नुकताच गुढीपाडवा झाला. मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. चैत्र महिन्याचाही पहिला दिवस. वसंत ऋतुची, आंब्यांची, कोकीळांची आणि उन्हाळ्याचीही चाहूल पाडव्याच्या आसपास लागते. आमच्या घराच्या शेजारी एक लहानसं झाड आहे. त्या झाडावर इतके कोकीळ येतात आणि त्यांचा इतका आवाज असतो की कधीकधी वसंतराव देशपांड्यांच्या ‘कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का त्या कोकीळा, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा’ असं म्हणायची वेळ येते. हे कोकीळ मध्यरात्रीपासून ओरडायला सुरूवात करतात (हो इतका आवाज असतो त्यांचा, गोड असतो खरा पण त्याला कूजन नाही म्हणता येणार!) कधी कधी तर सकाळ झाली आहे असं समजून मी मध्यरात्री दचकून उठले आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागलेली असली तरी बरोबर थंडगार वाळ्याचं माठातलं पाणी, कैरीचं गारेगार पन्हं, चमचमीत आंबा डाळ, कैरी बारीक चिरून केलेलं तात्पुरतं लोणचं, कडकडीत उन्हात दारावर येणा-या आईस्क्रीमवाल्याची घंटा, चैत्रगौरीचं हळदीकुंकू, हळदीकुंकवाला मिळालेल्या हरभ-यांची-चणा डाळीची झटपट केलेली मस्त उसळ, वाळ्याचे पडदे, कुलर्स, गच्चीवर किंवा अंगणात चांदण्यानं लखलखणारं आकाश बघत झोपणं अशा सगळ्या आठवणी यायला लागतात. आता माठाच्या पाण्याची जागा फ्रीजमधल्या पाण्यानं घेतली आहे. मुंबईत तरी कै-या जवळपास वर्षभर मिळतात. आईस्क्रीम तर काय आपण आता तिन्ही त्रिकाळ खात असतो. कुलरच्या जागी एअर कंडिशनर्स आले आहेत. आणि सततच्या डेंग्यू-मलेरियामुळे आपण गच्चीवर झोपणं बंद केलंय. पण असं असलं तरी स्मरणरंजनासाठी का होईना पण यातल्या निदान काही गोष्टी तरी आपण करत असतोच.
गुढी पाडव्याला बहुतेक सगळ्या मराठी घरांमध्ये ठरलेला बेत असतो तो श्रीखंड-पुरी-बटाटा भाजीचा. आज माझ्या घरीही श्रीखंड-पुरी-बटाटा भाजी-काकडी टोमॅटोचं कचुंबर आणि मसालेभात असा बेत होता. श्रीखंडाची रेसिपी मी यापूर्वीही शेअर केलेली आहे. ती माझ्या ब्लॉगवरही आहे. पण ज्यांची ती बघायची राहिली असेल त्यांच्यासाठी मी आज ती परत शेअर करते आहे. शिवाय आज चैत्रात खास होणा-या आंबा डाळीची रेसिपीही शेअर करणार आहे.
आंबा डाळ
साहित्य – २ वाट्या हरभरा डाळ (३-४ तास भिजवा), २ कै-या (किसून घ्या), २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या, १-२ टीस्पून साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, ७-८ सुक्या लाल मिरच्या बारीक तुकडे केलेल्या
कृती –
१) भिजवलेली चणा डाळ चाळणीत घालून निथळून घ्या.
२) डाळ मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात हिरव्या मिरच्या तुकडे करून घाला.
३) डाळ मिक्सरला जाडसर वाटून घ्या. वाटताना वाटलं तर किंचित पाणी घाला म्हणजे डाळ अगदी कोरडी होणार नाही.
४) वाटलेली डाळ एका भांड्यात काढा. त्यात कैरीचा कीस, साखर, मीठ, कोथिंबीर घाला. नीट कालवून घ्या.
५) एका लहान कढईत तेल तापवा. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घाला.
६) मोहरी तडतडली की मिरच्या घाला. लगेचच हिंग, हळद घाला.
७) ही फोडणी आंबा डाळीवर घाला. खाताना फोडणी कालवून मग खा.
आंबा डाळ तयार आहे.
कैरीचा आंबटपणा कसा आहे ते बघून कैरीचं प्रमाण कमी-जास्त करा. साखर आवडीनुसार वापरा. काही लोक यात ओलं खोबरं घालतात. हवं असल्यास घाला.
श्रीखंड
साहित्य – ३ लिटर म्हशीचं दूध, दोन ते अडीच वाट्या साखर, २ टीस्पून जायफळाची पूड, आवडत असल्यास थोडी वेलची पूड, १ टेबलस्पून चारोळी, थोडंसं केशर
कृती –
१) प्रथम दूध तापवून ते थंड करून घ्या.
२) दूध पूर्णपणे थंड झाल्यावर साय न काढता त्यात साधारणपणे एक वाटी विरजण घालून दही लावून ठेवा.
३) दही पूर्ण लागल्यावर मग ते दही एका मोठ्या चाळणीत पंचा घालून त्यावर घाला.
४) पाणी पूर्ण निथळून जाऊ द्या. पंचात दही बांधून ठेवा. साधारणपणे ३ तास ठेवा. चक्का फार कोरडा करू नका नाहीतर श्रीखंड फार घट्ट होतं.
५) तयार चक्का एका पातेल्यात काढा. त्यात साखर घालून नीट एकत्र करा.
६) हे पातेलं फ्रीजमधे ठेवून द्या. २ तासांनी साखर छान विरघळेल. आता त्यात जायफळ पूड घाला आणि मिश्रण नीट हलवून घ्या.
७) पुरणयंत्रातून श्रीखंड गाळून घ्या.
८) एका काचेच्या भांड्यात तयार श्रीखंड काढा. त्यावर केशराच्या काड्या घाला आणि चारोळी घाला.
श्रीखंड तयार आहे.
इतक्या साहित्यात ७-८ वाट्या श्रीखंड होतं. मी वेलची पूड घालत नाही पण आवडत असल्यास घाला. आवडत असल्यास सुक्या मेव्याचे तुकडे घाला. स्ट्रॉबेरीसारखं फळ बारीक चिरून घातलंत तर फ्रुट श्रीखंड करता येईल. केशर दुधात मिसळून घातलं तर श्रीखंड केशरी रंगांचं होतं. असं करायचं असेल तर श्रीखंड गाळतानाच केशर घाला. साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. श्रीखंड नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावं म्हणजे त्याची मूळ चव जास्त काळ टिकते. स्टीलच्या भांड्यात चव बदलते.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
तुमचा ब्लॉग मला खुप आवडला.
सोप्या शब्दात मांडलेल्या रेसिपी,फोटो,छानच.मी २महिन्यापासून बरेच पदार्थ करून पाहिले.
सोलकढी,दलिया,पैटीस,बिर्याणी,आणि आज लोणचेही घातले.
तुम्हाला खूप शुभेच्छा.
LikeLiked by 1 person