रविवारी काहीतरी खास जेवायला करायचं ही खास मुंबई-पुण्याकडची पद्धत. जी आमच्या घरातही आहे. म्हणजे रविवारी काहीतरी मांसाहारी पदार्थ झालाच पाहिजे असं घरातल्यांना वाटतं. मग तळलेले मासे असोत, माशांचं कालवण असो, चिकनचा रस्सा असो किंवा चिकन टिक्का असो, यातलं काहीतरी रविवारी आमच्या घरी हमखास असतंच. मी जरी शाकाहारी असले तरी घरातले बाकीचे सगळे पक्के मांसाहारी आहेत. म्हणजे त्यांना शाकाहारी पदार्थ आवडतातच पण मांसाहारी पदार्थांचं विशेष प्रेम आहे. सध्या माशांचा मोसम नाही. कारण हा माशांच्या पैदाशीचा मोसम असतो. शिवाय पावसामुळे बोटी समुद्रात खोलवर जात नाहीत. त्यामुळे या मोसमात चिकन किंवा मटनावर अवलंबून राहावं लागतं. रेड मीट जास्त खाऊ नये म्हणतात. त्यामुळे आमच्याकडे चिकनच जास्त होतं. सॉसेजेस, बेकन किंवा हॅम हे प्रोसेस्ड असतं. त्यामुळे घरी ते शॅलो फ्राय करण्याशिवाय इतर काही करावं लागत नाही. चिकन लवकर शिजतंही. शिवाय एक मांसाहारी पदार्थ केला की खाणारे खूष होतात! शाकाहारी लोकांसारखे डावे-उजवे पदार्थ करत बसावं लागत नाही. आज मी चिकन खिमा केला होता. हीच रेसिपी आज शेअर करणार आहे.
चिकन खिमा
साहित्य – १ किलो चिकन खिमा (स्वच्छ धुवून घ्या), ५ मोठे कांदे बारीक चिरलेले, ३ मोठे टोमॅटो बारीक चिरलेले, (१२-१३ लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, ४-५ हिरव्या मिरच्या वाटून घ्या), अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठी वाटी मटारचे दाणे, पाव वाटी ओलं खोबरं ऐच्छिक, २ टीस्पून तिखट, २ टीस्पून मालवणी मसाला, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून तेल, प्रत्येकी ४ मिरी दाणे, वेलच्या, लवंगा, २ लहान दालचिनीचे तुकडे, २ लहान तमालपत्रं, मीठ चवीनुसार
कृती –
१) एका कढईत तेल चांगलं गरम करा. तेल गरम झालं की त्यात लवंग, वेलच्या, मिरी दाणे, दालचिनी, तमालपत्रं घाला.
२) खडा मसाला चांगला परतून त्यात कांदा घाला. कांदा मध्यम आचेवर झाकण ठेवून, मधूनमधून हलवत चांगला मऊ शिजू द्या. कांदा कच्चा राहता कामा नये.
३) कांदा शिजला की त्यात हळद आणि टोमॅटो घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण घालून टोमॅटो अगदी गाळ होईपर्यंत शिजू द्या.
४) नंतर त्यात आलं-लसूण-मिरचीचं वाटण घालून परता.
५) खमंग वास यायला लागला की त्यात कोथिंबीर, मटार आणि ओलं खोबरं घाला. परत चांगलं परता. झाकण घालून मंद आचेवर मटार दाणे चांगले शिजू द्या.
६) नंतर त्यात तिखट, मालवणी मसाला आणि मीठ घाला. चांगलं एकत्र करा.
७) आता त्यात खिमा घाला. चांगलं हलवून मध्यम आचेवर खिमा शिजेपर्यंत शिजवा. खिमा शिजायला फार वेळ लागत नाही.
चिकन खिमा तयार आहे. हा खिमा गरमागरम पोळ्या, फुलके किंवा पावाबरोबर उत्तम लागतो. बरोबर कांदा आणि लिंबू द्या.
इतका खिमा सहा माणसांना पुरेसा होतो.
सायली राजाध्यक्ष