धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी

पारशी समुदाय हा भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. मूळचे इराणी असलेले पारशी हे मुस्लिम आक्रमकतेच्या भीतीनं भारतात आले आणि ते इथलेच बनून गेले. पहिले पारशी आले ते गुजरातेतल्या उदवाड इथं. म्हणूनच पारशांची मातृभाषा गुजराती झाली. पारशी बायकांनी गुजराती साडीला आपलंसं केलं. भारतीय समाजकारण, अर्थजगत, उद्योगविश्व, मनोरंजन क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रात पारशांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. भारतातल्या धर्मादाय कार्यात तर पारशांचा हात कोणीही धरू शकणार नाही. इतकं सगळं करूनही पारशांनी आपला वेगळा झेंडा फडकावत ठेवलेला नाही हेही त्यांचं वैशिष्टयच. पारशी भारतीय समाजात अगदी विरघळून गेले आहेत. भारतातलं पहिलं पंचतारांकित हॉटेल टाटांनी बांधलं, पहिला पोलाद कारखाना टाटांनी उभारला, पहिलं कॅन्सर हॉस्पिटल टाटांनी उभं केलं. भारतात विमान वाहतुकीचा पाया घालणारे जेआरडी टाटा, भारतीय अणु उर्जा प्रकल्पाचे जनक होमी भाभा हे पारशीच. मुंबईतलं NCPA पारशांनीच बांधलेलं. भारतीय लष्करात फील्ड मार्शल हा सर्वोच्च किताब मिळवणारे पहिले अधिकारी सॅम माणेकशा पारशीच. नावं तरी किती घेणार इतकं पारशांनी आपल्याला भरभरून दिलेलं आहे.

आज पारशी नववर्षांरंभ पतेती. पारशांचं जेवणही अतिशय लज्जतदार असतं. आज त्यांच्याकडे खास धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी आणि लगननु कस्टर्ड असा बेत असतो. आम्हीही दरवर्षी पतेतीच्या दिवशी हा बेत करतोच करतो. तेव्हा आज धानसाक, ब्राउन राइस आणि पातरानी मच्छीची रेसिपी तुमच्यासाठी.

धानसाक

तयार धानसाक
तयार धानसाक
धानसाक हे मटण, चिकन आणि शाकाहारी केलं जातं. आज मी शाकाहारी धानसाकची कृती देणार आहे.

साहित्य: 1 वाटी तूर डाळ, पाव वाटी मसूर डाळ, 1 टेबलस्पून मूग डाळ, 1 टेबलस्पून उडीद डाळ, 3 लहान वांगी चौकोनी फोडी करून, 1 वाटी लाल भोपळ्याच्या बारीक फोडी, 2 बटाट्यांच्या बारीक फोडी, अर्धी वाटी मेथी बारीक चिरून, 2 कांदे उभे पातळ चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरून, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 टीस्पून चिंचेचा कोळ, 2 टेबलस्पून धानसाक मसाला (मंगल धानसाक मसाला, कुठल्याही किराणा दुकानात मिळतो), 1 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार
कृती:
 1) प्रथम सगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
2) त्यात चिरलेल्या भाज्या आणि आलं लसूण घालून कुकरला मऊ शिजवून घ्यावं. अगदी गाळ शिजायला हवं.
3) शिजल्यावर हे मिश्रण थंड होऊ द्यावं. नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक, एकजीव वाटून घ्यावं.
4) एका कढईत तेल गरम करावं. त्यात चिरलेला कांदा घालून तो लाल होऊ द्यावा.
5) नंतर त्यात टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला शिजला की त्यात धानसाक मसाला घालून चांगलं हलवावं आणि त्यात वाटलेलं मिश्रण घालावं.
6) नीट हलवून त्यात चिंचेचा कोळ, मीठ घालावं आणि चांगली उकळी येऊ द्यावी.
7) धानसाक हे घट्टच असतं. भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ करावं. त्या अंदाजानेच पाणी घालावं.
8) धानसाक तयार आहे.
चिकन किंवा मटण धानसाक करताना पाव किलो तुकडे उकडून धानसाक उकळताना घालावेत.

ब्राउन राइस

तयार ब्राउन राइस
तयार ब्राउन राइस

साहित्य: 2 वाट्या बासमती तांदूळ, 2 कांदे उभे पातळ चिरलेले, 4 लवंगा, 2 टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून तूप, साडेचार वाट्या पाणी, सजावटीसाठी 2-3 कांदे उभे चिरून तळलेले.

कृती:

1) भात करण्याआधी 1 तास तांदूळ धुवून निथळत ठेवा.
2) गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा.
3) प्रथम एका पॅनमधे तूप गरम करा. त्यात लवंगा घाला.
4) आता त्यात पातळ चिरलेला कांदा आणि साखर घाला.
5) साखरेचं कॅरॅमल होईपर्यंत आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतत रहा.
6) कांदा लाल झाल्यानंतर त्यात धुतलेले तांदूळ घाला. तांदूळ परतून चांगले लाल होऊ द्या.
7) त्यात आधणाचं पाणी घाला. मीठ घाला.
8) भात चांगला शिजू द्या.
9) भात शिजल्यावर भांड्यात काढून वरून तळलेला कांदा घाला.

तूप न घालता फक्त 4 टीस्पून साखरेचं कॅरॅमल करून घेऊन त्यात धुतलेले तांदूळ घालूनही भात करता येतो. पण कॅरॅमलमुळे भात गोड लागतो म्हणून मी तसं करत नाही. पण मूळ पारसी पाककृती तशीच आहे.

पातरानी मच्छी

पातरानी मच्छी
पातरानी मच्छी

साहित्य: 8-10 पापलेटचे किंवा सुरमईचे तुकडे, जितके तुकडे तितकी मध्यम आकाराची केळीची पानं किंवा मोठ्या पानांचे तितके तुकडे, 2 वाट्या ओलं खोबरं, 2 वाट्या कोथिंबीर, 4-5 कमी तिखट हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, मोठ्या अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, पानं बांधायला जाडसर दोरा.

कृती:

1) प्रथम पापलेटचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या.
2) ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण, मिरच्या, लिंबाचा रस आणि मीठ घालून अगदी बारीक चटणी वाटून घ्या.
3) केळीची पानं स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्या.
4)आता फोटोत दाखवल्याप्रमाणे केळीच्या पानावर पापलेटचा तुकडा ठेवून दोन्ही बाजुंनी भरपूर चटणी लावा.
5) केळीचं पानं चारी बाजुंनी दुमडून दो-यानं व्यवस्थित बांधून घ्या. असे सगळे तुकडे गुंडाळून घ्या.
6) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यावर बसेल अशी चाळणी ठेवा. त्यात हे तुकडे ठेवा. त्यावर बसेल असं झाकण घाला.
7) साधारणपणे 10 मिनिटांत तुकडे शिजतात.

सगळं तयार करून झाल्यावर धानसाक, राइस आणि पातरानी मच्छी कचुंबराबरोबर द्या.

कचुंबरासाठी 2 कांदे, 2 काकड्या, 2 टोमॅटो बिया काढून लांबट चिरा. त्यात 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घाला. त्यात चवीनुसार मीठ, तिखट, लिंबाचा रस घाला.

धानसाक, ब्राउन राइस आणि पातरानी मच्छी तयार आहे
धानसाक, ब्राउन राइस आणि पातरानी मच्छी तयार आहे

2 thoughts on “धानसाक, ब्राउन राइस, पातरानी मच्छी

Leave a comment