आज गणेश चतुर्थी, आज घरोघरी गोड पदार्थ म्हणून अर्थातच मोदक केले जातात. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उकडीचे मोदक केले जातात तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागांमधे बहुतेक लोक तळलेले मोदक करतात. आता जरी नारळ सगळीकडे सर्रास मिळत असले तरी ज्या ज्या भागात नारळ पिकत नाहीत त्या भागांमधे पूर्वीपासून सुक्या सारणाचे, म्हणजे सुकं खोबरं वापरून मोदक करण्याची पध्दत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात असे मोदक केले जातात. म्हणज सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घ्यायचं, त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, सुका मेवा घालून सारण तयार करायचं आणि मैदा-रव्याचं पीठ भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तुपात तळायचे. उकडीचे मोदक तांदळाची उकड काढून, ओलं-खोबरं, गूळ आणि सुक्या मेव्याचं सारण करून केले जातात, नावाप्रमाणे ते अर्थातच उकडतात.
मी मूळची मराठवाड्यातली असले तरी आता मुंबईत राहते. त्यामुळे या दोन्ही पध्दतींच्या मिश्रणातून मी माझी मोदकांची रेसिपी तयार केली आहे. म्हणजे मी तळलेले मोदक करते पण सारण ओलं खोबरं आणि गुळाचं करते. हे मोदक अप्रतिम लागतात. अर्थात गुळ-खोबरं एकत्रित वापरलेला कुठलाही पदार्थ चविष्टच लागतो म्हणा! तेव्हा आजची रेसिपी आहे, तळलेले मोदक. गणपतीत एका तरी वेळेला प्रसादासाठी हे करून बघा आणि कसे झाले ते नक्की कळवा.
तळलेले मोदक

साहित्य:
सारणासाठीचं साहित्य: ३ वाट्या खोवलेलं ओलं खोबरं, दीड वाटी गूळ, प्रत्येकी अर्धी वाटी बदाम तसंच पिस्त्याचे काप, अर्धी वाटी काजुचे बारीक तुकडे, अर्धी वाटी बेदाणे, पाव वाटी चारोळी, अर्धा टीस्पून जायफळ पूड, १ टेबलस्पून साजुक तूप
वरच्या पारीसाठीचं साहित्य: ३ वाट्या कणीक, १ टेबलस्पून रवा, १ टेबलस्पून तूप, पाव टीस्पून मीठ, पाव टीस्पून साखर (साखरेनं वरची पारी खुसखुशीत होते), भिजवायला लागेल तितकं दूध
कृती:
१) प्रथम कणीक, रवा, मीठ आणि साखर नीट मिसळून घ्या.
२) त्यात तूप कडकडीत गरम करून घाला. नीट हलवून त्यात लागेल तितकं दूध घाला आणि पु-यांसाठी मळतो तशी घट्ट कणीक भिजवा.
३) कणीक मोदक करायच्या अर्धा ते एक तास आधी भिजवा.

सारणाची कृती:
१)एका कढईत ओलं खोबरं, गूळ, सुका मेवा आणि तूप घाला.
२) ते सगळं नीट मिसळून घ्या आणि मंद आचेवर कढई ठेवा.
३) त्यावर झाकण ठेवा आणि मधूनमधून हलवत साधारणपणे १५ मिनिटं शिजू द्या.
४) आता त्यात जायफळाची पूड घाला, हलवून घ्या आणि गॅस बंद करा.

मोदकांची कृती:
१) लहान लिंबाएवढा उंडा घ्या.
२) पुरी लाटतो तशी लाटी लाटा, पण पुरीपेक्षा पातळ लाटा.
३) पारी हातावर घेऊन त्यात हवं तितकं सारण भरा.
४) फोटोत दाखवल्याप्रमाणे लाटीला हलक्या हातानं कळ्या पाडा.
५) सगळ्या कळ्या एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्या.
६) असे सगळे मोदक करून घ्या.
७) कढईत तूप गरम करून मोदक लाल रंगावर तळून घ्या.
आजच्या साग्रसंगीत जेवणाबरोबर मोदक द्या. जेवणाची लज्जत वाढेलच!