अळूवडी

14053982_576028209270569_244515583526790512_n

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारण असं आहे की अळू बरेचदा खाजरा असतो. चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरेपणा कमी होतो.
अळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. जसजसा खाण्यासाठी वापर व्हायला लागला तसतसा अळू मुद्दाम पिकवला जायला लागला. अळूचं मूळ भारताचा पूर्व भाग, नेपाळ आणि बांगलादेशात असावं असं मानलं जातं. आता अळू जगभर खाल्ला जातो. अळूची पानं सुपासारखी असतात. कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. अळकुड्या किंवा अरवी म्हणजेच अळूचे कंद. अरवीचीही चिंच घालून भाजी केली जाते. अळकुड्यांची कुरकुरीत परतून केलेली भाजी तोंडीलावणं म्हणून छान लागते. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही अळूचा वापर केला जातो. महाराष्ट्र तसंच गुजरातेत अळूवड्या लोकप्रिय आहेत. बारीक कोलंबी घालूनही अळूवडी करतात. मी एका रेसिपी शोमध्ये तयार अळूवड्यांवर नारळाचं दूध घालून त्या झाकून ठेवून मस्त फुलवून केलेला पदार्थ बघितला होता. तोही मस्त लागत असणार.
अळूला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे अळू नेहमी पाण्याच्या एखाद्या डबक्यात लावला जातो. बरेचदा सांडपाण्यात अळूची आळी दिसतात. बीडला आमच्या बागेत अळूचं मोठं आळं होतं. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या घरून अळू नेत असत. माझी आई अळूच्या पानांची भजी आणि त्या भज्यांची चिंच-गूळ घालून मस्त भाजी करते. सध्या श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत. अशांना चमचमीत खायला म्हणून या दिवसांत बरेचदा तळलेले पदार्थ हवे असतात. मग बरेचदा अळूवडी केली जाते. आज मी अळूवडीचीच रेसिपी शेअर करणार आहे.

अळूवडी

साहित्य – १५-१६ वडीसाठीची अळूची पानं, २ वाट्या डाळीचं पीठ, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, २ टेबलस्पून गूळ, २-३ टीस्पून तिखट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, वड्या तळण्यासाठी तेल

कृती –
१) अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील आणि पानं मऊ होतील.
२) बेसनात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.
३) आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.
४) त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट रोल करा. असे जितके होतील तितके रोल करून घ्या.
५) कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.
६) थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.

या वड्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात. किंवा फोडणीला मोहरी, हिंग, तीळ घालून या वड्या परतवा. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. किंवा तेल-मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर वड्या घाला. जराशा परतून त्यात थोडं उकळतं पाणी, चिंचेचा कोळ, गूळ, थोडा काळा मसाला घालून अंगासरशी रस्सा करा.

तिखटमिठाचं आणि चिंचगुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करा. इतक्या पानांमध्ये २५-३० अळूवड्या होतात.

सायली राजाध्यक्ष

Advertisements

दिव्यांची रसमलाई

13925362_568613200012070_918824204826783_n

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्याची अमावस्या. आता विजेचे दिवे असतात. पण ज्या काळी वीज नव्हती तेव्हा तेलवात करून वापरण्यात येणा-या दिव्यांमुळेच उजेड होत असे.
आजच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून लख्ख करायचे आणि मल तेलवात करून उजळायचे, त्यांची पूजा करायची अशी जुनी प्रथा आहे. माझी आजी कणकेचे गूळ घालून दिवे करायची, ते उकडून, त्यात तूप घालून, वात पेटवून आम्हाला ओवाळायची आणि नंतर ते दिवे खायला द्यायची. आता ही प्रथा कालबाह्य झाली आहे. कारण वर म्हटलं तसं विजेचे दिवे असताना या दिव्यांना आता तितकंसं महत्त्व उरलेलं नाही. पण जुनी परंपरा म्हणून त्या-त्या सणाला ते-ते ठराविक पदार्थ मी करतेच. तसे आजही मी कणकेचे गूळ घालून दिवे केले होते. त्याचबरोबर माझी मैत्रीण तनुजा बांदिवडेकर हिनं सांगितलेली दिव्यांची खीरही केली होती. फक्त मी त्याला दिव्यांची रसमलई असं नाव दिलं, कारण मी त्यात थोडा बदल केला होता.

कणकेचे दिवे

साहित्य – १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी पाणी, त्यात मावेल तेवढी कणीक, १ टीस्पून तूप, चिमूटभर मीठ, वरून घालायला साजूक तूप

कृती –
१) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ घालून ठेवा.
२) तो विरघळला की त्यात तूप आणि मीठ घालून हलवून घ्या.
३) त्यात मावेल तेवठी कणीक घाला. साधारण आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा. १५ मिनिटं तशीच ठेवा.
४) नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन हातावर त्याचा गोल, जाडसर पेढा करा. पेढ्याच्या मधोमध बोटांनी दाब देऊन हळूवार हातानं कडा काढत त्याला दिव्याचा आकार द्या. असे सगळे दिवे करून घ्या.
५) एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा. त्यावर तयार दिवे ठेवा. झाकण ठेवून २०-२५ मिनिटं वाफवा.
दिवे तयार आहेत. गरम असतानाच वरून साजूक तूप घालून खा.

दिव्यांची रसमलई

साहित्य –

दिव्यांसाठीचं साहित्य – १ वाटी पाणी, १ वाटी सुवासिक तांदळाची पिठी, १ टीस्पून तूप, १०-१२ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ

रसमलईचं साहित्य- १ लिटर दूध, ५ टीस्पून साखर, प्रत्येकी १ टेबलस्पून काजू-बदामाचे तुकडे, थोडीशी चारोळी आणि बेदाणे, अर्धा टीस्पून जायफळ पूड

कृती –

दिव्यांची कृती –
१) एका कढईत पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात तूप आणि मीठ घाला. केशराच्या काड्याही घाला.
२) त्यात तांदळाची पिठी घाला. गॅस बंद करा. उलथन्यानं हलवून घ्या. १० मिनिटं झाकण घालून ठेवा.
३) नंतर एका ताटात काढून थोड्या तुपाचा हात लावून चांगली मळून घ्या.
४) बोराएवढे गोळे करून त्याला पणतीचा आकार द्या. अशा सगळ्या पणत्या करून घ्या.

रसमलईची कृती –
१) दूध गॅसवर आटवायला ठेवा.
२) चांगलं आटलं की त्यात साखर, सुकामेवा, जायफळ पूड घाला.
३) हलवून घ्या आणि नंतर तयार दिवे त्यात घाला.
४) मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटं उकळी काढा.

गरमागरम रसमलई तयार आहे. हवी असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.

 

सायली राजाध्यक्ष

अन्न हेच पूर्णब्रह्मची दोन वर्षं

12654335_499532773586780_7052328283318132128_n

२१ जुलैला अन्न हेच पूर्णब्रह्म हा ब्लॉग सुरू करून २ वर्षं पूर्ण झाली. अचानक आलेल्या विचारातून या पेजचा जन्म झाला आणि वाचकांच्या भरभरून मिळणा-या प्रतिसादामधून या पेजचं रूप निश्चित झालं. साध्या, सोप्या, रोजच्या जेवणातल्या पाककृती या पेजवर शेअर करायच्या असं मी पहिल्यापासून ठरवलं होतं. याचं कारण असं की मला स्वतःला रोज फार गुंतागुंतीचा स्वयंपाक करायला आवडत नाही. रोजचा स्वयंपाक हा आटोपशीर पण तरीही चौरस आहार देणारा असावा असं मला स्वतःला वाटतं. माझ्या घरच्या स्वयंपाकात मी ते अंमलातही आणते. मग हेच इतरांबरोबर शेअर का करू नये असं मला वाटलं आणि हे पेज सुरू झालं.
नवीन जीवनपद्धतीमध्ये बहुतेक सर्व स्त्री-पुरूष कामानिमित्तानं दिवसाचा अधिकात अधिक वेळ घराच्या बाहेर असतात. त्यामुळे बाहेर खाण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्यात फारसा पौष्टिकतेचा विचार करणं अवघड आहे. त्यामुळे निदान आपण जेव्हा घरात जेवतो तेव्हा ते जेवण साधं पण तरीही रूचकर आणि लवकर होणारं असावं असं मला वाटतं. म्हणून जास्तीत जास्त ताजा स्वयंपाक करण्यावर माझा भर असतो. शिवाय जेवताना सगळी पोषणमूल्यंही मिळायला हवीत. मी आहारतज्ज्ञ नाही किंवा मी त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही. पण मी विज्ञाननिष्ठ आहे. विज्ञानावर माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्यामुळे वाचनातून, अनुभवातून, प्रयोगांमधून, पारंपरिक प्रथांमधून जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून आपण जीवनशैली अंगिकारली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं. अनेक पारंपरिक प्रथांमागेही शास्त्रीय कारणं असतात त्यामुळे त्या नाकारताना किंवा स्वीकारतानाही त्यांचा डोळसपणे विचार केला गेला पाहिजे.
स्वयंपाक करणं ही कला आहे. ती निगुतीनं करण्याची गोष्ट आहे. साधासाच स्वयंपाक असला तरी तो रूचकर करण्यासाठी प्रयत्न घ्यावे लागतात. त्यात मन घालावं लागतं. स्वयंपाक करणारी गृहिणी ही आपल्याकडे कमी दर्जाची समजली जाते. त्यात ती नोकरी न करता घर सांभाळत असेल तर फारच. घरात बसणा-या बाईला कमी अक्कल असते असा एक सर्वसाधारण समज आहे. आणि असा समज करून देण्यात आणि घेण्यात बायकाही मागे नाहीत. पण जर घराचं व्यवस्थित नियोजन करून ते उत्तम रितीनं चालवायचं असेल तर त्यासाठी खूप कष्ट लागतात. हे पेज सुरू केल्यानंतर मला याही बाबीवर थोडासा जोर द्यावा वाटला. त्यामुळे या पेजवर मी स्वयंपाकघराचं नियोजन, स्वयंपाकघरात कशा प्रकारे वस्तू असाव्यात, स्वयंपाकाचं नियोजन अशाही विषयांवर सातत्यानं लिहीत आले आहे.
हे पेज अनेक पुरूष मित्र वाचतात आणि आपल्या प्रतिक्रियाही देतात हे मला खूप विशेष वाटतं. याचं कारण अजूनही जगभरात स्वयंपाक ही बाईनं करायची गोष्ट आहे असंच मानलं जातं. बायका जितक्या रोजचा स्वयंपाक करतात तितका पुरूष करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा या पेजचे पुरूष मित्र पेज वाचतात, त्याबद्दल प्रतिक्रिया कळवतात, रेसिपीज करून पाहतात ते मला फार आनंद देणारं असतं. हे पेज ७८ देशांमध्ये वाचलं जातं हेही मला फार मस्त वाटतं. मध्यंतरी मी पेजच्या वाचकांना कुठे राहाता याबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती. ती जेव्हा एकत्रित केली तेव्हा माझाच त्यावर विश्वास बसला नाही इतके जगाच्या कानाकोप-यातले लोक पेज वाचतात.
अनेकांना अजूनही स्वयंपाक करणं कमी दर्जाचं वाटतं. पण मला या मागचा विचारच कळत नाही. जर आपल्याला उत्तम खायला लागत असेल आणि आपल्याला आपलं आरोग्यही राखायचं असेल तर स्वयंपाक आलाच पाहिजे. मग तो तुम्ही बाई लावून करून घ्या. मदतनीसांकडून मदत घेऊन करा किंवा स्वतः सगळं करा. याला पर्याय नाही. त्यामुळे अनेकदा काही लोकांकडून मला सातत्यानं मी स्वयंपाक आणि साड्यांबद्दल, कपड्यांबद्दल लिहिते म्हणजे मला बुद्धी कमी आहे असे शालजोडीतले मिळाले असले तरी मला त्याकडे लक्ष द्यावंसं वाटलं नाही. याचं कारण ही एक कला आहे, आवश्यक गोष्ट आहे असं मानणा-यांची संख्या प्रचंड मोठी आहे.
मी हे पेज सुरू करून काय मिळवलं? तर मुख्य म्हणजे मी खूप आनंद मिळवला, लोकांचं खूप प्रेम मला मिळतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आयुष्यात या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे असं मी मानते. या पेजमुळे मला जगभर मित्रमैत्रिणी मिळाले आहेत. मी मागे गंमतीनं लिहिलंही होतं की मी मला आता जगप्रदक्षिणा करायला हरकत नाही! इतकं भरभरून लोक प्रेम करतात. परदेशातले लोक तर बोलावतातच पण जेव्हा पंढरपूर तालुक्यातल्या सांगोल्याला शेत बघायला या किंवा नासिकजवळ मुंगसेरा इथं द्राक्षाची बाग बघायला या अशी आमंत्रणं मिळतात तेव्हा मी भरून पावते. आयर्लंडची सोनाली जेव्हा मला गुरूपौर्णिमेला मेसेज करते तेव्हा मी तिची गुरू नाही याची पूर्ण जाणीव असूनही मन कृतज्ञतेनं भरून जातं. परवा कोल्हापूरला गेल्यावरही असंच प्रेम अनुभवायला मिळालं. स्वतःला व्हायरल इन्फेक्शन असतानाही मनीषाताई संध्याकाळभर माझ्याबरोबर फिरली. दुस-या दिवशी घरी बोलावून तिनं उत्तम पाहुणचार केला.
या पेजच्या वाचकांमध्ये साहित्यिक, कलावंत, चित्रकार, आयएएस, आयपीएस, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री असे सगळे आहेतच. त्याचबरोबर एखाद्या लहान गावात राहणारी, नवीन लग्न झालेली मुलगी आहे, परदेशात एकटे राहणारे विद्यार्थी आहेत, परदेशात मिळणा-या तुटपुंज्या साधनसामग्रीतून अन्नाला पूर्णब्रह्म करणारे मित्रमैत्रिणी आहेत. हे संचित माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, मनाला सतत उभारी देणारं आहे.
या पेजचे पहिले ५००० लाइक्स व्हायला ९ महिने जावे लागले. एक वर्ष झालं तेव्हा १२२८० लाइक्स होते. आणि आज २ वर्षं पूर्ण झाली तेव्हा ४१२८० लाइक्स आहेत. पेजवरची प्रत्येक पोस्टचे १०० ते ४०० शेअर्स होतात. आणखी काय हवं? या पेजवर असंच प्रेम करत रहा. असाच भरभरून प्रतिसाद देत रहा. नवनवीन कल्पना सुचवत रहा. तुम्हा सर्वांची मनापासून ऋणी आहेच.

Happy cooking and happy reading!

सायली राजाध्यक्ष

कढीपत्त्याची चटणी

 

13754106_562314747308582_4984805697224231095_n

भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. सांबार, दहीबुत्ती, रस्सम, बघारे बैंगन, मिरची का सालन अशा सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कढीपत्त्याची फोडणी हवीच हवी. आपल्याकडेही ब-याचशा भाज्या, आमट्या, कोशिंबिरींच्या फोडणीत कढीपत्ता वापरला जातोच. कढीपत्त्याच्या फोडणीशिवाय चिवडा कसा ओकाबोका दिसतो! फोडणीचा भात, बटाट्याची पिवळी सुकी भाजी, मुगा गाठी या पदार्थांचं रूप कढीपत्त्याच्या खमंग फोडणीमुळेच खुलतं. शिवाय किनारपट्टीवरच्या काही माशांच्या रेसिपीजमध्येही कढीपत्त्याचा वापर केला जातो.
कढीपत्ता हे मूळचं भारत आणि श्रीलंकेत सापडणारं झाड. कढीपत्त्याचं झाड फारसं उंच नसतं. पूर्ण वाढलेल्या झाडाला कढीपत्त्याचे भरभरून तुरे लागलेले असतात. कढीपत्त्याला निंबोणीसारखी दिसणारी, त्याच आकाराची पण किंचित गोलसर लाल रंगाची फळं येतात. झाडाजवळून नुसतं गेलात तरी पानांचा घमघमाट नाकाला जाणवतो. कढीपत्त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यं असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी कढीपत्ता उत्तम आहे असं मानलं जातं. केसांच्या आरोग्यासाठीही कढीपत्ता चांगला असतो असं म्हणतात. कढीपत्त्यामुळे केस पांढरे होण्याची क्रिया मंदावते असंही म्हणतात (मी तर भरपूर कढीपत्ता खाते तरीही माझे केस पांढरे का! ). तर आज कढीपत्त्याचीच एक रेसिपी शेअर करणार आहे, कढीपत्त्याची चटणी. माझी आई ही चटणी फार छान करते.

कढीपत्त्याची चटणी

साहित्य – २ वाट्या कढीपत्त्याची पानं-धुवून कोरडी केलेली, १ वाटी बिन पॉलिशचे तीळ, २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, २ टीस्पून तेल

कृती –
१) एका नॉनस्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करा. त्यावर कढीपत्त्याची पानं घाला.
२) मध्यम आचेवर मधूनमधून परतत ती कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाली की थंड करा.
३) तीळ कोरडेच लाल रंगावर भाजा.
४) पानं आणि तीळ थंड झाले की मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटा.
५) त्यात तिखट-मीठ घाला आणि परत एकदा फिरवा. अगदी बारीक पूड करू नका.

कढीपत्त्याची चटणी तयार आहे. या चटणीत कढीपत्त्याचं प्रमाण आपल्याला हवं तितकं वाढवू शकता. भाकरी किंवा पोळीबरोबर तर ही चटणी मस्तच लागते. पण गरम आसट भातावर ही चटणी आणि तूप घालून खाल्लंत तर बोटं चाटत रहाल!

सायली राजाध्यक्ष

खानदेशी शेवेची भाजी

13524431_557047867835270_3832009453666130781_n

मित्रमैत्रिणींनो, गेले काही दिवस काहीशी कामात होते त्यामुळे या पेजवर काही पोस्ट करू शकले नाही. लोकसत्ता पूर्णब्रह्मचा अंक तुमच्यापैकी बरेच जणांनी आतापर्यंत विकत घेतला असेलच. अनेकांचा तो वाचूनही झाला असेल तर काही जणांनी त्यातल्या काही रेसिपीज करूनही बघितल्या असतील. अंक उत्तम झाला आहे. मराठवाडा वगळता मलाही इतर प्रांतांमधल्या अनेक नवीन रेसिपीज कळल्या आणि आपली खाद्यसंस्कृती किती अफाट आहे तेही जाणवलं. प्रत्येक प्रांतात काही पाककृतींमध्ये साम्य आहे. पण तरीही त्या-त्या प्रांताचा खास असा एक टच त्या पाककृतीला आहे. म्हणूनच ती वेगळी ठरते.
मीही हा अंक हातात आल्याच्या दुस-याच दिवशी वाचून काढला. वाचल्याबरोबर त्यातले पदार्थ कधी करून खाते असं झालं. हात शिवशिवायला लागले. पण लोकसत्ताचे लागोपाठ तीन कार्यक्रम होते. त्यामुळे ठरवलं की ते संपले की मगच करू. त्यानुसार आजपासून यातले पदार्थ करायला घेतले आहेत. अगदी रोजच जमेल असं नाही. पण जसे जमतील तसे सगळे तिखट पदार्थ लागोपाठ करून पाहणार आहे. आणि फोटोंसकट त्या रेसिपी इथे शेअर करणार आहे. ज्यांच्याकडे अंक आहे त्यांनी त्या वाचल्या असतीलच. पण ज्यांच्याकडे अंक नाही त्यांच्यासाठी, विशेषतः परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी मी त्या शेअर करते आहे.

आजची पहिली रेसिपी आहे ती म्हणजे खानदेशी शेवेची भाजी. ही भाजी अनेकांना माहिती असेलही. पण ही रेसिपी आहे ती खानदेशी खाद्यसंस्कृतीबद्दल लिहिणा-या आशाताई पाटील यांची. त्यामुळे ती अस्सल खानदेशी आहे यात शंकाच नाही! शेवभाजी ही जाड तिखट शेव वापरून करतात आणि मटनासाठी ज्या प्रकारचा मसाला वापरला जातो तशा मसाल्यात करतात. मी त्यात फक्त दोन बदल केले. एक म्हणजे मी आलं-लसूण थोडं कमी घेतलं कारण मला फार आलं-लसूण आवडत नाही. आणि तेलाचं प्रमाण मी जरासं कमी केलं. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण जास्त घेऊ शकता.

खानदेशी शेवभाजी

साहित्य – जाड तिखट शेव पाव किलो किंवा २ वाट्या, ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, २ कांदे मध्यम आकारात किंवा पातळ लांब चिरून, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, १ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून खानदेशी मसाला, १ टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून तेल, कांदा भाजण्यासाठी १ टीस्पून तेल, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार

कृती –
१) एका कढईत सुकं खोबरं भाजून घ्या. ते काढून ठेवा आणि धणे-जिरे भाजून घ्या. तेही काढून ठेवा.
२) नंतर कढईत १ टीस्पून तेल घालून त्यात चिरलेला कांदा घाला आणि मध्यम आचेवर मधूनमधून परतत तो चांगला लाल होऊ द्या. तो लाल झाला की काढून ठेवा आणि थंड होऊ द्या.
३) भाजलेला मसाला थंड झाला की भाजलेला सुका मसाला, कांदा, खानदेशी मसाला, तिखट, आलं-लसूण हे सगळं मिक्सरवर अगदी एकजीव वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.
४) १ टेबलस्पून शेवही कोरडीच मिक्सरला वाटून तिची पूड करा.
५) एका कढईत तेल गरम करा. तेल चांगलं गरम झालं की त्यात वाटलेला मसाला घालून त्याला तेल सुटेपर्यंत खमंग परता.
६) दुस-या शेगडीवर ४-५ वाट्या पाणी गरम करायला ठेवा. मसाला परतला की त्यात अर्धी वाटी गरम पाणी घाला. २ मिनिटं झाकण ठेवा. मसाल्यातलं तेल वर आलं की त्यात उरलेलं गरम पाणी ओता.
७) शेवेची पूड घाला. चवीनुसार मीठ घाला. सगळं नीट हलवून घ्या आणि रस्सा चांगला उकळू द्या.
८) रस्सा उकळला की त्यात कोथिंबीर घाला. एक उकळी काढून गॅस बंद करा.
९) जेव्हा जेवायचं असेल तेव्हा रस्सा गरम करताना त्यात शेव घाला. चांगला गरम झाला की गॅस बंद करा.

या शेवेच्या भाजीबरोबर मी आज ज्वारीची भाकरी, ठेचा आणि कच्चा कांदा खाणार आहे. शिवाय बरोबर गरम भातही लावलेला आहेच. वासावरून तरी ही भाजी मस्त झाली आहे असं वाटतंय. पावसाळ्यात असं चमचमीत खायला असल्यावर बघायलाच नको!


आणखी एक विशेष म्हणजे या भाजीत मी जो खानदेशी मसाला वापरला तो मला आशाताईंनीच दिला होता. हा मसाला त्या तयार करतात. तो तुम्हाला ऑनलाइन मागवता येईल. त्याची लिंकही शेअर करते आहे.

http://wanderingfoodie.in/shop/

हा मसाला मागवेपर्यंत तुम्ही तुमच्याकडचा मालवणी मसाला किंवा मटन मसाला वापरला तरी चालेल.
मग पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही झणझणीत भाजी करून बघा. कशी झाली होती तेही कळवा.

सायली राजाध्यक्ष

बरण्या आणि बाटल्या

13507099_553666191506771_9172758413297425811_n

आज खरं तर मी कुठलीतरी रेसिपी शेअर करणार होते. पण आपली एक मैत्रीण लीना सौमित्र हिनं दुपारी मला मेसेज केला. तिला तिच्या स्वयंपाकघरातल्या बरण्या-डबे बदलायचे आहेत. तर ते कुठले घ्यावेत असं तिनं मला विचारलं आहे. ती गोंधळली आहे कारण तिला स्टीलचे डबे नको आहेत. शिवाय ती भाड्याच्या घरात राहाते. तिला टपरवेअर वापरायचं नाहीये. प्लॅस्टिकही तिला फारसं आवडत नाही. शिवाय एकूण बरण्या-बाटल्या किती ठेवाव्यात असा तिचा प्रश्न आहे. तर काय करावं या विचारात ती पडली आहे.
आपल्या स्वयंपाकघरातल्या डबे-बरण्यांची संख्या आणि आकार ही आपल्या घरात किती माणसं आहेत आणि रोज कोणत्या प्रकारचा स्वयंपाक होतो त्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर घरात १२ माणसं असतील तर अगदी उपमा केला तरीही एकावेळी निदान पाऊण किलोचा करावा लागेल म्हणजे महिन्याचं सामान भरायचं झालं तर महिन्यात निदान चारदा उपमा कराल असं गृहित धरलं तर ३ किलो रवा एका वेळेला घरात आणावा लागेल. त्याउलट जर ४ माणसं घरात असतील तर एका वेळेला दीड वाटीचा उपमा पुरे होईल. म्हणजे ६ वाट्यांचा उपमा महिन्याला म्हणजे साधारण किलोभर रवा महिनाभर पुरेल. त्यामुळे घरात सामान भरताना घरात किती माणसं आहेत हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे.
घरात जर रोज उसळी आणि आमट्या होत असतील तर मग घरात कडधान्यं साठवण्यासाठी जास्त बरण्या लागतील. त्याऐवजी मांसाहारी स्वयंपाकाचं प्रमाण जास्त असेल किंवा उसळी-डाळींऐवजी भाज्यांवर अधिक भर असेल तर मग कडधान्यं साठवण्यासाठी फार बरण्या लागत नाहीत.


लीनाच्या घरी साधारण ब्राह्मणी घरांमध्ये होतो तसा स्वयंपाक होतो (इथे जातीचा काहीही संबंध नसून हा उल्लेख खाण्यापिण्याच्या सवयींचा आहे). मग या प्रकारच्या जेवणात साधारणपणे कुठले घटक पदार्थ वापरले जातात? तर डाळी, कडधान्यं, बेसिक मसाले, बेसन-तांदळाचं पीठ-भाजणी अशी पीठं, साबुदाणा-पोहे-रवा-इडली रवा हे नाश्त्यासाठी लागणारे पदार्थ, सुक्या मिरच्या-चिंच-धणे आदी मसाल्यांसाठी लागणारे घटक पदार्थ असं साधारण या प्रकारच्या स्वयंपाकात वापरलं जातं. तूरडाळ-तांदूळ-गूळ-वाळवणाचे पदार्थ (कुरडया-पापड्या-सांडगे इत्यादी) हे साधारणपणे स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवलं जातं.
आता महिन्याचंच सामान मागवायचं आहे असं जर गृहित धरलं तर कुठलं सामान साधारण किती लागेल असं ठरवता येईल. माझं स्वयंपाकघर लहान आहे म्हणून मी महिन्यात एकदा सामान भरते आणि मग त्यात लागेल तशी भर घालत राहाते. महिन्याच्या सामानात आपण कुठले घटक पदार्थ मागवतो? (हा सगळा अंदाज लहान स्वयंपाकघर, ३ ते ४ माणसं असं गृहित धरून दिला आहे.)
महिन्याचं वाणसामान – साधे तांदूळ-बासमती तांदूळ, तूर डाळ-मूग डाळ-उडीद डाळ-चणा डाळ-मसूर डाळ-सालीची मूग डाळ, चवळी-मसूर-मूग-मटकी-चणा-छोले-राजमा-पांढरे वाटाणे-हिरवे वाटाणे ही कडधान्यं, तांदूळ-जाडं बेसन-बारीक बेसन-भाजणी ही पीठं, धणे-जिरे-मोहरी-चिंच-सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे-तीळ, मीठ-तिखट-हळद-काळा मसाला-धणेजिरे पूड हे मसाले, पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा हे नाश्त्यासाठी लागणारे घटक पदार्थ इतके किमान पदार्थ वाणसामानात मागवावे लागतात. यात मी महिन्याची कणीक-ज्वारीचं पीठ-आपण तात्पुरते करून ठेवतो ते सांबार-रसम मसाल्यांसारखे मसाले हे धरलेलं नाहीये.
चार माणसांच्या कुटुंबाला साधारण किती सामान लागेल हा अंदाजच आहे. कारण घराघरातल्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कुणाकडे तांदूळ जास्त लागत असतील तर कुणाकडे कणीक जास्त लागत असेल. पण मी प्रमाण ढोबळमानानं सांगते आहे. माझ्या घरात चार माणसं आणि माझ्या दोन सहकारी मुली शिवाय येणारे पाहुणे असं गृहित धरून मी सामान मागवते. जर वर उल्लेख केलेली सगळी कडधान्यं तुम्ही वापरत असाल तर ८ कडधान्यं महिन्यातून प्रत्येकी दोनदा केली गेली तर एका वेळेला वाटीभर कडधान्य पुरतं. पाव किलोमध्ये साधारण नेहमीच्या मापाची २ वाटी कडधान्यं येतात. म्हणजे ही कडधान्यं पाव किलो पुरतात. बहुतेक घरांमध्ये रोज तूर डाळीचं वरण केलं जातं त्यामुळे डाळींमध्ये तूर डाळ सर्वात जास्त लागते. पण अधूनमधून मूग-मसूर-छिलका-उडीद डाळ वापरली जात असेल तर ती प्रत्येकी अर्धा किलो पुरे होते. शिवाय खिचडीसाठी मूगडाळीचा वापर होतो. जर खिचडी जास्त वेळा करत असाल तर मग आपल्या आवडीनुसार मूगडाळ (सालीची अथवा बिनसालीची) १ किलो मागवा. भरडा भाज्या (पीठ पेरून केल्या जाणा-या भाज्या) करत असाल तर मग जाडं बेसन मागवा. अन्यथा साधं बेसन आणि तांदळाचं पीठ, थालीपिठ भाजणी प्रत्येकी किलोभर पुरेल. धणे-जिरं-मोहरी हे महिन्याला साधारण (घरी पूड करता हे गृहित धरून) पाव किलो पुरतं. चिंचेचा वापर वरणात, सांबारात, कालवणांमध्ये होत असेल शिवाय गोड चटणी करून ठेवत असाल तर महिन्याला अर्धा ते पाऊण किलो चिंच पुरते. सुक्या मिरच्या फोडणीला, सांबार-रसम मसाल्याला वापरत असाल तर मग पाव किलो मिरच्या पुरतात. पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा हे पदार्थ महिन्याला प्रत्येकी १ किलो पुरतात.
मी वर दिलेला सगळा अंदाज आहे. कारण म्हटलं तसं खाण्यापिण्याच्या सवयींवर हे अवलंबून आहे. माझ्या घरी कडधान्यांच्या उसळी तर होतातच शिवाय धिरड्यांना कडधान्यं आणि डाळी असं दोन्ही बरंच वापरलं जातं. त्यामुळे मला साहजिकच ती जास्त लागतात. शिवाय प्रत्येक वस्तूच वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळं असतं. म्हणजे एक किलोची बरणी घ्याल तर त्यात रवा बसेल पण १ किलो कुरमुरे बसणार नाहीत. कारण कुरमु-याचं वस्तुमान कमी असतं. म्हणून प्रत्येक १ किलो पदार्थाला सारख्याच आकाराची बरणी घेऊन उपयोग नाही.
तर आता पुन्हा लीनाचा मूळ प्रश्न – स्वयंपाकघरात किती आणि कुठल्या आकाराच्या बरण्या घ्याव्यात. लीनाच्या घरी तीन माणसं आहेत. ती, तिचा नवरा आणि तिचा सोळा महिन्यांचा मुलगा. मुलगा सोळा महिन्यांचा आहे म्हणजे लवकरच तो घरातलं सगळं जेवायला लागेल. त्यामुळे तीन माणसं पूर्ण असंच आपण धरू.

रोजच्या वापरातले तूरडाळ-तांदूळ-बासमती तांदूळ-गूळ या पदार्थांना स्टीलचेच डबे वापरावेत.
इतर डाळी महिन्याला प्रत्येकी अर्धा किलो असं धरलं तर ५ अर्धा किलोच्या बरण्या डाळींसाठी
पोहे-रवा-इडली रवा-साबुदाणा-बेसन-जाडं बेसन-तांदळाचं पीठ-भाजणी प्रत्येकी १ किलो धरलं तर १ किलोच्या ८ बरण्या
चिंच-सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे यांसाठी १ किलोच्या ४ बरण्या (मिरच्या वजनाला कमी असल्या तरी आकारमान जास्त असतं.)
धणे-जिरे-मोहरी-तिखट-हळद-मसाला-तीळ – पाव किलोच्या ६ बरण्या
शिवाय ओवा-मेथी दाणे-खसखस यांसारख्या पदार्थांसाठी १०० ग्रॅमच्या ६ बरण्या
तर या बेसिक बरण्या झाल्या. तेव्हा मी लीनाला असं सुचवेन –
१ किलोच्या १२ बरण्या
अर्धा किलोच्या ९ बरण्या
पाव किलोच्या ६ बरण्या
१०० ग्रॅमच्या १२ बरण्या
मी बरण्यांची संख्या जास्त लिहिली आहे. याचं कारण असं आहे बरेचदा आपण एखादं सामान जास्त मागवतो किंवा एखादा मसाला करून ठेवतो किंवा चिवड्यासारखे पदार्थ करतो त्यासाठी जास्तीच्या बरण्या असाव्यात. वस्तुमान आणि आकारमानानुसार एकाच आकाराच्या बरणीत दोन पदार्थ कमीजास्त बसतील. तेव्हा जितके बसतील तितके भरावेत, उरलेल्या पाकिटाला क्लॅम्प लावून ठेवावं आणि बरणीतला संपला की परत भरावा.
बरण्या कुठल्या मटेरियलच्या वापराव्यात? मी वर म्हटलं तसं लीनाला स्टील आणि टपरवेअर वापरायचं नाहीये. प्लॅस्टिक शक्यतो वापरू नये या मताची मी आहे. मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे काचेच्या बरण्यांचा. काचेच्या बरण्या हाताळायला काही जणांना अवघड वाटतं. पण मी गेली ५ वर्षं त्या वापरते आहे आणि फारशा फुटलेल्या नाहीत. त्यामुळे त्या वापरायला काहीच हरकत नाही. शिवाय त्यात पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया होत नाही. पटकन पदार्थ दिसतो. आरोग्यावरही काचेचा काहीही विपरीत परिणाम होत नाही. हे सगळे गुण लक्षात घेता काचेचा वापर करणं योग्य आहे असं मला वाटतं.
लीनाच्या शंकेचं निरसन करायचा मी माझ्या परीनं प्रयत्न केलेला आहे. तिला या पोस्टची थोडीफार मदत होईल अशी आशा करते.

सायली राजाध्यक्ष

शेवग्याच्या पानांची भाजी

13417530_549953048544752_7686064234429723434_n

७ जून हा मृग नक्षत्राचा दिवस. खरं तर नक्षत्रं ही काही इंग्लिश कॅलेंडरवरून लागत नाहीत. पण मृग हे असं एक नक्षत्र आहे जे दरवर्षी ७ जूनलाच लागतं. मृग हे पावसाचं पहिलं नक्षत्र. पावसाची सुरूवात मृगापासून होते. मृग लागला की शेतकरीही पेरण्या करायला घेतो. ७ जून माझ्यासाठीही महत्त्वाचाच कारण या दिवशी माझा वाढदिवस असतो.
शेवग्याच्या शेंगा भारतातल्या सगळ्या प्रांतांमध्ये वापरल्या जातात. शेंगांची आमटी, शेंगांची मिरवणी, शेंगांची वाटण लावून केलेली कोकणी आमटी, शेंगांची मसालेदार भाजी, शेंगांचं पिठलं, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली कढी हे तर आपण करत असतोच. शिवाय परवाच मी माझ्या मैत्रिणीकडे, शुभा गोखलेकडे शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायले होते. ते फारच चवदार होतं. शेवग्याच्या शेंगांना स्वतःची अशी एक अफलातून चव असते. दक्षिणेत अवियलमध्ये, सांबार करताना शेवग्याच्या शेंगा वापरल्या जातात. उत्तरेत साइजन की फल्ली या नावानं ओळखल्या जाणा-या शेवग्याच्या शेंगांची रस्सेदार बाजी केली जाते.
मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची प्रथा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आहे. शेवग्याच्या पानांची भाजी का? तर या पानांमध्ये विपुल पोषणमूल्यं असतात. पावसाळ्यातले संसर्ग टळावेत आणि तब्येत चांगली राहावी म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याची प्रथा असावी. मृग नक्षत्राला शेवग्याच्या पानांची भाजी करून त्याचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. शेवग्याची भाजी बाजारात सर्रास विकत मिळत नाही, फार क्वचित दिसते. ही भाजी करायची असेल तर ती डायरेक्ट झाडावरूनच तोडावी लागते.
इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट अधिक व्हिटॅमिन सी असतं, गाजरापेक्षा चारपट अधिक व्हिटॅमिन ए असतं, दुधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम असतं, केळ्यापेक्षा तीनपट अधिक पोटॅशियम असतं आणि दह्यापेक्षा दुप्पट प्रथिनं असतात. शेवग्याच्या पानांमधल्या पोषणमूल्यांचा विचार केला तर ही भाजी किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येतं. मग ही भाजी जास्त का खाल्ली जात नाही? याचं कारण अज्ञान आणि दुसरं म्हणजे चव हे आहे. शेवग्याच्या शेंगा जितक्या चवदार लागतात तितकी भाजी चवदार लागत नाही. मी एकदा गोव्यात रवींद्र केळेकरांकडे ही भाजी खाल्ली होती. मला तेव्हा ती आवडली नव्हती. एक तर मला कोकणी पद्धतीनं केलेल्या पालेभाज्या विशेष आवडत नाहीत. फक्त ओलं खोबरं आणि मिरची-कांदा घालून केलेल्या भाज्या ब-याचदा पाणी घालून करतात आणि मग त्या पांचट लागतात. पण मला आता ही भाजी खाण्याचं महत्त्व कळतंय. मग आपण कटलेट्समध्ये, पराठ्यांमध्ये, आमटीमध्ये ही भाजी घालून थोडीशी पोषणमूल्यं वाढवू शकतोच की.
अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र अभिजित कुपाटे यांची आजी मृग नक्षत्राला खास शेवग्याच्या पानांची भाजी करते. त्यांनी या भाजीची त्यांच्या आजीची रेसिपी पाठवली आहे. ती मी त्यांच्याच शब्दात शेअर करते आहे.
मृग राजाची चाहूल लागताच घरो-घरी बनणारी शेवग्याच्या पानांची भाजी आजही आमच्या ग्रामीण भागात मृग राजाला नैवद्य दाखवून आपल्या लेकरांना आणि परिवारातील सर्व सदस्यांना मृग / मिरग / मिरोगाच्या सुरूवातीला आजही कम्पलसरी खायलाच घालतात.

आय्य आज कसली भाजी हाय ग ?,
मिरोग चालू व्ह्तोय शेवग्याची भाजी हाय आज,
लहानपणी नाक मुरडून शेवग्याची भाजी खाना-या आम्हा चिल्या-पिल्याना आज्जी, पावसोळा चालू व्हायच्या अदुगर खावावी टणक आणि हुशार हुशील. पोटात बी दुखणार न्हायी. असं समजवायची.
नैवेद्य दाखवून मृगराजा खूश होवून भरपूर- विपुल पाऊस पडो अशी आख्यायिका इकडे असली तरी खरंतर विविध पोषणमुल्ये शेवग्याच्या पानात इतर कोणत्याही हिरव्या पालेभाजीपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. पाऊस आणि पूर येवून पाणी दुषित होवून त्याचे वाईट परिणाम होऊ नयेत यासाठी प्रबंध म्हणून ह्या भाजीचा खटाटोप असावा. विक्रीसाठी बाजारपेठेत आजतागायत शेवग्याची पाने भाजी म्हणून आढळत नाही.

आम्ही मित्र मंडळी सोलापूरला मित्राच्या शेतात शेवगा बघून ढीगभर पानं वर्बाडून काकूना करा ह्याची भाजी म्हणून विनंती केलेली. जुन्नर तसच सोलापूर भागातील मित्रमंडळीना हा भाजीचा प्रकार परिचित नाही. कदाचित तिकडे नदीला कमी पाऊस आणि पूर येवून पाणी दूषित होण्याचे प्रमाण कमी असेल!

तर कशी बनवितात आज्जीनं सांगितलेली शेवग्याच्या पानांची भाजी –

साहित्य – १ ओंजळ शेवग्याची ताजी गडद हिरवी पाने, १ वाटी तुरडाळ, १ कांदा, खाद्य तेल, चवीपुरते तिखट-मीठ, मोहरी, ७-८ पाकळ्या लसूण

कृती – एकदम सोप्पीय, डाळ-मेथीची भाजी करतात तशीच फक्त मेथीऐवजी शेवग्याची पाने वापरावीत.

१) शेवग्याच्या छोट्या देठांसहित पाने खुडून घ्यावीत .
२) पाने चिरून तूर डाळीसहित कमी पाण्यात उकडून घ्यावीत.
३) नंतर जास्तीचे पाणी काढून कांदा मोहरी फोडणी द्यावी. त्यातच लसूण घालून लाल करावा.
४) तिखट मीठ टाकून भाजी परतून घ्यावी.
५) एक वाफ आणावी.
ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा गरम भातासोबत गरम गरम खाऊन घ्यावी.

या पोस्टमध्ये अभिजितच्या आजीचा तर फोटो आहेच. शिवाय अभिजितच्या बायकोनं नंतर पुण्यात केलेल्या भाजीचे फोटोही आहेत.
तेव्हा करून बघा. कशी झाली तेही नक्की कळवा.

सायली राजाध्यक्ष