डाळीच्या पिठाचा किंवा बेसनाचा वापर मराठी जेवणात तर मुबलक प्रमाणात होतोच पण गुजराती लोकही बेसनाचा मुबलक वापर करतात. पिठलं हा मूळ गुजराती पदार्थ आहे असा गुजराती लोकांचा दावा आहे ते सोडा! पण पापडी, जलेबी फाफड्यातला फाफडा, गाठीया अशा अनेक पदार्थांमध्ये बेसनाचा वापर केलेला असतो नव्हे या पदार्थांमध्ये मुख्यतः फक्त बेसनच असतं. चवीला थोडे मसाले. नावं वेगवेगळी पण घटक पदार्थ एकच. खमण ढोकळा हाही गुजरात्यांचा लाडका पदार्थ. मुंबईत आणि इतरही गावांमध्ये सौराष्ट्र नावाचं दुकान हमखास असतंच असतं. आणि तिथे खमण ढोकळा मिळतोच मिळतो. अतिशय मुलायम, स्पंजसारखी जाळी पडलेला, वरून भरपूर तेलाची फोडणी घातलेला खमण ढोकळा लागतो उत्तमच. पण ढोकळा सोडा घालून करत असल्यानं नुसत्या डाळीच्या पिठाचा ढोकळा थोडासा घशाला लागतो असं मला वाटतं.
ब-याच ठिकाणी मूगडाळ किंवा चणा डाळ भिजवून, वाटूनही ढोकळा करतात. तोही चांगला लागतो. इडलीच्या पिठाचाही ढोकळा करतात. किंवा तांदूळ भिजवून वाटून त्याचाही ढोकळा करतात. माझी मैत्रीण वैशाली फडके ही डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घेऊन ढोकळा करते. तो मस्त लागतो. हा ढोकळा रेडीमेड खमण ढोकळ्याइतका फुलत नाही. पण चवीला जास्त चांगला लागतो असा माझा अनुभव आहे. आज मी याच ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे.
ढोकळा
साहित्य – १ वाटी बेसन, १ वाटी तांदळाचं पीठ, १ फुलपात्रं आंबट ताक, १ इंच आलं, ७-८ लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या ( आलं-लसूण-मिरच्या हे सगळं एकत्र वाटा), १ टीस्पून खाण्याचा सोडा, १ टीस्पून तेल, २-३ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार
फोडणीचं साहित्य – १ टेबलस्पून तेल, मोहरी, १ टेबलस्पून भरडलेले धणे, २ टीस्पून तीळ, १०-१२ कढीपत्त्याची पानं बारीक चिरून, ३-४ हिरव्या मिरच्या लांब पातळ चिरून, पाव टीस्पून हिंग
वरून घालण्यासाठी – अर्धी वाटी खोवलेलं ओलं खोबरं आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती –
१) ढोकळा सकाळी करायचा असेल तर रात्री बेसन आणि तांदळाचं पीठ एकत्र करून त्यात ताक घालून भिजवा. भज्यांसाठी पीठ भिजवतो तितपत पातळ झालं पाहिजे. ताक खूप आंबट असेल तर पुरेसं पातळ करण्यासाठी थोडं पाणी वापरा. फार आंबट नसेल तर ताकातच भिजवा.
२) सकाळी पीठ फुगलेलं दिसेल. डावानं ते सारखं करा. त्यात आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. साखर, हळद, मीठ, तेल घाला. नीट हलवून घ्या. साखर पूर्ण विरघळल्याची खात्री करा किंवा पिठीसाखर वापरा.
३) कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. कुकरच्या डब्याला तेल लावून घ्या. पाण्याला उकळी आली की मग पिठात सोडा घाला आणि भराभर मिसळा. लगेचच हे पीठ कुकरच्या डब्यात ओता. ही सगळी कृती भराभर करा. सोडा डबा अगदी कुकरमध्ये ठेवण्याच्या वेळेलाच घाला.
४) डबा कुकरमध्ये ठेवा. शिटी न लावता झाकण लावा. १५-२० मिनिटं मध्यम गॅसवर ढोकळा वाफवा. ढोकळा पूर्ण शिजला की नाही हे बघायची खूण म्हणजे त्यात हलकेच सुरी घाला. बाहेर काढल्यावर पीठ लागलेलं नसेल तर ढोकळा झाला आहे असं समजा.
५) इतक्या पिठात कुकरचे मध्यम आकाराचे दोन डबे ढोकळा होतो. म्हणून दोन कुकर असतील तर दोन कुकरमध्ये वाफवा. किंवा पीठ अर्धं करून अर्धा सोडा घालून दोनदा वाफवा. पण सोडा घालून पीठ ठेवू नका. डबे एकावर एक ठेवूनही ढोकळा वाफवू नका.
६) बाहेर काढून ढोकळा थंड होऊ द्या. मग तो शंकरपाळ्यासारखा तिरपा किंवा चौकोनी कापा.
फोडणीची कृती –
१) एका लहान कढईत तेल गरम करा. तेल गरम झालं की मोहरी घालून तडतडू द्या.
२) लगेचच धणे आणि तीळ घाला. ते परतलं गेलं की मिरची घाला.
३) मिरची परतली की मग कढीपत्ता घाला. हिंग घालून गॅस बंद करा.
४) ही फोडणी ढोकळ्यावर एकसारखी पसरा. वरून खोबरं-कोथिंबीर घाला.
तेव्हा हा ढोकळा तुम्हीही करून बघा आणि कसा झाला ते नक्की कळवा.
सायली राजाध्यक्ष
I liked ur collection of traditional recipes which r very innovative n mouth watering
LikeLike
Thanks!
LikeLike