कडधान्यांच्या आमट्या ही सारस्वतांच्या खाद्यसंस्कृतीची एक खासियत. हा सारस्वतांच्या सार्थ अभिमानाचाही विषय! चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी आणि काळ्या वाटाण्यांची आमटी हे तीन प्रकार एकदम वैशिष्ट्यपू्र्ण आहेत आणि अतिशय चविष्टही. या तिन्ही आमट्यांची रेसिपी मी शेअर करणार आहेच. आज मी मला अतिशय आवडणा-या काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी शेअर करते आहे.
ही पाककृती मी अर्थातच माझ्या सासुबाईंकडून शिकले आहे. ही आमटी मला फार आवडते म्हणून अजूनही ती केली की माझ्या सासुबाई आवर्जून मला ती पाठवतात. माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी माहेरी गेले असले की मी परत यायच्या दिवशी त्या मुद्दाम माझ्यासाठी ही आमटी करत. तेव्हा आज तुमच्यासाठी ही काळ्या वाटाण्यांच्या आमटीची रेसिपी.
काळ्या वाटाण्यांची आमटी

साहित्य: २ वाट्या काळे वाटाणे, एक ते दीड वाटी खोवलेलं ओलं खोबरं, एक टेबलस्पून धणे, अर्धा टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, २ टीस्पून मालवणी मसाला, एक वाटी काजु तुकडा, दीड टेबलस्पून चिंचेचा कोळ ( प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं ), मीठ चवीनुसार
कृती:
1) आमटी करण्याच्या आदल्या दिवशी रात्री काळे वाटाणे स्वच्छ धुवून भिजवून ठेवावेत.
2) सकाळी वाटाणे पुन्हा एकदा धुवून घेऊन कुकरला शिजवण्यासाठी लावावेत. शिजवताना त्यात अर्धा टीस्पून मीठ घालावं. हे वाटाणे शिजायला वेळ लागतो. तेव्हा कुकरच्या भांड्यात न घालता मध्यम आकाराच्या कुकरमधे डायरेक्ट शिजवल्यास साधारण दोन शिट्या करून अर्धा तास मंद गॅसवर ठेवावेत. वाटाणे अगदी मऊ शिजले पाहिजेत.
3) वाटाण्यांमधलं उरलेलं पाणी तसंच राहू द्यावं. काजु तुकडा तासभर भिजवून बेताचा शिजवून घ्यावा.
वाटण मसाला:
1) कढई गरम करून त्यात आधी ओलं खोबरं तेल न घालता गुलाबी रंगावर भाजून घ्यावं.
2) ते बाजुला काढून ठेवून कढईत जरासं तेल घालून धणे लाल रंगावर भाजून घ्यावेत.
3) आता धणे बाजुला करून थोडंसं तेल घालून हिंगाची पूड तळून घ्यावी. हिंग तळला गेला पाहिजे पण जळता कामा नये.
4) आता परत कढईत ओलं खोबरं घालावं आणि सगळा मसाला नीट एकत्र करून गॅस बंद करावा.
5) हा मसाला मिक्सरमधे आधी कोरडा फिरवावा. नंतर त्यात हळद, मालवणी मसाला आणि पाणी घालून वाटावं.
6) शेवटी शिजलेल्या वाटाण्यांपैकी दोन टेबलस्पून वाटाणे घालून एकजीव पेस्ट करावी. वाटाण्यांमुळे आमटीला छान दाटपणा येतो.
आमटीची कृती:
1) एका पातेल्यात शिजलेले वाटाणे घ्यावेत.
2) त्यात वाटलेला मसाला, काजू तुकडा, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालावं.
3) आपल्याला हवं असेल तितकी आमटी पातळ ठेवावी. सारस्वती आमट्या जराशा दाटच असतात.
4) गॅसवर आमटी उकळावी. उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
या आमटीला तेलाची फोडणी नसते. आमटी गरम साध्या भाताबरोबर द्यावी.
साधारणपणे ५-६ माणसांना एवढी आमटी पुरते.