प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक

प्रवास करताना अनेकांना एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे प्रवासात खायला मिळणारे वेगळे पदार्थ. काही लोक तर केवळ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी प्रवास करत असतात. पण प्रवासात काही लोकांची खाण्याची अडचण होते. विशेषतः कुणी जर शाकाहारी असेल तर परदेशात फिरताना अशा लोकांची अडचण होऊ शकते. ब-याच देशांमध्ये शाकाहारी जेवणाची संकल्पनाच नसते, मग अशा ठिकाणी शाकाहारी लोकांची पंचाईत होते.

२०१३ मध्ये आम्ही दहाजण स्पेनला गेलो होतो. त्यातल्या आम्ही दोघीजणी शाकाहारी होतो. पण काही ठिकाणी शाकाहारी म्हणजे काय हे हॉटेलमध्ये समजावून सांगताना नाकी नऊ आले होते.

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मानसी विजया हिनं मला इनबॉक्समध्ये याबद्दलच कळवलं आहे. मानसीचं कुटुंब दाक्षिणात्य असून शाकाहारी आहे. ती आणि तिचे कुटुंबीय मे महिन्यात युरोपला जाणार आहेत. तर या प्रवासात सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर खायला काय नेता येईल तसंच जर बरोबर इलेक्ट्रिक कुकर असेल तर हॉटेल रूममध्ये काय काय करता येईल याबद्दल लिहाल का असं मानसीनं मला विचारलं आहे. तेव्हा आजची पोस्ट खास मानसीसाठी.

युरोपमध्ये मेमध्येही ब-यापैकी थंड वातावरण असतं. शिवाय तिथे आपल्याइतके बॅक्टेरिया नसल्यानं पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच पदार्थ नेता येतील. मानसीची ट्रिप आहे दहा दिवसांची. तिला सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर नेलेले पदार्थ खाता येतील. हे पदार्थ कुठले असू शकतात?

पहिल्या दिवशी खायला बरोबर जरा जास्त तेल लावून खमंग भाजलेले मेथी पराठे आणि रव्याचा सुकामेवा घालून केलेला, साजूक तूप घातलेला शिरा नेता येईल. दुस-या दिवशी खायला तिखटमिठाच्या किंवा साध्या ओवा-मिरं घालून केलेल्या पु-या नेता येतील. बरोबर सुक्या चटण्या, लोणचं असलं की एका वेळचं व्यवस्थित जेवण होऊ शकेल. या पु-या २-३ दिवस सहज टिकतात. त्यामुळे त्या किंवा पराठे परत तिस-या दिवशीही खाता येतील. शिराही २ दिवस नक्कीच टिकतो, त्यामुळे तोही खाता येईल. अशा प्रवासात बरोबर दाण्याची, तिळाची, खोब-याची चटणी तसंच एखादं लोणचं ठेवा. हे तुम्ही ब्रेडबरोबरही खाता येईल. शिवाय परदेशात उत्तम लोणी, चीज, जॅम मिळतं. हे सगळं तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता. परदेशात फळं तर खूप सुंदर मिळतात.

बरोबर जर लहानसा इलेक्ट्रिक कुकर नेलात तर काय काय पदार्थ करता येतील?

प्रवासाला निघण्याच्या काही दिवस आधी तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात धुवून घेऊन ती पंचावर टाकून चांगली वाळू द्या. नंतर कढईत मंद आचेवर भाजून घ्या. खूप लाल करू नका पण सळसळीत मोकळं होईल इतकं भाजा. ते थंड झालं की त्यात चवीप्रमाणे मीठ-हळद-जिरेपूड घाला. थोडे मिरेदाणे आणि लवंगा घाला. हे झिप लॉकच्या पिशवीत भरा. ऐनवेळी अडीच-तीनपट पाणी घालून शिजवा.

इलेक्ट्रिक कुकरमध्ये नुसता पुलावही करता येईल. त्यासाठी बासमती तांदूळ धुवून, पंचावर कोरडे करा. नंतर ते तुपावर हलके भाजून घ्या. त्यात रेडीमेड पुलाव मसाला घालून ठेवा. चवीनुसार मीठ घालून ठेवा. इलेक्ट्रिक कुकरला करताना त्यात बाजारातून मटार, गाजरं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या असं घालून शिजवा. उत्तम पुलाव होऊ शकतो.

उपमा हा असाच झटपट करता येण्याजोगा पदार्थ आहे. रवा कोरडा खमंग भाजून घ्या. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मोहरी-हिंग घाला. उडदाची डाळ घालून खमंग लाल करा. त्यात थोडे काजूचे तुकडे घाला. कढीपत्ता घालून तो चुरचुरीत कोरडा तळा. त्यातच जाडसर वाटलेलं आलं-मिरचीचं वाटण घालून चांगलं परता. त्यात रवा घाला. तोही खमंग भाजा. गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला. हे झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. ऐनवेळी अडीचपट पाणी घालून शिजवा.

असंच शि-याचंही करता येईल. आधी रवा कोरडा भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम, बेदाणे घालून परतून घ्या. मग रवा घाला. भाजलं गेलं की बंद करा. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे मिश्रण झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. करताना त्यात आवडीनुसार पाणी किंवा दूध आणि चवीनुसार साखर घाला.

नाचणीचं सत्व हे असंच बहुगुणी आणि पोटभरीचं आहे. नाचणीचं सत्व खाद्यपदार्थांच्या कुठल्याही दुकानात विकत मिळतं. हे नाचणीचं सत्व दूध घालून उकळा. त्यात साखर घाला. एक पोटभरीचा पदार्थ तयार होतो. अनेकदा हे सत्व साखर घातलेलंही मिळतं. किंवा जर गोड आवडत नसेल तर नाचणीच्या सत्वात योगर्ट घालूनही खाता येईल.

पिठांच्या दुकानांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचं पीठ तयार मिळतं. या ज्वारीच्या लाह्यांच्या पिठात साखर आणि दूध घालून फार मस्त लागतं. गोड आवडत नसेल तर दुकानातून प्लेन योगर्ट आणा आणि मीठ घालून खा. फ्लेवर वाढवायला त्यात ताजी फळं घालू शकता.

हे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.

दुपारी बाहेर फिरताना जर रेस्टॉरंटमध्ये एखादं थिक सूप मागवलंत तर पोटभर होतं. कारण बरोबर ब्रेड किंवा ब्रेडस्टिक्स असतातच. नाहीतर अनेक ठिकाणी पिझ्झा पीसेस मिळतात. ते घेता येतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः मेडिटेरेनियन देशांमध्ये फळांचे ताजे रस फार सुंदर मिळतात. ते प्याच.

एअर बीएनबीमध्ये राहात असाल तर मग रात्री परतताना तुम्ही बाजारातून हव्या त्या गोष्टी आणून लहानसा स्वयंपाकही करू शकता. नाहीतर मी वर जे झटपट पदार्थांचे पर्याय दिले आहेत तेही करू शकता. भारतात अनेक ठिकाणी आता रेडीमिक्स मिळतात. त्यात फक्त उकळतं पाणी घालून शिजवलं की काम होतं. तसं काही बरोबर कॅरी करू शकता. विशेषतः ज्या देशांमध्ये ऐन थंडीत प्रवास करता तिथे दिवसभर फिरल्यावर पायाचे तुकडे तर पडलेलेच असतात शिवाय थंडीमुळे संध्याकाळी परत जेवायला बाहेर पडावंसं वाटत नाही. तेव्हा असे काही पर्याय असलेले बरे असतात. किंवा म्हटलं तसं परततानाच पूर्वतयारीनं बरोबर काही घेऊन आलात तर मग फारशी तकतक होत नाही.

फक्त एक लक्षात घ्या. शाकाहारी किंवा मांसाहारी असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपल्या या निवडीचा इतरांना त्रास होता कामा नये. त्याचबरोबर आपण जे बघायला जातोय त्यात तिथली खाद्यसंस्कृती हाही एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आपल्याला चालतील, रूचतील असे पदार्थ आवर्जून खाऊन बघा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी पदार्थ खाऊन बघा. पण शाकाहारी पदार्थांमध्ये जे पर्याय मिळतील ते जरूर चाखून बघा. खुल्या मनानं खाऊन बघा.

प्रवास आपली जीवनदृष्टी समृद्ध करत असतो. तेव्हा प्रवासाला जाताना खुल्या मनानं जा आणि निर्भीडपणे अनुभव घ्या.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#प्रवासतयारी #प्रवासाचीतयारी #प्रवासातलेपदार्थ #सोपाप्रवास #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #अन्नहेचपूर्णब्रह्म #travelspecial #travelrecipes #simplerecipe #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

Advertisements