फरसबी गाजराची भाजी

रोज भाजी काय करायची हा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर आ वासून उभा असतो. मला तर वाटतं की, प्रत्यक्ष पदार्थ करण्यापेक्षा त्याचा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणून आज-काल कधीकधी माझ्या मनात येतं की, एकदाच काय तो विचार करावा आणि आठवड्याचा मेन्यू लिहून ठेवावा. म्हणजे सकाळचं जेवण झालं की रात्री जेवायला काय करायचं आणि रात्रीचं जेवण झालं की उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं हा विचार रोज करावा लागणार नाही. सोय म्हणून मेन्यू लिहून ठेवता येईलही, पण तसं केलं तर मग स्वयंपाकातली उत्स्फूर्तता निघून जाईल. मंडईत एखादी ताजी भाजी दिसली की ती आणून ताबडतोब करून खाण्यातली मजा जाईल. किंवा आज हवा मस्त पावसाळी आहे तर आज गरमागरम भजी करूया असं होणार नाही! पण तरीही रोज भाजी कुठली करायची हा प्रश्न उरतोच. मी आजच माझ्या धाकट्या मुलीला, शर्वरीला तिला आवडणा-या २० भाज्यांची यादी द्यायला सांगितलं आहे. कारण तिच्यासाठी काय करायचं हा माझ्यासमोर कायम पेच असतो. तिला आज जे आवडतं ते उद्या आवडेलच असं नाही. २० भाज्यांची यादी द्यायची म्हणजे तिच्यासमोरही मोठा प्रश्न आहे! म्हणून आज मी एका साध्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. जी तुम्हाला रोजच्या जेवणात करता येईल. ही भाजी करायला अतिशय सोपी आहे. ती दिसतेही सुंदर. आजची रेसिपी आहे फरसबी-गाजराची भाजी.

फरसबी-गाजराची भाजी

फरसबी-गाजराची तयार भाजी
फरसबी-गाजराची तयार भाजी

साहित्य- पाव किलो फरसबी (शिरा काढून अगदी बारीक चिरा), २ मध्यम आकाराची गाजरं बारीक चिरलेली, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, २-३ हिरव्या मिरच्या मोठे तुकडे केलेल्या, १ टीस्पून उडीद डाळ, १०-१२ कढीपत्त्याची पानं, १ टेबलस्पून ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग फोडणीसाठी, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार

कृती –

१) एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून फोडणी करून घ्यावी.

२) नंतर त्यात कढीपत्ता, मिरच्या आणि उडदाची डाळ घालावी.

३) उडदाची डाळ लाल झाली की त्यात कांदा घालावा. कांदा फार लाल करायचा नाहीये.

४) कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात हळद घालावी. नीट मिसळून गाजर घालावं.

५) सगळं नीट हलवून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्यावं.

६) आता त्यात फरसबी घालावी. चांगलं परतून त्यात मीठ आणि साखर आणि लिंबाचा रस घालावा.

७) कढईवर झाकण ठेवावं, वर झाकणावर थोडंसं पाणी ठेवावं. म्हणजे भाजी चांगली शिजेल शिवाय कढईत खाली लागणार नाही. मंद आचेवर मधूनमधून हलवत भाजी शिजू द्यावी. भाजी फार मऊ शिजवायची नाही. ती थोडीशी करकरीतच लागली पाहिजे.

८) भाजी शिजली की झाकण काढून त्यात खोबरं आणि कोथिंबीर घालावी. गॅस बंद करावा.

भाजी तयार आहे
भाजी तयार आहे

फरसबी-गाजराची भाजी तयार आहे.

लिंबाचा रस शिजतानाच घातला की भाजीचा रंग छान हिरवा राहतो. म्हणून भाजीत हळदही कमीच घाला. इतकी भाजी ३-४ माणसांना पुरते.

One thought on “फरसबी गाजराची भाजी

  1. Madam mi farasbi gajar chi bhaji & bharli vangi try keli khupach chaan jhalya…mala tumchya sarva recipes avadlya…even kitchen cha niyojan khup chaan dilay…keep writing…i love to read your blogs☺

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: