पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा

अचानक झटपट एखादं काही तरी वेगळं करायचं मनात येतं. आणि मग ते मनासारखं जमलं की मस्त वाटतं. परवा असंच झालं. घरातल्या भाज्या संपल्या होत्या. म्हणून रात्री छोले भिजत घातले होते. सकाळच्या जेवणाला छोले करू या असं ठरवलं. पण रात्रीचा प्रश्न होताच. भरपूर पुदिना घरात होता. म्हणून ठरवलं चटणी वाटून सँडविचेस करू या. तशी पुदिना, कोथिंबीर, कांदा, मिरची, लिंबू, साखर आणि मीठ घालून चटणी वाटली. पण नंतर अचानक खिचडी केली. मग मनात आलं की उद्या सकाळी छोले करणार आहोत तर बरोबर पुदिना पराठे करू. सकाळी मी कांदा बारीक चिरला, त्यात ती पुदिना चटणी घातली आणि त्यात मावेल तशी कणीक घालून पुदिना पराठे केले. मस्त झाले होते. बरोबर केले होते पिंडी छोले. मागे मी टिपिकल पंजाबी छोल्यांची रेसिपी शेअर केली होती. ही रेसिपी त्यापेक्षा वेगळी आहे. ती होती ती कांदा-टोमॅटो घालून केलेल्या छोल्यांची. ही आहे तुलनेनं फारसा रस्सा नसलेल्या, काळपट रंगाच्या छोल्यांची. शिवाय या रेसिपीची खासियत अशी आहे की अजिबात तेल किंवा तूप न वापरताही तुम्ही ती करू शकता. या छोल्यांना लागणारा मसाला तुम्ही करून ठेवू शकता. तो तसा तयार असेल तर मग हे छोले अतिशय झटपट होतात आणि छान लागतात. माझी मैत्रीण विद्या स्वामिनाथन हिच्याकडून मी ही रेसिपी शिकले आहे. विद्या मूळची मराठी पण दिल्लीत वाढलेली. त्यामुळे ती दिल्लीकडे होणारे पदार्थ उत्तम करते.

पिंडी चना किंवा पिंडी छोले

पिंडी छोले आणि पुदिना पराठा
पिंडी छोले आणि पुदिना पराठा

मसाल्याचं साहित्य – अडीच टेबलस्पून अनारदाना (बाजारात विकत मिळतो तो तव्यावर भाजून त्याची पूड करा), २ टेबलस्पून जिरे पूड, ४ टेबलस्पून धणे पूड, २ टीस्पून गरम मसाला, अडीच टीस्पून काळी मिरपूड, १ टीस्पून आमचूर पावडर

इतर साहित्य – २ कप छोले (किमान ६-७ भिजवा), ४ बड्या वेलच्या, १० लवंगा, २ दालचिनीचे तुकडे (१ इंचाचे), ६ हिरव्या मिरच्या लांब पातळ चिरलेल्या, २ इंच आलं साल काढून पातळ लांब चिरलेलं, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तूप किंवा तेल (ऐच्छिक)

कृती –
१) मसाल्यासाठी दिलेलं सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करा. नीट मिसळून घ्या आणि बाजुला ठेवा.
२) कुकरमध्ये छोले, बड्या वेलच्या, लवंगा, दालचिनी आणि थोडं मीठ घाला. छोले अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्या अंदाजानं शिजवा. कुकरमध्ये डायरेक्ट शिजवलंत तर वेळ कमी लागेल. भांड्यात घालून शिजवलं तर वेळ जास्त लागेल. साधारणपणे मध्यम कुकरमध्ये डायरेक्ट शिजवलंत तर प्रेशर आल्यावर १५-२० मिनिटांत छोले मऊ शिजतात.
३) छोले शिजल्यावर बाहेर काढून ठेवा. त्यातलं पाणी फेकू नका, तसंच असू द्या.
४) एका लोखंडी कढईत छोले घाला. गॅसवर ठेवा. उकळी आली की त्यात मसाला घाला. नीट मिसळून घ्या.
५) आता त्यात आलं आणि मिरच्या घाला. परत हलवून घ्या. मंद गॅसवर शिजू द्या.
६) हवं असल्यास लहान कढईत तेल किंवा तूप कडकडीत गरम करून छोल्यांवर ओता. गॅस बंद करा.

पिंडी चना तयार आहे. या छोल्यांना तेलापेक्षा तूप घातलेलं अधिक चांगलं लागतं. लोखंडी कढईत केलेत तर रंग सुंदर येतो. नसली तर कुठल्याही कढईत करा. मसाला जास्त तयार करून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर पटकन छोले करता येतील. आमचूर आणि अनारदाना हे दोन्ही घटक आंबट असतात त्यामुळे त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. मी आमचूर कमी घालते. इतक्या साहित्यात ८-१० माणसांना पुरतील इतके छोले होतात.
या छोल्यांबरोबर साधे गरम पराठे, फुलके, पोळ्या आणि अर्थातच भटुरेही असं काहीही उत्तम लागतं. बरोबर पांढरा कांदा कापून घ्या. किंवा कांदा लांब पातळ चिरून त्यात तिखट,मीठ, लिंबू घालून कचुंबर करून घ्या. मी बरोबर पुदिना पराठे केले होते.

पुदिना पराठा

पुदिना पराठा
पुदिना पराठा

चटणीचं साहित्य – १ मोठी जुडी पुदिना, त्याच्या अर्धी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, १ कांदा मोठे तुकडे करून, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार

इतर साहित्य – २ कांदे बारीक चिरलेले, मावेल तेवढी कणीक, भाजायला तेल किंवा तूप

कृती –
१) चटणीसाठी दिलेलं साहित्य एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक चटणी वाटून घ्या.
२) परातीत चिरलेला कांदा, ही चटणी घाला. नीट मिसळा आणि त्यात मावेल तेवढी कणीक घाला.
३) नेहमीच्या पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवा. पाण्याचा वापर अगदी कमी करा. साधारण चार वाट्या कणीक बसेल.
४) आपल्याला हव्या त्या आकाराचे पराठे लाटा. तेल किंवा तूप लावून भाजा.

इतक्या कणकेत साधारणपणे मध्यम आकाराचे १२-१५ पराठे होतील.
पिंडी चना आणि हे पराठे हे एक अफलातून काँबिनेशन आहे. करून बघा आणि कसे झाले होते ते नक्की कळवा.

ही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

One thought on “पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा

Leave a comment