मटार-सोलाणे-रताळी कबाब

हिवाळ्यात सगळ्याच भाज्या चांगल्या मिळतात. पावसाळ्यात ताज्या मिळाल्या तरी त्यात पाणी, चिखल असतं. पण हिवाळ्यात तसं नसतं. पावसाळा संपलेला असतो. हवा चांगली असते त्यामुळे रसरशीत भाज्या मिळतात. मटारचे कोवळे पोपटी ढीग, गुलाबी रसरशीत गाजरं, पिवळीधमक लिंबं, ताज्या गवारीच्या-घेवड्याच्या शेंगा, बिनबियांची सुंदर जांभळ्या रंगाची वांगी असं सगळं दिसलं की काय घेऊ आणि काय नको असं होतं.

काल तसंच झालं, भाजीला गेले आणि भरमसाठ भाजी घेऊन आले. घरात आता आम्ही इनमिन तीन माणसं. शर्वरीला अनेक भाज्या आवडत नाहीत. पण भाज्या बघितल्या की मला राहावत नाही. मटार तर तसेच खूप खाल्ले जातात. त्यामुळे मटार आणलेच होते. त्याचबरोबर सोलाणे किंवा ओले हरभरेही आणले होते. सोलाण्यांची आमटी मला फार आवडते. त्यामुळे ती तर करायचीच होती. पण थोडे जास्त होते. रताळीही आणलेली होती. त्यामुळे या सगळ्यातून काय करता येईल असा विचार करत होते.

रताळी आणली की ती मी उकडून ठेवायला सांगते. येताजाता खायला छान लागतात. तशी ती काल उकडून ठेवलेली होती. माझ्या डोक्यात हराभरा कबाब किंवा टिक्की करावं असं आलं. रात्रीच्या जेवणाला हेच करू आणि बरोबर एखादं सूप असं ठरवलं. बाहेर हॉटेलमध्ये आपण जो हराभरा कबाब खातो त्यात पालक असतो पण बरोबर कॉर्नफ्लोर किंवा आरारूट असतं. मला असं काही वापरायचं नव्हतं. शिवाय मी मैदा जवळपास वापरतच नाही. मला ब्रेड किंवा बटाटाही वापरायचा नव्हता. मला स्वतःला खूप मसाले वापरून मूळ पदार्थाची चव मारायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मसालाही अगदी कमी वापरलाय.

काल मी भरपूर मटार, थोडे सोलाणे आणि रताळी वापरून हे कबाब केले. अतिशय चवदार झाले होते. आज त्याचीच रेसिपी शेअर करणार आहे.

मटार-सोलाणे-रताळ्याचे कबाब

साहित्य – ३ वाट्या ताजे कोवळे मटार, १ वाटी ताजे कोवळे सोलाणे, ३-४ रताळी उकडून किसलेली, ५-६ लसूण पाकळ्या-५-६ कमी तिखट हिरव्या मिरच्या-१ जुडी कोथिंबीर यांचं वाटण, १ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, परतण्यासाठी १ टीस्पून तेल, थोडं तेल शॅलो फ्राय करण्यासाठी

कृती –

१) एका कढईत १ टीस्पून तेल गरम करा. त्यात मटार आणि सोलाणे घाला. हलवून झाकण ठेवा आणि ५ मिनिटं वाफवून घ्या.

२) नंतर हे दाणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी हलकेच फिरवून घ्या. मिश्रण जाडंभरडं राहायला हवं, पेस्ट करायची नाहीये.

३) एका टोपल्यात हे मिश्रण, रताळ्याचा कीस, लसूण-मिरची-कोथिंबिरीचं वाटण, तिखट-मीठ-हळद आणि तीळ घाला.

IMG_20180109_161445

४) हे मिश्रण छान मळून घ्या. रताळ्यामुळे उत्तम बाइंडिंग होतं.

५) नंतर हातावर थापून लहान लहान गोल टिक्क्या किंवा कबाब करा.

६) नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून मंद आचेवर खमंग लाल होऊ द्या.  चटपटीत पुदिना चटणीबरोबर खा.

IMG_20180109_161954

इतक्या साहित्यात ४ लोकांसाठी कबाब होतात. साधारण लहान आकाराचे ३० कबाब होतील.

पुदिना चटणी – जितका पुदिना तितकीच कोथिंबीर घ्या. त्यात आवडीनुसार हिरव्या मिरच्या घाला. मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक वाटा.

मी काल या कबाबांबरोबर क्रीम ऑफ टोमॅटो सूप केलं होतं. कबाब-चटणी आणि सूप हे उत्तम जेवण झालं. अजून पोटभरीचं करायचं असेल तर ब्रेडच्या स्लाइसला थोडं लोणी लावून खमंग भाजा. दोन स्लाइसमध्ये हे कबाब आणि कांद्याच्या रिंग्ज घाला. पुदिना चटणीबरोबर खा. उत्तम लागेल.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #मुंबईमसाला #healthiswealth #healthyliving #healthyeating #simplerecipe #healthyrecipe #mumbaimasala

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष

Advertisements

प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक

प्रवास करताना अनेकांना एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे प्रवासात खायला मिळणारे वेगळे पदार्थ. काही लोक तर केवळ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी प्रवास करत असतात. पण प्रवासात काही लोकांची खाण्याची अडचण होते. विशेषतः कुणी जर शाकाहारी असेल तर परदेशात फिरताना अशा लोकांची अडचण होऊ शकते. ब-याच देशांमध्ये शाकाहारी जेवणाची संकल्पनाच नसते, मग अशा ठिकाणी शाकाहारी लोकांची पंचाईत होते.

२०१३ मध्ये आम्ही दहाजण स्पेनला गेलो होतो. त्यातल्या आम्ही दोघीजणी शाकाहारी होतो. पण काही ठिकाणी शाकाहारी म्हणजे काय हे हॉटेलमध्ये समजावून सांगताना नाकी नऊ आले होते.

अन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मानसी विजया हिनं मला इनबॉक्समध्ये याबद्दलच कळवलं आहे. मानसीचं कुटुंब दाक्षिणात्य असून शाकाहारी आहे. ती आणि तिचे कुटुंबीय मे महिन्यात युरोपला जाणार आहेत. तर या प्रवासात सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर खायला काय नेता येईल तसंच जर बरोबर इलेक्ट्रिक कुकर असेल तर हॉटेल रूममध्ये काय काय करता येईल याबद्दल लिहाल का असं मानसीनं मला विचारलं आहे. तेव्हा आजची पोस्ट खास मानसीसाठी.

युरोपमध्ये मेमध्येही ब-यापैकी थंड वातावरण असतं. शिवाय तिथे आपल्याइतके बॅक्टेरिया नसल्यानं पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच पदार्थ नेता येतील. मानसीची ट्रिप आहे दहा दिवसांची. तिला सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर नेलेले पदार्थ खाता येतील. हे पदार्थ कुठले असू शकतात?

पहिल्या दिवशी खायला बरोबर जरा जास्त तेल लावून खमंग भाजलेले मेथी पराठे आणि रव्याचा सुकामेवा घालून केलेला, साजूक तूप घातलेला शिरा नेता येईल. दुस-या दिवशी खायला तिखटमिठाच्या किंवा साध्या ओवा-मिरं घालून केलेल्या पु-या नेता येतील. बरोबर सुक्या चटण्या, लोणचं असलं की एका वेळचं व्यवस्थित जेवण होऊ शकेल. या पु-या २-३ दिवस सहज टिकतात. त्यामुळे त्या किंवा पराठे परत तिस-या दिवशीही खाता येतील. शिराही २ दिवस नक्कीच टिकतो, त्यामुळे तोही खाता येईल. अशा प्रवासात बरोबर दाण्याची, तिळाची, खोब-याची चटणी तसंच एखादं लोणचं ठेवा. हे तुम्ही ब्रेडबरोबरही खाता येईल. शिवाय परदेशात उत्तम लोणी, चीज, जॅम मिळतं. हे सगळं तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता. परदेशात फळं तर खूप सुंदर मिळतात.

बरोबर जर लहानसा इलेक्ट्रिक कुकर नेलात तर काय काय पदार्थ करता येतील?

प्रवासाला निघण्याच्या काही दिवस आधी तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात धुवून घेऊन ती पंचावर टाकून चांगली वाळू द्या. नंतर कढईत मंद आचेवर भाजून घ्या. खूप लाल करू नका पण सळसळीत मोकळं होईल इतकं भाजा. ते थंड झालं की त्यात चवीप्रमाणे मीठ-हळद-जिरेपूड घाला. थोडे मिरेदाणे आणि लवंगा घाला. हे झिप लॉकच्या पिशवीत भरा. ऐनवेळी अडीच-तीनपट पाणी घालून शिजवा.

इलेक्ट्रिक कुकरमध्ये नुसता पुलावही करता येईल. त्यासाठी बासमती तांदूळ धुवून, पंचावर कोरडे करा. नंतर ते तुपावर हलके भाजून घ्या. त्यात रेडीमेड पुलाव मसाला घालून ठेवा. चवीनुसार मीठ घालून ठेवा. इलेक्ट्रिक कुकरला करताना त्यात बाजारातून मटार, गाजरं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या असं घालून शिजवा. उत्तम पुलाव होऊ शकतो.

उपमा हा असाच झटपट करता येण्याजोगा पदार्थ आहे. रवा कोरडा खमंग भाजून घ्या. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मोहरी-हिंग घाला. उडदाची डाळ घालून खमंग लाल करा. त्यात थोडे काजूचे तुकडे घाला. कढीपत्ता घालून तो चुरचुरीत कोरडा तळा. त्यातच जाडसर वाटलेलं आलं-मिरचीचं वाटण घालून चांगलं परता. त्यात रवा घाला. तोही खमंग भाजा. गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला. हे झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. ऐनवेळी अडीचपट पाणी घालून शिजवा.

असंच शि-याचंही करता येईल. आधी रवा कोरडा भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम, बेदाणे घालून परतून घ्या. मग रवा घाला. भाजलं गेलं की बंद करा. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे मिश्रण झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. करताना त्यात आवडीनुसार पाणी किंवा दूध आणि चवीनुसार साखर घाला.

नाचणीचं सत्व हे असंच बहुगुणी आणि पोटभरीचं आहे. नाचणीचं सत्व खाद्यपदार्थांच्या कुठल्याही दुकानात विकत मिळतं. हे नाचणीचं सत्व दूध घालून उकळा. त्यात साखर घाला. एक पोटभरीचा पदार्थ तयार होतो. अनेकदा हे सत्व साखर घातलेलंही मिळतं. किंवा जर गोड आवडत नसेल तर नाचणीच्या सत्वात योगर्ट घालूनही खाता येईल.

पिठांच्या दुकानांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचं पीठ तयार मिळतं. या ज्वारीच्या लाह्यांच्या पिठात साखर आणि दूध घालून फार मस्त लागतं. गोड आवडत नसेल तर दुकानातून प्लेन योगर्ट आणा आणि मीठ घालून खा. फ्लेवर वाढवायला त्यात ताजी फळं घालू शकता.

हे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.

दुपारी बाहेर फिरताना जर रेस्टॉरंटमध्ये एखादं थिक सूप मागवलंत तर पोटभर होतं. कारण बरोबर ब्रेड किंवा ब्रेडस्टिक्स असतातच. नाहीतर अनेक ठिकाणी पिझ्झा पीसेस मिळतात. ते घेता येतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः मेडिटेरेनियन देशांमध्ये फळांचे ताजे रस फार सुंदर मिळतात. ते प्याच.

एअर बीएनबीमध्ये राहात असाल तर मग रात्री परतताना तुम्ही बाजारातून हव्या त्या गोष्टी आणून लहानसा स्वयंपाकही करू शकता. नाहीतर मी वर जे झटपट पदार्थांचे पर्याय दिले आहेत तेही करू शकता. भारतात अनेक ठिकाणी आता रेडीमिक्स मिळतात. त्यात फक्त उकळतं पाणी घालून शिजवलं की काम होतं. तसं काही बरोबर कॅरी करू शकता. विशेषतः ज्या देशांमध्ये ऐन थंडीत प्रवास करता तिथे दिवसभर फिरल्यावर पायाचे तुकडे तर पडलेलेच असतात शिवाय थंडीमुळे संध्याकाळी परत जेवायला बाहेर पडावंसं वाटत नाही. तेव्हा असे काही पर्याय असलेले बरे असतात. किंवा म्हटलं तसं परततानाच पूर्वतयारीनं बरोबर काही घेऊन आलात तर मग फारशी तकतक होत नाही.

फक्त एक लक्षात घ्या. शाकाहारी किंवा मांसाहारी असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपल्या या निवडीचा इतरांना त्रास होता कामा नये. त्याचबरोबर आपण जे बघायला जातोय त्यात तिथली खाद्यसंस्कृती हाही एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आपल्याला चालतील, रूचतील असे पदार्थ आवर्जून खाऊन बघा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी पदार्थ खाऊन बघा. पण शाकाहारी पदार्थांमध्ये जे पर्याय मिळतील ते जरूर चाखून बघा. खुल्या मनानं खाऊन बघा.

प्रवास आपली जीवनदृष्टी समृद्ध करत असतो. तेव्हा प्रवासाला जाताना खुल्या मनानं जा आणि निर्भीडपणे अनुभव घ्या.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#प्रवासतयारी #प्रवासाचीतयारी #प्रवासातलेपदार्थ #सोपाप्रवास #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #अन्नहेचपूर्णब्रह्म #travelspecial #travelrecipes #simplerecipe #healthiswealth #healthyliving #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

आंबट बटाटा

बटाटा ही जगातली सर्वाधिक लोकांची लाडकी भाजी. खरंतर ही भाजी नव्हे तर कंदमूळ आहे. पण आपल्याकडे बटाट्याची भाजी लोकप्रिय असल्यानं आपण त्याला भाजी म्हणतो. बटाटा मूळचा दक्षिण अमेरिकेतला. स्पॅनिश लोकांनी त्याचा जगभरात प्रसार केला. त्यानंतर बटाटा जगभरात इतका लोकप्रिय झाला की आज बहुसंख्य देशांच्या स्वयंपाकात बटाट्याला फार मानाचं स्थान आहे.
तुम्ही बघितलंत तर युरोपात तसंच जगात जिथे जिथे अति थंडी असते आणि त्यामुळे जिथे भाज्या अगदीच नगण्य उगवतात अशा देशांच्या जेवणात बटाटा असतोच असतो. याचं कारण अशा थंडीत भाज्या कमी उगवतात हे तर आहेच. पण थंडीत लागणारी ऊर्जा पुरवण्याचं काम बटाटा करतो.
बटाट्याचे तब्बल ५००० प्रकार आहेत. ७-८ प्रजातींपासून हे वेगवेगळे प्रकार तयार झालेले आहेत. बटाटा जमिनीखाली उगवतो. बटाट्याच्या झाडाला पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी अशी वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात. पांढ-या फुलांच्या झाडांच्या बटाट्याची साल पांढरट असते तर इतर रंगांच्या फुलांची साल गुलाबीसर रंगाची असते. आज जागतिक धान्य उत्पादनात मका, गहू आणि तांदळाच्या खालोखाल बटाट्याचा क्रमांक लागतो. भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे.
आपल्याकडे उपासाला बटाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तळलेला बटाटा तर फार म्हणजे फारच फर्मास लागतो. बटाटा वेफर्स हे एक वेडं खाणं आहे. एकदा खायला लागलो की थांबवताच येत नाही स्वतःला. बटाट्याच्या वेगवेगळ्या जातींचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर केला जातो. मॅकडोनल्ड्समधल्या फ्रेंच फ्राईजना तोड नाही याचं कारण यासाठी एका विशिष्ट प्रकारचा बटाटा वापरला जातो. कमीजास्त स्टार्चच्या प्रमाणानुसार त्या-त्या जातीपासून विशिष्ट पदार्थ बनवले जातात. आपणही भाजी चिकट झाली की म्हणतोच की नाही की बटाटा नवा आहे वाटतं.
तर आज मी या लाडक्या बटाट्याचीच एक रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी सारस्वतांची खासियत आहे. या भाजीचं नाव आहे आंबट बटाटा. खोब-याचं वाटण घातलेली तिखट-आंबट-गोड अशी रस्सा भाजी. ही रेसिपी मी माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. त्या ही भाजी फार सुंदर करतात.

आंबट बटाटा

साहित्य – ४ मोठे बटाटे (साल काढून फ्रेंच फ्राइजच्या आकारात चिरलेले), दीड वाटी ओलं खोबरं-२ टीस्पून तिखट-१ टीस्पून मालवणी मसाला-अर्धा टीस्पून हळद (हे सगळं मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्या. वाटताना पाण्याचा वापर करा.), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ (किंवा थोडी चिंच वाटण मसाल्यातच वाटा), लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मेथी दाणे, मीठ चवीनुसार

कृती –
१) एका कढईत तेल गरम करा. त्यात मेथी दाणे आणि हळद घाला.
२) मेथी दाणे लाल झाले की बटाटा घाला. झाकण ठेवून किंचित वाफ द्या.
३) नंतर त्यात कपभर गरम पाणी घाला, मीठ घाला आणि झाकण ठेवून गॅस बारीक करा.
४) बटाटा शिजत आला की त्यात वाटण, चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. ते सगळं नीट एकत्र करून चव बघा.
५) आपल्याला हव्या त्या चवीचं प्रमाण वाढवा. कारण ही भाजी तिखट-आंबट-गोड अशी हवी.

photo 4 (2)

गरमागरम पोळ्या किंवा गरमागरम भाताबरोबर ही भाजी खा. बरोबर एखादी सुकी भाजी, मठ्ठा किंवा सोलकढी आणि आवडत असतील तर तळलेले मासे असा बेत करा.
इतक्या साहित्यात ४ जणांसाठी भाजी होते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#साधीरेसिपी #सोपीरेसिपी #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #मराठीपदार्थ#सारस्वतीपदार्थ #सारस्वतीखासियत #रोजचास्वयंपाक #रोजचेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म#simplerecipe #marathirecipe #saraswatdelicacy #saraswatrecipe#healthiswealth #healthycooking #everydaycooking #everydayrecipe#traditionalmaharashtrianrecipe #traditionalcooking #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

photo 1 (2)

डाएटसाठी चालतील असे पदार्थ

15036719_615172132022843_1362274204576290416_n

मी गेल्या आठवड्यापासून थोडंसं विचारपूर्वक खायचं ठरवलं आहे. म्हणजे खरंतर मी कधीच फार बेजबाबदारपणे खात नाही. पण तरीही वाढत्या वयानुसार गेल्या वर्षभरात ५-६ किलोंची कमाई केली आहे. त्यातले निदान २-३ किलो कमी करावेत असा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून मी नियमितपणे, व्यवस्थित खाते आहे.

डाएटिंग करताना पाळण्याचा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीच क्रॅश डाएट करू नये. वजन खूप जास्त असेल आणि ते मनापासून कमी करण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही उत्तम. याचं कारण मनानं केलेल्या, इंटरनेटवर वाचून केलेल्या डाएटमुळे शरीराची हानी होण्याची शक्यता असते. शास्त्रशुद्ध माहिती नसताना आहारातून काही पदार्थ वगळले तर डेफिशिअन्सी होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचाच सल्ला घ्या. मी जे डाएट करते आहे ते मी फार विचारपूर्वक करते आहे. शिवाय मला फारसं वजन कमी करायचं नाहीये तर हेल्दी खायचं आहे. त्यामुळे मी इथे जे डाएट शेअर करते ते संदर्भासाठी वापरा. त्यात आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या शारीरिक समस्यांनुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बदल करा.
प्रत्येकाची शरीरप्रकृती वेगळी असते, प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात त्यामुळे सरसकट कुठलेच नियम सगळ्यांना लागू होत नाहीत.
आजची जी पोस्ट आहे त्यात मी काही हेल्दी रेसिपीज शेअर करणार आहे. गेल्या आठवड्याभरात मी जे पदार्थ खाते आहे त्यातल्या काही पदार्थांच्या अगदी सोप्या रेसिपीज शेअर करणार आहे.

चटपटे हरभरे किंवा चणे
साहित्य – १ वाटी भिजवून मऊ शिजवलेले हरभरे (हरभरे शिजवून त्यातलं पाणी गाळून घ्या. ते सूप किंवा आमटीत वापरा), १ लहान कांदा बारीक चिरलेला, १ लहान टोमॅटो बारीक चिरलेला, १-२ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार
कृती – हरभरे फ्रीजमध्ये मस्त थंड करा. त्यात सगळं साहित्य घाला. लगेचच खा.

15027563_615171985356191_1767573786615262550_n

कोबी आणि पपनस कोशिंबीर
साहित्य – २ वाट्या लांब पातळ चिरलेला कोबी, १ वाटी सोललेलं पपनस, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून जाड भरडलेले मिरी दाणे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15027976_612960678910655_3948258700166116713_n

मूग-काकडी-डाळिंब सॅलड
साहित्य – प्रत्येकी १ वाटी मूग आणि मध्यम आकारात चिरलेली काकडी, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, चवीनुसार मीठ आणि तिखट, थोडासा लिंबाचा रस
कृती – सगळं साहित्य एकत्र करा. लगेचच खा.

15107370_615172068689516_8505055392683547100_n

कुरमु-यांचा साधा चिवडा
साहित्य – पाव किलो कुरमुरे, अर्धी वाटी डाळं, हवे असल्यास अर्धी वाटी शेंगदाणे, भरपूर बारीक चिरलेला कढीपत्ता, २ टीस्पून लाल तिखट, १ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या (ऐच्छिक), मोहरी-हिंग-हळद
कृती – कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घाला. त्यातच दाणे घाला. सतत हलवत परता. लाल होत आले की त्यात डाळं घाला. डाळं लाल झालं की त्यात लसूण घालून लाल करा. नंतर त्यात कढीपत्ता घाला, हळद-तिखट-मीठ घाला. चांगलं हलवा आणि कुरमुरे घाला. व्यवस्थित एकत्र करा. गॅस बंद करा.

15094450_615172215356168_6926909106747496070_n

पुदिना पराठा आणि पुदिना चटणी
पराठा साहित्य – १ ते दीड वाटी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, १ मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला, २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, २-३ वाट्या कणीक, भाजण्यासाठी साजूक तूप, नसेल तर तेलही चालेल.
कृती – पुदिन्याची पानं, कांदा, मिरची आणि मीठ एकत्र करा. चांगलं मिसळलं की त्याला थोडं पाणी सुटेल. त्यात कणीक घाला. घट्ट मळून घ्या. नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडी घट्ट भिजवा. नेहमीसारखा पराठा लाटा. तव्यावर थोडंसं तूप लावून खमंग भाजा.
चटणी साहित्य – १ मध्यम आकाराची पुदिन्याची जुडी, त्याच्या अर्धी कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस, ४-५ हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार
कृती – पुदिना आणि कोथिंबीर निवडून, धुवून, नीट निथळून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरवर बारीक चटणी वाटा.
पराठा आणि चटणी खा.

15085531_615172092022847_8443951495275013912_n

पालक-बाजरी-नाचणी भाकरी
साहित्य – अर्धी जुडी पालक (निवडून, धुवून पाण्यात अर्धवट शिजवून घ्या. नंतर निथळा.), २ हिरव्या मिरच्या, ३-४ पाकळ्या लसूण, अंदाजे १ वाटी बाजरी आणि १ वाटी नाचणीचं पीठ (अंदाजे यासाठी की पालकाच्या मिश्रणात मावेल तसं पीठ घाला. बाजरी आणि नाचणी समप्रमाणात किंवा आवडीनुसार कमीजास्त करा.), किंचित मीठ
कृती – शिजवलेला पालक, मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात मावेल तसं पीठ घाला, चवीला किंचित मीठ घाला. पीठ चांगलं मळून नेहमीसारखी भाकरी करा. इतक्या साहित्यात मध्यम आकाराच्या ३-४ भाक-या होतात.

कांद्याच्या पातीचा घोळाणा
साहित्य – १ लहान जुडी कांद्याची पात (धुवून, कोरडी करून मध्यम आकारात चिरलेली, हवा असल्यास पातीचा कांदाही बारीक चिरा.) २ टीस्पून दाण्याचं कूट, अर्धा टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून तेल
कृती – चिरलेली कांद्याची पात आणि इतर साहित्य एकत्र करा. आवडत असल्यास लिंबाचा रस आणि साखरही घालू शकता.

15078638_615172168689506_7722971918702105799_n

हे पदार्थ करायला अतिशय सोपे आहेत. चवदार लागतात, करायला अतिशय कमी वेळ लागतो.

काही सोप्या टीप्स लक्षात ठेवा. हा कॉमन सेन्स आहे. जर नाश्त्याला पराठे, पोळी, भाकरी किंवा मिश्र पिठांची धिरडी असं खाल्लंत तर जेवताना उसळ किंवा घट्ट वरण खाच. मांसाहार करत असाल तर मासे आणि चिकन, अंडी खाऊ शकता. रोजच्या स्वयंपाकात एक पालेभाजी, एक फळभाजी, एक कडधान्य, एक डाळ वापराच. मांसाहारी असाल तर अर्थातच चिकन किंवा मासे. रेड मीट आणि शेलफिश (कोलंबी, कालवं, तिस-या) नेहमी खाऊ नये असं डॉक्टर सांगतात म्हणून मटन आणि शेलफिश क्वचित खा.

मला कुणीतरी प्रश्न विचारला होता की दुपारच्या जेवणात पोळी खाल्ली नाही तर अशक्तपणा येणार नाही का? तर त्या दिवशी मी नाश्त्याला २ पोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे जेवताना सॅलड, उसळ आणि ताक इतकं मला पुरे होतं. मी भातही पूर्ण बंद केलेला नाही. कारण मला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. पण तो मी अगदी कमी म्हणजे फक्त एक वाटी खाते. काल रात्री मी एक वाटीभर चण्याचं सॅलड आणि एक मोठा बोल पालकाचं सूप घेतलं तर तेवढं मला पुरेसं होतं. रात्री मी एक संत्रं आणि ३ मोठे खजूर खाल्ले.

हेल्दी राहाण्यासाठी भुकेलं राहू नका. पण भरमसाठ खाऊही नका. पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका. फळं, भाज्या, कोशिंबिरी, सॅलड्स, पनीर, प्रमाणात सुकामेवा, तेलबिया (शेंगदाणे, तीळ, सूर्यफूल), कडधान्यं, डाळी हे जास्त खा. ब्रेड, भाकरी, पोळी, भात हे कमी प्रमाणात खा पण पूर्ण बंदही करू नका. साखर आणि तेल (तूप, बटर, लोणी हेही) खूप कमी करा.
कायम मन मारून खाणं अशक्य आहे. अगदी कुठल्याही वयात अवघड आहे. त्यामुळे मध्यम मार्ग स्विकारणं हे सगळ्यात उत्तम. सगळं खा पण प्रमाणात खा. प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामाला पर्याय नाही. आठवड्यातून ५-६ दिवस व्यायाम कराच. मी आठवड्यातून ६ दिवस ४५ मिनिटं चालते आणि आठवड्यातून ३ दिवस १ तास योगासनं करते. व्यायाम हवाच हवा हे लक्षात घ्या.

So Happy Reading, happy Eating, Happy exercising!

सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.

#happyhealth #Healthiswealth #Healthyeating #dietplan #Mumbaimasala#हेल्दीखादेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #Exerciseisamust

सायली राजाध्यक्ष