कढीपत्त्याची चटणी

 

13754106_562314747308582_4984805697224231095_n

भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. सांबार, दहीबुत्ती, रस्सम, बघारे बैंगन, मिरची का सालन अशा सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये कढीपत्त्याची फोडणी हवीच हवी. आपल्याकडेही ब-याचशा भाज्या, आमट्या, कोशिंबिरींच्या फोडणीत कढीपत्ता वापरला जातोच. कढीपत्त्याच्या फोडणीशिवाय चिवडा कसा ओकाबोका दिसतो! फोडणीचा भात, बटाट्याची पिवळी सुकी भाजी, मुगा गाठी या पदार्थांचं रूप कढीपत्त्याच्या खमंग फोडणीमुळेच खुलतं. शिवाय किनारपट्टीवरच्या काही माशांच्या रेसिपीजमध्येही कढीपत्त्याचा वापर केला जातो.
कढीपत्ता हे मूळचं भारत आणि श्रीलंकेत सापडणारं झाड. कढीपत्त्याचं झाड फारसं उंच नसतं. पूर्ण वाढलेल्या झाडाला कढीपत्त्याचे भरभरून तुरे लागलेले असतात. कढीपत्त्याला निंबोणीसारखी दिसणारी, त्याच आकाराची पण किंचित गोलसर लाल रंगाची फळं येतात. झाडाजवळून नुसतं गेलात तरी पानांचा घमघमाट नाकाला जाणवतो. कढीपत्त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यं असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी कढीपत्ता उत्तम आहे असं मानलं जातं. केसांच्या आरोग्यासाठीही कढीपत्ता चांगला असतो असं म्हणतात. कढीपत्त्यामुळे केस पांढरे होण्याची क्रिया मंदावते असंही म्हणतात (मी तर भरपूर कढीपत्ता खाते तरीही माझे केस पांढरे का! ). तर आज कढीपत्त्याचीच एक रेसिपी शेअर करणार आहे, कढीपत्त्याची चटणी. माझी आई ही चटणी फार छान करते.

कढीपत्त्याची चटणी

साहित्य – २ वाट्या कढीपत्त्याची पानं-धुवून कोरडी केलेली, १ वाटी बिन पॉलिशचे तीळ, २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, २ टीस्पून तेल

कृती –
१) एका नॉनस्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करा. त्यावर कढीपत्त्याची पानं घाला.
२) मध्यम आचेवर मधूनमधून परतत ती कुरकुरीत होऊ द्या. कुरकुरीत झाली की थंड करा.
३) तीळ कोरडेच लाल रंगावर भाजा.
४) पानं आणि तीळ थंड झाले की मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटा.
५) त्यात तिखट-मीठ घाला आणि परत एकदा फिरवा. अगदी बारीक पूड करू नका.

कढीपत्त्याची चटणी तयार आहे. या चटणीत कढीपत्त्याचं प्रमाण आपल्याला हवं तितकं वाढवू शकता. भाकरी किंवा पोळीबरोबर तर ही चटणी मस्तच लागते. पण गरम आसट भातावर ही चटणी आणि तूप घालून खाल्लंत तर बोटं चाटत रहाल!

सायली राजाध्यक्ष

Advertisements

कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी

मराठी जेवणात, मुख्यतः कोकण वगळता इतर भागांतल्या जेवणात ताटातल्या डाव्या बाजुला खूप महत्व दिलं जातं. मराठवाडा आणि विदर्भात तर चटण्या-लोणच्यांसारख्या तोंडी लावण्यांची रेलचेल असते. आता जसा उन्हाळा… Read more “कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी”

भुरका

आजची रेसिपी आहे भुरका. भुरका हा तोंडीलावण्याचा एक प्रकार मराठवाड्यात लोकप्रिय आहे. जेवताना घरात लोणचं, चटणी, ठेचा असं काही नसलं की पटकन भुरका केला की काम भागतं.… Read more “भुरका”

दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी

मराठी जेवणात ताटात डावीकडे वाढल्या जाणा-या पदार्थांना म्हणजेच चटणी, लोणची, कोशिंबिरींना महत्वाचं स्थान आहे. कोशिंबिरींमधून जीवनसत्वं मिळतात तर चटण्या आणि लोणची जेवणाची चव वाढवण्याबरोबरच अन्न पचनासाठी आवश्यक… Read more “दाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि पूड चटणी”