मटार-सोलाणे-रताळी कबाब

हिवाळ्यात सगळ्याच भाज्या चांगल्या मिळतात. पावसाळ्यात ताज्या मिळाल्या तरी त्यात पाणी, चिखल असतं. पण हिवाळ्यात तसं नसतं. पावसाळा संपलेला असतो. हवा चांगली असते त्यामुळे रसरशीत भाज्या मिळतात. मटारचे कोवळे पोपटी ढीग, गुलाबी रसरशीत गाजरं, पिवळीधमक लिंबं, ताज्या गवारीच्या-घेवड्याच्या शेंगा, बिनबियांची सुंदर जांभळ्या रंगाची वांगी असं सगळं दिसलं की काय घेऊ आणि काय नको असं होतं.

काल तसंच झालं, भाजीला गेले आणि भरमसाठ भाजी घेऊन आले. घरात आता आम्ही इनमिन तीन माणसं. शर्वरीला अनेक भाज्या आवडत नाहीत. पण भाज्या बघितल्या की मला राहावत नाही. मटार तर तसेच खूप खाल्ले जातात. त्यामुळे मटार आणलेच होते. त्याचबरोबर सोलाणे किंवा ओले हरभरेही आणले होते. सोलाण्यांची आमटी मला फार आवडते. त्यामुळे ती तर करायचीच होती. पण थोडे जास्त होते. रताळीही आणलेली होती. त्यामुळे या सगळ्यातून काय करता येईल असा विचार करत होते.

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

काल मी भरपूर मटार, थोडे सोलाणे आणि रताळी वापरून हे कबाब केले. अतिशय चवदार झाले होते. आज त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे.

मटार-सोलाणे-रताळ्याचे कबाब

साहित्य – ३ वाट्या ताजे कोवळे मटार, १ वाटी ताजे कोवळे सोलाणे, ३-४ रताळी उकडून किसलेली, ५-६ लसूण पाकळ्या-५-६ कमी तिखट हिरव्या मिरच्या-१ जुडी कोथिंबीर यांचं वाटण, १ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, परतण्यासाठी १ टीस्पून तेल, थोडं तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कृती –

१) एका कढईत १ टीस्पून तेल गरम करा. त्यात मटार आणि सोलाणे घाला. हलवून झाकण ठेवा आणि ५ मिनिटं वाफवून घ्या.

२) नंतर हे दाणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी हलकेच फिरवून घ्या. मिश्रण जाडंभरडं राहायला हवं, पेस्ट करायची नाहीये.

३) एका टोपल्यात हे मिश्रण, रताळ्याचा कीस, लसूण-मिरची-कोथिंबिरीचं वाटण, तिखट-मीठ-हळद आणि तीळ घाला.

IMG_20180109_161445

४) हे मिश्रण छान मळून घ्या. रताळ्यामुळे उत्तम बाइंडिंग होतं.

५) नंतर हातावर थापून लहान लहान गोल टिक्क्या किंवा कबाब करा.

६) नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून मंद आचेवर खमंग लाल होऊ द्या.  चटपटीत पुदिना चटणीबरोबर खा.

IMG_20180109_161954

इतक्या साहित्यात ४ लोकांसाठी कबाब होतात. साधारण लहान आकाराचे ३० कबाब होतील.

पुदिना चटणी – जितका पुदिना तितकीच कोथिंबीर घ्या. त्यात आवडीनुसार हिरव्या मिरच्या घाला. मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटा.

मी काल या कबाबांबरोबर क्रीम ऑफ टोमॅटो सूप केलं होतं. कबाब-चटणी आणि सूप हे उत्तम जेवण झालं. अजून पोटभरीचं करायचं असेल तर ब्रेडच्या स्लाइसला थोडं लोणी लावून खमंग भाजा. दोन स्लाइसमध्ये हे कबाब आणि कांद्याच्या रिंग्ज घाला. पुदिना चटणीबरोबर खा. उत्तम लागेल.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #मुंबईमसाला #healthiswealth #healthyliving #healthyeating #simplerecipe #healthyrecipe #mumbaimasala

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक

प्रवास करताना अनेकांना एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे प्रवासात खायला मिळणारे वेगळे पदार्थ. काही लोक तर केवळ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी प्रवास करत असतात. पण प्रवासात काही लोकांची खाण्याची अडचण होते. विशेषतः कुणी जर शाकाहारी असेल तर परदेशात फिरताना अशा लोकांची अडचण होऊ शकते. ब-याच देशांमध्ये शाकाहारी जेवणाची संकल्पनाच नसते, मग अशा ठिकाणी शाकाहारी लोकांची पंचाईत होते.

२०१३ मध्ये आम्ही दहाजण स्पेनला गेलो होतो. त्यातल्या आम्ही दोघीजणी शाकाहारी होतो. पण काही ठिकाणी शाकाहारी म्हणजे काय हे हॉटेलमध्ये समजावून सांगताना नाकी नऊ आले होते.

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मानसी विजया हिनं मला इनबॉक्समध्ये याबद्दलच कळवलं आहे. मानसीचं कुटुंब दाक्षिणात्य असून शाकाहारी आहे. ती आणि तिचे कुटुंबीय मे महिन्यात युरोपला जाणार आहेत. तर या प्रवासात सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर खायला काय नेता येईल तसंच जर बरोबर इलेक्ट्रिक कुकर असेल तर हॉटेल रूममध्ये काय काय करता येईल याबद्दल लिहाल का असं मानसीनं मला विचारलं आहे. तेव्हा आजची पोस्ट खास मानसीसाठी.

युरोपमध्ये मेमध्येही ब-यापैकी थंड वातावरण असतं. शिवाय तिथे आपल्याइतके बॅक्टेरिया नसल्यानं पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच पदार्थ नेता येतील. मानसीची ट्रिप आहे दहा दिवसांची. तिला सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर नेलेले पदार्थ खाता येतील. हे पदार्थ कुठले असू शकतात?

पहिल्या दिवशी खायला बरोबर जरा जास्त तेल लावून खमंग भाजलेले मेथी पराठे आणि रव्याचा सुकामेवा घालून केलेला, साजूक तूप घातलेला शिरा नेता येईल. दुस-या दिवशी खायला तिखटमिठाच्या किंवा साध्या ओवा-मिरं घालून केलेल्या पु-या नेता येतील. बरोबर सुक्या चटण्या, लोणचं असलं की एका वेळचं व्यवस्थित जेवण होऊ शकेल. या पु-या २-३ दिवस सहज टिकतात. त्यामुळे त्या किंवा पराठे परत तिस-या दिवशीही खाता येतील. शिराही २ दिवस नक्कीच टिकतो, त्यामुळे तोही खाता येईल. अशा प्रवासात बरोबर दाण्याची, तिळाची, खोब-याची चटणी तसंच एखादं लोणचं ठेवा. हे तुम्ही ब्रेडबरोबरही खाता येईल. शिवाय परदेशात उत्तम लोणी, चीज, जॅम मिळतं. हे सगळं तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता. परदेशात फळं तर खूप सुंदर मिळतात.

बरोबर जर लहानसा इलेक्ट्रिक कुकर नेलात तर काय काय पदार्थ करता येतील?

प्रवासाला निघण्याच्या काही दिवस आधी तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात धुवून घेऊन ती पंचावर टाकून चांगली वाळू द्या. नंतर कढईत मंद आचेवर भाजून घ्या. खूप लाल करू नका पण सळसळीत मोकळं होईल इतकं भाजा. ते थंड झालं की त्यात चवीप्रमाणे मीठ-हळद-जिरेपूड घाला. थोडे मिरेदाणे आणि लवंगा घाला. हे झिप लॉकच्या पिशवीत भरा. ऐनवेळी अडीच-तीनपट पाणी घालून शिजवा.

इलेक्ट्रिक कुकरमध्ये नुसता पुलावही करता येईल. त्यासाठी बासमती तांदूळ धुवून, पंचावर कोरडे करा. नंतर ते तुपावर हलके भाजून घ्या. त्यात रेडीमेड पुलाव मसाला घालून ठेवा. चवीनुसार मीठ घालून ठेवा. इलेक्ट्रिक कुकरला करताना त्यात बाजारातून मटार, गाजरं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या असं घालून शिजवा. उत्तम पुलाव होऊ शकतो.

उपमा हा असाच झटपट करता येण्याजोगा पदार्थ आहे. रवा कोरडा खमंग भाजून घ्या. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मोहरी-हिंग घाला. उडदाची डाळ घालून खमंग लाल करा. त्यात थोडे काजूचे तुकडे घाला. कढीपत्ता घालून तो चुरचुरीत कोरडा तळा. त्यातच जाडसर वाटलेलं आलं-मिरचीचं वाटण घालून चांगलं परता. त्यात रवा घाला. तोही खमंग भाजा. गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला. हे झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. ऐनवेळी अडीचपट पाणी घालून शिजवा.

असंच शि-याचंही करता येईल. आधी रवा कोरडा भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम, बेदाणे घालून परतून घ्या. मग रवा घाला. भाजलं गेलं की बंद करा. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे मिश्रण झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. करताना त्यात आवडीनुसार पाणी किंवा दूध आणि चवीनुसार साखर घाला.

नाचणीचं सत्व हे असंच बहुगुणी आणि पोटभरीचं आहे. नाचणीचं सत्व खाद्यपदार्थांच्या कुठल्याही दुकानात विकत मिळतं. हे नाचणीचं सत्व दूध घालून उकळा. त्यात साखर घाला. एक पोटभरीचा पदार्थ तयार होतो. अनेकदा हे सत्व साखर घातलेलंही मिळतं. किंवा जर गोड आवडत नसेल तर नाचणीच्या सत्वात योगर्ट घालूनही खाता येईल.

पिठांच्या दुकानांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचं पीठ तयार मिळतं. या ज्वारीच्या लाह्यांच्या पिठात साखर आणि दूध घालून फार मस्त लागतं. गोड आवडत नसेल तर दुकानातून प्लेन योगर्ट आणा आणि मीठ घालून खा. फ्लेवर वाढवायला त्यात ताजी फळं घालू शकता.

हे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.

दुपारी बाहेर फिरताना जर रेस्टॉरंटमध्ये एखादं थिक सूप मागवलंत तर पोटभर होतं. कारण बरोबर ब्रेड किंवा ब्रेडस्टिक्स असतातच. नाहीतर अनेक ठिकाणी पिझ्झा पीसेस मिळतात. ते घेता येतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः मेडिटेरेनियन देशांमध्ये फळांचे ताजे रस फार सुंदर मिळतात. ते प्याच.

एअर बीएनबीमध्ये राहात असाल तर मग रात्री परतताना तुम्ही बाजारातून हव्या त्या गोष्टी आणून लहानसा स्वयंपाकही करू शकता. नाहीतर मी वर जे झटपट पदार्थांचे पर्याय दिले आहेत तेही करू शकता. भारतात अनेक ठिकाणी आता रेडीमिक्स मिळतात. त्यात फक्त उकळतं पाणी घालून शिजवलं की काम होतं. तसं काही बरोबर कॅरी करू शकता. विशेषतः ज्या देशांमध्ये ऐन थंडीत प्रवास करता तिथे दिवसभर फिरल्यावर पायाचे तुकडे तर पडलेलेच असतात शिवाय थंडीमुळे संध्याकाळी परत जेवायला बाहेर पडावंसं वाटत नाही. तेव्हा असे काही पर्याय असलेले बरे असतात. किंवा म्हटलं तसं परततानाच पूर्वतयारीनं बरोबर काही घेऊन आलात तर मग फारशी तकतक होत नाही.

फक्त एक लक्षात घ्या. शाकाहारी किंवा मांसाहारी असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपल्या या निवडीचा इतरांना त्रास होता कामा नये. त्याचबरोबर आपण जे बघायला जातोय त्यात तिथली खाद्यसंस्कृती हाही एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आपल्याला चालतील, रूचतील असे पदार्थ आवर्जून खाऊन बघा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी पदार्थ खाऊन बघा. पण शाकाहारी पदार्थांमध्ये जे पर्याय मिळतील ते जरूर चाखून बघा. खुल्या मनानं खाऊन बघा.

प्रवास आपली जीवनदृष्टी समृद्ध करत असतो. तेव्हा प्रवासाला जाताना खुल्या मनानं जा आणि निर्भीडपणे अनुभव घ्या.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#प्रवासतयारी #प्रवासाचीतयारी #प्रवासातलेपदार्थ #सोपाप्रवास #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #अन्नहेचपूर्णब्रह्म #travelspecial #travelrecipes #simplerecipe #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

जागतिक मधुमेह दिन

या आठवड्यात खाद्यप्रेमींनी लक्षात घ्यावेत असे दोन दिवस आहेत. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. तर आज म्हणजे १६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय फास्ट फूड दिवस म्हणून पाळला जातो. हे दोन्ही दिवस परस्परविरोधी गोष्टींसाठी पाळले जातात. मधुमेह टाळायचा असेल तर फास्ट फूड टाळणं हिताचं असतं. पण त्याचबरोबर जिभेची आवड पुरवायची असेल तर फास्ट फूड खाल्लं जातंच.

मधुमेह हा एक दबक्या पावलांनी येणारा आजार आहे. मधुमेहाचा एक प्रकार हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आहे. मधुमेहाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. टाइप १ मधुमेह. या प्रकारात शरीरात चयापचयासाठी आवश्यक अशा इन्सुलिनची निर्मितीच होत नाही. स्वादुपिंड किंवा पॅनक्रिआ ही ग्रंथी शरीरात इन्सुलिनची निर्मिती करत असते. पण काही कारणांनी जेव्हा ही निर्मिती होत नाही तेव्हा मधुमेह उद्भवतो. या प्रकारात इन्सुलिन टोचून घेणं गरजेचं ठरतं. या आजारात शरीरातल्या साखरेकडे सतत लक्ष ठेवून इन्सुलिनचा डोस कमीजास्त करावा लागतो.

टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीमुळे उद्भवणारा आजार आहे. तो टाळता येऊ शकतो. हा मधुमेह कशामुळे होतो? तर हा मधुमेह बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जंक फूडचं सेवन, वाढलेलं वजन यामुळे होतो. टाइप १ मधुमेह टाळता येत नाही. त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू. पण हा प्रकार टाळणं सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल मी आज या पोस्टमध्ये सांगणार आहे.

वर म्हटलं तसं बैठी आणि आळशी जीवनशैली ही याला कारणीभूत असते. तेव्हा सगळ्यात आधी जितकं शक्य आहे तितकं सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. जी-जी कामं चालत जाऊन करता येऊ शकतात ती वाहन न घेता चालत जाऊन करा. शक्य तितके जिने चढा आणि उतरा. व्यायामाचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार म्हणजे चालणं आहे. आणि चालणं हे कुठल्याही वयात सहज करता येईल असा व्यायाम प्रकार आहे. गती आणि अंतर आपापल्या क्षमतेपेक्षा कमीजास्त करता येऊ शकतं. पन्नाशीपर्यंतच्या आणि कुठलेही मोठे आजार नसलेल्या माणसांना रोज ५ किलोमीटर चालणं सहज शक्य आहे. यातही तुम्ही सकाळी अर्धं आणि संध्याकाळी अर्धं असं करू शकता. किंवा दिवसभरात १०-१० मिनिटं तीन-चारदा चालू शकता. थोडक्यात हे करणं अगदीच सोपं आहे. जे लोक दिवसभर कामासाठी बाहेर असतात ते ऑफिसमध्ये वेळ काढून चालू शकतात किंवा ऑफिसहून येताना वाहन अर्ध्यावर सोडून चालत येऊ शकतात.

चालण्याशिवाय धावणं, पोहणं, नाचणं, सायकल चालवणं यासारखे हृदयाला व्यायाम देणारे म्हणजे एरोबिक व्यायामप्रकार मधुमेह टाळण्यासाठी आणि झाला असेल तर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. रोज आपण किती व्यायाम करतो याची नोंद टेवण्यासाठी मोबाईलवर अनेक apps उपलब्ध आहेत. त्यांच्यावर आपण रोजची नोंद सहज ठेवू शकतो. शिवाय चालताना निसर्गाचा फार मोठा आनंद मिळतो.

मी स्वतः गेली अनेक वर्षं म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून नियमितपणे चालते. औरंगाबादच्या आमच्या घरापासून विद्यापीठ साधारण ६ किलोमीटर दूर होतं. मी अनेकदा एकटी मजेत चालत यायचे. लग्नानंतर साधारण २००० च्या सुमाराला निरंजनला कोलेस्टरॉल डिटेक्ट झालं. त्यानंतर रोज चालायला जायला लागलो. तरी २००३ मध्ये निरंजनची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र आम्ही जीवनशैली फारच बदलली. आता भरपूर चालणं हा आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे.

माझ्या आईच्या माहेरी डायबेटिसची स्ट्राँग हिस्टरी आहे. माझ्यातही ते जीन्स असणारच. होणं न होणं आपल्या हातात नसतं. पण मी तो होणं लांबवू शकते किंवा झालाच तर नियंत्रणात ठेवू शकते. सध्या मी दिवसाला ६-७ किलोमीटर चालण्याचा प्रयत्न करते. सकाळी वॉकला निघाल्यावर ५ किलोमीटर आणि जमल्यास परत संध्याकाळी थोडं चालतेच.

टाइप २ मधुमेह होण्यात जंक फूडचा मोठा हात आहे. जंक फूड किंवा फास्ट फूड ही पहिल्या महायुदधानंतर जगाला मिळालेली देणगी आहे. रस्ता प्रवासात पटकन हातात घेऊन खाता येईल अशा पदार्थांचा विचार या काळात केला गेला. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार होता हॅम्बर्गर किंवा बर्गर. नंतर नंतर या प्रकारानं इतका जोर धरला की गेल्या काही वर्षांत जंक फूडचा प्रसार रोखण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था सरसावल्या आहेत. मुलांना शाळेच्या डब्यात घरी केलेले पदार्थच द्यावेत. छोट्या सुटीच्या टिफिनमध्ये फळं किंवा काकडी गाजरासारख्या कच्च्या भाज्या द्याव्यात अशी सक्ती अनेक शाळा करताना दिसतात.

फास्ट फूड डे हा खरंतर आपल्या आवडीचं फास्ट फूड खाऊन साजरा केला जातो. पण आपण असं करायला काय हरकत आहे की या दिवसाचं स्मरण म्हणून महिन्यातल्या फक्त दर १६ तारखेला आपल्या आवडीचं फास्ट फूड खायचं पण इतर दिवशी मात्र सकस, आरोग्यदायी अन्न खायचं. फास्ट फूडमध्ये काय काय येतं? तर फास्ट फूडमध्ये बर्गर, चिप्स, वेफर्स, नूडल्स असे पदार्थ येतात.

घरी स्वयंपाक केला तर आपल्या सोयीनं आपण या पदार्थांमध्ये काही बदल करून ते जास्तीत जास्त आरोग्यदायी बनवू शकतो. जसं की पावभाजी करताना खूप जास्त बटाटा घालण्याऐवजी त्यात फ्लॉवर, वाटाणा, टोमॅटोबरोबर थोडं गाजर-फरसबी अशा भाज्या वापरू शकतो. मॅश केल्यानं आणि पावभाजी मसाल्याच्या स्वादामुळे या भाज्या वापरल्याचं लक्षातही येत नाही. किंवा नूडल्स करताना नूडल्सच्या बरोबरीनं भाज्या घातल्या तर ते मस्तच लागतात. मॅगीसारखे रेडीमेड मसाले असलेले नूडल्स वापरण्याऐवजी जर तुम्ही साधे नूडल्स विकत आणले आणि त्यात भाज्या घातल्यात तर उत्तम नूडल्स होतात. तसंच पास्ता करतानाही त्यात ब्रोकोली,फ्लॉवर,गाजर,कॉर्न,मश्रूम्स अशा भरपूर भाज्या घातल्यात आणि वर चीज घातलंत, व्हाईट सॉससाठी मैद्याऐवजी कणीक वापरलीत तर पास्ता छानच बनतो. रेडीमेड सॉसऐवजी घरी टोमॅटो सॉस करून पिझ्झा बनवलात, त्यावर सिमला मिरची, बेबीकॉर्न, टोमॅटो, ऑलिव्ह घातलेत, वरून चीज घालून तो साध्या तव्यावर खरपूस भाजलात तर उत्तम पिझ्झा होतो.

नेहमी जर असं केलंत तर सिनेमाला गेल्यावर एखादा समोसा खाल्लात किंवा एखादं लहान फ्राइजचं पॅकेट खाल्लंत तर काहीच हरकत नाही.

रोजचा आहार आरोग्यदायी करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं?

रोज साधा पण ताजा स्वयंपाक करा. जेवणात भरपूर भाज्यांचा, कडधान्यांचा, डाळींचा, वेगवेगळ्या धान्यांचा वापर करा. जसं की जेवणाआधी एखादी काकडी-गाजर खाण्याची सवय लावून घ्या. (मधुमेह असलेल्यांनी डॉक्टरांना विचारून गाजर, बीट, कॉर्न खावं). रोजच्या दोन जेवणांपैकी एका जेवणात तरी उसळ ठेवाच. प्रत्येक जेवणात ताजी कोशिंबीर किंवा सॅलड ठेवाच. कोशिंबीर नेहमी ताजीच खा. उरली तर सरळ फेकून द्या. कच्च्या अन्नात जीवाणूंची वाढ लवकर होते त्यामुळे कधीही कच्चे पदार्थ जास्त वेळ ठेवू नका. आहारात आंबवलेले पदार्थ वापरा. इडली, डोसे करताना जास्त डाळी वापरा. गव्हाबरोबरच ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा धान्यांचा वापर करा. रोज किमान २-३ फळं चोथ्यासकट खा. फळांचे रस पिऊ नका. मधुमेह असलेल्यांनी आंबा, चिकू, सीताफळ, द्राक्षं अशी फळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खा. जेवणात दूध-दही-ताक यांचा समावेश करा. मांसाहारी पदार्थ करताना तेलाचा कमीत कमी वापर करा. शक्यतो बेकिंग, स्टीमिंग अशा पद्धती वापरा. पारंपरिक माशांची आमटी, पारंपरिक चिकन रस्सा करायला हरकत नाही. मटन, बीफ, पोर्क हे प्रमाणात, कधीतरीच खा.  गोड पदार्थ रोज खाऊ नका. विकतचे तर खाऊच नका. गोड पदार्थांचं तसंच जंक पदार्थांचं व्यसन लागू शकतं.  गोड फारच खावंसं वाटलं तर घरी केलेले खीर, गाजर हलवा, दुधी हलवा, श्रीखंड असे पदार्थ खा, पण तेही प्रमाणात खा. आईस्क्रीम, केक्स, पुडिंग असे पदार्थ क्वचितच खा. फार गोड खावंसं वाटलं तर खजूर, जर्दाळू, बेदाणे, मनुका असं काहीतरी खा.

पण जर एकदा मधुमेह झाला आणि तुम्ही तो नियंत्रणात ठेवला नाही तर मात्र तुमचं आयुष्य कठीण होतं. मधुमेह किडनी, डोळे, मज्जासंस्था यावर मोठा परिणाम करतो. त्यामुळे चाळीशीनंतर दर सहा महिन्यांनी मधुमेह तपासणी करायलाच हवी. ज्यांच्या घरात मधुमेहाची स्ट्राँग हिस्टरी आहे त्यांनी तर पंचविशीपासून तपासणी करावी. ही तपासणी अगदी स्वस्तात होते.

मधुमेह टाळायचा असेल किंवा नियंत्रित ठेवायचा असेल तर सक्रिय जीवनशैली, सकस आहार आणि पूरक व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. तो करणं अजिबात अवघड नाही हे स्वानुभवानं सांगते फक्त मनाचा निग्रह मात्र हवा.

मी आहारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञ नाही. हे मी सगळं कॉमन सेन्समधून लिहिलेलं आहे. ज्यांना कुठल्याही शारिरीक समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करू नका. या लेखातल्या मधुमेहाबद्दलच्या माहितीचा संदर्भ – विकीपीडिया

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #हेल्दीजीवनशैली #अन्नहेचपूर्णब्रह्म #साधीजीवनशैली #simpleliving #healthyliving #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

 

आंबट बटाटा

बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला. स्पॅनिश लोकांनी त्याचा जगभरात प्रसार केला. त्यानंतर बटाटा जगभरात इतका लोकप्रिय झाला की आज बहुसंख्य देशांच्या स्वयंपाकात बटाट्याला फार मानाचं स्थान आहे.
तुम्ही बघितलंत तर युरोपात तसंच जगात जिथे जिथे अति थंडी असते आणि त्यामुळे जिथे भाज्या अगदीच नगण्य उगवतात अशा देशांच्या जेवणात बटाटा असतोच असतो. याचं कारण अशा थंडीत भाज्या कमी उगवतात हे तर आहेच. पण थंडीत लागणारी ऊर्जा पुरवण्याचं काम बटाटा करतो.
बटाट्याचे तब्बल ५००० प्रकार आहेत. ७-८ प्रजातींपासून हे वेगवेगळे प्रकार तयार झालेले आहेत. बटाटा जमिनीखाली उगवतो. बटाट्याच्या झाडाला पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी अशी वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात. पांढ-या फुलांच्या झाडांच्या बटाट्याची साल पांढरट असते तर इतर रंगांच्या फुलांची साल गुलाबीसर रंगाची असते. आज जागतिक धान्य उत्पादनात मका, गहू आणि तांदळाच्या खालोखाल बटाट्याचा क्रमांक लागतो. भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे.
आपल्याकडे उपासाला बटाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तळलेला बटाटा तर फार म्हणजे फारच फर्मास लागतो. बटाटा वेफर्स हे एक वेडं खाणं आहे. एकदा खायला लागलो की थांबवताच येत नाही स्वतःला. बटाट्याच्या वेगवेगळ्या जातींचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर केला जातो. मॅकडोनल्ड्समधल्या फ्रेंच फ्राईजना तोड नाही याचं कारण यासाठी एका विशिष्ट प्रकारचा बटाटा वापरला जातो. कमीजास्त स्टार्चच्या प्रमाणानुसार त्या-त्या जातीपासून विशिष्ट पदार्थ बनवले जातात. आपणही भाजी चिकट झाली की म्हणतोच की नाही की बटाटा नवा आहे वाटतं.
तर आज मी या लाडक्या बटाट्याचीच एक रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी सारस्वतांची खासियत आहे. या भाजीचं नाव आहे आंबट बटाटा. खोब-याचं वाटण घातलेली तिखट-आंबट-गोड अशी रस्सा भाजी. ही रेसिपी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. त्या ही भाजी फार सुंदर करतात.

आंबट बटाटा

साहित्य – ४ मोठे बटाटे (साल काढून फ्रेंच फ्राइजच्या आकारात चिरलेले), दीड वाटी ओलं खोबरं-२ टीस्पून तिखट-१ टीस्पून मालवणी मसाला-अर्धा टीस्पून हळद (हे सगळं मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ (किंवा थोडी चिंच वाटण मसाल्यातच वाटा), लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मेथी दाणे, मीठ चवीनुसार

कृती –
१) एका कढईत तेल गरम करा. त्यात मेथी दाणे आणि हळद घाला.
२) मेथी दाणे लाल झाले की बटाटा घाला. झाकण ठेवून किंचित वाफ द्या.
३) नंतर त्यात कपभर गरम पाणी घाला, मीठ घाला आणि झाकण ठेवून गॅस बारीक करा.
४) बटाटा शिजत आला की त्यात वाटण, चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. ते सगळं नीट एकत्र करून चव बघा.
५) आपल्याला हव्या त्या चवीचं प्रमाण वाढवा. कारण ही भाजी तिखट-आंबट-गोड अशी हवी.

photo 4 (2)

गरमागरम पोळ्या किंवा गरमागरम भाताबरोबर ही भाजी खा. बरोबर एखादी सुकी भाजी, मठ्ठा किंवा सोलकढी आणि आवडत असतील तर तळलेले मासे असा बेत करा.
इतक्या साहित्यात ४ जणांसाठी भाजी होते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#साधीरेसिपी #सोपीरेसिपी #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #मराठीपदार्थ#सारस्वतीपदार्थ #सारस्वतीखासियत #रोजचास्वयंपाक #रोजचेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म#simplerecipe #marathirecipe #saraswatdelicacy #saraswatrecipe#healthiswealth #healthycooking #everydaycooking #everydayrecipe#traditionalmaharashtrianrecipe #traditionalcooking #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

photo 1 (2)

हेल्थ इज वेल्थ

15027976_612960678910655_3948258700166116713_n

कशी झाली सगळ्यांची दिवाळी? मस्तच झाली असेल ना? माझीही दिवाळी मस्त झाली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचा सहवास, खुसखुशीत फराळ, खूपसे दिवाळी अंक, शांतपणे तेवत असलेले भरपूर दिवे, दारात छानशी रांगोळी, उत्तम खाणं-पिणं आणि मुख्य म्हणजे सगळे ताणतणाव दूर सारून निवांत होणं हे सगळं म्हणजेच माझ्यासाठी दिवाळी. आणि हे सगळं मी छानपैकी अनुभवलं.
त्याआधी महिनाभर अंकाची खूप गडबड होती. रात्रंदिवस काम होतं. त्यामुळे कायम कॉम्प्युटरला चिकटलेले होते. यावर्षी दिवाळीचा फराळही माझ्या कामवाल्या मुलींनीच केला. पण नंतर दिवाळीच्या आदल्या दिवशी मी खूपशी फुलं आणली, ती छान लावून ठेवली, घरभर पणत्या ठेवल्या, खिडक्यांमध्ये आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा लावल्या आणि वातावरणच बदलून गेलं. एकदम प्रसन्न वाटायला लागलं.
दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड खाणं झालंय. चकल्या, बेसनाचे लाडू आणि येताजाता चिवडा सुरूच होतं. शिवाय वर्षभरात जे तळलेलं फारसं केलं जातं नाही तेही खाल्लं. म्हणजे एक दिवस वडा सांबार झालं, अळूवड्या झाल्या, दहीवडे झाले. एकूण काय तर जीवाची मौज केली. महिनाभर एकाजागी बसून केलेलं काम, वाढतं वय आणि अरबट चरबट खाणं या सगळ्यामुळे वजन वाढलं आहे. आणि आता ते कमी करायचं आहे. दोन महिन्यात निदान ५ किलो वजन कमी करायचं आहे.

अन्न हेच पूर्णब्रह्मच्या एका मैत्रिणीनं डाएटला चालतील अशा रेसिपीज सुचवायला सांगितलं आहे. मी आहारतज्ज्ञ नाही किंवा या विषयातला माझा अभ्यासही नाही. पण मी जे काही वाचून आणि अनुभवातनं शिकले आहे त्यानुसार मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यायाम आणि तोंडावर ताबा अशा दोन गोष्टी अमलात आणल्या, अर्थात नॉर्मल परिस्थितीत ( म्हणजे थायरॉइड किंवा औषधाचे दुष्परिणाम असतील किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर काहीच करता येत नाही) तर वजन कमी करता येतंच. त्यामुळे मी आजपासून थोडंसं डाएट करणार आहे. ४५ मिनिटं वॉक तर रोज घेतेच, पण जमल्यास संध्याकाळीही ३० मिनिटं चालण्याचा प्रयत्न करणार आहे.

मी माझ्या डाएटमध्ये काय करणार आहे? –
१) तळलेले आणि गोड पदार्थ बंद करणार आहे. रोज किमान ७-८ मोठे ग्लास पाणी पिणार आहे.
२) रोज निदान ३ फळं खाणार आहे. रोज निदान २ काकड्या आणि २ गाजरं कच्ची खाणार आहे.
३) रात्रीच्या जेवणात एक मोठा बोलभर सूप रोज घेणार आहे.
४) रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण संपवणार आहे.
५) सकाळच्या जेवणात १ मोठी पोळी आणि भरपूर भाज्या, कोशिंबीर आणि डाळ किंवा उसळ खाणार आहे. हे सगळं बनवण्यासाठी कमीतकमी तेलाचा वापर करणार आहे.
६) भरपूर नाश्ता, मध्यम जेवण आणि पुरेसं रात्रीचं जेवण असं घेणार आहे.
७) रोज निदान १ तास चालण्याचा प्रयत्न करणार आहे. आठवड्यातून तीनदा योगासनांना जाणार आहे (योगासनांनी वजन कमी होत नाही. फक्त स्ट्रेचिंग,बेंडिंग आणि टोनिंग होतं.)
८) आठवड्यातून फार तर फार एकदाच बाहेर खाणार आहे, शक्यतो न खाण्याचा प्रयत्न करणार आहे.
९) मी रोज निदान ७ तास झोपतेच. ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करणार आहे.
१०) आणि तुम्हाला वेळोवेळी याचा फीडबॅक देणार आहे, म्हणजे माझ्यावरही तुमचा वचक राहील.

तुमच्यापैकी कुणाला हे फॉलो करायचं असेल तर यात त्रास होईल असं काहीही नाहीये. फक्त तुम्हाला डायबेटिस किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.

चला तर मग आजपासून पुढचे दोन महिने हेल्दी होण्याचा प्रयत्न करूया. याचा अर्थ आपलं मन मारून सगळं करा असा अजिबात नाही. कधीतरी आपल्या मनासारखं खायला काहीच हरकत नाही. फक्त ते खाताना किती प्रमाणात आणि किती वेळा खातोय याचा विचार मात्र करा. माझ्या एकूण हेल्थ प्लॅनबद्दल मी आठवड्यातून एकदा लिहिणार आहे आणि एकदा नेहमीची पोस्ट करणार आहे. हेल्थ प्लॅनच्या पोस्टमध्ये मी एखादी हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. आवडेल का तुम्हाला असं? जरूर कळवा.

#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्दीडाएट #अन्नहेचपूर्णब्रह्मडाएट #मुंबईमसाला #Healthiswealth#Mumbaimasala #हेल्थरेसिपीज #हेल्दीरेसिपीज

सायली राजाध्यक्ष