स्वयंपाक करणे हा एक स्वतंत्र रंग आहेच. त्याची पूर्वतयारी करणे, मेन्यू ठरवणे, पदार्थ तयार करणे, टेबल लावणे, वाढणे यातील प्रत्येक कृती मला आवडते. मेन्यू ठरवण्यात तर किती आनंदात वेळ जातो. पदार्थ वेगवेगळ्या आकाराचे हवेत. (म्हणजे वडा गोल असला तर मग एखादी चौकोनी वडी किंवा त्रिकोणी सँडविच.) त्यांचे घटकही वेगळे हवेत. कडधान्याची आमटी असेल तर मग उसळ नको इत्यादी. नॉनव्हेज खाणा-यांची चंगळ, तर व्हेजवाल्यांना पोटापुरते, असे नको. येणा-या पाहुण्यांना अनोळखी असणारा एखादा पदार्थ.
आता पाटर्या करणे वगैरे खूपच कमी झाले, पण चांगला स्वयंपाक करण्यासाठी मला पाहुणेच यायला हवेत असं नाही. घरच्या मंडळींसाठीही मी छान बेत ठरवते. ते पदार्थ करण्यासाठी उत्सुक असते. कधी पूर्ण चायनीज तर कधी पारशी. पुस्तकांतून पाहून काही गोष्टी करायच्या, कधी त्या त्या स्वयंपाकातील तज्ञ अशा एखाद्या मैत्रिणीला किंवा तिच्या आईला विचारून. कधी एखादा पदार्थ हॉटेलमध्ये खाल्लेला असेल तर तो अंदाजाने करून बघण्याचा प्रयत्न. अलीकडे पुस्तके तर खूपच निघाली आहेत. माझ्याकडेही संग्रह होता. पण आता माझी सूनच ती पुस्तके वापरते. ती स्वतः एक उत्तम कुक आहे. त्यामुळे आमच्यातील गप्पांचा तो एक जिव्हाळ्याचा विषय आहे. खाणेपिणे हा कुणाच्या जिव्हाळ्याचा विषय नसतो? स्त्रियांपेक्षा पुरूषांना त्या विषयात अधिक रस असतो. कारण त्यांना ‘विशुध्द’ आनंद असतो. ‘कलेसाठी कला’ प्रमाणे ‘खाण्यासाठी खाणे’ —-त्यापूर्वीचे ‘करणे’ पुरूषजातीला अजून पुरेसे उमगलेले नाही!
स्वयंपाकातही एक सर्जनशील आनंद लपलेला आहे, हे स्त्रियांना जाणवलेले आहे. मी पाककृतींची पुस्तके वाचते, वृत्तपत्रांत येणा-या पाककृतींवरही नजर टाकते. पण आता रेफरन्स वर्क पूर्णपणे गेले आहे. थोडीफार जवळ आहे ती स्वतंत्र प्रज्ञाच. त्यामुळे, खरे सांगते मला जशी एखादी कथा सुचते, तसा एखादा पदार्थ किंवा एखादा संवादी बेत सुचतो!
विजया राजाध्यक्ष ( स्वयंपाक करणे : एक विरंगुळा या लेखातला एक भाग)