हा हुरड्याचा मोसम आहे. हुरडा म्हणजे ओली, कोवळी ज्वारी हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. महाराष्ट्रात गावोगावी या दिवसात हुरडा पार्ट्या होतात. ताजा भाजलेला हुरडा, बरोबर दाण्याची, लसणाची, तिळाची झणझणीत तिखट चटणी, हुरड्याच्या ताटानं खायला दही-साखर, बरोबर बोरं, टहाळा (ओला हरभरा), उसाच्या गंडे-या. शिवाय डाळ-बाटीचं किंवा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, खिचडी असं जेवण. पण हे सगळं शेतात जाऊनच करायला पाहिजे तरच त्यात मजा आहे. आमच्या लहानपणी तर आम्ही बैलगाडीतून शेतात जायचो. ती मजा तर काही औरच होती.
माझ्या आईनं औरंगाबादहून हुरडा आणला होता. तो काही फारसा कोवळा नव्हता. मग मी आज तो मिक्सरमधून जाडाभरडा वाटला. त्यातले काही दाणे तसेच राहतील असा. त्यात थोडं डाळीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, लसूण-मिरचीचं वाटण, थोडंसं अख्खं जिरं, कांदा-कढीपत्ता-कोथिंबीर मिरची बारीक चिरून घातली, हळद, तिखट, मीठ घातलं आणि सगळं कालवून ठेवलंय. आता माझी मैत्रीण ऐनवेळेला त्याचे वडे तळेल. मस्त लागतात.
परवा निरंजनची, माझ्या नव-याची भाची सहकुटुंब बंगलोरहून आली होती. ती सारस्वत आहे. त्यामुळे तिनं आधीच मला सांगितलं होतं की मला तुझ्या पद्धतीचं जेवायचं आहे. मग भलेही त्यात नॉनव्हेज नसेल तरी चालेल. मी त्या दिवशी सगळा मराठवाडी स्वयंपाक केला होता. वांग्याचं दही घातलेलं भरीत, मेथीची पचडी, पालक-मेथी मुद्दा भाजी, सोलाण्यांची आमटी, तूप-जि-याची फोडणी दिलेला मठ्ठा, कोथिंबीर वडी, बाजरीची भाकरी, ठेचा, लोणी, साधा भात-वरण. शिवाय मुलांना यातलं काही आवडलं नाही तर फ्लॉवर-मटारची आणि भेंडीची अशा दोन भाज्या. गोड म्हणून सिझनल गाजर हलवा केला होता. तिला आणि तिच्या नव-याला, शिवाय मुलांनाही जेवण आवडलं म्हणून बरं वाटलं. आज मी याच सगळ्या पदार्थांच्या थोडक्यात रेसिपीज सांगणार आहे.
वांग्याचं दही घातलेलं भरीत – बिनबियांची भरताची वांगी तेलाचा हात लावून गॅसवर डायरेक्ट खमंग भाजून घ्या. गार झाल्यावर सालं काढून गर एकजीव करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. मीठ, आवडत असल्यास थोडी साखर घाला. दही घालून छान एकत्र करा. वरून तेलाची हिंग-मोहरी आणि जरा जास्त लाल तिखट घालून फोडणी करून ती ओता.
मेथीची पचडी – प्रत्येकी १ गाजर, टोमॅटो, कांदा, काकडी घ्या. अर्धा मुळा घ्या. एक लहान मेथीची जुडी फक्त पानं खुडून घ्या. मेथी धुवून बारीक चिरून घ्या. गाजर आणि मुळा किसून घ्या. कांदा आणि काकडी बारीक चिरा. टोमॅटोच्या बिया काढून बारीक चिरा. सगळं एकत्र करा. त्यात दाण्याचं कूट, साखर, मीठ, थोडं लाल तिखट घाला. वरून जरा जास्त हिंग घालून मोहरीची फोडणी द्या.
पालक-मेथी मुद्दा भाजी – ही रेसिपी आधी शेअर केलेली आहे. ब्लॉगवर ती सविस्तर मिळेल. प्रत्येकी १ जुडी पालक आणि मेथी घ्या. निवडून धुवून बारीक चिरा. लहान कुकरमध्ये १ वाटी तुरीची डाळ धुवून घाला. त्यात २ टोमॅटो आणि २-३ हिरव्या मिरच्या चिरून घाला. त्यावर भाजी घाला. हिंग आणि हळद घाला. १ वाटी पाणी घालून शिजवून घ्या. शिजल्यावर भाजी गरम असतानाच घोटा. पातळ वाटली तर थोडं डाळीचं पीठ लावा. त्यात जरा जास्त चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ घाला. कढईत घालून शिजवून घ्या. वरून लसणाचे तुकडे, शेंगदाणे, सुकी लाल मिरची, हळद, तिखट अशी झणझणीत फोडणी घाला.
सोलाण्यांची आमटी – हीही रेसिपी आधी शेअर केलेली आहे. ब्लॉगवर सविस्तर मिळेल. एका कढईत लांब चिरलेला कांदा आणि सोलाणे तोल घालून परतायला ठेवा. झाकण ठेवून मऊ होऊ द्या. त्यातच १-२ हिरव्या मिरच्या परता. सोलाणे मऊ होत आले की त्यात थोडी कोथिंबीर आणि थोडं ओलं खोबरं घाला. परत एक वाफ येऊ द्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटा. हवं तितकं पाणी घालून पातळ करा. त्यात काळा मसाला आणि मीठ घाला. वरून मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद अशी खमंग फोडणी द्या.
मठ्ठा – ताक घुसळून घ्या. त्यात आवडीनुसार आलं मिरचीच्या वाटणाचं पाणी घाला. (आलं-मिरची पाणी घालून वाटा आणि गाळणीतून पाणी गाळून घ्या. म्हणजे स्वाद येईल पण तोंडात तुकडे येणार नाहीत.), साखर, मीठ घाला. वरून तूप-जिरे-हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी घाला.
कोथिंबीर वडी – ब्लॉगवर रेसिपी सविस्तर मिळेल.
मिरचीचा ठेचा – एका कढईत थोडं तेल गरम करून त्यावर जिरं घाला. त्यात भरपूर लसूण आणि हव्या तितक्या हिरव्या मिरच्या घाला. झाकण ठेवून चांगलं परतून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून गॅस बंद करा. त्यावर थोडावेळ झाकण ठेवा म्हणजे कोथिंबीर जराशी शिजेल. नंतर मीठ घालून वाटून घ्या.
या सीझनमध्ये गाजर हलवा हेच गोड केलं जातं. कारण गाजरं उत्तम मिळतात.
गाजर हलवा – १ किलो गुलाबी गाजरं सालं काढून किसून घ्या. एका कढईत तूप गरम करा. त्यावर गाजराचा कीस घाला. झाकण ठेवून मंद आचेवर चांगली वाफ येऊ द्या. नंतर त्यात साधारणपणे १ मोठा कप दूध घाला. परत झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गाजर शिजत आलं की त्यात वेलची पावडर, काजूची जाडीभरडी पूड, बेदाणे, बदामाचे काप आणि साखर घाला. मला १ किलोला अर्धी वाटी साखर पुरली. कारण गाजरं छान गोड होती. शिवाय फार मिट्ट गाजर हलवा मला आवडत नाही. लवकर घट्ट करायचा असेल तर २ टेबलस्पून मिल्क पावडर घाला.
या सिझनमध्ये हे जेवण फार मस्त लागतं. करून बघा, कसं झालं होतं तेही कळवा. आणि फोटो काढून पाठवा.
सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.
सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा!
सायली राजाध्यक्ष
Aaaahaaaaa yummy food
LikeLike