भेंडीची भाजी आवडत नाही असं लहान मूल बहुधा नसतंच. मुलांना नुसती परतलेली साधी भेंडीची भाजी जास्त आवडते. भरलेली भेंडी, चिंचगुळातली भेंडी, ताकातली भेंडी, तळलेली राजस्थानी भेंडी असे भेंडीच्या भाजीचे किती तरी प्रकार होत असतात. काही लोक उपासालाही भेंडीची भाजी खातात. उपासाला खाल्ले जाणारे बहुतेक सगळे पदार्थ जसे मूळचे परदेशी आहेत तसंच भेंडीचंही आहे. भेंडी मूळची कुठली याबाबत वाद आहेत. ती इथियोपियातून किंवा आफ्रिकेतून आली असावी असंही मानलं जातं.
भेंडीमध्ये पोषणमूल्यंही भरपूर असतातच शिवाय तिच्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे पोटासाठी भेंडी उत्तम. मी लहान असताना आजीबरोबर मंडईत जाऊन भाजी आणायचे तेव्हा आजीला हमखास भेंडी घ्यायला लावायचे. त्यावेळी भेंडीत इतकी कीड असायची की जवळपास अर्धी भेंडी फेकायला लागायची. उरलेल्या भेंडीची आजीला दाण्याचं कूट घालून कुरकुरीत भाजी करायला लावायची. पण आता तसं होत नाही. आता भेंडी उत्तम मिळते. माझ्या मुलीला हिरव्या रंगाच्या भाज्या बघितल्या की मळमळतं म्हणे! ती फक्त ताजे मटार (कच्चे), भेंडी आणि तोंडली याच हिरव्या भाज्या खाते. त्यामुळे आमच्या घरी एक दिवसाआड भेंडीची भाजी होते. तीही तिला साधी तिखट-मीठ-दाण्याचं कूट घालून परतलेलीच भेंडी लागते मग ती तशीच केली जाते. पण कधी तरी ती घरी नसल्याची संधी साधून मी भरलेली भेंडी करते. आज मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. भरलेली भेंडी ब-याच प्रकारांनी करतात. मी डाळीचं पीठ भाजून करते.
भरलेली भेंडी
साहित्य – अर्धा किलो अगदी कोवळी भेंडी, दीड वाटी डाळीचं पीठ (कोरडंच खमंग लाल रंगावर भाजून घ्या), अर्धी वाटी दाण्याचं कूट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड आणि लाल तिखट, १ टीस्पून काळा मसाला (ऐच्छिक), अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून साखर (ऐच्छिक), अर्धा टीस्पून आमचूर, १ टेबलस्पून ओलं खोबरं (ऐच्छिक), मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, मोहरी-हिंग
कृती –
१) भेंडी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घ्या. तिचे देठ काढून तिला फक्त एक चिर द्या.
२) भाजलेलं बेसन, दाण्याचं कूट, धणे-जिरे पूड, तिखट-मीठ-हळद-साखर-आमचूर, ओलं खोबरं असं सगळं एकत्र करा.
३) त्यात थोडंसं पाणी घालून ते पीठ साधारण भाकरीच्या पिठासारखं भिजवा.
४) आता हे मिश्रण भेंडीत भरा.
५) एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घालून नेहमीसारखी फोडणी करून घ्या.
६) त्यावर भरलेल्या भेंड्या नीट पसरून लावा.
७) झाकण घालून मध्यम आचेवर चांगलं शिजू द्या. मधूनमधून हलवत रहा.
८) भेंडी शिजत आली की झाकण काढून मोठ्या आचेवर भेंडी सगळ्या बाजूंनी लाल होऊ द्या.
भरलेली भेंडी तयार आहे.
ही भेंडी पोळीला भाजी म्हणून लावून खाता येत नाही. त्यामुळे दालफ्राय-भात, आमटी भात, सांबार भात असं काही केलंत तर त्याबरोबर तोंडी लावणं म्हणून ही भेंडी करू शकता किंवा पराठा-डाळ, एखादी पातळ भाजी पोळी आणि ही भेंडी असंही करू शकता. इतकी भेंडी साधारणपणे ४ माणसांना पुरेशी होते.
सोशल नेटवर्किंगवर ही रेसिपी शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सायली राजाध्यक्ष