माझा नवरा निरंजन आणि मी सिनेमा-वेडे आहोत. आम्ही सिनेमा बघायला कधीही तयार असतो. कालच आम्ही बोलत होतो की, खाणं केंद्रस्थानी असलेले किती चित्रपट आपण पाहिले आहेत. डोळ्यांसमोर लगेचच जी नावं आली त्यात शोकोला (Chocolat) , ज्युली एंड जुलिया (Julie and Julia), रातातुई (Ratatouille), अ गुड इयर (A good year) , इट प्रे लव्ह (Eat Pray Love), नो रिझर्व्हेशन्स (No Reservations) हे चित्रपट पटकन डोळ्यासमोर आले. हल्लीच आलेल्या शेफ (Chef) हा चित्रपटातही खाणंच केंद्रस्थानी आहे पण मी अजून तो बघितलेला नाही.
हॉलिवुडमधल्या या ज्या चित्रपटांचा मी उल्लेख केला आहे त्यातल्या बहुतांश चित्रपटांमध्ये युरोपियन खाद्यसंस्कृतीचं चित्रण आहे. शोकोला हा सिनेमा घडतो तो साठच्या दशकातल्या फ्रान्समधे. (मी मूळ पुस्तक वाचलेलं नाही पण ते अप्रतिम आहे असं म्हणतात.) चित्रपटाची नायिका आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलीबरोबर फ्रान्समधल्या एका काल्पनिक खेड्यात येते. त्या खेड्यावर चर्चचा आणि रूढी-परंपरांचा पगडा आहे. तिथे राहणारे लोक साध्याशा, छोट्या छोट्या आनंदापासून वंचित आहेत. ही नायिका येते तेव्हा नेमका तिथं लेन्ट सुरू होणार आहे. आपल्याकडे जसा श्रावण पाळला जातो तसाच इस्टरच्या आधी धार्मिक ख्रिश्चन हा चाळीस दिवसांचा काळ पाळतात. या काळात स्वतःवर निर्बंध घालून घेतात. अशा वेळेलाच ही नायिका तिथे येते आणि चॉकलेटचं दुकान उघडते. ही नायिका त्या गावातल्या पारंपारिक स्त्रियांपेक्षा अधिक मोकळी ढाकळी आहे त्यामुळे लोकांना विशेषतः त्या गावच्या चर्चच्या बिशपला तिचं वागणं मान्य नाहीये. तिच्यातल्या आणि बिशपमधल्या संघर्षाला चॉकलेट प्रेमाची मस्त किनार आहे. तिच्या वागण्यामुळे आणि तिच्या दुकानामुळे लोक हळूहळू बदलत जातात. या चित्रपटातलं चॉकलेट बनवण्याचं चित्रण बघण्यासारखं आहे.
ज्युली एंड जुलिया हा तर हल्लीच तीन चार वर्षांपूर्वी आलेला चित्रपट. ज्युलिया चाइल्ड ही पाककला तज्ज्ञ. नव-याच्या नोकरीच्या निमित्तानं ती पॅरिसला येते. मूळची अमेरिकन पण फ्रेंच कुकिंगची चाहती. ती आजच्या काळात अमेरिकेत राहणा-या, खाण्यातली दर्दी असलेल्या आणि स्वयंपाकाची आवड असलेल्या ज्युली पॉवेलला भारावून टाकते. जुलियाच्या 524 फ्रेंच पाककृती वर्षाच्या 365 दिवसांत करून बघायचं ज्युली ठरवते. एकीकडे या पाककृती करून बघताना तिच्या आयुष्यातही उलथापालथ होत असते. आपल्या या अनुभवांवर ती ब्लॉग लिहायला लागते आणि शेवटी एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था तिचं पुस्तक काढायचं ठरवते. दोघींच्याही नव-यांचा त्यांच्या या छंदाला पाठिंबा असतो. मेरिल स्ट्रीप आणि एमी एडम्सच्या अप्रतिम अभिनयासाठी हा चित्रपट बघायलाच हवा. विशेषतः मेरिल स्ट्रीप टीव्हीवर पाककृती करून दाखवत असतानाचे प्रसंग अप्रतिम आहेत.
इट प्रे लव्ह या चित्रपटाची नायिका घटस्फोट घेऊन आपली आत्मखूण शोधायला बाहेर पडली आहे. प्रथम ती इटलीला जाते. जिथे ती वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन आयुष्यातला आनंद शोधायचा प्रयत्न करते. नंतर ती भारतात येते आणि अध्यात्माच्या मार्गानं मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी इंडोनेशियामधे तिला तिच्या आयुष्यातलं खरं प्रेम मिळतं. इटालियन खाद्यसंस्कृतीच्या नयनरम्य चित्रणासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
नो रिझर्व्हेशन्स हाही असाच एक चित्रपट. चित्रपटातली दोन्ही प्रमुख पात्रं ही न्यू यॉर्कमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये शेफ आहेत. नायिका मुख्य शेफ तर नायक हा सू-शेफ किंवा तिच्या हाताखाली काम करणारा आहे. नायिकेची बहिण आणि तिचा नवरा एका रस्ता अपघातात मरण पावलेले आहेत आणि त्यांची सात-आठ वर्षांची मुलगी आता नायिकेकडे राहते आहे. रेस्टॉरंटमधलं शेफ्समधलं राजकारण, त्यांच्यातली चढाओढ आणि दुसरीकडे नायिकेचं एकाकी आयुष्य असा समांतर हा चित्रपट सुरू राहतो. बहिणीच्या छोट्या मुलीला आपलंसं करण्याची नायिकेची धडपड कॅथरीन झिटा-जोन्सनं जिवंत केलीय.
अ गुड इयर रूढार्थानं खाण्याशी संबंधित आहे असं म्हणता येणार नाही. पण या चित्रपटातली नायिका प्रोव्हान्स या फ्रान्समधल्या अतिशय सुरेख, निसर्गरम्य अशा प्रांतातल्या एका गावात एक रेस्टॉरंट चालवते. नायक लंडनमधला अतिशय व्यस्त आणि यशस्वी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह. त्याचे एक दूरचे काका मरण पावतात आणि आपली सगळी मालमत्ता याच्या नावावर करतात. अट एकच आहे त्या मालमत्तेची व्यवस्था लावण्यासाठी त्याला स्वतःला काही दिवस तिथं राहावं लागणार आहे. नायिकेचं टुमदार रेस्टॉरंट, द्राक्षांचे मळे आणि अतिशय निसर्गसुंदर परिसर यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
रातातुई ही एनिमेशन फिल्म तर खाद्यसंस्कृतीबद्दलची कल्ट फिल्म मानली जाते. रातातुई ही एक फ्रेंच डेलिकसी. एक उंदीर नायकाला पाककला तज्ज्ञ बनण्यासाठी कसा मदत करतो ते बघणं फार रंजक आहे.
गंमतीची गोष्ट अशी की मी वर उल्लेख केलेल्या बहुतेक चित्रपटांमधे फ्रेंच खाद्यसंस्कृतीचंच प्राबल्य आहे. फ्रेंच लोक खाण्याचे शौकीन आहेत ते उगाच नाही!
हिंदीमध्ये मात्र फारसे असे चित्रपट झालेले दिसत नाहीत. हृषिकेश मुखर्जींच्या बावर्ची या चित्रपटाचं नाव जरी बावर्ची असलं तरी त्यात खाद्यसंस्कृतीचं चित्रण आढळत नाही. काही वर्षांपूर्वी आलेला प्रिटी झिंटा आणि सैफ अली खान अभिनित सलाम नमस्ते या चित्रपटात नायक शेफ आहे. पण फक्त नावालाच, त्यातही खाण्याबद्दलचं चित्रीकरण नाहीच. अपवाद फक्त चीनी कम या चित्रपटाचा. अमिताभ बच्चन यांनी आर. बालकी यांच्या चित्रपटांमधे आपल्या इतर भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात त्यांनी वठवलेला शेफ मस्तच.
मराठी चित्रपटांमध्ये असे काही प्रयोग झाले आहेत का? मला तरी आठवत नाहीये.
तुम्ही उल्लेख केलेले सगळे इंग्लिश चित्रपट अगदी आवडीचे.
१०० फीट जर्नी हा पण एक सुंदर चित्रपट आहे. हेलन मिलर आणि ओम पुरीचा अभिनय अगदी सुंदर. हा पण फ्रेंच खाद्यसंस्कृतीबद्दलच आहे.
हिंदीमधला लंचबॉक्स मधे खाण्याचे सुंदर चित्रण आहे. भारती आचरेकरांचा आवाज खासच!!
बाकी परिणीती चोप्रा आणि आदित्य रोय कपूरचा दावत-ए-इश्क, अमोल गुप्तेचा स्टॅन्लीका डिब्बा वगैरे मधे पण थोड्या फार प्रमाणात खाण्यावर भर आहे.
LikeLike