्या कपाटात नॉनस्टिकची रोज न लागणारी मोठी भांडी, तवे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रे, मोठे सर्व्हिंग बोल्स असं ठेवलेलं असतं. त्याच्या खालच्या कप्प्यात रोजचं जेवण काढायला लागणारी काचेची भांडी, इडली-सांबार किंवा वडा-सांबार किंवा बिसीबेळे भातासारखे प्रकार खायला वापरले जाणारे बोल्स ठेवलेले असतात. सगळ्यात खालच्या कप्प्यात इटालियन हर्ब्ज, पास्ता सिझनिंग, ओरिगामो, रोझमेरी, थाइम यासारखे मसाले, सोया सॉस-चिली सॉस, व्हिनेगर असे सॉस ठेवलेले असतात. शिवाय हँड मिक्सर ठेवलेलं असतं. सिंकच्या वरती जे शेल्फ आहे तिथे रोज लागणारे कप, ग्लासेस, मग्ज आदी ठेवलेलं असतं.
मी डायनिंग टेबलाजवळ एका कपाटात जेवताना लागणारं लोणचं-चटण्या, मस्टर्ड-टोमॅटो केचप, जॅम-जेली असं ठेवते. शिवाय भडंग, चिवडा, टोस्ट, बिस्किटं असे कोरडे पदार्थ ठेवते. या सगळ्यासाठी काचेच्याच बरण्या वापरते. या कपाटात जास्तीचे कोस्टर, गरम जेवण ठेवण्यासाठी लागणा-या जाळ्या, ऑलिव्ह ऑईल, मध, कॉर्नफ्लेक्स असंही ठेवलेलं असतं. या कपाटाच्या बाजूलाच एक लहानंसं उभं कपाट आहे. जे आधी मुलींच्या खोलीत होतं. ते त्यांना नकोसं झाल्यामुळे ते बाहेर आलं. त्याच्या खालच्या कप्प्याची काच काढून मी त्यात टीव्हीचा व्हूपर ठेवला आहे. तर वरच्या कप्प्यात जास्तीचे बोल्स, मग्ज, कोरडे पदार्थ देण्यासाठी लागणारे बोल्स अशा गोष्टी ठेवल्या आहेत. माझ्या नव-याला वेगवेगळे चहा आवडतात. त्यासाठी कालच मी एक खास कप्पा केला आहे. त्यात वेगवेगळे चहा, माझ्या मैत्रिणीनं शर्मिलानं दिलेलं देखणं चायनीज चहापात्र, आमची मैत्रीण शिरीननं दिलेली खास ब्रिटिश डिझाइनची केटल असं ठेवलं आहे.


आणि हो हे सगळं आवरताना अनेक खराब झालेले मसाले, ज्यांच्या एक्स्पायरी डेट गेल्या होत्या असे मसाले आणि सॉस, कीड लागलेली कडधान्यं (मुंबईत महिनाभरात लागते), फुटके कप, बोल्स, भांडी हे सगळंही काढलं गेलंच. तर अशा रितीनं माझं स्वयंपाकघर मला हवं तसं लागलं. बाकीच्या खोल्या जशा जमतील तशा आवरणार आहेच. तेव्हा त्याचा वृत्तांत पुन्हा कधीतरी.

14332952_587364324803624_8209324156104885761_n

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा. पोस्ट वाचलीत तर लाइकवर क्लिक जरूर करा. मला ब्लॉग स्टॅट्ससाठी ते गरजेचं आहे. आणि पोस्ट आवडली तर कमेंटही जरूर करा!

सायली राजाध्यक्ष

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २

याआधी जी स्वतंत्र पोस्ट लिहिली होती त्यात मी अमृता पाटील आणि मधुरा गद्रे या परदेशातल्या दोन मैत्रिणींनी सुचवल्याप्रमाणे व्हेजिटेरियन स्टार्टर्सबद्दल लिहिलं होतं. परदेशात राहात असताना सगळं स्वतःलाच करायचं असतं, आपल्यासारखी घरकामातली मदत तिथे मिळत नाही. शिवाय भारतीय स्वयंपाकात लागणारे घटक पदार्थ परदेशात सगळीकडे उपलब्ध असतीलच असं नाही. त्यामुळे कमीत कमी घटक पदार्थात काय काय करता येईल असा विचार करून ती पोस्ट लिहिली होती. मधुरानं काही व्हेजिटेरियन पार्टी मेन्यू सुचवायला सांगितले होते. आजची ही पोस्ट त्याबद्दलच.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत जेव्हा माझ्या घरी जेवायला लोक असायचे तेव्हा मी भरमसाठ पदार्थ करत असे. मग त्यात स्टार्टर्स तर भरपूर असायचेच पण त्याबरोबरच मेन कोर्समध्येही भरपूर पदार्थ असायचे. पण नंतर नंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की ड्रिंक असतील तर मेन कोर्स फारसा खाल्ला जात नाही. शिवाय जर स्टार्टर्सही खूप केले असतील तर मेन कोर्समधले पदार्थ हमखास उरतात. म्हणून मी मेन कोर्समध्ये कमी पदार्थ करायला सुरूवात केली. आणि खरं सांगते हा अंदाज बरोबर ठरला. याचं कारण असं आहे की आपण बहुतेकदा लोकांना रात्रीच्या वेळी जेवायला बोलावतो. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लोक साडेआठच्या आधी येत नाहीत. त्यानंतर ड्रिंक घेत, गप्पा मारत बसलो तर जेवायला रात्रीचे साडे अकरा-बारा होतात. त्यावेळी जास्त जेवण जातही नाही. शिवाय आता आमच्या वयाच्या जोडप्यांच्या पार्ट्यांना लहान मुलं नसतातच. लहान मुलं, वाढत्या वयाची मुलं असली तर मग मात्र भरपूर पदार्थ, भरपूर प्रमाणात करावे लागतात.
स्टार्टर्स करताना जर २-३ कोरडे पदार्थ (जसं सुकी भेळ, चिवडा, वेफर्स, चीज स्टीक्स), २ सॅलड्स (त्यातही एखादं सॅलड फक्त भाज्यांचं आणि एखादं कडधान्य वापरून केलेलं), १-२ डिप्स (हमस, दही डिप किंवा तत्सम) आणि बरोबर काकडी-गाजर-मुळा-सेलरी स्टिक्स, १-२ तळलेले पदार्थ (मिश्र डाळींचे वडे, तिखटमिठाच्या पु-या किंवा मिनी बटाटेवडे) असं केलंत तर मग इथेच अर्धं जेवण होतं. मग मेन कोर्समध्ये फार पदार्थ न ठेवता २-३ पदार्थच ठेवलेत तर पुरेसं होतं.
आपल्याला मेन कोर्समध्ये काय काय ठेवता येईल असे काही मेन्यूज बघूया.

१) व्हेज बिर्याणी, कांद्याचं दह्यातलं रायतं, मेथी पराठे किंवा पालक पराठे बरोबर ओल्या खोब-याची चटणी

https://shecooksathome.com/…/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E…/

२) व्हेज पुलाव, दाल फ्राय, बुंदी रायतं, मेथी पराठे किंवा पालक पराठे बरोबर एखादी ओली चटणी (कांद्याची, कैरी-कांद्याची, गाजर-कांद्याची)

https://shecooksathome.com/…/%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%AA%E…/

३) व्हेज धानसाक – ब्राउन राइस, कांदा-काकडी-टोमॅटो कचुंबर, तळलेले पापड

https://shecooksathome.com/…/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E…/

४) मसालेभात (यात मटार भात, वांगी भात, मिश्र भाज्या घालून भात, तोंडली-काजू भात असं काहीही करता येईल), टोमॅटोचं सार, तळलेले पापड, कोथिंबीर पराठे

https://shecooksathome.com/…/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E…/

https://shecooksathome.com/2014/08/25/221/

५) काळ्या वाटाण्यांची आमटी, साधा भात, बटाट्याची सुकी भाजी (काळ्या वाटाण्यांच्या आमटीऐवजी चणा डाळीची आमटी, मुगागाठी (याच पद्धतीनं करतात) असंही करता येईल.)
https://shecooksathome.com/…/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E…/

६) सांबार भात, दही भात (दहीबुत्ती), तळलेले पापड, सांडगी मिरची, बटाट्याच्या काच-या

https://shecooksathome.com/…/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80-%…/

७) बिसीबेळे भात, चिंचेचा भात (पुळीहोरा), तळलेले पापड, सांडगी मिरची

https://shecooksathome.com/…/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E…/

८) पालक किंवा मेथी पराठे, चण्याची किंवा चवळीची मसालेदार रस्सा उसळ, दह्यातली एखादी कोशिंबीर (काकडी, कांदा, कोबी अशी कुठलीही चालेल.)

https://shecooksathome.com/…/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E…/

९) आलू पराठे, पुदिना चटणी, कांद्याचं दह्यातलं रायतं, लोणचं

१०) पुदिना आणि कांद्याचे पराठे, पिंडी छोले, दह्यातली कोशिंबीर

https://shecooksathome.com/…/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E…/

११) पनीर पराठे, फ्लॉवर-मटार रस्सा, एखादी कोशिंबीर

१२) पनीरची रस्सा भाजी, एखादी डाळ (धाबेवाली डाळ, दाल माखनी वगैरे), साधे पराठे, कांद्याचं कचुंबर

https://shecooksathome.com/…/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AC%E…/

https://shecooksathome.com/…/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E…/

१३) मिसळ-पाव, दहीभात
https://shecooksathome.com/…/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E…/

१४) थालिपीठं, मुगडाळीची खिचडी, टोमॅटोचं सार, भाजलेले पापड

https://shecooksathome.com/2015/01/22/धुंदुरमासाचं-जेवण/

१५) ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, पिठलं, ठेचा, भात

१६) कांदा-बटाटा-टोमॅटो रस्सा, पोळ्या, दह्यातली एखादी कोशिंबीर, खिचडी

https://shecooksathome.com/…/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E…/

१७) उपासाची भगर किंवा वरीचा भात, दाण्याची आमटी, बटाट्याची उपासाची भाजी, ओल्या खोब-याची चटणी, बटाट्याचे पापड

१८) येसर आमटी, साधा भात, मेथीची पीठ पेरून केलेली भाजी, पोळ्या

https://shecooksathome.com/…/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E…/

१९) कर्नाटकी मुद्दा भाजी, चिंचेचं सार, ज्वारीची भाकरी, लसणाची चटणी

https://shecooksathome.com/…/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E…/

२०) मुगडाळीची खिचडी, कढी, पापड, कोशिंबीर

२१) ज्वारीची भाकरी, भरल्या वांग्यांची भाजी, ठेचा, मठ्ठा, लोणी

२२) इडली-सांबार-चटणी

https://shecooksathome.com/…/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E…/

२३) धपाटे, कांद्याची चटणी, मसालेभात, दह्यातली कोशिंबीर

https://shecooksathome.com/…/%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A4%BE%E…/

२४) मेथीची मिश्र पचडी, चण्याची किंवा चवळीची किंवा मसुराची उसळ, सोलाण्यांची आमटी, भाकरी

https://shecooksathome.com/…/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E…/

२५) व्हेज सँडविचेस, टोमॅटोचं किंवा कुठलंही सूप, दही भात किंवा मुगाची खिचडी

मी वर २५ मेन्यूंची यादी दिली आहे. माझ्या अनुभवानं आणि अंदाजानं इतके पदार्थ जेवायला पुरेसे होतात. या मेन्यूत फेरफार करून तुम्ही आपली कल्पनाशक्ती वापरून अजून मेन्यू तयार करू शकता. या यादीत मी मुद्दाम तळलेले पदार्थ दिलेले नाहीत, याचं कारण असं की स्टार्टर्समध्ये तळलेले पदार्थ असतील तर मग मेन कोर्समध्ये परत तळलेले पदार्थ नको वाटतात. पण जर स्टार्टर्समध्ये तळलेले पदार्थ नसतील तर तुम्ही या मेन्यूत वडा-सांबार-चटणी किंवा तिखटमिठाच्या पु-या-चटणी-खिचडी अशीही काही काँबिनेशन्स करू शकता. सोपे पदार्थ याचसाठी की मोठ्या पार्ट्या करताना इतर तयारी करून आपण थकून गेलेलो असतो. शिवाय वर दिलेले बहुतांश पदार्थ आधी तयार करून ठेवता येतात. कोशिंबीरीच्या भाज्या चिरलेल्या असल्या की ती फक्त ऐनवेळी मिसळली की काम भागतं. किंवा पुलाव, खिचडी ऐनवेळेला गरमागरम टाकता येतात. वर उल्लेख केलेल्या दोन्ही मैत्रिणींच्या मागणीनुसार या पोस्टमध्ये फक्त शाकाहारी मेन्यू आहेत. कधीतरी मांसाहारी मेन्यूबद्दलही पोस्ट लिहीनच.

सायली राजाध्यक्ष

परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १

14102515_579280992278624_7415615789204159558_n

अन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे राहणा-या मधुरा गद्रे यांनी व्हेजिटेरियन पार्टीसाठीचे काही मेन्यू सुचवायला सांगितलं आहे. तर स्टॉकहोमला राहणा-या अमृता पाटील यांनी काही स्टार्टर्स सुचवायला सांगितलं आहे. आजची ही पोस्ट त्याबद्दलच.
मांसाहारी पदार्थ खाणारे लोक असतील तर मग खरं तर स्वयंपाक सोपा असतो. म्हणजे जर भारतीय पद्धतीनं करायचं झालं तर एखादा रस्सा – मटण, चिकन किंवा फिश असा कुठलाही, एखादं सुकं, बरोबर सॅलड आणि पोळी किंवा ब्रेड आणि भात केला की भागतं. पण शाकाहारी पदार्थांचं तसं होत नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये भाज्या, कडधान्यं, डाळी, फळं या सगळ्यांचा वापर होतो. त्यामुळे पदार्थ संख्याही वाढते.
पार्टीच्या जेवणाचे मुख्य घटक कुठले? तर स्टार्टर्स, मग मुख्य जेवण आणि मग गोड पदार्थ. आजकाल ब-याच पार्ट्या या ड्रिंक्सबरोबर असतात. मग ते हार्ड ड्रिंक्स असोत किंवा मॉकटेल्स-सॉफ्ट ड्रिंक्स. तर अशा पेयांबरोबर काहीतरी खायला हवं असतं. त्यासाठी आपल्याला कोरडे पदार्थ, ताजे ओले पदार्थ, वेगवेगळी सॅलड्स असं काहीतरी करता येईल.

स्टार्टर्स

कोरडे पदार्थ

सुकी भेळ – कुरमुरे, भाजलेले दाणे, शेव असं एकत्र करून त्यात चिरलेला कांदा, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची असं घालून जरा चाट मसाला किंवा तिखट-मीठ घाला.
तळलेले दाणे – बेसन-हळद-तिखट-मीठ-हिंग-आमचूर असं एकत्र करून भज्याच्या पिठापेक्षा किंचित घट्ट भिजवा. त्यात शेंगदाणे घोळून मध्यम आचेवर लाल होईपर्यंत तळा. हे आधीही करून ठेवता येतील. डाळ्याचंही असंच करता येईल.
लावलेले कुरमुरे – कुरमुरे कुरकुरीत भाजून घ्या. त्यात मीठ-मेतकूट-काळा मसाला-तिखट-कच्चं तेल घालून नीट कालवा. हवं असल्यास बारीक चिरलेला कच्चा कांदा घाला.
मठरी – मैदा-ओवा-जिरं-मीठ-हिंग असं एकत्र करा. तेलाचं मोहन घालून घट्ट पीठ भिजवा. लहान लहान पु-या करा. त्याला टोचे मारून मंद आचेवर कडक होईपर्यंत तळा. हाही पदार्थ आधी करून ठेवता येईल.
तिखट-मिठाचे शंकरपाळे – मैद्यात जरा जास्त तुपाचं कडकडीत मोहन घालून नीट मिसळून घ्या. त्यात तिखट-मीठ-ओवा-बारीक चिरलेली कोशिंबीर-हिंग-हळद घालून पीठ घट्ट भिजवा. जरा जाड पोळी लाटून शंकरपाळे कापा किंवा अगदी लहान झाकणानं लहान लहान पु-या कापा. मंद आचेवर कडकडीत तळा. याही आधी करून ठेवता येऊ शकतात. कोथिंबिरीएवजी मेथी घालता येऊ शकेल.
शिवाय नेहमीचं चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव हेही ठेवता येईल.

14088526_579280948945295_3369107411855604867_n

काही सॅलड्स

पास्ता सॅलड – मॅकरोनी उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याला तेलाचा हलका हात लावून मोकळी करून ठेवा. गाजराच्या चकत्या करून त्याचे चार तुकडे करा. कांद्याची पात कांद्यांसकट बारीक चिरा. सिमला मिरची बारीक चिरा. कॉर्न दाणे उकडून घ्या. हे सगळं साहित्य एकत्र करा. त्यात मीठ-पिठी साखर-मिरपूड-लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल घाला. थंड करून सर्व्ह करा.
चटपटे चणे – ब्राउन रंगाचे चणे भिजवून, उकडून घ्या. पाणी काढून कोरडे होऊ द्या. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-हिरवी मिरची-कोथिंबीर घाला. वरून थोडं लाल तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला.
मुगाचं सॅलड – हिरवे मोड आलेले मूग जरासे उकडून घ्या. लगदा करू नका. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घाला. तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला. आवडत असल्यास थोडी चिंचेची चटणी घाला. हे सॅलड तसंच खा किंवा कॅनपीजमध्ये अथवा पाणीपु-यांच्या पु-यात भरून सर्व्ह करा.
मिश्र भाज्या-पनीर सॅलड – आइसबर्ग लेट्यूस हातानं मोकळं करून स्वच्छ धुवून कोरडं करा आणि फ्रीजरला गार करायला ठेवा. काकडीची सालं काढून मोठे तुकडे करा. बेबी टोमॅटो असतील तर अख्खे वापरा. नसतील तर टोमॅटोच्या बिया काढून मोठे तुकडे करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करा. हे सगळं एकत्र करा. त्यात स्लाइस केलेले ब्लॅक ऑलिव्ह घाला. वरून लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल-मीठ-मिरपूड घाला. हलक्या हातानं एकत्र करा. अगदी सर्व्ह करताना थंड लेट्यूसचे हातानं तुकडे करून त्यात घाला.
मूग-सिमला मिरची-कोबी सॅलड – सिमला मिरची पातळ लांब चिरा. त्यात लांब पातळ चिरलेला कोबी घाला. त्यात मोड आलेले मूग घाला. चाट मसाला-मीठ-लिंबाचा रस घाला. हवं असल्यास थोडं ऑलिव्ह ऑइल घाला. यात सगळ्या रंगाच्या सिमला मिरच्याही वापरता येतील.
चटपटा कॉर्न – कॉर्न दाणे उकडून घ्या. थंड झाले की त्यात बारीक चिरलेला उकडलेला बटाटा, हिरवी मिरची घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. अगदी सर्व्ह करताना त्यात जरा तिखट शेव घाला. तिखट नको असल्यास साधी शेव घाला.
मिश्र सॅलड – काकडी-सिमला मिरची-टोमॅटो-गाजरं सगळं मध्यम आकारात चौकोनी चिरा. त्यात अक्रोड, काजू, भाजलेल्या बदामाचे तुकडे घाला. थोडासा खजूर चिरून घाला. बेदाणे घाला. लिंबाचा रस आणि मीठ घाला.
आपली कल्पनाशक्ती वापरून असं कसलंही सॅलड करता येऊ शकतं.

काही ताजे पदार्थ

मिश्र डाळींचे वडे – हरभरा-उडीद-मूग अशा डाळी किंवा आपल्याला हव्या त्या डाळी आपल्याला हव्या त्या प्रमाणात भिजवा. वाटताना त्यात आलं-लसूण-मिरची घालून जरा जाडसर वाटा. त्यात बारीक चिरलेला कांदा-भरपूर कोथिंबीर-बारीक चिरलेला कढीपत्ता-मीठ-तिखट-हळद-भरडलेले धणे असं घाला. लहान लहान वडे तळा.
मिनी वडे – उडीद डाळ आणि त्याच्या निम्मी मूग डाळ भिजवा. वाटून त्यात ओल्या खोब-याचे लहान पातळ तुकडे, बारीक चिरलेली मिरची, अख्खे मिरीदाणे, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. मीठ घाला. लहान लहान वडे तळा.
मिनी बटाटेवडे – बटाटे उकडून मॅश करा. त्यात आलं-लसूण-मिरची वाटून घाला. भरपूर कोथिंबीर घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. लहान लहान गोळे करा. बटाटेवड्यांना करतो तसं पीठ भिजवून त्यात हे वडे घोळून तळा. किंवा थोड्या तेलावर कांदा परतून, त्यात वाटण घालून परता. त्यात उकडलेला बटाटा, मीठ, लिंबाचा रस घाला. बाकी कृती तशीच करा.
कोथिंबीर वडी – भरपूर कोथिंबीर धुवून चिरा. त्यात तिखट-मीठ-हळद-धणे पूड-जिरे पूड-साखर-तीळ घाला. थोडं लसूण-मिरची वाटून घाला. थोडा वेळ ठेवा. त्यात मावेल तसं बेसन घालून रोल करा. कुकरला उकडून घ्या. कापून तसेच खा किंवा हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात खमंग परता. किंवा वड्या कापून तळा.
मिश्र भजी – कांदा-कोबी पातळ चिरा. बटाटा किसून घ्या. फ्लॉवरचे लहान तुरे काढा. या सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात तिखट-मीठ-हळद-हिंग-ओवा घाला. बेसन घाला. भज्यांच्या पिठासारखं भिजवा. थोडं कडकडीत तेलाचं मोहन घाला. लहान लहान भजी तळा.
परतलेली इडली – तयार इडली लांब पातळ चिरा. बटरवर इडली घालून खमंग लाल रंगावर परता. सर्व्ह करताना थोडं तिखट आणि चाट मसाला भुरभुरवा.
चटणी चीज सँडविच – पुदिना-कोथिंबीर-मिरची-लिंबाचा रस-मीठ-साखर-थोडं डाळं असं एकत्र वाटून चटणी करा. त्यात थोडं बटर घाला. ही चटणी ब्रेडला लावा. त्यावर थोडं किसलेलं चीज पसरवा. वर परत दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापा. वरून टूथपिक लावा.
चटणी सँडविच २ – दाण्याची-तिळाची चटणी एकत्र करा. ती मिक्सरला थोडी बारीक फिरवा. त्यात थोडं दही घाला. थोडं कच्चं तेल घाला. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा घाला. हे मिश्रण ब्रेडला लावा. वर दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापून वरून टूथपिक लावा.
मिनी पु-या – कणीक-थोडासा रवा आणि थोडं बेसन एकत्र करा. त्यात भरपूर बारीक चिरलेली मेथी घाला. हळद-तिखट-मीठ-तीळ घाला. लसूण-मिरचीचं वाटण घाला. कडकडीत तेलाचं मोहन घालून पीठ घट्ट भिजवा. पोळी लाटून डब्याच्या लहान झाकणानं मिनी पु-या करा. तेलात खमंग तळा. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा पालकही वापरू शकता.
कॉर्न वडे – कॉर्न दाणे कच्चेच मिक्सरला भरड फिरवा. त्यात बेसन-थोडंसं तांदळाचं पीठ घाला. बारीक चिरलेलं कांदा-मिरची घाला. हळद-तिखट-मीठ घाला. लहान लहान वडे तळा.
पनीर टिक्का – पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करा. थोडा वेळ दही बांधून ठेवा. नंतर का भांड्यात हा चक्का-आलं-लसूण पेस्ट-लिंबाचा रस- थोडा तयार तंदुरी मसाला-हळद-तिखट-थोडा ओवा घाला. सगळं नीट एकत्र करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवा. तव्यावर किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. असेच फ्लॉवरचे तुरे काढूनही करता येईल. किंवा बेबी पटेटो उकडून करता येईल. मश्रूमचंही करता येईल.
ब्रेड पकोडा – भज्यांचं पीठ भिजवा. बटाटेवड्यांसाठी करतो तसं सारण करा. ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये हे सारण भरा. एकमेकांवर घट्ट दाबा. त्याचे चार तुकडे करा. भज्यांच्या पिठात बुडवून मध्यम आचेवर तळा.


वर जे पदार्थ मी सांगितले आहेत ते तुमच्यापैकी अनेक जण करत असतीलच. परदेशातल्या लोकांना उपलब्ध साहित्यातूनच स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे शक्यतो त्यांना उपलब्ध असतील असेच पदार्थ मी यात सांगितले आहेत. या पोस्टच्या पुढच्या भागात मुख्य जेवणाचे काही मेन्यू सांगणार आहे.

सायली राजाध्यक्ष