अळूवडी

14053982_576028209270569_244515583526790512_n

श्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारण असं आहे की अळू बरेचदा खाजरा असतो. चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरेपणा कमी होतो.
अळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. जसजसा खाण्यासाठी वापर व्हायला लागला तसतसा अळू मुद्दाम पिकवला जायला लागला. अळूचं मूळ भारताचा पूर्व भाग, नेपाळ आणि बांगलादेशात असावं असं मानलं जातं. आता अळू जगभर खाल्ला जातो. अळूची पानं सुपासारखी असतात. कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. अळकुड्या किंवा अरवी म्हणजेच अळूचे कंद. अरवीचीही चिंच घालून भाजी केली जाते. अळकुड्यांची कुरकुरीत परतून केलेली भाजी तोंडीलावणं म्हणून छान लागते. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही अळूचा वापर केला जातो. महाराष्ट्र तसंच गुजरातेत अळूवड्या लोकप्रिय आहेत. बारीक कोलंबी घालूनही अळूवडी करतात. मी एका रेसिपी शोमध्ये तयार अळूवड्यांवर नारळाचं दूध घालून त्या झाकून ठेवून मस्त फुलवून केलेला पदार्थ बघितला होता. तोही मस्त लागत असणार.
अळूला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे अळू नेहमी पाण्याच्या एखाद्या डबक्यात लावला जातो. बरेचदा सांडपाण्यात अळूची आळी दिसतात. बीडला आमच्या बागेत अळूचं मोठं आळं होतं. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या घरून अळू नेत असत. माझी आई अळूच्या पानांची भजी आणि त्या भज्यांची चिंच-गूळ घालून मस्त भाजी करते. सध्या श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत. अशांना चमचमीत खायला म्हणून या दिवसांत बरेचदा तळलेले पदार्थ हवे असतात. मग बरेचदा अळूवडी केली जाते. आज मी अळूवडीचीच रेसिपी शेअर करणार आहे.

अळूवडी

साहित्य – १५-१६ वडीसाठीची अळूची पानं, २ वाट्या डाळीचं पीठ, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, २ टेबलस्पून गूळ, २-३ टीस्पून तिखट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, वड्या तळण्यासाठी तेल

कृती –
१) अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील आणि पानं मऊ होतील.
२) बेसनात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.
३) आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.
४) त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट रोल करा. असे जितके होतील तितके रोल करून घ्या.
५) कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.
६) थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.

या वड्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात. किंवा फोडणीला मोहरी, हिंग, तीळ घालून या वड्या परतवा. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. किंवा तेल-मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर वड्या घाला. जराशा परतून त्यात थोडं उकळतं पाणी, चिंचेचा कोळ, गूळ, थोडा काळा मसाला घालून अंगासरशी रस्सा करा.

तिखटमिठाचं आणि चिंचगुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करा. इतक्या पानांमध्ये २५-३० अळूवड्या होतात.

सायली राजाध्यक्ष

Advertisements

दिव्यांची रसमलाई

13925362_568613200012070_918824204826783_n

आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची अमावस्या. या सुरेख सणाला आता गटारी अमावस्या या नावानं ओळखलं जातं. आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या-ज्या गोष्टींचा वापर होतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण पाळले जातात. शेतात वर्षभर राबणा-या बैलासाठी पोळा किंवा बेंदूर, शेतक-याचा मित्र असलेल्या नागोबाच्या पूजेचा नागपंचमी, चुलीला विश्रांती द्यायची म्हणून शिळासप्तमी तसंच आपल्याला कायम उजेड देणा-या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्याची अमावस्या. आता विजेचे दिवे असतात. पण ज्या काळी वीज नव्हती तेव्हा तेलवात करून वापरण्यात येणा-या दिव्यांमुळेच उजेड होत असे.
आजच्या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून लख्ख करायचे आणि मल तेलवात करून उजळायचे, त्यांची पूजा करायची अशी जुनी प्रथा आहे. माझी आजी कणकेचे गूळ घालून दिवे करायची, ते उकडून, त्यात तूप घालून, वात पेटवून आम्हाला ओवाळायची आणि नंतर ते दिवे खायला द्यायची. आता ही प्रथा कालबाह्य झाली आहे. कारण वर म्हटलं तसं विजेचे दिवे असताना या दिव्यांना आता तितकंसं महत्त्व उरलेलं नाही. पण जुनी परंपरा म्हणून त्या-त्या सणाला ते-ते ठराविक पदार्थ मी करतेच. तसे आजही मी कणकेचे गूळ घालून दिवे केले होते. त्याचबरोबर माझी मैत्रीण तनुजा बांदिवडेकर हिनं सांगितलेली दिव्यांची खीरही केली होती. फक्त मी त्याला दिव्यांची रसमलई असं नाव दिलं, कारण मी त्यात थोडा बदल केला होता.

कणकेचे दिवे

साहित्य – १ वाटी किसलेला गूळ, १ वाटी पाणी, त्यात मावेल तेवढी कणीक, १ टीस्पून तूप, चिमूटभर मीठ, वरून घालायला साजूक तूप

कृती –
१) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ घालून ठेवा.
२) तो विरघळला की त्यात तूप आणि मीठ घालून हलवून घ्या.
३) त्यात मावेल तेवठी कणीक घाला. साधारण आपल्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा. १५ मिनिटं तशीच ठेवा.
४) नंतर लिंबाएवढा गोळा घेऊन हातावर त्याचा गोल, जाडसर पेढा करा. पेढ्याच्या मधोमध बोटांनी दाब देऊन हळूवार हातानं कडा काढत त्याला दिव्याचा आकार द्या. असे सगळे दिवे करून घ्या.
५) एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा. त्यावर तयार दिवे ठेवा. झाकण ठेवून २०-२५ मिनिटं वाफवा.
दिवे तयार आहेत. गरम असतानाच वरून साजूक तूप घालून खा.

दिव्यांची रसमलई

साहित्य –

दिव्यांसाठीचं साहित्य – १ वाटी पाणी, १ वाटी सुवासिक तांदळाची पिठी, १ टीस्पून तूप, १०-१२ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ

रसमलईचं साहित्य- १ लिटर दूध, ५ टीस्पून साखर, प्रत्येकी १ टेबलस्पून काजू-बदामाचे तुकडे, थोडीशी चारोळी आणि बेदाणे, अर्धा टीस्पून जायफळ पूड

कृती –

दिव्यांची कृती –
१) एका कढईत पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात तूप आणि मीठ घाला. केशराच्या काड्याही घाला.
२) त्यात तांदळाची पिठी घाला. गॅस बंद करा. उलथन्यानं हलवून घ्या. १० मिनिटं झाकण घालून ठेवा.
३) नंतर एका ताटात काढून थोड्या तुपाचा हात लावून चांगली मळून घ्या.
४) बोराएवढे गोळे करून त्याला पणतीचा आकार द्या. अशा सगळ्या पणत्या करून घ्या.

रसमलईची कृती –
१) दूध गॅसवर आटवायला ठेवा.
२) चांगलं आटलं की त्यात साखर, सुकामेवा, जायफळ पूड घाला.
३) हलवून घ्या आणि नंतर तयार दिवे त्यात घाला.
४) मंद आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटं उकळी काढा.

गरमागरम रसमलई तयार आहे. हवी असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता.

 

सायली राजाध्यक्ष

सुशीला

13177609_538112656395458_719514957023450861_n

तांदूळ हे धान्य असं आहे की किती तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या रोजच्या खाण्यात आपण त्याचा वापर करत असतो. पोहे तांदळाचेच असतात, इडली, दोसे तांदळासहच बनतात. तांदळाच्या शेवयांचा उपमा केला जातो. भाताचे तर कितीतरी प्रकार करता येतात. तांदूळ हे जगातलं सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं कर्बोदक (कार्बोहायड्रेट) आहे. जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये या ना त्या स्वरूपात तांदूळ खाल्ला जातो. आशियातल्या सगळ्या देशांमध्ये रोजच्या जेवणात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा भात असतोच असतो. मध्यपूर्वेतल्या देशांमध्येही तांदळाचा मुबलक वापर केला जातो. आपल्याकडे मिळणारा तांदळाचाच आणखी एक प्रकार म्हणजे मुरमुरे किंवा कुरमुरे किंवा चुरमुरे. अगदी सहज उपलब्ध असलेलं, स्वस्तातलं हे खाणं हे पौष्टिक आहे. त्यात चणे-फुटाणे-शेंगदाणे घालून खाल्लं की पूर्णान्न होतं. भारतात रस्तोरस्ती कुरमुरे विकणारे भडभुंजे असतात. मग कधी त्याची भेळ होते तर कधी झालमुरी.
आमच्याकडे मराठवाड्यात मुरमुरे मुबलक खाल्ले जातात. लहानपणी आजीबरोबर भडभुंज्याकडून गरम मुरमुरे, गरम भट्टीचे शेंगदाणे आणि फुटाणे आणायला जायचे. ताजे कुरमुरे नुसतेही छान लागतात. त्याला थोडा काळा मसाला, कच्चं तेल, तिखट आणि मेतकूट लावूनही मस्त लागतं. बरोबर चिरलेला कच्चा कांदा घेतला तर अजूनच चव वाढते. कुरमु-यांचा चिवडाही पटकन होतो. शिवाय सांगली-कोल्हापूरकडचं भडंगही अफलातून लागतं. आज मी कुरमु-यांची एक खास मराठवाडी रेसिपी शेअर करणार आहे. जी करायला अतिशय सोपी आहे, पौष्टिक आहे, खमंग आहे. या रेसिपीला मोजून १० मिनिटं लागतात. ही रेसिपी आहे सुशीला. माझी एक मामी आहे. तिचं नाव सुशीला आहे. त्यामुळे मला लहानपणी तिचं या पदार्थाशी काहीतरी नातं आहे असं सारखं वाटायचं!

सुशीला

साहित्य – ८ वाट्या कुरमुरे (शक्यतो भेळेचे घ्या. ते चांगले भिजतात), २ टेबलस्पून दाण्याचं भरड कूट, २ टीस्पून तिखट, पाव टीस्पून साखर, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १-२ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती –
१) प्रथम एका मोठ्या टोपल्यात किंवा पातेल्यात भरपूर पाणी घ्या. त्यात कुरमुरे घाला. ते लगेचच भिजतात. भिजलेले कुरमुरे हाताच्या मुठीत घेऊन चांगले घट्ट पिळून घ्या.
२) पिळलेले कुरमुरे एका ताटात घ्या. त्यावर दाण्याचं कूट, साखर, मीठ, तिखट आणि हळद घाला. हलक्या हातानं नीट मिसळा.
३) एका कढईत तेलाची फोडणी करा. कमी तेल हवं असेल तर १ टेबलस्पूनच वापरा. जास्त चालत असेल तर मग २ वापरा. फोडणीत हिंग फुलला की त्यावर कुरमुरे घाला. चांगलं हलवून घ्या.
४) मंद आचेवर झाकण घालून चांगली दणदणीत वाफ येऊ द्या. वरून कोथिंबीर घाला.

काही लोक यात डाळ्याचं भरड कूटही घालतात. आवडत असेल तर तेही घाला. इतकं सुशीला ३-४ लोकांना पुरेसं होईल. भडंगाचे कुरमुरे वापरलेत तर जरा जास्त वेळ भिजू द्या.

सायली राजाध्यक्ष

 

उंबरांची आमटी

13102626_533565470183510_2564177057547579889_n

मराठवाड्यात ब्राह्मणसदृश जातींमध्ये पूर्वी मांसाहाराचं प्रमाण नगण्य होतं. मांसाहार हा प्रथिनांची गरज पूर्ण करणारा मोठा आणि महत्त्वाचा स्त्रोत आहे. शिवाय मराठवाड्यात वरण फक्त तुरीच्या डाळीचं केलं जायचं आणि तेही खूप पातळ अगदी रस्समसारखं. उडदाची डाळही फार कमी वापरली जायची. मग प्रथिनांची गरज भागवण्याकरता भाजीत, आमटीत चणा डाळीच्या पिठाचे गोळे किंवा उंबरं सोडण्याची प्रथा आली असावी. कारण हरभरा डाळ हा प्रथिनांचा मोठा स्त्रोत आहे. शिवाय या आमट्यांचा जो बेस आहे त्यातही कणीक, डाळीचं पीठ, दाण्याचा कूट वापरला जातो. माझ्या माहेरी आई जहाल तिखट खाणारी. पण बाबा, आजी, आजोबा फारसं तिखट न खाणारे. मी शाळेत असताना बाबांचे मित्र आणि माझी मैत्रीण संपदाचे वडील सुरेश मंगीराज यांच्या घरी मी बरेचदा जात असे. एकदा मंगीराज काकूंनी झणझणीत अशी उंबरांची आमटी केली होती. ती मी आमच्या घरी कधी खाल्ली नव्हती. मला ती प्रचंड आवडली होती. या पेजच्या निमित्तानं मी आता असे काही आमच्या घरातही न होणारे पदार्थ करून बघते आहे. आजची रेसिपी आहे उंबरांची आमटी

उंबरांची आमटी

आमटीचं साहित्य – २ टीस्पून बेसन, २ टीस्पून कणीक, २ टीस्पून काळा मसाला, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १-२ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ७-८ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, १ टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग, ५-६ कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर

उंबरांच्या पारीसाठीचं साहित्य – ३ टेबलस्पून बेसन, तीन टेबलस्पून कणीक, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून तेल, मीठ चवीनुसार हे सगळं साहित्य एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.

सारणाचं साहित्य – २ मध्यम कांदे बारीक चिरलेले, अर्धी वाटी सुकं खोबरं, १ टीस्पून खसखस, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार (मीठ बेतानं घाला, कारण आमटीतही आणि वर पारीतही मीठ आहे.) १ टीस्पून तेल

आमटीची कृती –
१) कढईत तेल चांगलं गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
२) मोहरी तडतडली की त्यात हिंग घाला. आता त्यात लसूण ठेचून घाला. कढीपत्ता घाला.
३) लसूण जरासा लाल झाला की त्यात कणीक आणि डाळीचं पीठ घाला आणि मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजा.
४) पीठ भाजलं गेल्याचा खमंग वास यायला लागला की त्यात दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला आणि थोडंसं परता.
५) नंतर त्यात साधारणपणे ४-५ फुलपात्रं पाणी घाला. पाणी हळूहळू घालत जा म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करा.
६) पाण्यात मीठ, तिखट, काळा मसाला घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यात कोथिंबीर घाला.

सारणाची कृती –
१) कढईत तेल गरम करा. त्यावर कांदा घाला. मंद आचेवर चांगला गुलाबी होईपर्यंत शिजू द्या. कांदा मऊ शिजला पाहिजे पण लाल होता कामा नये.
२) कांदा शिजला की खोबरं आणि खसखस घाला. मध्यम आचेवर सतत परतत खोबरं लाल होऊ द्या. गॅस बंद करा.
३) त्यात कोथिंबीर, काळा मसाला आणि मीठ घाला. सारण गार होऊ द्या.

उंबरांची कृती –
१) अर्ध्या लिंबाएवढं पीठ घेऊन हातावर त्याची चपटी पारी करा. त्या पारीत १ टीस्पून सारण भरा.
२) मोदकांना पाकळ्या करतो तशा करून लहान लहान उंबरं करून घ्या. अशी सगळी उंबरं करा.

उंबरांच्या आमटीची कृती –
१) येसर आमटी उकळायला लागली की त्यात ही उंबरं सोडा.
२) मंद आचेवर चांगलं शिजू द्या. शिजल्यावर ही उंबरं फुलून आमटीत वर येतात. ही आमटी भाकरीबरोबर, भाताबरोबर, अगदी नुसतीही उत्तम लागते.

ही आमटी झणझणीतच छान लागते. तेव्हा सारणात आपल्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण वाढवा. मी आमच्या घरच्या चवीनं मध्यम तिखट केली होती.

सायली राजाध्यक्ष

भरलेले कांदे

कांद्याशिवाय भारतीय स्वयंपाकाचा आपण विचारही करू शकत नाही. आपल्याकडे जवळपास ७०-८० टक्के भाज्यांमध्ये फोडणीला कांदा घातला जातो. शिवाय कालवणं, मांसाहारी पदार्थ यांनाही कांदा हवाच. कांद्याची पीठ पेरून… Read more “भरलेले कांदे”

प्रसादाचे दहा पदार्थ

गणेश चतुर्थी अगदी जवळ आली आहे. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता म्हणून कुठल्याही समारंभात आधी गणेशाचं पूजन करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांच्या सोयीनं आपला मुक्काम… Read more “प्रसादाचे दहा पदार्थ”

पुरणपोळी

आज होळी आहे. अर्थातच पुरणपोळीचा दिवस! मला फार कमी गोड पदार्थ मनापासून आवडतात, त्यातली एक पुरणपोळी आहे. लहान असताना आजी जेव्हा सणांना पुरणपोळ्या करायची तेव्हा लहान लहान… Read more “पुरणपोळी”