कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी

मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. आता जसा उन्हाळा तापायला लागलाय तसं नेहमीचं जेवण नकोसं वाटायला लागतं. विशेषतः मसालेदार भाज्या-आमट्या नकोशा होतात. तोंडाला चव आणणारं काहीतरी चटकमटक खावंसं वाटतं. मला तर या दिवसांमध्ये आमरस आणि पोळीशिवाय काहीच खावंसं वाटतच नाही. या दिवसांत कैरी वापरून केलेले कितीतरी पदार्थ जेवणाची लज्जत वाढवत असतात. कैरीचं वरण, कैरीची आमटी, मेथांबा, गुळांबा, साखरांबा, कैरीचं सार, आंबा डाळ, कैरीचं तात्पुरतं लोणचं, कैरीची चटणी, कैरीचा भात हे पदार्थ या दिवसांत हमखास केले जातात. आज मी अशाच डाव्या बाजुला वाढल्या जाणा-या चटण्यांची रेसिपी शेअर करणार आहे. त्या आहेत कैरीची चटणी आणि दोडक्याच्या शिरांची आणि सालींची चटणी.
लहानपणी मी बरेचदा माझ्या आईच्या मावशीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबला जायचे. उन्हाळ्यात सकाळचा नाश्ता म्हणजे रात्रीची उरलेली शिळी भाकरी आणि कैरी-कांद्याची तिखट चटणी असा असे. ती अफलातून चव अजूनही माझ्या जिभेवर आहे.

कैरी कांद्याची चटणी

कैरी-कांद्याची चटणी
कैरी-कांद्याची चटणी

साहित्य – २ कै-या (सालासकट मोठे तुकडे करा), १ कांदा (मोठे तुकडे करा), २ टीस्पून लाल तिखट, एका मोठ्या लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी –तेल, मोहरी,हिंग, हळद

कृती –
१) मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे आणि तिखट-मीठ घालून जाडसर वाटून घ्या.
२) नंतर त्यात कैरीचे तुकडे घाला आणि परत जाडसर वाटून घ्या.
३) आता त्यात गूळ घाला आणि परत फिरवा.
४) शेवटी दाण्याचं कूट घालून हलकंसं फिरवा. चटणी बोलमध्ये काढा.
५) लहान कढलीत तेलाची नेहमीसारखी फोडणी करा. त्यात जरासा जास्त हिंग घाला. चिमूटभर हळद घाला. फोडणी चटणीवर ओता. कैरीची आंबटगोड चटणी तयार आहे.

ही चटणी तिखट-आंबट-गोड अशी लागायला हवी. त्यामुळे कैरीच्या आंबटपणावर गुळाचं प्रमाण कमीजास्त करा. मुद्दाम एक एक पदार्थ घालत चटणी वाटा. कारण तिचं टेक्श्चर जाडंभरडं असायला हवं आहे.

दोडक्याच्या शिरांची आणि सालींची चटणी

दोडक्याच्या शिरांची चटणी
दोडक्याच्या शिरांची चटणी

साहित्य – अर्धा किलो दोडक्यांच्या काढलेल्या शिरा आणि साली, ३-४ हिरव्या मिरच्या, ६-७ लसूण पाकळ्या, २ मुठी कोथिंबीर, १ टीस्पून तेल, मीठ चवीनुसार

कृती –
१) सालकाढण्यानं दोडक्याच्या शिरा आणि साली काढून घ्या.
२) एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात लसूण घाला.
३) जरासं परतून मिरच्यांचे तुकडे घाला. चांगलं परतलं की त्यात शिरा आणि साली घाला. नीट हलवून झाकण घालून चांगली वाफ येऊ द्या.
४) साली जराशा शिजत आल्या की त्यात कोथिंबीर घाला. हलवून घ्या आणि परत झाकण घालून २ मिनिटं वाफ येऊ द्या. ५) गॅस बंद करा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून चटणी वाटा.
आवडत असल्यास वरून हिंग-मोहरीची फोडणी घाला. काही लोक परतताना तीळ किंवा जिरंही घालतात.

दोडक्याच्या शिरांची चटणी

साहित्य – अर्धा किलो दोडक्याच्या पातळ शिरा, १ टेबलस्पून तीळ, तिखट-मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल

कृती –
१) दोडक्याच्या पातळ शिरा काढून त्यांचे बारीक तुकडे करा.
२) एका पॅनमध्ये तेल गरम करून तीळ घालून ते परता.
३) नंतर त्यात शिरा घालून मंद आचेवर झाकण न घालता कुरकरीत होईपर्यंत परता.
४) शेवटी मीठ-तिखट घाला.
कुरकुरीत तोंडीलावणं तयार.

या तिन्ही चटण्या करून बघा आणि कशा झाल्या होत्या ते नक्की कळवा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.

3 thoughts on “कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी

  1. सायली, तू सुगरण तर आहेसच, अतिशय चांगली शिक्षकही आहेस. इतकं तपशिलात आणि सोपं करून सांगतेस की किचनला घाबरणाऱ्या मुलींनी खास तुझ्या रेसिपीज वाचाव्या.
    दोडक्याच्या शिरा-सालींची चटणी मात्र मी कधीच करत नाही. माणसाने सगळंच खाऊ नये, गुरा-ढोरांसाठी काहीतरी सोडावं, असं मला नेहमी वाटतं. पण तीही छानच लागत असणार. फेसबुक सोडलं म्हणून डायरेक्ट इथे आले/येत राहीन. अशीच लिहीत राहा.

    Liked by 1 person

  2. I like the way you present your culinary knowledge with your traditional Maharashtrian recipes. I would also like to see more of your Aaji’s Brahmin, sister’s Maratha, and Saasubai’s Sarswat recipes in future. My best wishes to your blog.

    Like

Leave a reply to aparna mahabal Cancel reply