उन्हाळ्यातला शेवटचा साठवणीचा पदार्थ म्हणजे कैरीचं टिकाऊ लोणचं. तोपर्यंत कैरीचं तात्पुरतं लोणचं, तात्पुरता तक्कू, किसवंती, कैरी-कांद्याचं लोणचं, कैरी-कांद्याची चटणी, मेथांबा, आंबा डाळ हे सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन झालेले असतात. कैरीला निरोप देताना मात्र तिची आठवण म्हणून वर्षभराचं टिकाऊ लोणचं घातलं जातंच.
माझी आई कैरीचं साधं लोणचं, का-हळ आणि लसूण घालून केलेलं लोणचं, आंध्र पद्धतीचं आलं-लसूण घालून केलेलं लोणचं अशी विविध प्रकारची लोणची करते. मी लहान असताना आईची एक मैत्रीण मधुलिका आर्य आणि आई मिळून लोणचं घालायच्या. आर्य काकू मूळच्या हैदराबादच्या होत्या. त्यामुळे आलं-लसूण घालून केलेलं तिखट लोणचं आई त्यांच्याकडूनच शिकली. माझी आई साधारणपणे पहिला पाऊस झाल्यावर हे लोणचं घालते. त्यामुळे मीही एक पाऊस पडून गेला की लोणचं करते. आमच्या घरी लोणचं घातलं की निदान पाव लोणचं तरी पहिल्या दिवशीच ताज्या फोडी खाऊन संपतं.
आमच्या औरंगाबादच्या घराच्या अंगणात, एक आपोआप उगवलेलं आंब्याचं झाड आहे. आणि या झाडाच्या कै-या लोणच्यासाठी लागतात तशा आंबट आणि करकरीत असतात. यावर्षी आईनं तब्बल ५० किलोंचं लोणचं घातलं. माझ्या दोन्ही बहिणी आणि मी, माझी वहिनी, चुलत वहिनी अशा सगळ्यांना आईनं लोणचं पाठवलंय. पण मी केवळ तुमच्यासाठी आज एक किलो कै-या आणून लोणचं घातलं. नाहीतर दरवर्षी मी निदान ४-५ किलोंचं लोणचं घालते.
लोणच्यासाठी कै-या निवडताना त्या अगदी घट्ट असायला हव्यात. शिवाय गडद हिरव्या रंगाच्या आणि करकरीत हव्यात. कै-या विकणारेच बरेचदा कै-या फोडूनही देतात. फक्त ते कै-या न धुता फोडतात. किंवा काही जण कै-या फोडून आणून मग घरी आणून फोडी धुतात आणि मग त्या कोरड्या करून लोणचं करतात. यात फक्त एकच धोका आहे, जर कै-यांना पाणी राहिलं तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. म्हणून कै-या विकत आणून, घरी आणून स्वच्छ धुवून मग कोरड्या करून फोडून आणा. यावर्षी तर मी एकच किलो होत्या तर घरीच कै-या चिरल्या. पण फोडलेल्या कै-यांचं लोणचं जास्त लज्जतदार लागतं कारण त्यात बाठीचीही चव येते. आजची रेसिपी आहे कैरीच्या लोणच्याची.
कैरीचं लोणचं
साहित्य – १ किलो लोणच्याच्या करकरीत कै-या (शक्यतो राजापुरी), १०० ग्रॅम बेडेकर किंवा केप्रचा कैरी लोणचे मसाला, पाव वाटी लाल तिखट, अर्धी ते पाऊण वाटी मीठ, १ वाटी कडकडीत तापवून थंड केलेलं शेंगदाणा किंवा तिळाचं तेल
तयार मसाला वापरायचा नसेल तर – १ वाटी लाल तिखट, १ टेबलस्पून हळद, अर्धी ते पाऊण वाटी मीठ, पाऊण वाटी मोहरीची डाळ, १ टेबलस्पून मेथ्या (तेलावर लाल भाजून बारीक पूड करा), दीड टीस्पून हिंग (हा सगळा मसाला मिक्सरवर फिरवून घ्या) आणि १ वाटी कडकडीत तापवून थंड केलेलं तेल
कृती –
१) कै-या स्वच्छ धुवून पंचावर टाकून कोरड्या करा. चांगल्या कोरड्या झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी फोडून आणा किंवा घरी चिरा.
२) मसाल्याचं दिलेलं सामान एकत्र करा. त्याची चव बघून मसाल्याचे पदार्थ कमी-जास्त करा.
३) एका मोठ्या पातेल्यात हा मसाला घ्या. त्यात कैरीच्या फोडी घालून स्वच्छ डावानं एकत्र करा. झाकून ठेवून द्या.
४) बरणीत भरताना बरणी कोरडी आहे याची खात्री करून घ्या. थोडंसं तिखट-मीठ एकत्र करून बरणीच्या तळाशी घाला. वर लोणचं भरा. वर परत थोडं तिखट-मीठ मिसळून घाला.
५) बरणीचं झाकण घट्ट लावा. पहिले तीन-चार दिवस बरणी रोज हलवा.
मी लोणच्याला तेल घालत नाही. म्हणून मसाला जरा जास्त घेते. बरेच लोक मसाल्यात तेल घालत नाहीत. ते वरून तापवून थंड केलेलं तेल घालतात. तसंही करू शकता.
का-हळाचं लोणचं करताना वर दिलेला थोडा मसाला, अर्धी वाटी अख्खा लसूण, अर्धी वाटी का-हळाची पूड, अर्धी वाटी तापवून थंड केलेलं तेल असं घेऊन मसाला तयार करा. त्यात कैरीच्या फोडी मिसळा.
आलं-लसणाचं लोणचं करताना १ किलो कैरीला पाव वाटी आलं आणि पाव वाटी लसूण बारीक वाटून घ्या. लोणच्याच्या मसाल्यात हे चांगलं मिसळा. त्यात जरा जास्त तेल घाला. कैरीच्या फोडी मिसळा. वरून परत तापवून थंड केलेलं तेल घाला. या लोणच्याला भरपूर तेल वापरतात.
तिळाचं लोणचं करताना एक किलो कैरीला वाटीभर तीळ न भाजता जाडसर पूड करून घाला. मसाला वरच्या प्रमाणेच वापरा. वरून तापवून थंड केलेलं तेल घाला.
सुकं खोबरं घालून लोणचं करायचं असेल तर वाटीभर सुकं खोबरं जरासं कोमट करा. लाल भाजू नका. मिक्सरला वाटून पूड करा. ती मसाल्यात मिसळा. वरून तापवून थंड केलेलं तेल घाला.
तक्कू करताना एक किलो कैरीचा जाड कीस करा. त्यात वरचाच मसाला घाला. तेल घालून नका. बरणीत भरून ठेवा.
सायली राजाध्यक्ष