तांदूळ हे जगात सर्वात जास्त प्रमाणात खाल्लं जाणारं तृणधान्य आहे. जगभरात जिथेजिथे मुबलक प्रमाणात पाऊस पडतो अशा देशांमध्ये तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. तांदूळ उत्पादनाला फारसे कष्ट लागत नाहीत. जगात सगळ्यात जास्त तांदूळ चीनमध्ये आणि त्या खालोखाल भारतात पिकवला जातो. साहजिकच भारतीय जेवणात भाताच्या प्रकारांना अनन्यसाधारण महत्व आहे. अगदी दक्षिणेपासून बघितलं तर तैरसादम (दही भात), सांबार-भात, पुळीवगरै (चिंचेचा कोळ घालून केलेला भात), भिशीब्याळी (भाज्या, मसाले, डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात), पोंगल (खिचडीचाच प्रकार), चित्रान्ना असे भाताचे किती तरी लोकप्रिय प्रकार दिसतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या भागांमध्ये खिचडी किंवा वरण-भात, आमटी-भात, डाळ-भात हे जेवणात असतंच असतं. ईशान्य भारतातल्या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर भात खाल्ला जातो. किनारपट्टीवरच्या आंध्र, बंगाल, केरळ, तामिळनाडू, ओरिसा या राज्यांमध्ये भात आणि मासे खाण्याचं प्रमाण मोठं आहे. उत्तरेत उत्तर प्रदेशपासून ते काश्मीरपर्यंत राजमा-चावलसारख्या पाककृती लोकप्रिय आहेत. शिवाय उत्तर प्रदेशातली खासियत म्हणजे बिर्याणी.
बिर्याणी ही अरब देश आणि भारतात अधिक खाल्ली जाते. भारतात मोगलांनी बिर्याणी आणली असं मानलं जातं. बिर्याणी या शब्दाचा जन्म बिरींज या फारसी शब्दापासून झाला असं म्हणतात. बिरींज म्हणजे भात. पुलाव करताना मांस किंवा मासे किंवा भाज्या घालून भात शिजवला जातो. तर बिर्याणीमध्ये भात आणि मांस, मासे किंवा भाज्या वेगवेगळं शिजवलं जातं आणि नंतर त्याचे थर देऊन बिर्याणीला दम दिला जातो. भारतात, अवधी म्हणजे लखनवी, हैदराबादी, कलकत्ता, थलासेरी असे बिर्याणीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. बिर्याणी करताना मटण, चिकन, मासे, बीफ, अंडी, भाज्या, सोया चंक्स असे प्रकार वापरून मसालेदार रस्सा केला जातो आणि नंतर भाताबरोबर त्याचे थर दिले जातात.
या पेजच्या ब-याच वाचकांची बिर्याणीची रेसिपी शेअर करण्याची मागणी होती. त्यामुळे आजची रेसिपी आहे चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी
चिकन बिर्याणी
साहित्य – ४ वाट्या बासमती तांदूळ, १ किलो चिकन (मध्यम आकाराचे तुकडे करून पाव टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ लावून ठेवा), केशराच्या १०-१२ काड्या (पाव वाटी दुधात घालून ठेवा) २ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, १ वाटी दही, ६ कांदे (उभे पातळ चिरा आणि कुरकुरीत तळून बाजुला ठेवा), १ टीस्पून साखर, एका लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल
भातासाठी – ६-७ वाट्या पाणी (आपल्या अंदाजानं घ्या. भात नवा-जुना असेल त्याप्रमाणे), पाव वाटी काजुचे तुकडे, पाव वाटी बेदाणे, २ तुकडे दालचिनी, ४ लवंगा, ४ वेलच्या, पाव टीस्पून शहाजिरं, २ तमालपत्रं, १ टेबलस्पून तूप, पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
रश्श्याचा वाटण मसाला – ६ मोठे कांदे (मोठे तुकडे करून), ३ मोठे टोमॅटो (मोठे तुकडे करून), २० लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, २ हिरव्या मिरच्या, १ लहान जुडी कोथिंबीर, १ लहान जुडी पुदिना, २ तुकडे दालचिनी, ३-४ लवंगा, २-३ वेलच्या, १ मोठी वेलची, १५-१६ काळे मिरे, १ टेबलस्पून खसखस, पाव टीस्पून शहाजिरं – हे सगळं एकत्र करून मिक्सरवर एकजीव वाटून घ्या.
भाताची कृती –
१) तांदूळ स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून १ तास निथळत ठेवा. भातासाठीचं पाणी गरम करायला ठेवा.
२) एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात खडा मसाला घालून तडतडू द्या.
३) आता त्यात काजू आणि बेदाणे घालून चांगले लाल परता. त्यावर तांदूळ घालून मधूनमधून हलवत लाल परता.
४) नंतर त्यात उकळी आलेलं पाणी आणि मीठ घाला. भातातलं पाणी आटेपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवा. भात मोकळा झाला पाहिजे.
चिकन रश्श्याची कृती –
१) एका कढईत तेल गरम करा.
२) त्यात वाटलेला मसाला घालून मध्यम आचेवर चांगला शिजू द्या. रश्श्याला कच्चा वास राहता कामा नये.
३) रस्सा शिजत आला की त्यात तिखट आणि दही घाला.
४) दह्यातलं पाणी आटेपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा. नंतर त्यात चिकन घाला.
५) चांगलं हलवून घ्या. झाकण ठेवा.
६) चिकन चांगलं परतलं गेलं की त्यात कपभर पाणी घाला. लिंबाचा रस घाला आणि चिकन चांगलं शिजू द्या.
बिर्याणीची कृती –
१) अर्धवट शिजलेला भात पातेल्यातून अर्धा बाजूला काढा.
२) अर्ध्या भातावर चिकन रस्सा घाला. वरून उरलेला भात घाला.
३) भाताला उलथन्यानं छिद्रं करा. त्यात केशराचं दूध आणि थोडंथोडं साजूक तूप सोडा.
४) वर घट्ट झाकण घाला आणि मंद आचेवर भात पूर्ण शिजू द्या.
भात शिजल्यावर सर्व्हिंग बोलमध्ये काढून त्यावर तळलेला कांदा घाला. बरोबर कांद्याचं दह्यातलं रायतं द्या.
चिकन बिर्याणी तयार आहे.
बिर्याणीचा रस्सा जरा रस असलेला हवा. बरेच लोक रस्सा घट्ट करतात आणि बिर्याणी कोरडी होते. बिर्याणीत मी तिखटाचं प्रमाण अतिशय कमी दिलेलं आहे. जास्त तिखट हवी असेल तर हिरव्या मिरच्या आणि लाल तिखटाचं प्रमाण वाढवा.
व्हेज बिर्याणी
साहित्य – ४ वाट्या बासमती तांदूळ, २ वाट्या गाजराचे लांब तुकडे, २ वाट्या फरसबीचे तिरपे लांब तुकडे, १ वाटी सिमला मिरचीचे लांब तुकडे, २ वाट्या बटाट्याचे लांब तुकडे,केशराच्या १०-१२ काड्या (पाव वाटी दुधात घालून ठेवा) २ टीस्पून तिखट, पाव टीस्पून हळद, १ वाटी दही, ६ कांदे (उभे पातळ चिरा आणि कुरकुरीत तळून बाजुला ठेवा), १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, एका लिंबाचा रस
भातासाठी – ६-७ वाट्या पाणी (आपल्या अंदाजानं घ्या. भात नवा-जुना असेल त्याप्रमाणे), पाव वाटी काजुचे तुकडे, पाव वाटी बेदाणे, २ तुकडे दालचिनी, ४ लवंगा, ४ वेलच्या, पाव टीस्पून शहाजिरं, २ तमालपत्रं, १ टेबलस्पून तूप, पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार
रश्श्याचा वाटण मसाला – ४ मोठे कांदे (मोठे तुकडे करून), ३ मोठे टोमॅटो (मोठे तुकडे करून), १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आलं, २ हिरव्या मिरच्या, १ लहान जुडी कोथिंबीर, १ लहान जुडी पुदिना, २ तुकडे दालचिनी, ३-४ लवंगा, २-३ वेलच्या, १ मोठी वेलची, १५-१६ काळे मिरे, १ टेबलस्पून खसखस, पाव टीस्पून शहाजिरं – हे सगळं एकत्र करून मिक्सरवर एकजीव वाटून घ्या.
भाताची कृती –
१) तांदूळ स्वच्छ धुवून पूर्ण पाणी काढून १ तास निथळत ठेवा. भातासाठीचं पाणी गरम करायला ठेवा.
२) एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात खडा मसाला घालून तडतडू द्या.
३) आता त्यात काजू आणि बेदाणे घालून चांगले लाल परता. त्यावर तांदूळ घालून मधूनमधून हलवत लाल परता.
४) नंतर त्यात उकळी आलेलं पाणी आणि मीठ घाला. भातातलं पाणी आटेपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवा. भात मोकळा झाला पाहिजे.
रश्श्याची कृती –
१) एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात गाजर, फरसबी आणि बटाटा घाला.
२) भाज्या अर्धवट शिजल्या की गॅस बंद करा आणि नंतर त्यात सिमला मिरची घाला.
३) ५ मिनिटांनी भाज्या चाळणीत उपसून ठेवा.
४) एका कढईत तेल गरम करा. त्यात वाटलेला मसाला घाला आणि चांगलं परता.
५) मसाला चांगला परतला गेला की दही घालून दह्याचं पाणी आटेपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा.
६) नंतर त्यात लिंबाचा रस, साखर आणि मीठ घाला.
७) भाज्या घालून एक वाफ आली की कपभर पाणी घाला. उकळी आली की गॅस बंद करा.
बिर्याणीची कृती –
१) अर्धवट शिजलेला भात पातेल्यातून अर्धा बाजूला काढा. अर्ध्या भातावर रस्सा घाला.
२) वरून उरलेला भात घाला. भाताला उलथन्यानं छिद्रं करा. त्यात केशराचं दूध आणि थोडंथोडं साजूक तूप सोडा.
३) वर घट्ट झाकण घाला आणि मंद आचेवर भात पूर्ण शिजू द्या.
भात शिजल्यावर सर्व्हिंग बोलमध्ये काढून त्यावर तळलेला कांदा घाला. बरोबर कांद्याचं दह्यातलं रायतं द्या.
व्हेज बिर्याणी तयार आहे. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. माझा कॅमेरा खराब असल्यानं हे फोटो मी मोबाइलवर काढलेले आहेत. ते तितकेसे चांगले आलेले नाहीत.
सायली राजाध्यक्ष