स्वयंपाकाचं नियोजन या विषयावर मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट घाईघाईत लिहिल्यानं मी त्यात काही मुद्दे विसरले होते. आजच्या पोस्टमध्ये त्या मुद्द्यांचा समावेश करणार आहे.
मी मसाल्याच्या डब्यात एक लहानसा ट्रे ठेवते आणि त्यात सतत हाताशी लागणा-या गोष्टी ठेवते. त्यात काही लहान चमचे, टीस्पून, टेबलस्पून असे मोजण्याचे चमचे, साल काढणं, सु-या, एक लहान बत्ता आणि एक स्क्रू ड्रायव्हर या गोष्टी ठेवते हे मी लिहिलं होतंच. पण त्यात अजूनही काही गोष्टी असतात ज्यांचा उल्लेख करायचं मी विसरले होते. या गोष्टींशिवाय या ट्रेमध्ये कात्री, बॉटल ओपनर, तव्याला तेल ब्रश करण्यासाठी लागणारा ब्रश हेही ठेवलेलं असतं. याच ड्रॉवरमध्ये किचनमध्ये लागणारे नॅपकिन्सही ठेवलेले असतात. एक नॅपकीन हात पुसायला आणि एक नॅपकिन भांडी पुसायला ठेवा. आणि ते दिवसातून निदान दोनदा बदला. गॅस-ओटा पुसण्यासाठी हल्ली चांगले मॉप्स मिळतात, त्यांचा वापर करा. हे मॉप्स दर एका दिवसाआड ब्लीच आणि साबण मिक्स करून त्यात भिजवून ठेवून मग धुवा. मायक्रोवेव्हचा वापर नियमितपणे करत असाल तर तो रोज स्वच्छ पुसा. यासाठी बाजारात मऊ पातळ कपडे मिळतात. शिवाय त्यातला काचेचा ट्रे निदान दोन दिवसांना स्वच्छ धुवा. गॅस आणि ओटा अर्थातच रोजच धुवा.
तुम्ही सगळेजण कमी-अधिक फरकानं हे सगळं करत असणारच. महिन्याच्या वाणसामानाची एक नेहमीची यादी बनवून ठेवा. माझं स्वयंपाकघर इतकं लहान आहे की मी महिन्यातून एकदा नेहमी लागणारं सामान मागवते आणि मग त्यात लागेल तशी भर घालते. उदाहरणार्थ माझ्या तूरडाळीच्या डब्यात २ किलो तूरडाळ बसते. मी ३ किलो मागवते. डब्यात २ किलो भरली की १ किलो जास्तीची असते. ती भरली की पुढची मागवते. असंच सगळ्या सामानाचं करते. सामानाची यादी लिहितानाही संगतवार लिहा. म्हणजे डाळीच्या खाली डाळी, कडधान्यांखाली कडधान्यं, मसाल्यांखाली मसाले, साबणांखाली साबणं, पिठांखाली पिठं अशी यादी करा. म्हणजे फोनवर मागवतानाही किंवा प्रत्यक्ष जाऊन खरेदी करतानाही सोपं होतं. काही विसरलं आहे का हे तपासणंही सोपं होतं.
सामान लावतानाही शक्यतो असंच लावा. म्हणजे शेजारशेजारच्या डब्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये एकसारखे पदार्थ ठेवा. डाळींच्या शेजारी डाळी, पिठांच्या शेजारी पिठं इत्यादी. रेडीमेड सॉस, रेडीमेड हर्ब्ज अशा गोष्टी बाजुबाजुला ठेवा. शिवाय घरात एल्युमिनियम फॉइल आणि क्लिंग फिल्मचे रोल्सही ठेवा. स्वयंपाक करताना, विशेषतः बेकिंग करताना यांचा उपयोग होतो. क्लिंग फिल्म तुम्ही सॅलड्स किंवा तत्सम पदार्थांचे बोल्स झाकण्यासाठी वापरू शकता. किचनमध्ये नेहमी किचन टिश्यूजचे रोल ठेवा. तळलेले पदार्थ निथळण्यासाठी टिश्यूज उत्तम. शिवाय तेलासारख्या चिकट गोष्टी साफ करायलाही उत्तम. पोळ्यांच्या डब्यात खाली तसंच पोळ्यांच्या जुडग्यावर टिश्यू ठेवलेत तर पोळ्या दमट होत नाहीत.
मी किचनच्या साफसफाईची एक यादी केलेली आहे. ती अशी आहे –
गॅस आणि ओटे रोज धुवायचे. मायक्रोवेव्ह रोज पुसायचा. एक्वागार्ड रोज बाहेरून पुसायचं. फ्रीज रोज बाहेरून पुसायचा शिवाय आतल्या काचा रोज पुसायच्या. रोज सकाळी फ्रीज आवरायचा. त्यातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर काढायच्या आणि मग काचा स्वच्छ पुसून तो लावायचा. या कामाला मोजून पाच मिनिटं लागतात. फ्रीज या पध्दतीनं स्वच्छ केलात तर फ्रीजमधल्या कुठल्याही गोष्टीला वास येत नाही. शिवाय फ्रीजमधे काहीही ठेवताना (न कापलेली फळं सोडून) झाकण घातल्याशिवाय ठेवू नका. डायनिंग टेबल तर आपण वापरलं की सतत पुसत असतोच. किचनमधली जी उघडी शेल्व्हज असतील तीही रोज पुसा. किचन रोज झाडून पुसतोच पण आठवड्यातून एकदा ते स्वच्छ साबणानं घासून धुवा. किचनमधल्या भिंतीही वेळोवेळी पुसा. किचन सिंक रोज भांडी घासून झाली की स्वच्छ धुवा. अधूनमधून रात्री त्यात डिसइन्फेक्टंट घाला. पाण्याच्या बाटल्या आठवड्यातून एकदा घासा. प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरत असाल तर मग त्या घासून, धुवून पूर्ण कोरड्या होऊ द्या आणि मगच वापरा.
भांडी लावताना ती पूर्ण कोरडी झाली की मगच लावा किंवा कोरडी पुसून लावा म्हणजे भांड्यांनाही वास येत नाही. नॉनस्टिक भांड्यांना लाकडी चमचेच वापरा. ही भांडी हलक्या हातानं साबणाच्या पाण्यानं धुवा. फार तेलकट झालं असेल तर त्यात थोडं साबणाचं पाणी घालून भरपूर उकळा आणि मग धुवा. मग ही भांडी जास्त टिकतील. फ्रीजमध्ये गोष्टी स्टोअर करताना शक्यतो चपट्या आकाराचे डबे वापरा. जमल्यास चौकोनी डबे खरेदी करा. काचेचे तर चौकोनी कंटेनर्स मिळतातच. शिवाय स्टीलचेही मध्यम आकाराचे चौकोनी डबे मिळतात. चपट्या आकाराच्या डब्यांमुळे आपण फ्रीजमध्ये गोष्टी व्यवस्थित ठेवू शकतो. शिवाय जागेचा योग्य वापर करता येतो.
प्रत्यक्ष स्वयंपाकाच्या नियोजनाबद्दलही मी लवकरच लिहिणार आहेच.
useful tips
LikeLike