चिवळीची भाजी

परवा भाजी मंडईत गेले तेव्हा माझ्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे फार भाज्या नव्हत्या. तो त्या दिवशी बाजारात गेलाच नव्हता. म्हणून जरा फिरत फिरत पुढे गेले. मंडईत बरेचसे भाजीवाले घाणेरड्या पाण्यात भाज्या बुडवून बाहेर काढतात. मी अशा भाजीवाल्यांकडून अजिबात भाजी घेत नाही. पुढे एक वसईवाली दिसली. तिच्याकडून काही भाजी घेतली. एकदम तिच्याकडे मला चिवळीची भाजी दिसली. घेऊनच टाकली.

चिवळीची भाजी बघितल्यावर मला बीडची मंडई आठवली. आजीबरोबर मंडईत फिरायचे ते आठवलं. तेव्हा बीडला या चिवळीच्या भाजीचे ढीग असायचे. केवळ त्या आठवणीसाठी आणि आजीच्या आठवणीसाठी लगेचच ही भाजी घेतली. अनेक वर्षांनी ही भाजी घेतल्यानं मला ती कशी करायची हे आठवेना. मग म्हटलं आईला विचारीन. पण मी या भाजीचा फोटो शेअर केला आणि या भाजीच्या अनेक रेसिपी मला मिळाल्या. त्यातल्याच एका रेसिपीनं मी भाजी केली.

IMG_20180221_110443

चिवळी ही घोळाच्या भाजीसारखीच असते. किंबहुना या भाजीला रानघोळ असंही म्हणतात. घोळाची भाजी थोडी जाड पानांची असते. गोलसर पानांची ही भाजी आंबट असते. लसणाची झणझणीत फोडणी घालून ती फार बहारदार लागते. चिवळीची भाजीही चवीला आंबट असते.

आजची रेसिपी आहे चिवळीच्या भाजीची.

चिवळीची भाजी

साहित्य – पाव किलो चिवळीची भाजी, अर्धा वाटी मूगडाळ भिजवलेली, २ कांदे मध्यम आकारात चिरलेले, ७-८ लसूण पाकळ्या-४-५ हिरव्या मिरच्यांचं वाटण, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग

IMG_20180221_110754

 

कृती –

१) चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. पण त्याची मूळं काढून टाका आणि फक्त कोवळे देठ ठेवा.

२) नंतर ही भाजी स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यावर जराशी कोरडी करून बारीक चिरून घ्या.

३) कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्या.

४) कांदा शिजत आला की लसूण-मिरचीचं वाटण घाला. ते परता.

५) खमंग वास आल्यावर हळद आणि मूगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या.

६) त्यात तिखट आणि मीठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा. मूगडाळ हलकी शिजवा फार गाळ करू नका.

ही भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी, एखादी खमंग चटणी, कच्चा कांदा आणि ताक असं बरोबर घेऊन खा. उत्तम लागते.

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

#साधीरेसिपी #सोपीरेसिपी #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #पारंपरिकरेसिपी #पारंपरिकमराठीपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #healthiswealth #healthyliving #traditionalrecipe #traditionalmarathirecipe #simplerecipe #mumbaimasala

सायली राजाध्यक्ष

Advertisements

हिवाळ्यातले पदार्थ – १

मुळात भाजी मंडईत गेलं की किती भाज्या घेऊ आणि किती नको असं होतं. विशेषतः हिवाळ्यात ताज्या रसरशीत भाज्यांचे ढीग बघितले की सगळंच घ्यावंसं वाटतं. हिवाळ्यात बहुतेक भाज्या मिळतात आणि त्याही ताज्या. नुकताच पाऊस होऊन गेलेला असतो त्यामुळे त्या पाण्याचा अंश जमिनीत असतो आणि पावसाळ्यात अति पाण्यानं भाज्या सडतात तसंही होत नाही.

हिवाळ्यात मिळणा-या भाज्यांचं काय काय करता येईल आणि जास्त भाज्या एकाच वेळी आणल्या तर त्या कशा संपवता येतील याबद्दल एक पोस्ट लिही असं माझी मैत्रीण शर्मिला हिनं सुचवलं आहे. त्यामुळे आजची ही पोस्ट शर्मिलाच्या फर्माइशीनुसार.

हिवाळ्यात गाजरं, फ्लॉवर, मटार या भाज्या तर सुरेख मिळतातच. त्यामुळे माझी सगळ्यात पहिली हिवाळी रेसिपी असते ती भाज्यांच्या लोणच्याची. हे लोणचं मी भरपूर करते आणि फ्रीजमध्ये ठेवते. शिवाय मी या लोणच्याला अजिबात तेल घालत नाही. या लोणच्याची रेसिपी अगदीच सोपी आहे. गाजरं, फ्लॉवर, मटार दाणे, ओली हळद-आंबे हळद, कमी तिखट हिरव्या मिरच्या, आवडत असेल तर अगदी कोवळी गवार आणि अगदी कोवळी कारली (आमच्या घरी गवार आणि कारली मी सोडले तर इतरांना आवडत नाही, त्यामुळे मी ते वापरत नाही) हे सगळं समप्रमाणात घेऊन बारीक चिरायचं, त्यात चवीनुसार केप्र किंवा बेडेकरचा कैरी लोणचं मसाला आणि मीठ घालायचं. जितकी भाजी असेल त्या प्रमाणात पुरेसं आंबट होईल इतपत लिंबाचा रस घालायचा. नीट कालवायचं आणि काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये टाकायचं.

photo 3
लोणच्यासाठी एकत्र केलेल्या भाज्या

मटारचं तर काय-काय करता येतं. मटारची साधी उसळ फार सोपी आहे. मात्र यासाठीचा मटार अगदी कोवळा, गोडसर हवा. तेलाची फोडणी करा. त्यात मोहरी-हिंग घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. तो गुलाबी झाला की थोडंसं आलं-ओल्या मिरचीचं वाटण घाला. त्यावर किंचीत हळद घाला. छान वास आला की त्यात मटार दाणे घालून दोन मिनिटं परता. त्यानंतर त्यात थोडं गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ, काळा मसाला घाला. चिमूटभर साखर घाला. मटार शिजत आले आणि पाणी आटत आलं की कोथिंबीर-ओलं खोबरं घाला. गॅस बंद करा. मटार पचपचीत शिजवू नका. किंवा फारही गाळ करू नका.

मटारची वाटणाची उसळ – भरपूर कोथिंबीर, ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि आलं (आवडत असल्यास थोडा लसूण) हे सगळं एकजीव वाटून घ्या. त्यात पाणी घालून सरबरीत वाटा. रंग हिरवागार यायला हवा. तेलाची फोडणी करा. हिंग-मोहरी-चिमूटभर हळद घाला. मटार घालून परता. किंचित पाणी घालून चांगली वाफ येऊ द्या. नंतर वाटण आणि मीठ घालून, हवा तितका रस्सा करून एक उकळी काढा.

मटार करंजी – यासाठी छान कोवळे मटार वापरा. करंजीच्या पारीसाठी मैदा, रवा समप्रमाणात घ्या. दोन्ही मिक्सरमधून फिरवून घ्या. फिरवताना त्यात थोडं तूप घाला. नंतर मीठ, ओवा, तीळ, थोडं मोहन घालून घट्ट भिजवा. सारणासाठी थोड्या तेलावर जिरं घालून मटार वाफवा. नंतर त्यात मिरची-लसणाचं वाटण घाला. तिखट-मीठ आणि भरपूर कोथिंबीर घाला. हे सारण घालून नेहमीसारख्या करंज्या करा.

मटार भात – एक वाटी तांदूळ असतील तर दीड वाटी कोवळे मटार, १ कांदा मध्यम आकारात चिरलेला आणि एक टोमॅटो मध्यम आकारात चिरलेला असं प्रमाण घ्या. तांदूळ तासभर आधी धुवून ठेवा. पाणी पूर्ण काढून ठेवा. करताना तांदळाला आपल्या आवडीप्रमाणे काळा मसाला चोळून घ्या. तेलाची नेहमीसारखी फोडणी करून त्यात अगदी कमी खडा मसाला (२ लवंगा, २ दालचिनीचे लहान तुकडे, ७-८ मिरीदाणे, १ तमालपत्र) घाला. नंतर कांदा घालून मऊ शिजवा. त्यात टोमॅटो घालून जरासं शिजवा. त्यानंतर मटार घालून एक वाफ काढा. त्यानंतर त्यात तांदूळ घालून चांगली वाफ येऊ द्या. दुप्पट उकळतं पाणी घाला, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घाला. मऊ शिजवा. वरून साजूक तूप, खोबरं-कोथिंबीर घालून खा. आवडत असल्यास गाजराचे लांब तुकडे घाला.

मटार पराठा – मटार मिक्सरला वाटा. वाटतानाच त्यात आलं-मिरची घाला. नंतर या प्युरेत ओवा, तीळ, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. यात मावेल तसं पीठ घाला. घडीचे जाडसर पराठे करा. तेल लावून खरपूस भाजा.

मटार-गाजर कोशिंबीर – अगदी कोवळे मटार वाटीभर असतील तर कोवळ्या रसरशीत गाजराचा कीस वाटीभर घ्या. त्यात लिंबाचा रस, चिमूटभर साखर, मीठ, कोथिंबीर, ओलं खोबरं घाला. वरून हिंग-मोहरीची खमंग फोडणी द्या.

मटार पॅटिस रेसिपी –  https://goo.gl/UvB7zU

या मोसमात तुरीचे दाणेही फार सुंदर मिळतात. तुरीच्या दाण्याचे पदार्थ फार खमंग लागतात.

तुरीच्या दाण्यांची आमटी – कढईत तेल गरम करून त्यात एखादा कांदा उभा चिरून तो गुलाबी होऊ द्या. त्यातच एखादी लसणाची पाकळी आणि एखादी हिरवी मिरची घाला. ते जरासं परतून त्यात तुरीचे दाणे घाला. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. नंतर त्यात थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून थोडंसं परता. गार झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड वाटा. फार बारीक पेस्ट करू नका. आपल्याला हवं असेल तितपत पातळ करून पातेल्यात घालून उकळायला ठेवा. त्यात आवडत असल्यास थोडा दाण्याचा कूट घाला. काळा मसाला आणि मीठ घाला. एका लहान कढईत हिंग मोहरी हळदीची खमंग फोडणी करा. थोडा कढीपत्ता घालून ही फोडणी आमटीवर घाला. मस्त उकळा. गरम बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खा. अशीच सोलाण्याची म्हणजे ओल्या हरभ-याचीही आमटी करतात.

तुरीच्या दाण्यांचा भात – एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी तुरीचे दाणे घ्या.  तांदूळ तासभर आधी धुवून, पाणी काढून ठेवा. करताना ८-१० लसूण पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीरीचं वाटण करा. आवडत असल्यास एखादी हिरवी मिरची त्यात घाला. हे वाटण तांदळाला चोळा. पातेल्यात साजूक तूप गरम करा. त्यात फक्त ३-४ लवंगा घाला. नतर तांदूळ घालून लसणाचा खमंग वास येईपर्यंत परता. त्यात दुप्पट पाणी, किंचित लिंबाचा रस आणि मीठ घालून मऊ शिजवा. या भाताला कसलाही मसाला घालायचा नाही.

तुरीच्या दाण्यांची उसळ – तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यावर चिरलेला कांदा परता. कांदा चांगला परतला की त्यात तुरीचे दाणे, तिखट, मीठ, काळा मसाला, आवडत असल्यास किंचित गूळ घाला. एक वाफ आली की त्यात थोडं गरम पाणी घाला. चांगली शिजू द्या. नंतर त्यात खोबरं-कोथिंबीर घाला. काळ्या मसाल्याऐवजी गरम मसाला किंवा मालवणी मसालाही वापरू शकता. अशीच सोलाण्याची म्हणजे ओल्या हरभ-याची उसळ करता येते. तुरीचे सुके दाणे भिजवूनही ही उसळ करता येते. पण ताज्या दाण्यांची जास्त चांगली लागते.

photo (22)

हिवाळ्यात पालेभाज्या फार छान मिळतात. मराठवाड्यात कच्च्या पालेभाज्या खातात. पालेभाज्यांचा घोळाणा केला जातो.

कांद्याच्या पातीचा घोळाणा – कांद्याची पात बारीक चिरायची. त्यात दाण्याचं कूट, तिखट-मीठ घालायचं. वरून कच्चं तेल घालून एकत्र करायचं. हा झाला कांद्याच्या पातीचा घोळाणा. असाच मेथीचा, करडईचा करता येतो.

मेथीची पचडी – कोवळी मेथी धुवून बारीक चिरा. मेथी दोन वाट्या असेल तर प्रत्येकी १ लहान कांदा, टोमॅटो, काकडी बारीक चिरा. १ गाजर आणि अर्धा मुळा किसून घ्या. सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, थोडं तिखट, लिंबाचा रस असं घाला. वरून जरा जास्त हिंग घालून खमंग फोडणी द्या.

IMG_8370

मेथीचे पराठे – मेथी बारीक चिरून घ्या. त्यात हळद-तिखट-मीठ-ओवा-तीळ घाला. लसूण वाटून घाला. सगळं नीट एकत्र करा आणि चांगलं पाणी सुटू द्या. आवडत असल्यास एखादं चांगलं पिकलेलं केळं कुस्करून घाला. नीट एकत्र करून ठेवा. चांगलं पाणी सुटलं की त्यात एक लहान चमचा बेसन आणि मावेल तेवढी कणीक घाला. नीट मळून थोडा वेळ ठेवून द्या. नंतर आपल्याला हवे तसे घडीचे पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.

मेथीचं वरण – मेथी धुवून बारीक चिरून घ्या. तूरडाळीचं वरण शिजवून घ्या. तेलाची फोडणी करा. त्यात मोहरी आणि हिंग घाला. ठेचलेला लसूण घाला. तो चांगला लाल झाला की थोडी हळद घाला. त्यावर मेथी घालून एक चांगली वाफ येऊ द्या. मेथी शिजत आली की त्यात शिजलेलं वरण घाला. आपल्याला हवं तितपत पातळ करा. त्यात तिखट, मीठ आणि काळा मसाला घाला, चांगलं उकळा. गरम भात किंवा भाकरीबरोबर खा.

मेथीफळं – https://goo.gl/U4VCqC

मेथी-वांगं-बटाटा भाजी – https://goo.gl/vxUcBc

हे पदार्थ आपल्या सोयीनं करून बघा. कसे झाले ते जरूर कळवा. या पोस्टचा दुसरा भाग लवकरच. त्यात एकत्रित भाज्यांचा वापर करून केलेल्या पदार्थांचा समावेश असणार आहे.

#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #रोजचेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #एकत्रितपदार्थांच्यापोस्ट #हिवाळीपदार्थ #हिवाळा #आरोग्यदायीपदार्थ #मुंबईमसाला #अन्नहेचपूर्णब्रह्म #simplerecipe #healthyrecipe #healthiswealth #healthyliving #healthyeating #winterrecipes #indianwinter #mumbaimasala

सोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

सायली राजाध्यक्ष